Ad will apear here
Next
‘मनोहर’ कार्य करणारी ‘मुक्ता’

एखाद्याच्या दुःखानं अश्रूंना मुक्तपणे वाट करून देणाऱ्या, पण अन्यायाच्या विरोधातल्या मोर्चाचं नेतृत्व करताना कणखर, लढाऊ होणाऱ्या, कामगारांच्या हक्कांसाठी त्यांना लढण्याचं बळ देण्यासाठी प्रेरणादायी भाषणं करणाऱ्या आणि समाजाला जागृत करण्यासाठी या साऱ्यांचे प्रश्न प्रभावी लेखनातून मांडणाऱ्या संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्या म्हणजे मुक्ता मनोहर. मनाला भावणाऱ्या, पण अतिशय कठीण अशा कार्याचं व्रत घेतलेल्या मुक्ता मनोहर यांच्याबद्दल जाणून घेऊ या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या लेखमालेच्या आजच्या भागात...
...............
दोन वर्षांपूर्वी, तीन जून २०१५ या दिवशी पुणे महानगरपालिका युनियनची सचिव म्हणून काम करणाऱ्या कॉम्रेड मुक्ता मनोहर हिला कॉम्रेड गोविंदराव पानसरे पुरस्कारानं पुण्यातल्या एस. एम. जोशी सभागृहात सन्मानित केलं गेलं. गोविंदराव पानसरे पुरस्कार स्वीकारताना तिनं तिच्या मनातल्या अस्वस्थ भावनांना वाट करून दिली होती. सध्याचा प्रत्येक क्षेत्रातला चंगळवाद तिला अस्वस्थ करत होता. नरेंद्र दाभोळकर आणि गोविंदराव पानसरे यांच्या हत्येची भळभळती जखम तिच्या मनाला क्लेश देत होती. कितीही विरोधी वातावरण असलं, तरी तिची आशा खूप प्रबळ असल्याचं जाणवत होतं. तसंच प्रबोधनाची चळवळ कधीच थांबणार नाही याची खात्री तिनं आपल्या बोलण्यातून व्यक्त केली. सफाई कामगारांची हलाखीच्या जीवनातून सुटका व्हावी, त्यांनाही माणूस म्हणून चांगलं जगता यावं असंच तिला वाटत होतं आणि तेच ती आपल्या मनोगतातून उपस्थित श्रोत्यांशी संवाद साधताना सांगत होती.

काही वर्षांपूर्वी ‘लोकायत’ संस्थेच्या एका कार्यक्रमात माझी मुक्ता मनोहर हिच्याशी ओळख झाली. उत्साहानं सळसळणारी, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची, पारदर्शी स्वभावाची आणि पहिल्याच भेटीत समोरच्याशी विश्वासाचं नातं निर्माण करणारी खंबीर मुक्ता मला पहिल्याच भेटीत आवडली. त्यानंतर अनेक वेळा ती मला भेटत राहिली. कधी स्त्रियांवरच्या बलात्काराच्या घटनांनी अस्वस्थ झालेली मुक्ता मी बघितली, तर कधी कामगारांचे प्रश्न सुटत नाहीयेत या विचारानं बेचैन झालेली मुक्ता मी बघितली. त्या वेळची तिची तगमग बघवत नसे. एखाद्याच्या दुःखानं डोळ्यातल्या अश्रूंना मुक्तपणे वाट करून देणारी हळवी मुक्ता मी बघितली; पण त्याचबरोबर अन्यायाच्या विरोधातल्या मोर्चाचं नेतृत्व करताना खंबीर, कणखर, लढाऊ मुक्ताही मी अनुभवली. मोठमोठ्या सभांमधली, कामगारांच्या हक्कांसाठी त्यांना लढण्याचं बळ देण्यासाठी केलेली, हजारोंच्या जनसमुदायासमोरची तिची प्रेरणादायी भाषणंही मी ऐकली....प्रत्येक वेळची मुक्ताची छबी, तिचा आविर्भाव निराळा होता; पण तिच्या आतला अस्सल कार्यकर्ता आणि संवेदनशील माणूस मात्र तोच होता! आज मुक्तासारख्या बोटांवर मोजण्याइतक्या स्त्रिया सामाजिक क्षेत्रात काम करताना बघायला मिळतात. खरं तर या क्षेत्रात येणाऱ्या स्त्रिया फार कमी आहेत. कारण इतर क्षेत्रांच्या तुलनेत इथे आयुष्यभर फक्त कठीण वाटेवरून चालत राहायचं आहे. त्या बदल्यात यश, कीर्ती, प्रसिद्धी, भौतिक सुखं, पैसा यांची शाश्व ती नाही. असं असताना ही वाट निवडणाऱ्या स्त्रियांबद्दल मनात खरोखरच कृतज्ञता दाटून येते.

