Ad will apear here
Next
कवितेचे भाषांतर, अनुवाद, रूपांतर किंवा अनुसर्जन


लुईजे ग्लिक या अमेरिकन कवीला नोबेल पारितोषिक घोषित झाले आणि त्याच दिवशी माझ्या ओळखीच्या हिंदी आणि मराठी भाषेत लिहिणाऱ्या-बोलणाऱ्या अनेक कवींनी तिच्या काही निवडक कवितांची भाषांतरे त्यांच्या-त्यांच्या फेसबुक वॉलवर पोस्ट केलीत. त्यात हिंदीतले दोन महत्त्वाचे कवी मंगलेश डबराल आणि कुमार अंबुज यांनीही लुईजे ग्लिक हिच्या A Fantasy या कवितेची भाषांतरे पोस्ट केलीत.

मला व्यक्तिशः डबरालजींचे भाषांतर कुमार अंबुज यांच्या भाषांतरापेक्षा सरस वाटले; पण तरीही ते मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषेतील काव्य-वाक्यांचा शब्दांचा क्रम न बदलता घाई घाईत केलेले भाषांतर वाटले. खरं सांगायचे, तर डबरालजी भाषांतराचे काम फार निष्ठेने, मन लावून आणि मेहनत घेऊन करत असतात. त्यांनी केलेली यान्नीस रीत्सोस आणि अर्नेस्तो कार्देनाल यांच्या कवितांची हिंदी भाषांतरे बरीच चांगली झालेली आहेत.

विविध भारतीय भाषांतील कवितांचे विनय धारवाडकर आणि ए. के. रामानुजन यांनी इतर तब्बल सदुसष्ठ भाषांतरकारांच्या मदतीने सिद्ध केलेले Oxford India Paperbacks या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेले भाषांतरित कवितांचे संकलन The Anthology of Modern Indian Poetry हे तर माझे आवडते पुस्तक आहे. या भाषांतरकारांमध्ये सगळेच भारतीय नाहीत, तर काही ब्रिटिश, युरोपियन आणि काही अमेरिकन भाषांतरकारही आहेत. कधीही आपल्या देशातील विविध भाषांत कुणी काय चांगले लिहून ठेवले आहे, हे वाचण्याची इच्छा झाली, तर मी हे पुस्तक काढून वाचायला घेतो. Oxford India Paperbacks याच प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेले Modern Indian Poetry in English हेदेखील असेच अप्रतिम पुस्तक आहे. Bruce King या अत्यंत अभ्यासू आणि समीक्षेची आणि भाषांतराची कठोर प्रमाणके वापरणाऱ्या व्यासंगी माणसाने हा संग्रह संपादित केलेला आहे. भारतातील बहुतेक विद्यापीठांत इंग्रजी विभागांच्या अभ्यासक्रमांतही तो असावा.

हे मला सहज लिहावेसे वाटले. कारण माझ्या मनात गेले काही दिवस कवितेसंबंधी विचार करताना तिचे भाषांतर, अनुवाद, रूपांतर किंवा (आमची मैत्रीण जयश्री हरी जोशी फार आग्रहपूर्वक वापरते ती संज्ञा) अनुसर्जन यासंबंधी काहीएक विचार मनात येत होते आणि ते लिहून काढले पाहिजे, असेही वाटत होते.

सर्वप्रथम भाषांतराच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी या वेगवेगळ्या संज्ञा आपण का वापरतो, हे समजून घ्यायला हवे. प्रत्येक संज्ञेची काहीएक व्याख्या भाषांतर शास्त्राच्या क्रमिक पुस्तकात नक्कीच असेल. त्या सगळ्या व्याख्यांचा अभ्यास करून आपण करतो त्याला भाषांतर म्हणायचे, रूपांतर म्हणायचे, अनुवाद म्हणायचे की अनुसर्जन, हे प्रत्येकाने स्वतःशी ठरवून घ्यायला हवे आणि आपले काम कुठेही प्रकाशित स्वरूपात आणताना ते नेमके काय आहे, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे.

