डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर यांनी लिहिलेल्या ‘राजमाता जिजाऊसाहेब’ या लेखमालेचा २४वा भाग............
शहाजीराजांच्या निधनाचा शोक आवरून मायलेकरे पुन्हा आपल्या कामास लागली. पुत्राच्या हालचालीवर माऊली सतत लक्ष देत असत. छत्रपती शिवाजीराजांना घरातले विश्वासाचे वडीलधारे माणूस म्हणजे एक जिजामाताच होत्या. राजे वयाने व कर्तृत्वाने मोठे झाले खरे; पण मातेच्या दृष्टीने ते शिवबाच होते. वैधव्याचे दारुण दुःख गिळून ती वृद्ध माऊली पुत्राचा वाढता पराक्रम आणि वैभव पाहण्यासाठी जगली होती. आपला मुलगा साहसी, शूर, मुत्सद्दी आहे व संकटे ओढवून घेणार आहे हे माहीत असूनही त्या आपल्या पराक्रमी पुत्राचा राज्यकारभार पाहण्यासाठी, पुत्राच्या हट्टापायी सती जाण्यापासून स्वतःला सावरून होत्या. आपल्या मुलाचा जीवनक्रम संकटमय, धावपळीचा आहे याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. शिवरायांना आता केवळ आदिलशाही व मुघली सत्तांशीच झगडायचे नव्हते, तर परकीय डच, पोर्तुगीज इंग्रजांच्या हालचालींचाही बंदोबस्त करावयाचा होता. या सर्वांनी राजांना उसंत म्हणून लाभू दिली नाही.
शहाजीराजांच्या निधनानंतर दोन-चार महिन्यांनी आदिलशाही सरदार खवासखान पूर्वीचा तह विसरून महाराजांच्या मुलखावर चालून आला. बाजी घोरपडे व सावंत हेही त्यांच्याबरोबर होते. जिजामातेला खवासखानाच्या स्वारीची बातमी मिळताच त्यांनी तातडीने महाराजांना पत्र देऊन इशारा दिला व त्यांचे पारिपत्य करण्याचा मनोदय व्यक्त केला. मातोश्रींचा हा इशारा व मनोदय महाराजांनी अर्थातच पुरा केला.
आपल्या वडिलांस कैद करणाऱ्या बाजी घोरपड्यास मुधोळला गाठून त्याचा प्रांत लुटून महाराजांनी लढाईत त्यास ठार मारले. खवासखान पळून गेला. सावंतास पळता भुई थोडी होऊन त्याने गोवेकरांचा आश्रय घेतला. महाराजांनी पाठलाग करून त्यास शेवटी तह करण्यास भाग पाडले.
औरंगजेबाने १६६५ साली शिवाजीराजांवर प्रचंड मोहीम काढली. त्यामुळे राजांचा विस्तारलेला हा वटवृक्ष उन्मळून पडणार की काय, अशी भीती वाटू लागली. दिलेरखान मुघल दरबारात विडे उचलून महाराष्ट्रात वेगाने चालून आला. महाराजांच्या मानाने दिलेरखानाचे सामर्थ्य खूप मोठे होते. त्यांनी झपाट्याने महाराजांचे मुलूख ताब्यात घेऊन त्यांची नाकाबंदी केली. दिलेरखानाने संपूर्ण स्वराज्याला वेढा घातला. या सर्वांच्या हातून शिवाजीराजांचा पराभव होत नाही हे बघून औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंह यांना शिवाजीराजांवर चालून जाण्याची आज्ञा केली. शिवाजीराजांनी सुरत शहराचा नाश करून, मक्केस जाणारी मुसलमान यात्रेकरूंची जहाजे लुटली, हे प्रकार पाहून बादशहा अत्यंत चिंतातुर झाला. स्वतः शिवाजीराजांवर चालून जाण्याचे धाडस न करता त्याने राजे जयसिंग व दिलेरखान या दोन सरदारांस शिवाजीराजांना पकडून आणण्याची आज्ञा केली. दोघेही पराक्रमी सरदार होते. राजा जयसिंहास अपयश कधीच माहीत नव्हते. मिर्झाराजे हे उत्कृष्ट योद्धा व कसलेले शूर सेनानी होते. त्याचबरोबर ते अत्यंत धूर्त, कावेबाज आणि पाताळयंत्री होते. मिर्झाराजे हिंदू असल्याने शंकेखोर औरंगजेबाने दिलेरखानाला मुद्दाम त्यांच्यासोबत पाठवले.