कॉम्रेड गोविंदराव पानसरे पुरस्कार स्वीकारताना मुक्ता मनोहर.थोडं मागं वळून बघितलं, तर महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, आगरकर, कर्वे, आंबेडकर यांसारख्या अनेक थोर माणसांच्या प्रयत्नांमुळे स्त्रियांकडे व्यक्ती म्हणून बघितलं गेलं. त्या शिकू लागल्या, आपल्या पायावर उभ्या राहू लागल्या. आज आपल्या आसपास बहुसंख्य मुली आपल्या करिअरबाबतीत जागरूक झालेल्या दिसतात. कोणी डॉक्टर, कोणी इंजिनीअर, कोणी पोलीस अधिकारी, कोणी राजकारणात, वकील, कोणी आर्किटेक्ट, तर कोणी शिक्षिका, होऊन आपापली कारकीर्द गाजवताना दिसतात. या सगळ्याच क्षेत्रांमध्ये स्त्रियांची जशी नितांत आवश्यकता आहे, तसंच आणखी एक क्षेत्र आहे, जिथे स्त्रियांचा सक्रिय सहभाग खूप खूप मोलाचा आहे. ते क्षेत्र म्हणजे सामाजिक क्षेत्र! सामाजिक कार्याच्या क्षेत्रात डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते मेधा पाटकर यांचं आणि त्याचबरोबर त्यांच्या नर्मदा लढ्याबद्दलचं चित्र उभं राहतं. मेधा पाटकरांसारख्या धडाडीनं आपलं आयुष्य झोकून वंचित, उपेक्षित, अन्यायानं पिडलेल्या समाजासाठी काम करत असलेल्या अनेक स्त्रिया दृष्टीस पडतात. या सगळ्याच स्त्रियांबद्दल खूप आदर वाटतो.

मुक्ता मनोहरसारखी झुंजार स्त्री घडते कशी, हा प्रवास बघणंही तितकंच विलक्षण आहे. मुक्ता मनोहर हिची शैक्षणिक ओळख म्हणजे तिनं वाणिज्य शाखेतल्या पदवीनंतर समाजशास्त्र हा विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. आज पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ती म्हणूनच तिची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. ती मराठी साहित्यातली प्रसिद्ध लेखिका आहे, तशीच ती सफाई कामगारांची संघटक आहे. आंदोलनं, संप, मोर्चे, टाळेबंदी हे करत कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सतत संघर्ष करत त्यांच्याबरोबरीनं रस्त्यात उतरत असते.

अशा या सगळ्यांनाच आपल्याशा वाटणाऱ्या मुक्ता मनोहरचं शालेय शिक्षण नाशिक शहरात झालं. तिचे वडील शिक्षण खात्यात नोकरी करत होते. मुक्ताचं आजोळ पुण्यात असल्यानं सुट्टीत पुण्याला येणाऱ्या मुक्ताला पुणं आवडायचं. इथलं वातावरण तिला ओढ लावायचं. वडिलांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे दर तीन वर्षांनी इकडून तिकडे, तिकडून इकडे अशा अनेक ठिकाणी फिरावं लागे. त्यातच त्या वेळी पगारदेखील वेळेवर होत नसत. त्याचा संपूर्ण घरावर ताण येई. मुक्ताला आणखी दोन बहिणी! आपल्या तिन्ही मुलींनी उत्तम शिकावं ही मात्र तिच्या आई-वडिलांची मनापासून इच्छा होती. त्यासाठी नेहमीच ते आपल्या मुलींना प्रोत्साहन देत असत.

लोकमत सखी सन्मान जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना मुक्ता मनोहरमुक्ताच्या वडिलांची जेव्हा धुळ्याला बदली झाली, तेव्हा त्यांच्या कुटुंबात एक अशी घटना घडली, की त्यामुळे घरातले सगळेच बिथरून गेले. मुक्ताच्या मोठ्या बहिणीचं एका पंजाबी मुलावर प्रेम जडलं. घरात या वार्तेचे पडसाद अर्थातच विरोधात उमटले. कोणाच्याही विरोधाला न जुमानता तिनं त्या तरुणाशी लग्न केलं. या सगळ्या गोष्टींमुळे मुक्ताचं कुटुंब धुळे सोडून पुण्यात आलं. मुक्तानंही आपलं सुरू असलेलं शिक्षण अर्धवट सोडलं आणि नंतर पुण्यात आल्यावर वाणिज्य शाखेतली पदवी घेतली आणि नंतर कला शाखेत प्रवेश घेऊन ‘एमए’देखील केलं. एका संस्थेत अर्धवेळ काम करत तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. खरं तर मुक्तानं ‘पीएचडी’साठीही नाव नोंदवलं; पण चळवळीत पूर्ण वेळ काम करायचं म्हणून ती पीएचडी करू शकली नाही.

