Ad will apear here
Next
वंदन नगरकर, इम्रान हाश्मी, कुलदीप पवार
प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ वंदन राम नगरकर, बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी यांचा २४ मार्च हा जन्मदिन. तसेच, मराठी चित्रपट, हिंदी, तसेच मराठी मालिका आणि नाटकांमधून शैलीदार अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांचा २४ मार्च हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
.........
वंदन नगरकर
वंदन नगरकर हे विनोदी अभिनेते, नाटककार, लेखक राम नगरकर यांचे चिरंजीव आहेत. वंदन नगरकर हे कॉर्पोरेट ट्रेनर आहेत. चला विचार बदलू या, टर्निंग पॉइंट, प्रभावी इंटरव्ह्यू टेक्निक्स्, भाषणाचे प्रभावी तंत्र, पालकांचे चुकते कुठे?, मालक नको पालक व्हा, भाषणाचे प्रभावी तंत्र, उज्ज्वल भवितव्यासाठी भरारी यशाची, यशाकडे नेणारा टर्निंग पॉइंट, Speak With Confidence ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राम नगरकर यांच्या निधनानंतर वंदन नगरकर यांच्यातील कलागुण ओळखून ख्यातनाम अभिनेते निळू फुले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे वंदन नगरकर यांनी ‘रामनगरी’ला पुन्हा रंगभूमीवर आणले आहे.
........


इम्रान हाश्मी
२४ मार्च १९७९ रोजी उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथे इम्रान हाश्मीचा जन्म झाला. इम्रानचे वडील अन्वर हाश्मी अभिनेता होते. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इम्रानचे मामा आहेत. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इम्रान सहायक दिग्दर्शक होता. बॉलिवूडमध्ये पदार्पण करून अल्पावधीतच किसर बॉय अशी ओळख निर्माण करणाऱ्या इम्रान हाश्मीचे फिल्मी करिअर फुटपाथ नावाच्या चित्रपटापासून सुरू झाले. 

त्याला मर्डर चित्रपटाने अनोखी ओळख दिली. या चित्रपटात साकारलेल्या नकारात्मक भूमिकेसाठी त्याला स्टारडस्टकडून नवोदित अभिनेता पुरस्कार मिळाला होता. त्याने १५ वर्षांत ३७ चित्रपटांत काम केले. परवीन शहानीसोबत इम्रानने २००६मध्ये लग्न केले. इम्रानला एक मुलगा आहे. त्याचे नाव अयान आहे. अयानला काही वर्षांपूर्वी कर्करोग झाला होता. मात्र परदेशात उपचार घेतल्यानंतर अयान आता बरा झाला आहे. आपल्या मुलाच्या कर्करोगावर इम्रान हाश्मीने ‘किस ऑफ लाइफ. हाऊ ए सुपर हिरो अॅन्ड माय सन डिफीटेड कॅन्सर’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे.
.........
कुलदीप पवार
२४ डिसेंबर १९४९ रोजी कुलदीप पवार यांचा जन्म झाला. चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि दूरदर्शन यावर नायक, खलनायक आणि विनोदी भूमिका दमदारपणे साकारणारे आणि प्रसंगी स्वतःच पटकथाही लिहिणारे अभिनेते कुलदीप पवार मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे वडील वसंतराव मोटारसायकलींच्या एजन्सीमध्ये काम करत असत आणि आई शांतादेवी यांनी गुजराथी शाळा चालवली होती. कुलदीप वसंत पवार यांना अभिनयाचा वारसा नसला तरी आई शांतादेवी उत्तम नकला करत असत, तर वडील व्हायोलीन व माऊथऑर्गन वाजवत असत.

भारदस्त आवाजाचा अभिनेता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ओळख असलेले कुलदीप पवार यांचे शिक्षण कोल्हापूरला ‘सेट झेवियर्स’ स्कूलमध्ये झाले. शाळेत असतानाच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. याच वयात त्यांनी सुलोचनादीदींच्या हस्ते बक्षिसेही पटकावली. ‘ज्यांना दुसरं काही करता येत नाही ते सिनेमात जातात’ अशी समजूत असण्याच्या काळात पवार यांनी याच क्षेत्रात यायचे निश्चित केले. तेव्हा त्यांना घरातून विरोधही झाला. अभिनयाऐवजी आजोबांची ‘जयश्री’, ‘प्रताप’, ‘वसंतबहार’ ही सांगली-कोल्हापूरची थिएटर्स सांभाळ, असे त्यांना सांगण्यात आले. पण अभिनयाकडे ओढा आणि घरचा कडाडून विरोध अशा कात्रीत सापडलेले पवार वयाच्या सोळाव्या वर्षी घरातून पळून कऱ्हाडला आले आणि ‘हिंदुस्थान गिअर्स’ नावाच्या कंपनीला कास्टींग पुरवणाऱ्या फाउंड्रीत कामाला लागले. लेथवर काम केल्यावर खाली पडणारा कचरा उचलण्याचे काम त्यांना देण्यात आले. फक्त ९० रुपये पगार घेणारे कुलदीप काम संपल्यावर संध्याकाळी कामगारांची नाटके हौसेने बसवायचे. 