पुण्यात आल्यावर जयसिंहाने विचार करून मनाशी दुसराही एक मुत्सद्दी कावा ठरविला. शिवाजीराजांना निरोप पाठवला, की तुम्ही बादशहाला शरण याल तर तुमचे सर्व प्रकारे कल्याण होऊन वैभव वाढेल. आमच्या मध्यस्थीने तुमची बादशहाशी इतमानाने भेट होईल. आपण दोघेही हिंदूधर्मीय आहोत. यात कोणताही कपटभाव एकमेकांशी ठेवू नये. मी म्हणतो यास परमेश्वर साक्ष आहे. राजा जयसिंहाने दिलेरखानाला घेऊन पुरंदरास वेढा घातला.
पुण्यास आल्यापासून महाराजांच्या प्रदेशात ठिकठिकाणी मजबूत ठाणी करणे व सैन्याच्या तुकड्या पाठवून महाराजांची खेडी बेचिराख करणे हा उद्योग जयसिंहाने मोठ्या जोमाने चालू ठेवला होता.
१४ मार्च १६६५ रोजी राजा जयसिंहाने मोठ्या जोमाने पुणे सोडले व पुरंदरच्या पायथ्यापर्यंत धडक मारली. तेव्हा मराठे चालून आले व मोठी चकमक उडवून दिली. पुरंदर किल्ला तसा अवघड होता. त्यात पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी देशपांडे शर्थीने लढणारा स्वामीनिष्ठ सेवक होता. त्यामुळे पुरंदर जिंकणे मोठे जिकिरीचे काम होते. दिलेरखानाने पुरंदरभोवती वेढा टाकून फास आवळला. किल्ल्यावर तोफांचा भडिमार चालू केला. मुरारबाजीने निकराचा प्रतिकार केला. मराठा सैन्यापेक्षा पठाणांची संख्या जास्त होती. त्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी खंदक खोदला व त्यात सुरुंग पेरून तो ऊडवला. त्यामुळे किल्ल्याचे दोन बुरुज उद्ध्वस्त झाले. तरीही मुरारबाजीने जिद्द सोडली नाही. लढत लढत मरावे या न्यायाने किल्ल्याचा दरवाजा उघडून ते आपल्या सैन्यासह दिलेरखानाच्या पठाणांवर तुटून पडले. अनेक पठाणांना त्यांनी स्वर्गात पाठवले. मुरारबाजी लढतच होते; पण शेवटी लढता-लढता त्यांनी स्वराज्यासाठी मरणाला मिठी मारली.
मुरारबाजींच्या मृत्यूची बातमी समजताच शिवाजीराजांनी पुरंदरवरील सैन्याचे व आपल्या रयतेचे प्राण वाचवण्यासाठी किल्ला मिर्झाराजेंच्या स्वाधीन करून वाटाघाटीचे बोलणे केले. स्वराज्य राखण्यासाठी युक्तीची लढाई खेळणे राजांना भाग होते. हे संकट टाळण्यासाठी राजाने विजापूरच्या आदिलशहाशी संधान बांधले. याची बातमी मिर्झाराजे जयसिंहाला लागली. अफजलखान व शाहिस्तेखानासारखी आपली अवस्था होऊ नये म्हणून जयसिंहराजे यांनी घाबरून तहाची बोलणी सुरू केली. शिवाजीराजांनी स्व-संरक्षणाची हमी घेऊन मिर्झाराजांच्या छावणीत जाऊन त्यांची भेट घेतली व तहाच्या अटीवर चर्चा केली. तहाच्या अटी महाराजांना मान्य नव्हत्या. परंतु नाईलाजास्तव त्या स्वीकाराव्या लागल्या.
या अटी अत्यंत त्रासदायक होत्या. परंतु राजांच्या पुढे पर्यायच नव्हता. मोठ्या पराक्रमाने मिळवलेल्या मुलखातील पाचपैकी चार हिश्श्यांच्या स्वराज्याचे दान या तहात मोठ्या नाईलाजाने करावे लागले. राजे अजिबात डगमगले नाहीत. जिजाऊंच्या संस्कारामुळे राजे नाउमेद झाले नाहीत. राजे प्रचंड आशावादी होते. गेलेले किल्ले आणि मुलूख परत मिळवता येईल हा आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये कायम होता. या तहामुळे कमीपणा, नामुष्की वाटत असली, तरी त्यातच आपल्या भविष्यकाळाचे बीज आहे हे शिवाजीराजांना चांगलेच माहीत होते. त्यांना निमूटपणे मुघलांचे मांडलिकत्व पत्करावे लागले.