फार जुने सांगत बसण्याची इच्छा नाही. जुन्या पिढीतले प्रतिभावान लेखक, समीक्षक आणि भाषांतरकार विलास सारंग यांनी त्यांच्या ‘भाषांतर आणि भाषा’ या पुस्तकात ते बऱ्यापैकी विस्ताराने सांगून ठेवले आहे आणि त्यापेक्षा जास्त विस्तार माझ्या औकातीच्या पलीकडला आहे. परंतु गेली काही वर्षे इतर भारतीय भाषांतून, तसेच जगातील इतर भाषांतून मराठी भाषेत भाषांतरित होऊन आलेल्या पुस्तकांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली दिसते. कवितेतला माणूस असल्याने कवितेपुरते सांगायचे झाल्यास इतर भाषांतून मराठीत भाषांतरित होऊन आलेल्या कवितांच्या भाषांतराच्या दर्जाबद्दल माझ्या मनात एक कायम असमाधान असते. कदाचित माझाच काही दोष असेल किंवा माझेच भाषांतराबद्दलचे विचार चुकीच्या गृहीतकांवर आधारित असतील किंवा ती भाषांतरे समजून घेण्याची माझीच क्षमता कमी असेल. काहीही असले तरी मनात असमाधान असते, हे मात्र खरे आणि काही दोष, चुका तर अक्षम्य म्हणाव्या अशाच असतात.

काही गोष्टींबद्दल फारसा आग्रह धरता येत नाही. कारण त्यांचे प्रमाणीकरण झालेले नाही. उदाहरणार्थ, परदेशी लेखक/कवींची नावे. उदाहरणार्थ Louise Glück हिचेच नाव. लुईस, लुइस, लूईस, लूइस, लुईज असे अनेक पर्याय मराठी आणि हिंदी भाषिक लेखक/कवींनी वापरलेले दिसले आणि मग कुणी तरी त्यावर प्रकाश टाकून तिचे नाव लुईजे ग्लिक असे लिहावे, असे मार्गदर्शन केले. (हेसुद्धा चूक असण्याची शक्यता मी नाकारीत नाही.) हिंदी भाषिक लोक लंडनला लंदन असे लिहितात. कुमार अंबुज यांनी अशीच अडचण ब्रेष्ट/ब्रेख्त, मार्खेज/मार्क्वेज, बोर्खेज/बोर्खेस/बोर्हेज इत्यादी नावांच्या संदर्भात उपस्थित होते, हे दाखवून दिले. या संदर्भात आंतरजालावर अमुक एका शब्दाचा उच्चार कसा करावा, याचे केलेले मार्गदर्शन उपलब्ध असते. परंतु त्यातही काही वेळा अनेक पर्याय दिसून येतात; पण तरीही त्यांचा वापर करून बघायला हरकत नसते. एखाद्या अधिकारी संस्थेने या नावांचे प्रमाणीकरण करण्याची गरज आहे. तेव्हा हा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवू या.

दुसरी एक मोठी अडचण मला स्वतःला जाणवते ती पाश्चात्य परंपरेतून मराठीत आणलेल्या संज्ञांची. उदाहरणार्थ मानसशास्त्रातील Collective Unconscious या संज्ञेसाठी आ. रा. भा. पाटणकर, आ. म. सु. पाटील, आ. गंगाधर पाटील यांच्यासारखे व्यासंगी समीक्षक सामूहिक अंतर्मन/सामूहिक अचेतन/सामूहिक नेणीव इत्यादी स्वतःचे प्रतिशब्द योजतात आणि त्यांचे प्रमाणीकरण करत नाहीत, तेव्हा अडचण निर्माण होते. महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

परंतु कवितांचे भाषांतर करताना मूळ संहिता, संहितेतील शब्दांची विशिष्ट निवड, शब्दांचा भाषेच्या वळणानुसार लावलेला अनुक्रम, वाक्यांशांचा विशिष्ट अर्थ निश्चित व्हावा किंवा होऊ नये म्हणून कवीने योजिलेला अनुक्रम याकडे भाषांतरकाराने लक्ष देणे आवश्यक असते; पण या बाबतीत अक्षम्य असे स्वातंत्र्य घेतले जाते. अनेकदा एखादी ओळ किंवा शब्द दुसऱ्या भाषेत आणताना ओळी खालच्या वर किंवा वरच्या खालीही कराव्या लागू शकतात. कारण इंग्रजीतली कर्ता, कर्म आणि क्रियापदाची योजना मराठी किंवा हिंदीत नेमकी उलटी असण्याची शक्यता असते. याकडे लक्ष न देता अनेकदा शब्दाला शब्द तरी वापरला जातो किंवा मूळ संहितेत मुळीच अभिप्रेत नसलेले भरीचे शब्द वापरले जातात. हे अक्षम्य आहे.

