Ad will apear here
Next
संतांनी केलेल्या बंडखोरीकडे आजच्या साहित्यिकांनी पाहावे : डॉ. अरुणा ढेरे


रत्नागिरी :
‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सर्वांत मोठी बंडखोरी कोणी केली असेल, तर ती संतांनी आणि तीसुद्धा कोणत्याही प्रकारचा झेंडा न नाचवता! गीता शूद्रांपर्यंत पोहोचवणे ही बंडखोरीच होती. या संतकालीन बंडखोरीकडे नव्या साहित्यिकांनी पाहिले पाहिजे,’ असे प्रतिपादन ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा व ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांनी केले. 

कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालय, शहर वाचनालय आणि अभ्यंकर ग्रंथालय यांच्या वतीने नुकताच त्यांचा सत्कार व मुलाखत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या. रत्नागिरीतील राणी लक्ष्मीबाई सभागृहात साहित्यप्रेमी आणि रसिक वाचकांच्या मोठ्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘कोमसाप’च्या नमिता कीर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर चारही संस्थांच्या वतीने डॉ. अरुणा ढेरे यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुरेश जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना स्वामी स्वरूपानंद लिखित अभंग ज्ञानेश्वरी, शाल-श्रीफळ, आविष्कार संस्थेच्या मुलांनी तयार केलेला गुच्छ व अत्तराची कुपी असलेले सोनचाफ्याचे फूल देण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक डॉ. सुरेश जोशी म्हणाले, ‘स्त्रीचा सन्मान लेखनातून करण्याचे काम अरुणाताईंनी केले आहे. वाचकांना पुढे नेण्याची ताकद त्यांच्या लेखनात आहे. त्यांच्या भाषेत गोडवा आहे. सकारात्मक जगणे-वागणे महत्त्वाचे असून संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणे, ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे.’



प्राध्यापिका जयश्री बर्वे व विनय परांजपे यांनी अरुणा ढेरे यांची मुलाखत घेतली. या वेळी अरुणा ढेरे म्हणाल्या, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सर्वांत मोठी बंडखोरी संतांनी केली. त्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचा झेंडा नाचवला नाही! स्वातंत्र्य मागून मिळत नाही, त्यासाठी गटा-तटाची, द्वेषाची किंमत मोजावी लागते. गीता शूद्रांपर्यंत पोहोचवणे, ही बंडखोरीच होती. दुर्बोधता टाळून ‘अणुरणियां थोकडा, तुका आकाशाएवढा’ हा अवघड आशय संतच सोप्या शब्दांत देऊ शकले. या संतांनी केलेल्या बंडखोरीकडे नव्या साहित्यिकांनी पाहिले पाहिजे.

अभिव्यक्ती स्वातत्र्यांच्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, ‘मराठी साहित्य संमेलनात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा विशिष्ट राजकीय संदर्भात सुरू झाली. त्याला खूप मोठे सामाजिक परिमाण मिळाले. असहिष्णुता सगळ्या बाजूंनी वाढते आहे. त्याचा निषेध प्रत्येक साहित्यिकाने करायला हवा. लेखिका म्हणून नयनतारा सेहगल काय लिहितात, याची कल्पना नसताना एक वादळ निर्माण झाले. ही चुकीची गोष्ट आहे. नयनतारा या स्वतंत्र भूमिका मांडणाऱ्या लेखिका आहेत. त्यांना निमंत्रित केल्यानंतर त्यांना येऊ नका, असे म्हणणे, ही गोष्ट चुकीची होती. त्यांच्या भाषणावर, साहित्यावर उलटसुलट चर्चा होणे, हे नंतरही घडलेले नाही. मग कशासाठी विरोध केला गेला..?’ 

‘या निमित्ताने आपापले छुपे अजेंडे पुढे आणणाऱ्या माणसांनी आपण समाजापुढे काय न्यायचे आहे, याचा विवेकबुद्धीने विचार करायला हवा,’ असे खडे बोल त्यांनी राजकारण्यांना सुनावले.

