जहाजाचा कप्तान इतर सगळ्यांच्या मानानं धिप्पाड, उंचापुरा होता. पण त्याला थोडं कमी ऐकू यायचं आणि दूरवरचं दिसायचं नाही. आपल्या अधू दृष्टीला झेपेल इतकंच त्याला जहाज चालवण्याचं ज्ञान होतं.
जहाजातल्या अनेक प्रवाशांकडे जहाज चालवायचं कौशल्य नसलं तरी त्यांना जहाजाचा कप्तान व्हायचं होतं. बरं कप्तानपदाचा दावा करताना, “आपण जहाज चालवायला कुणाकडूनतरी शिकलो आहोत” इतपत अंगुलीनिर्देश करण्याइतका त्यांना कोणी गुरुही लाभलेला नव्हता. मुळात “जहाज चालवणं ही कला शिकवून शिकता येते” असंही त्यांच्यापैकी कुणाला वाटत नब्हतं. पण तरीही जहाजाच्या मालकाभोवती सतत गिल्ला करुन आपल्याला जहाज चालवायला द्यावं असा ते त्याच्यामागे लकडा लावत बसायचे.
आपण कप्तान व्हावं यासाठी एखाद्यानं जहाजाच्या मालकाचं मन वळवलं असा संशय आला तरी इतरजण त्या मन वळवणाऱ्याला मारुन टाकून समुद्रात फेकून द्यायचे.
कधीकधी ते जहाजाच्या मालकाला अफू वगैरे देऊन गुंगवून ठेवायचे आणि जहाजाचं नियंत्रण आपल्या हातात घ्यायचे. ते तरी काय करणार? त्यांना बिचाऱ्यांना आपापली ओझी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत वाहून नेणं क्रमप्राप्त होतं.
अर्थात लोक जहाज चालवत असताना, सफर करताना जशी मौजमस्ती करतात तसंच नाचगाणं, दारु पिणं असं सगळं ते करायचे. एखाद्या माणसानं जर जहाजाच्या मालकाकडून आपल्याकडे जहाजाचं तात्पुरतं नियंत्रण राखण्यासाठी (कप्तानाला दारु पाजणं वगैरे) नवीन क्लृप्त्या शोधल्या तर ते त्याला लगेच बुध्दिमान आणि कप्तानपदाला खराखुरा लायक ही उपाधी द्यायचे. जर एखाद्याला अशी मखलाशी / क्लृप्ती जमत नसेल तर तो माणूस मात्र ताबडतोब निरुपयोगी आणि मूर्ख ठरायचा.
या सगळ्यात फक्त एकच गोष्ट जहाजावरच्या कप्तानपदासाठी इच्छुक असणाऱ्या लोकांच्या विचारांच्या कक्षेत बसत नव्हती. ती म्हणजे, उत्तम कप्तानासाठी “इतरजणांना तो कप्तान असलेला आवडतो का आणि त्याचे अधिकार मान्य आहेत का? या गोष्टी गौण आहेत.” उलट उत्कृष्ट कप्तान व्हायचं असेल तर वर्षातले सगळे ऋतू, त्या ऋतूंमधलं बदलतं आकाश, तारे, वारे आणि त्याचा समुद्राशी असणारा संबंध तसंच जहाज चालवण्याशी संबंधित अनेक गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. पण उत्तम कप्तान होण्यासाठी या म्हणजे आकाश, ताऱ्यांची दिशा इ. गोष्टी महत्वाच्या आहेत असंच अनेकजणांना वाटत नव्हतं. त्यांच्या दृष्टिकोनातून मग त्या गोष्टी जाणणारा माणूस हा निव्वळ खगोलप्रेमी, पर्यावरणप्रेमी किंवा निरुपयोगी ठरू शकतोच ना?
ही आहे “शिप आॉफ फूल्स” ही प्लेटोनं सांगितलेली रुपककथा. राजकारणरुपी नावेत ज्ञान या गोष्टीला महत्व नसताना कोणतंही विशेषत: लोकशाही तत्वावरचं सरकार चालत असेल तर त्या सरकारची अवस्था या रुपककथेतून प्लेटोला मांडायची होती.
स्थलांतरित मजुरांचे रोजचे आक्रोश, वणवण, असहाय्यता, आक्रंदन, हलाखी, भीषण दारिद्र्य, होरपळ, तगमग पाहून प्लेटोचं हे रुपक आठवलं..
आणि बा. सी. मर्ढेकर यांची ही कविताही आठवली..
मोलें धाडी जो मराया, नाही आसूं नाही माया
त्यासी नेता बनवावे, आम्हा मेंढरांस ठावे
- नीलांबरी जोशी