विलास सारंग यांचे वर उल्लेख केले ‘भाषांतर आणि भाषा’ हे पुस्तक मराठीत भाषांतराचे काम करणाऱ्या सगळ्याच कवी/लेखकांनी अवश्य वाचले पाहिजे आणि वारंवार वाचून आपण त्या पुस्तकात दाखवून दिलेला चुका करत तर नाही ना किंवा त्यात आवर्जून घ्यायला सांगितलेली काळजी घेत आहोत किंवा नाही, हे पुन्हा-पुन्हा तपासून पाहिले पाहिजे. आत्ता माझ्या हातात नाही, परंतु साहित्य अकादमीने तमीळ समीक्षक, भाषांतरकार रामचंद्र रेड्डी यांचे भाषांतरशास्त्रावर एक पुस्तक प्रकाशित केले आहे. ते पुस्तकांच्या गर्दीत कुठे तरी लपलेले आहे; पण ते पुस्तक भाषांतर करणाऱ्या आणि तपासणाऱ्या सगळ्यांनीच वारंवार वाचावे, असे आहे. ते पुस्तक अनेकदा वाचून तयार झालेले हे माझे मत आहे.

भाषांतरशास्त्रावर जागतिक वाङ्मयात अनेक अधिकारी मंडळींची पुस्तके उपलब्ध आहेत आणि साहित्य विषय घेऊन एमए करणाऱ्या विद्यार्थ्यांना ती अभ्यासक्रमात असतीलही. परंतु हे शिक्षण न घेतलेली अनेक मंडळी भाषांतराचे काम उत्साहाने करीत आहेत. त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो; पण त्याला अभ्यासाची जोड नसते. अनेकांचा असाही एक तर्क असतो, की भाषांतरांतून मूळ कविता लिहिणाऱ्या कवीची जुजबी ओळख तरी होते ना. तेवढी पुरे. मला हा तर्क फारसा रुचत नाही. कविता काय किंवा कुठलाही साहित्यप्रकार हा केवळ आशय घेऊन जन्माला येत नाही. त्याला स्वतःचा एक आकार असतो, त्याचे एक रूप असते, उपलब्ध भाषेंतर्गत कवी/लेखक स्वतःची एक शैलीसुद्धा निर्माण करत असतो. या सगळ्या गोष्टींचा मिळून एक फॉर्म तयार होतो. कवितेच्या संदर्भात आपण त्याला रूपबंध म्हणतो. या सगळ्या गोष्टींना काहीच महत्त्व नाही काय? आशयासाठी फॉर्मचा, शैलीचा, व्याकरणाचा सगळ्यांचा बळी दिला तरी चालेल; पण केवळ आशय तेवढा वाचकापर्यंत पोचवणे, हेच भाषांतरकाराचे काम आहे काय?

विलास सारंगांनी तर विरामचिन्हांच्या ढिसाळ वापरामुळे भाषांतरांवर कसा परिणाम होतो, हे सोदाहरण दाखवून दिलेले आहे. त्यांनी याकरिता हेमिंग्वेच्या ‘The old man and the sea’ या कादंबरीचे पु. ल. देशपांडे यांनी केलेल्या ‘एका कोळियाने’ या भाषांतराचे उदाहरणच दिले आहे.

‘हेमिंग्वेच्या मूळ कादंबरीत फक्त दोन उद्गारवाचके आढळतात. उलट भाषांतरात मुक्तहस्ताने उद्गारवाचकांची उधळण केली आहे. कधी कधी ‘पुलं’नी लागोपाठ दोन उद्गारवाचके ठेवलेली आहेत...’

‘या भाषांतराचा मूळचा संपूर्ण सूर बदलून गेला आहे. हेमिंग्वेच्या कादंबरीत मंद स्वर हा निवेदनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हेमिंग्वे तटस्थतेचा, तसेच शांततेचा भाव सलगपणे राखतो. वाचकाला चकित करण्याच्या, प्रसंग नाट्यमय करण्याच्या आणि बोलीभाषेची गंमत आणण्याच्या इच्छेने देशपांडे वरील गुणधर्म जणू उडवून लावतात.’

सारंगांचे हे निरीक्षण महत्त्वाचे नाही काय?

या पुस्तकातील ‘लिंग आणि पुरुष’ आणि ‘अ’ आणि ‘द’ ही दोन प्रकरणे तर मुळातून वाचावीत अशीच आहेत.

