डहाणू (पालघर) : डहाणू येथील बाहारे आणि जामशेत, सावरपाडा शाळेतील सहावी, सातवी आणि आठवी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथे १९ जुलै रोजी ‘विज्ञान एक्सप्रेस’ला भेट दिली.
पालघर जिल्हा परिषद आणि रोशनी फाउंडेशन यांनी ही शैक्षणिक सहल आयोजित केली होती. ही विज्ञान विशेष गाडी भारतभर भ्रमण करत असून, विद्यार्थ्यांचे आकर्षण ठरत आहे. ५० विद्यार्थी व पाच शिक्षक यांनी हा अनुभव घेतला.
या वेळी विद्यार्थ्यांना गेट ऑफ इंडिया, मंत्रालय, मत्स्यालय, वरळी सी लिंक आदी ठिकाणेदेखील दाखविण्यात आली. हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.
रोशनी फाउंडेशनच्या गीताबेन मुछाला, संजीव मुछाला यांनी पुढाकार घेऊन केलेल्या सहकार्याबद्दल, पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.