मुक्ताला सुरुवातीपासूनच भौतिक सुखांचा अतिहव्यास कधीच नव्हता. तिला कोणीतरी आखून दिलेल्या रूढ चौकटीतलं जगणं नकोसं वाटे. आपलं आयुष्य खूप वेगळ्या पद्धतीनं जगता यायला हवं अशी स्वप्नंही ती बघत असे. १९७५ सालचा तो काळ होता. जागतिक महिला वर्ष सर्वत्र साजरं होत होतं. मुक्ताच्या लग्नाचा विषय घरात चर्चिला जाऊ लागला. अशा वेळी मुक्तामधली बंडखोर मुलगी जागी झाली. आपल्या बहिणीनं जे केलं, ते आपल्या दुसऱ्या मुलीनं करू नये यासाठी धडपडणारे आई-वडील तिला दिसत होते. त्यांची काळजीही तिला समजत होती; पण त्याचबरोबर ‘माझं जगणं माझ्या हाती, माझ्या आयुष्याचे निर्णय दुसऱ्या कोणाच्यातरी आयुष्याचा संदर्भ घेऊन घ्यायचे नाहीत,’ असं मुक्ताचं मन तिला सांगू लागलं. तिनं आपल्या आई-वडिलांना ‘माझं लग्न मी ठरवेन’ असं ठामपणे सांगितलं.

त्याच वेळी ‘मागोवा’ नावाचा सामाजिक प्रश्नांच्या ध्येयानं भारलेल्या उच्चशिक्षित तरुणांचा एक गट मुक्ताच्या आयुष्यात आला. यातले अनेक तरुण धुळे जिल्ह्यातल्या शहादा इथं आदिवासींसाठी काम करत होते. ते नेहमी एकत्र जमत आणि चर्चा करत. एका कार्यक्रमाच्या वेळी मुक्ताची अशोक मनोहर नावाच्या तरुणाशी ओळख झाली. तो हसरा, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा, बोलघेवडा देखणा तरुण मुक्ताला खूपच आवडला. अशोक मनोहर ताडमाड सहा-साडेसहा फूट उंच, तर मुक्ता एखाद्या नाजूक बाहुलीसारखी जेमतेम पाच फुटी! पण प्रेमात जात, धर्म, रंग, रूप, आर्थिक स्तर काहीच आडवं येऊ शकत नाही, त्याप्रमाणे झालं. मुक्ता या गटाच्या चर्चांमध्ये सामील होऊ लागली. आदिवासींचे प्रश्न तिला आपले प्रश्न वाटू लागले. तसंच त्या निमित्तानं तिला अशोकमधला धडाडीचा कार्यकर्ता सतत दिसू लागला.

अशोकच्या सामाजिक कामातल्या संघर्षामुळे त्याच्यावर अनेक सामाजिक, राजकीय कोर्ट केसेसही सुरू होत्या. मुक्ताच्या घरून जेव्हा लग्नाचा तगादा सुरू झाला आणि मुक्ता अशोकशी लग्नाबद्दल बोलली, तेव्हा अशोकला वाटलं, ‘माझ्यावरच्या केसेसचं निराकरण झाल्यावर लग्नाचा निर्णय घेता येईल;’ पण मुक्ताला या गोष्टी खूप किरकोळ वाटल्या. अशा केसेस म्हणजे आपल्या जगण्याचा यापुढेदेखील एक भागच असतील, त्यांना स्वीकारून पुढे जायचं, असं मुक्तानं ठरवलं. दोघांनी लग्न करायचं ठरवलं. अशोक हा मार्क्सवादी विचारांचा; पण त्यानं आपले विचार मुक्तावर कधी लादले नाहीत. ‘तू एक स्वतंत्र व्यक्ती आहेस, तू वाच, तू अनुभव घे आणि तुझं तू कार्यक्षेत्र ठरव,’ अशीच त्याची मतं होती आणि तीच मतं मुक्ताची स्वतःचीही होती आणि आजही आहेत.