माझा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू अशा चार भाषांशी परिचय आहे. पैकी कोणत्याही भाषेवर माझे प्रभुत्व नाही. मराठी आणि हिंदी भाषेच्या व्याकरणाशी माझा जुजबी परिचय आहे आणि उर्दू तर त्या भाषेतून लिहिले गेलेले साहित्य कळावे यासाठी मी जो प्रयत्नपूर्वक अगदी प्राथमिक स्वरूपाचे भाषाज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला तेवढीच कळते. माझे शिक्षण इंग्रजी भाषेतूनच झाले आणि पत्रकारितेच्या तेवीस वर्षांच्या नोकरीपैकी सलग अठरा वर्षे मी इंग्रजी वर्तमानपत्रांसाठीच काम केले. सात वर्षांपूर्वी पत्रकारिता सोडून दिल्यानंतर आजपर्यंत उदरनिर्वाहासाठी मी इंग्रजी भाषेवरच अवलंबून आहे. परंतु मी प्रयत्नपूर्वक माझे लिखाण मराठी भाषेतच करायचे, हे ठरविले होते आणि आजवर ते स्वतःला दिलेले वाचन पळत आहे. त्यासाठी मी व्याकरणाचे नियम व इतर गोष्टी शिकून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.

मला स्वतःला कोणतीही भाषा प्रभावीपणे वापरता येत नाही, याचे मला कमालीचे वाईट वाटते; पण मी काही मराठी भाषेचा अभ्यास केलेला नाही. माझे माझ्या मातृभाषेत शिक्षण झालेले नाही. मी काही प्रस्थापित कवी किंवा लेखकही नाही. मी या चारही भाषांत बऱ्यापैकी वाचन करणारा एक वाचक आहे. परंतु या भाषेत काम करणाऱ्या कवींनी, लेखकांनी, भाषांतरकारांनी भाषेबद्दल सजग राहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करणे चूक आहे काय? मी तेवढीच अपेक्षा व्यक्त करतो.

- गणेश कनाटे
(ज्येष्ठ पत्रकार)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WWNSCR
Similar Posts
‘बाईपण’ समजून घेताना... गुणी कवी योजना यादव हिच्या एका कवितेच्या शेवटच्या ओळी आहेत - किंबहुना बाईच व्हावं लागतं बाईच्या पुढ्यात यावर प्रतिक्रिया देताना गुणी, चिकित्सक आणि अभ्यासू मेघना भुस्कुटेने ‘What is बाईपण?’ असा प्रश्न उपस्थित केला आणि योजनाच्या कवितेवर प्रतिक्रिया देताना मेघना, योजना आणि संहिता अदिती जोशी यांच्यात
भाषेचे जगणे-मरणे... एका ज्येष्ठ पत्रकार मित्राची ‘अचूक मराठी’वरील एक नोंद वाचली आणि त्यांची तळमळ अस्वस्थ करून गेली. मराठीच्या चिंधड्या उडविण्याची स्पर्धा स्वजनांकडूनच सुरू असून माध्यमे - विशेषत: चित्रवाणी माध्यमे - त्या स्पर्धेत हिरीरीने उतरलेली दिसतात. त्या नोंदीमुळे मग एक स्वगत-चिंतन-होऊन गेले. सहज वाटलं, हा तर अपरिहार्य बदलाचा प्रभाव आहे
अनुवाद क्षेत्राचे भवितव्य ‘एकेकाळी उपेक्षित असलेला ‘अनुवाद’ हा साहित्यप्रकार आज लोकप्रिय आणि आघाडीला आहे. जग एक ‘ग्लोबल व्हिलेज’ झाल्यानंतर आणि फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप यांसारखी माध्यमे विलक्षण वेगाने वापरात येत असताना ते अपरिहार्य आहे. त्यामुळे ‘अनुवादाचे भवितव्य काय,’ याचे उत्तर ‘अनुवादालाच भवितव्य’ असे द्यावे लागेल....’
तुमचा अनुग्रहो गणेशु... श्रीगणेशाची कृपा म्हणजे काय हे सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीतील पाच ओव्या आणि त्या ओव्यांतील शब्दरत्ने वेचण्याचा प्रयत्न करू या. आपले सद्गुरू हे प्रत्यक्ष गणेशाची विभूती आहेत असं सांगणाऱ्या या पहिल्या पाच ओव्या! सद्गुरू निवृत्तीनाथांचं वर्णन करताना माउलींच्या वाग्वैभवाला नेहमीच उधाणाची भरती यावी तसं झालंय.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language