मुंबई : शूरवीर मराठा योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावरील तान्हाजी : द अनसंग वॉरीयर हा चित्रपट आता मराठी भाषेतही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, संपूर्ण महाराष्ट्रात दहा जानेवारी २०२० रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
अजय देवगण आणि काजोल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या हिंदी आणि मराठीतील चित्रपटाची निर्मिती अजय देवगणच्या ‘एडीएफ’ आणि भूषण कुमारच्या ‘टी-सिरीज’ने केली आहे. दिग्दर्शनाची धुरा ओम राऊत याने सांभाळली आहे.
मराठी आवृत्तीविषयी बोलताना काजोल म्हणाली, ‘मला ही महाराष्ट्रीय व्यक्तिरेखा निभावणे प्रचंड भावले. मी आजीच्या, पणजीच्या मायेखाली लहानाची मोठी झाले. मी त्यांना पाहायचे. मी माझा स्वत:चा भूतकाळ जगले, असे वाटते. मी माझ्या आईच्या साड्या नेसून बालपणीचा खेळ खेळतेय असेच वाटले. मी प्रचंड प्रेमात पडले. मला संधी मिळाली, तर मी रेड कार्पेटवरदेखील नऊवारी साडी नेसून जाईन! सावित्री ही व्यक्तिरेखा कणखर आणि अफलातून आहे. माझ्यात तिच्यातले करारीपण चपखल उतरले. मी तिच्या रुबाबाच्या प्रेमात आहे.’