लग्न झाल्यावर मुक्ताला आपल्या कामासाठी अनुकूल वातावरण आणि अशोकची साथ मिळाली. त्या वेळी ‘लाल निशाण’ नावाच्या पक्षात अनेक जोडपीही सामील झालेली होती. दोघांपैकी एकानं पूर्ण वेळ नोकरी करायची आणि दुसऱ्यानं पूर्ण वेळ सामाजिक काम करायचं असा निर्णय प्रत्येक जोडप्यानं घेतला होता. त्या वेळी मुक्ता एका संस्थेत काम करत होती. दोघांनीही पूर्ण वेळ सामाजिक काम करायचं, तर आर्थिक प्रश्न कोणी उचलायचा असाही प्रश्न  त्या वेळी समोर होता. त्यातच आपल्याला मूल हवं की नको यावरही गटामध्ये चर्चांच्या फेरी झडू लागल्या. तिचं एक मन म्हणे मूल हवं. गरिबाला मूल होत नाही का? आहे त्या परिस्थितीत ते वाढतंच की! अशा परिस्थितीत मुक्तानं एका मुलाला जन्म दिला; पण एका आजाराचं छोटंसं निमित्त होऊन ते बाळ खूप लवकर दगावलं. मुलाच्या जाण्यानं मुक्ताला खूप हादरल्यासारखं झालं. आता आपण पुन्हा मूल होऊ द्यायचं नाही आणि संपूर्ण वेळ चळवळीतल्या कामातच घालवायचा, असा निर्णय तिनं घेतला.

याच वेळी विविध प्रश्नांवर, समस्यांवर उत्तरं शोधण्यासाठी, चर्चा करण्यासाठी अभ्यास मंडळं सुरू झाली. त्यांच्या अनेक चर्चांमध्ये मुक्तादेखील सहभाग घेऊ लागली. त्या वेळी ती अध्यात्माबद्दलच्या एका मासिकातही काम करत होती. त्यामुळे अभ्यास मंडळातल्या चर्चांमध्ये ‘भौतिकवाद’ हाही विषय चर्चिला जाऊ लागला. मार्क्सवाद समजून घेता घेता तिला त्या भौतिकवादासारख्या विषयावर खोलवर जाता आलं.

१९७५ साली स्त्रियांची एक मोठी परिषद झाली. डॉ. सुलभा ब्रह्मे, कॉम्रेड लीला भोसले आणि कुमुद पोरे यांसारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी स्त्रियांना संघटित करण्यात पुढाकार घेतला. त्यामुळे स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक कार्यकर्त्या तयार झाल्या होत्या. महाराष्ट्रात अनेक गट काम करत होते. फेमिनिझम, रॅडिकल, वगैरे...त्या वेळचं वातावरण मंतरलेलं होतं. मुक्ता आणि इतर कार्यकर्त्या चर्चा करीत, स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी, स्त्रियांशी संवाद साधण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी एका कार्यालयाची आवश्यकता त्यांना भासू लागली. त्याच वेळी मुक्ता आणि इतर काहींनी शहादा चळवळीशी जोडल्यामुळे तिथं जाऊन स्त्रियांसाठी अनेक शिबिरं घेतली. शेतमजूर आणि कष्टकरी स्त्रिया यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी मुक्ता गावोगाव फिरू लागली. डॉ. सुलभा ब्रह्मे यांच्याबरोबर काम करताना महाराष्ट्रातल्या बिडी कामगार, गिरणी कामगार, बेळगावमधल्या गिरणीतल्या स्त्रिया, मुंबईतल्या केमिकल फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया या सगळ्यांना भेटणं, त्यांच्या समस्या समजून घेणं ही कामं मुक्ता करू लागली. यातूनच १९८० साली पुण्यात पहिल्या मोलकरीण संघटनेची स्थापना करण्यात आली. मोलकरणींना त्यांचे हक्क मिळालेच पाहिजेत, ही भूमिका या संघटनेच्या स्थापनेमागे होती.

ही कामं करत असतानाच मुक्ताला आपण ट्रेड युनियनमध्ये काम करावं, असं वाटायला लागलं. १९८५ साली स्त्री मुक्ती मंचाची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थानं स्त्रियांसाठीचं कार्यालयही सुरू झालं. स्त्रियांच्या चळवळीचा खरा कणा म्हणजे कष्टकरी महिलाच होत्या. तेव्हा त्यांचं वेगवेगळ्या पातळ्यांवर होणारं शोषण थांबलं पाहिजे आणि तरच या चळवळीला खरी धार येईल अशी भूमिका अप्पासाहेब भोसले आणि लीलाताई यांनी घेतली होती. स्त्रियांना यात सक्रियपणे उतरवण्यासाठी मुक्ता स्वतःही या विचारांकडे आकर्षिली गेली. जेवढं जास्त खोलात जाऊन काम सुरू झालं, तेवढं ते तिला आवडायला लागलं. कामामधली स्पष्टता काम करतानाच तिला येत गेली.