तह झाल्यानंतर शिवाजीराजे मोहिमेवर निघण्यापूर्वी राजांच्या नावे आलेल्या शाही फर्मानाचा स्वीकार करण्यासाठी येण्याची सूचना मिर्झाराजांनी राजगडावर पाठवली. त्यावेळी राजे राजगडावर हजर नव्हते. शंभूराजे जिजाऊंसोबत गडावर होते. जिजाऊंनी शंभूराजांना राजा जयसिंहाकडे पाठवण्याची व्यवस्था केली आणि तसा राजांकडे निरोप पाठवला. शंभूराजे यांनी मिर्झाराजे जयसिंह यांच्या छावणीत जाऊन मुस्लिम दरबारी रिवाजानुसार शाही फर्मानाचा स्वीकार केला. शंभूराजांना मानाचा पोशाख, रूप्याचा साज चढविलेला हत्ती देऊन मिर्झाराजे जयसिंहाने त्यांचा गौरव केला. संभाजीराजे मुघलांचे पंचहजारी मनसबदार झाले.
मुघलांचे फर्मान स्वीकारल्यानंतर शंभूराजे रायगडावर परतले. शिवाजीराजांनी पुरंदरच्या तहानुसार तेवीस किल्ले मुघलांना दिले. तेरा किल्ले महाराजांकडे राहिले. स्वराज्यस्थापनेचे स्वप्न भंग पावले होते. परंतु आऊसाहेबांची जिद्द कायम होती. जिजाऊसाहेब न डगमगता न खचता शिवाजीराजांना कायमच धीर देत होत्या. राजांना सावरण्याचे काम फक्त एकट्या आऊसाहेबच करत होत्या. शिवाजीराजांना फक्त आपल्या आईचाच आधार होता. पुरंदरचा तह म्हणजे स्वराज्य संपवणारीच घटना होती.
युवराज शंभूराजांनीसुद्धा आपल्यावर आलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली. जिजाऊंनी पुरंदरच्या अपमानास्पद तहानंतरही आपला धीर खचू दिला नाही. पुढील राज्यकारभाराकरीता जिजाऊंनी परत राजांना तयार केले. यावरून जिजाऊंच्या राज्यकारभारास आवश्यक अशा धीरगंभीर वृत्तीचा परिचय होतो. आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याची गरज म्हणून जिजाऊ व शिवराय यांनी या मनसबदारीला मान्यता दिली. तरीही कोणत्याही परिस्थितीला न डगमगता जिजाऊ व शिवरायांनी नवे डावपेच आखणे सुरू केले. मिर्झाराजांची स्वारी म्हणजे मराठ्यांच्या स्वराज्यावर आलेले एक मोठे संकट होते. महाराजांनी या संकटाला आपल्या सर्व शक्तीनिशी तोंड दिले. जेव्हा निरूपाय झाला तेव्हा त्यांनी शरणागती स्वीकारली आणि पुरंदरचा तह मान्य केला होता.
पन्हाळ्याच्या तहानंतर आऊसाहेबांच्या मनाची घालमेल सुरू झाली. कारण मिर्झाराजांनी काहीच शिल्लक ठेवले नव्हते. पुरंदरच्या तहाने जिजाऊंचे हृदय फाटून गेले होते. डोळ्यातले अश्रू जिथल्या तिथे थिजले होते. त्यांच्या मनाची घालमेल सुरू होती. जिजाऊ म्हणतात, स्वारी गेली, तेव्हा आम्ही सती जात होतो; पण तुम्ही आडवे आलात, पाय शिवलेत. म्हणालात, माँसाहेब तुम्ही जाऊ नका. आमचा पराक्रम पाहायला कोणी उरले नाही. स्वराज्याची स्थापना आम्ही करीत नाही तोवर आम्ही प्रतिज्ञेला बद्ध आहोत. विसरलात ते राजे? शब्दांना मोल नसेल, तर ते उच्चारू नयेत. हाच तो पराक्रम दाखवण्याकरिता आम्हाला गुंतवलंत का? जी व्यथा राजे भोगीत होते, तीच व्यथा जिजाऊ भोगत होत्या. शिवाजीराजे व छोटे संभाजीराजे पुरंदरच्या तहानंतर आग्र्याला जाणार होते. त्यामुळे आऊसाहेबांच्या मनाची घालमेल चालू होती.
पुरंदरचा तह आऊसाहेबांच्या जिव्हारी लागला होता. पराभवातून कसे सावरायचे हे दोन्ही मायलेकरांना चांगलेच माहीत होते. तसा त्यांचा पुढे प्रयत्न चालू झाला होता.