चारही संस्थांचे कौतुक!
‘एके काळी साहित्यिकाचा शब्द एखाद्या मंत्रासारखा मानला जायचा. आज साहित्यिकांनी स्वत:लाच अनेक बाबतींत बाजारात उभे केले आहे. आपण विक्रेय वस्तू झाल्याची अवस्था अनेक साहित्यिकांची झाली आहे. त्यामुळे साहित्यिकांकडे कुणीही बोट दाखवू लागले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार साहित्यिक आहेच, शिवाय समाजही आहे. सगळ्यांनी मिळून साहित्यविश्व कसे असावे, याचा पुनर्विचार केला पाहिजे. आपण मिळून चांगल्या साहित्य संस्कृतीची घडण केली पाहिजे. ती जबाबदारी वाचक, साहित्यिक, प्रकाशक, ग्रंथालये या सर्वांची आहे. समाजात इतकी फुटीरता आहे, इतके भेदाभेद आहेत. तरीही ज्या चार संस्था एकत्र आल्या, आणि हा कार्यक्रम केला त्याचा आनंद खूप मोठा आहे. असे चांगल्या गोष्टीसाठी एकत्र येणे घडले पाहिजे,’ असे गौरवोद्गार अरुणाताई ढेरे यांनी काढले.

कार्यक्रमासाठी व्यासपीठावर ‘कोमसाप’च्या नमिता कीर, जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, शहर वाचनालयाच्या अध्यक्षा मोहिनी पटवर्धन, कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालयाचे अध्यक्ष मधुसूदन बोरसुतकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुरेश जोशी होते. कार्यक्रमाला श्रीकृष्ण साबणे, बापटकाका, प्रा. निधी पटवर्धन, कवयित्री वैशाली हळबे, प्रसाद घाणेकर, विवेक भावे, दाक्षायणी बोपर्डेकर, श्री. देवळेकर यांच्यासह रसिक, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(डॉ. अरुणा ढेरे यांनी साहित्य संमेलनात केलेले अध्यक्षीय भाषण ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. डॉ. अरुणा ढेरे यांची पुस्तके बुकगंगा डॉट कॉमवरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZTVCH
Similar Posts
मातीच्या आड गेलेले लढवय्ये हेच स्फूर्तीचे झरे चिपळूण : ‘मातीच्या आड गेलेले लढवय्ये, हेच स्फूर्तीचे खरे झरे आहेत. लेखक त्यातील माती आणि वाळू बाजूला करतो आणि रत्न सादर करतो,’ अशा शब्दांत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी ऐतिहासिक कादंबरीलेखनामागची आपली भूमिका स्पष्ट केली. ‘पानिपत’सह संभाजी, पांगिरा, झाडाझडती इत्यादी कादंबऱ्यांचा लेखनप्रवास चिपळुणात
डिजिटल पुस्तके म्हणजे प्रकाशनाच्या क्षेत्रातील संकट नसून संधी : अनिल मेहता चिपळूण : ‘नव्या माध्यमांच्या वापरातून आपले मन सुसंस्कृत करणे ही प्रत्येकाची गरज आहे. सुसंस्कृत मने तयार करण्यात पुस्तकांचा आणि पर्यायाने प्रकाशकांचा वाटा मोलाचा असतो. त्यामुळे नव्या युगातील डिजिटल पुस्तके म्हणजे प्रकाशनाच्या क्षेत्रातील संकट नसून संधी आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांनी २८ डिसेंबर २०१९ रोजी चिपळुणात व्यक्त केले
ग्रंथालय मान्यतेवरील बंदी उठवणार रत्नागिरी : ‘नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये असा निर्णय शासनाने २०१२ साली घेतला होता. तो बदलून आता नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचे काम सुरू करण्यात येईल,’ असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित करण्यात
‘मराठीच्या समृद्धीसाठी व्हावीत छोटी साहित्य संमेलने’ रत्नागिरीतील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी मराठी भाषेच्या वृद्धीसाठी छोट्या-छोट्या साहित्य संमेलनांची भूमिका स्पष्ट केली. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language