एकीकडे काम सुरू असे आणि दुसरीकडे मुक्ता आणि तिचे सहकारी, मित्र-मैत्रिणी यांचा साहित्याचाही अभ्यास, चर्चा सुरू असत. या अभ्यासात कधी चेकॉव्हच्या कथा असत, तर कधी मार्क्सवादाची अभ्यासमंडळं असत. माणसाचं वेगळेपण काय आहे, इथपासून सर्जनशीलता म्हणजे काय, निसर्गाशी संवाद साधत माणूस कसा बदलत जातो, तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा कसा, माणूस म्हणून उपजीविका करताना तोच माणूस निसर्गात हस्तक्षेप कसा करत गेला, त्यातूनच पुढे उत्पादन, उत्पादकता हे सगळं कसं निर्माण होत गेलं, या सगळ्या गोष्टींवरचा मुक्ताचा अभ्यास होत गेला. त्याच वेळी इतिहास म्हणजे काय, इतिहास कसा बदलतो, अनेक अंगांनी इतिहासाकडे कसं बघितलं पाहिजे, तुळपुळ्यांची मार्क्सवादावरची भाषांतरित पुस्तकं, सीपीआय म्हणजे काय, कम्युनिस्ट पक्ष म्हणजे काय, गिरणी कामगारांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या लढ्याचा इतिहास काय आहे, अशा सगळ्या विषयांवरदेखील अभ्यास आणि चर्चा होत. तसंच टागोर, टॉलस्टॉय, मराठीतलं साहित्य आणि कविता अशा अनेक विषयांवर ही मंडळी वाद-चर्चा करत. यातून मुक्ता आणखीच घडत चालली होती.

या सर्व गोष्टींत साथीला मुक्ताचा जोडीदार अशोक होताच. खरं तर तो नवरा म्हणण्यापेक्षा मित्रच जास्त होता. तो तिच्याकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघत असे. तिच्या प्रत्येक मताला त्याच्या दृष्टीनं खूप महत्त्व असे. तिनं लिखाण करावं असंही त्याला वाटे. माणूस म्हणून अशोक मनोहर हा एक उमदा, हसरा, पण तरीही आयुष्याकडे गंभीरपणे बघणारा तरुण होता. तसंच डॉ. अनंत फडके, संध्या फडके, सुहास परांजपे, स्वाती परांजपे, प्रफुल्ल बिडवई असे अनेक जण त्या वेळी दोघांचे जवळचे मित्र होते. असं सगळं सुरळीत चालू असताना अशोकचा अचानक झालेला मृत्यू मुक्ताला हलवून गेला; मात्र तो गेला म्हणजे आयुष्य संपलं असं तिला वाटलं नाही. उलट त्याच्या आठवणी, त्याच्या स्मृतींनी तिला पुढे जाण्याचं जास्त बळ दिलं. तो असता तर त्याला आपला चेहरा रडवेला असलेलं आवडलं असतं का, असा प्रश्न ती स्वतःला विचारत असे. त्याच्यातलं जे जे मुक्तानं टिपलं होतं, ते सगळं बरोबर घेऊन अशोकची अदृश्य साथ घेऊन मुक्ता नव्या दमानं कामाला लागली.

स्त्रियांच्या चळवळीतली आव्हानं खूप असायची. नवरा-बायकोची भांडणं, मारहाणीचे प्रसंग, स्त्री-धन मिळवण्याचे प्रसंग वारंवार येत. अशा वेळी खूप सक्रिय व्हावं लागे. एकदा तर असं झालं, की एका कंपनीत संप सुरू होता. त्या कंपनीला ‘युनियन’ नको होती. त्या वेळी स्त्रियांनी मोर्चा काढून कंपनीच्या मॅनेजरला जाब विचारायचं ठरवलं. त्याप्रमाणे मुक्ता ३०-४० स्त्रियांना घेऊन इच्छित स्थळी पोहोचली. कार्यालय दुसऱ्या मजल्यावर होतं. जिना अरुंद होता. सगळ्या स्त्रिया निवेदन देण्यासाठी वर गेल्या; पण त्या मॅनेजरनं आधीच काही गुंड बोलावून ठेवले होते. त्यांनी दगड आणि इतर वस्तू अरुंद जिन्यातून वर येणाऱ्या स्त्रियांवर फेकून मारायला सुरुवात केली. अनेक स्त्रियांची डोकी फुटली. त्या अरुंद जिन्यात अचानक झालेल्या या प्रसंगानं चेंगराचेंगरी झाली. तशाही अवस्थेत स्त्रिया आपल्या भूमिकेवर ठाम होत्या. थोड्याच वेळात बातमी कामगारांपर्यंत पोहोचली आणि ती कळताच अनेक कामगार तिथे एकत्र जमले. जखमी स्त्रियांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. एका कामगाराच्या सासूचा डोळा तर या दगडफेकीत कायमचा गेला. प्रत्येकीलाच खूप लागलं होतं; मात्र एकीचं बळ असं होतं, की त्या मॅनेजरला अटक झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका सगळ्यांनी घेतली. अशा रीतीनं कळत-नकळत ‘ट्रेड युनियन’च्या कामात मुक्ता मनोहरचा सहभाग झाला. १९९५पासून तिनं ‘पुणे महानगरपालिका कामगार युनियन’मध्ये सक्रियपणे काम करायला सुरुवात केली.

एकीकडे रोज नवा येणारा प्रश्न आणि तो सोडवण्यासाठी झटणं हे मुक्ताचं आजही अव्याहतपणे सुरू आहे; पण त्याचबरोबर समोरचं भेसूर वास्तव तिला स्वस्थ बसू देत नाही. असाच एक प्रश्न बलात्कारांच्या वारंवार होणाऱ्या घटनांचा. अशा घटना घडल्या, की मुक्ता स्वतः त्या कुटुंबाकडे जात असे किंवा आताही जाते आणि त्यांच्या बाजूनं उभी राहून त्यांना लढण्याचं बळ देते. यातूनच समाजाला जागृत करायचं असेल तर हे त्यांच्यापर्यंत आपल्या लेखणीतून पोहोचवलं पाहिजे या भावनेतूनच तिनं ‘नग्नसत्य’ हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकानंही अनेक मानाचे पुरस्कार मिळवले. एकीकडे काम, तर दुसरीकडे लिखाण अशी दुहेरी कसरत करत मुक्ताची वाटचाल सुरू आहे.

लिहिणाऱ्याने लिहीत जावे, वाचणाऱ्याने वाचत जावे
लिहिता लिहिता लिहिणाऱ्याने, वाचणाऱ्याचे पंचेद्रिय व्हावे
कळले किती, गळले किती याचे थोडे भान घ्यावे
लिहिणाऱ्याने लिहीत जावे, वाचणाऱ्याने वाचत जावे
वाचता वाचता वाचणाऱ्याने लिहिणाऱ्याचे मन व्हावे
अशा मनांच्या मशागतीतून, कृतींचे थोडे सृजन व्हावे
लिहिणाऱ्याने लिहीत जावे, वाचणाऱ्याने वाचत राहावे
लिहिणारे, वाचणारेही कधीतरी एक व्हावेत
दोघे मिळून कधी तरी, आंधळ्याचे डोळे व्हावेत

‘विंदां’च्या कवितेची आठवण व्हावी अशी ही कविता मुक्ता मनोहरनं लिहिली आहे. मुक्ता मनोहरचा ‘जगणं वेचताना’ हा कथासंग्रह कष्टकरी स्त्रियांच्या जगण्यावर भाष्य करतो, तर बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध घेणारं तिचं ‘नग्नसत्य’ हे पुस्तक बलात्कारामागची व्यापक स्तरावरची कारणं शोधत आपल्याला अस्वस्थ करून सोडतं. त्याचप्रमाणे ‘समतेचे वारकरी’ हे पुस्तक समतेच्या वाटेवर चालणाऱ्यांच्या पायाखालची वाट ही धगधगत्या निखाऱ्यांसारखी कशी असते आणि त्याचे परिणाम त्यांना कसे भोगावे लागतात याबद्दलची अस्वस्थता व्यक्त करणारं आहे. मुक्तानं लिहिलेली सगळीच पुस्तकं समाजातलं दाहक सत्य आणि त्यामुळे होणारी तगमग व्यक्त करणारी आहेत. मुक्ता मनोहरनं लिहिलेल्या ‘नग्नसत्य’ या पुस्तकाला उत्कृष्ट वाङ्मयाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला. तसंच स्त्री-वादी साहित्य पुरस्कारानं तिला सन्मानित करण्यात आलं. तिच्या लिखाणाबरोबरच तिनं पुणे कामगार युनियनच्या सहयोगानं निर्मिती केलेल्या आणि अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कचराकोंडी’ या माहितीपटाला आणि ‘सत्यशोधक’ या नाटकाला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. याबरोबरच तिच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन कुदळे फाउंडेशनचा सुनील दत्त पुरस्कार, गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार, लोकमत जीवनगौरव पुरस्कार, एस. एम. जोशी कार्यकर्ता पुरस्कार, आदिशक्ती पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार देऊन मुक्ताला गौरवान्वित करण्यात आलं आहे.

मुक्ता केवळ लेखिका किंवा कवयित्रीच नसून, ती पुण्यातल्या महानगरपालिकेच्या कामगार युनियनची जनरल सेक्रेटरी आहे. ती एक हाडाची कार्यकर्ती आहे. स्त्रियांच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन १९७५ सालापासूनच तिनं पुरोगामी स्त्री संघटनेमध्ये सक्रिय सहभाग घेतला. ‘बायजा’ या स्त्रियांच्या प्रश्नां वर आधारित द्वैमासिकाच्या संपादनामध्ये तिचा सहभाग होता. मुक्ता मनोहरनं लोकसत्ता, दैनिक सकाळ अशा अनेक प्रथितयश वृत्तपत्रातून आणि मासिकांमधून लेखन केलं आणि आजही करत असते. ‘सकाळ सप्तरंग’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मी कात टाकली’ या मालिकेतून तिनं स्त्रियांविषयीचे अत्यंत महत्त्वाचे विषय हाताळले. ‘अशा आणखी कितीतरी मारिया आहेत’, ‘नजिबा,’ ‘आशा आणि ओसामा’, ‘फॅशनच्या दुनियेतलं जळीत’, ‘या इंडस्ट्रीचे मालक आहेत तरी कुठे?,’ ‘युक्रेनच्या तरुणी, लेनिन आणि क्लारा’, ‘हत्याकांडं दलितांचीच का?’ अशा अनेक ज्वलंत विषयांवर तिनं स्तंभलेखन केलं आणि समाजापुढे जळजळीत वास्तव ठेवत त्यांना प्रश्ननही विचारले. आपल्या लेखणीतून तिनं कायम शोषित आणि पीडितांचे प्रश्ना समाजासमोर मांडले आणि आजही मांडत असते.

मुक्ता मनोहर हिनं वंचितांच्या जनजागृतीसाठी अनेक पथनाट्यं केली. केवळ पुणंच नाही, तर महाराष्ट्रातल्या विडी, कापड आणि गिरणी कामगारांच्या जीवनाचा जवळून अभ्यास केला. रासायनिक आणि इतर कारखान्यांतल्या स्त्रियांची सुरक्षा आणि त्यांचे हक्क, आदिवासी, शेतकरी आणि कष्टकरी स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते जाणून घेणं आणि त्या विरोधात लढे उभारणं या कामात सहभाग घेतला. वाढत्या शहरीकरणानंतर कामगार संघटना, श्रमिक महिला मोर्चा, श्रमिक महासंघ अशा अनेक संघटनांमार्फत कष्टकरी वर्गांच्या हक्कासाठी दमदारपणे आवाज उठवला.

पुणे कामगार युनियनचं ‘श्रमिक’ कार्यालय नेहमीच गजबजलेलं असतं. कामगारांचे अनेक प्रश्न सोडवत असतानाच मुक्ता मनोहर त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवताना दिसते. कामगारांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी मुंबई आणि अनेक मोठ्या शहरांतून प्रेरणा राणेसारख्या तज्ज्ञ व्यक्तींना बोलावून कामगारांच्या कार्यशाळा ती घेत असते. केवळ कामगारच नाही, तर त्यांच्या कुटुंबांसाठीही काही उपक्रमांची आखणी केलेली असते. कामगारवस्तीत त्यांच्या मुलांसाठी ‘रामानुजन’ प्रकल्प चालवत असताना मुलांनी गणित आणि विज्ञान या विषयांत प्रगती करावी असा तिचा ध्यास असतो. त्याच वेळी कामगारांचं दुःसह्य जगणं ‘कचराकोंडी’सारखी फिल्म तयार करून हीच मुक्ता जगासमोर ठेवत असते. ‘सत्यशोधक’ या महात्मा फुले यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित नाटकाची निर्मिती करण्यात पुढाकार घेऊन मुक्ता मनोहरनं अतुल पेठे या कुशल दिग्दर्शकाच्या सहकार्यानं चक्क कामगारांनाच त्यात काम करायला लावलं. रंगमंचाची पायरी कधीही न चढलेले सफाई कामगार मुक्ताचा विश्वाास सार्थ करण्यासाठी दिवसरात्र नाटकाच्या तालमी करू लागले. त्याचाच परिणाम म्हणजे, हे नाटक केवळ महाराष्ट्रच नाही, तर देश आणि देशाबाहेर वाहवा मिळवतं झालं.

या नाटकानं सफाई कामगारांना समाजाच्या मूळ स्रोतात आणणं आणि महात्मा फुले यांचा संदेश मनातच रुजवणं नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीत आणणं या दोन्हीही गोष्टींत मुक्तासारखी हाडाची कार्यकर्ती जेव्हा यशस्वी होते, तेव्हा तिचं वैयक्तिक जगणं वेगळं राहिलंच नाही, हे क्षणोक्षणी जाणवत राहतं. मुक्ताचं आणि सफाई कामगारांचं जगणं आता एकमेकांत इतकं मिसळून गेलंय, की स्वतःच्या गरजा मर्यादित ठेवून ती दिवसरात्र केवळ त्यांच्या सुखाचा आणि कल्याणाचा विचार करत असते. तसंच आपल्या कामाशिवाय सफाई कामगारांचं जगणं सुंदर व्हावं यासाठी मुक्ता मनोहर हिची नेहमीच धडपड सुरू असते. म्हणूनच त्यांच्यासाठी अनेक उत्तमोत्तम चित्रपटांचं आयोजन करणं, साहित्य, नाट्य, संगीत या क्षेत्रातली तज्ज्ञ माणसं बोलावून कामगारांबरोबर त्यांचा संवाद घडवणं, ‘विंदां’सारख्या कवीच्या कवितांवरच्या कार्यक्रमाचं आयोजन करणं असे अनेक उपक्रम मुक्ता सतत राबवत असते.

मुक्तासारख्या निरपेक्ष वृत्तीनं काम करणाऱ्या व्यक्ती आहेत हे आजच्या डोळ्यांवर झापड लावलेल्या समाजाला कदाचित खरं वाटणारही नाही; पण ज्यांना समाजाबद्दलची आत्मीयता आहे, समाजात चांगला बदल हवा आहे, ज्यांना समाजासाठी काम करायचं आहे त्यांनी मुक्ता मनोहरला अवश्य भेटायलाच हवं!

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात.)

(‘अनवट वाटेवरचे वाटसरू’  हे सदर दर पंधरा दिवसांनी गुरुवारी प्रसिद्ध होते.) 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZGRBE
Similar Posts
असाही एक सिद्धार्थ! ही गोष्ट आहे अशा एका तरुणाची, की ज्यानं आपलं आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतलंय. प्राणिप्रेमी असलेला, भौतिकशास्त्र विशेष आवडणारा, उत्तम फोटोग्राफी करणारा, पुढे-मागे न पाहता गरजूंच्या सेवेसाठी धावून जाणारा, अंगी स्वाभिमान असलेला, अन्यायाची चीड असलेला आणि संघर्षासाठी रस्त्यावर उतरणारा हा मुलगा म्हणजे एक वेगळंच रसायन आहे
संवादातून प्रश्नांचा गुंता सोडवणारा राजू कुठल्याही विषयातलं शिक्षण खूप महत्त्वाचं असतंच; मात्र फक्त शिक्षण घेऊन उपयोगाचं नाही, तर त्या व्यक्तीच्या प्रवृत्तीत बदल करायचा असला, तर संवाद जास्त महत्त्वाचा आहे. हेच ओळखून राजू इनामदार हा कार्यकर्ता गेली २५ वर्षं कार्यरत आहे. किशोरवयीन मुलांचं वा प्रौढांचं मानसिक आरोग्य असो, त्यांचे लैंगिकतेचे प्रश्न
ब्रेल मॅन ऑफ इंडिया! आपल्या संवेदनशील मनाला सतत जागं ठेवून गेली अनेक वर्षं अंधांसाठी अफाट कार्य करणाऱ्या एका मराठी तरुणाला आज जगभरातले आणि देशातले अंध वाचक आणि डोळस वाचक ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखायला लागले आहेत. ही सगळी कामं हा तरुण कुठल्याही सरकारी मदतीशिवाय किंवा अनुदानाशिवाय स्वखर्चाने करत असतो. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज या अवलियाची ओळख
रुक जाना नहीं, तू कहीं हार के... बीए, एलएलबी झालेल्या, लग्न होऊन संसारात रुळलेल्या शारदा बापट नावाच्या एका स्त्रीनं आपल्या आईच्या सततच्या आजारपणाचं कारण शोधण्यासाठी चक्क वयाच्या पस्तिशीत डॉक्टर व्हायचं ठरवलं. रीतसर कॉलेज करून, असंख्य अडचणींना तोंड देत त्या डॉक्टर झाल्याही. त्याच दरम्यान त्या वैमानिकही झाल्या, कम्प्युटर्स-इलेक्ट्रॉनिक्स यांवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language