याच काळात कुलदीप पवार यांच्याकडे दिग्दर्शक कृष्णा पाटील यांचे लक्ष गेले आणि ‘एक माती अनेक नाती’ या चित्रपटातल्या नायकाच्या भूमिकेसाठी त्यांना विचारणा झाली. हा कुलदीप पवार यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटात त्यांची नायिका होती अनुपमा, तर खलनायक होते चित्तरंजन कोल्हटकर. परंतु हा चित्रपट फारसा चालला नाही. मात्र या चित्रपटामुळे ‘आपल्या अभिनयात अजून खुलेपणा, परिपक्वता येण्याची गरज आहे’ हे कुलदीप पवार यांना स्वतःलाच जाणवले. यानंतर पवार पुण्याला आले. तेथे ते ‘राजहंस’ आणि ‘माउली’ या मासिकांसाठी विपणन करू लागले. अभिनयाचा योग्य मार्ग दाखवतील असे वाटणारी अनेक माणसे त्यांना या काळात भेटली, मात्र प्रत्यक्षात काम हाती आले नाही. मुंबईतल्या स्टुडिओंना भेटी दिल्या तर काही काम होईल, असे वाटून कुलदीप पवार पुणे सोडून मुंबईला आले. स्टुडिओतली पायपीट सुरू झाली आणि पोटासाठी बंगाली माणसाच्या कारखान्यात चेपलेल्या गाड्यांना रंग देण्याचे काम त्यांनी सुरू केले. या काळात त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळत नसल्यामुळे नैराश्य आले.

याच काळात भारदस्त आवाजाच्या आणि उत्तम व्यक्तिमत्त्वाच्या पण दाढी वाढलेल्या पवारांशी गाडगीळ नावाच्या गृहस्थांशी ओळख झाली. ते पवारांना ‘नाट्यसंपदे’च्या कार्यालयामध्ये घेऊन गेले व पवारांच्या रूपात दाजी पणशीकरांना ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकाकरता जसा हवा होता तसा संभाजी सापडला. या नाटकाचा पहिलाच प्रयोग बेळगावला झाला, तो एकदम सुपरहिट, हाऊसफुल ठरला. याचे पुढे ३५० हून अधिक प्रयोग झाले. पुढे नाट्यसंपदा आणि कुलदीप पवार हे अतूट समीकरण झाले. या भूमिकेमुळे अभिनयाचा रस्ता त्यांच्यासाठी खुला झाला.

नाटकामध्ये सर्व प्रकारच्या भूमिका केल्याशिवाय चित्रपटात काम करणार नाही, असे ठरवणाऱ्या कुलदीप पवार यांनी ऐतिहासिक, फार्सिकल, तसेच लोकनाट्येही केली. ‘नकटीच्या लग्नाला’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘गोलमाल’, ‘पाखरू’, ‘रखेली’, ‘निष्कलंक’, ‘खेळ थोडा वेळ’, ‘बायांनो नवरे सांभाळा’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘पती सगळे उचापती’, ‘एन्काऊंटर’, ‘राजकारण गेलं चुलीत’ अशी अनेक नाटके त्यांनी केली, गाजवली. त्यांनी ‘गीतगोविंद’ नावाची स्वतःची नाट्यसंस्थाही काढली होती.

कुलदीप पवार यांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले ते गोविंद कुलकर्णी यांच्या ‘जय तुळजाभवानी’ या चित्रपटामधून एका छोटाशा भूमिकेद्वारे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अनंत माने यांनी त्यांच्या ‘कलावंत’ या चित्रपटासाठी खलनायक म्हणून पवार यांना साईन केले. अनंत माने यांच्याबरोबर कुलदीप पवार काम करत आहेत, हे कळल्यावर दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांनी त्यांच्या ‘दरोडेखोर’ या चित्रपटात नायकाची भूमिका दिली. हा चित्रपट मराठीतल्या अभिजात चित्रपटांपैकी एक ठरला. त्यानंतर कुलदीप पवार यांनी केलेला ‘जावयाची जात’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. रांगडा, मराठमोळा मर्द नायक या चित्रपटात त्यांनी अतिशय प्रभावीपणे साकार केला. यानंतर त्यांच्या उत्तमोत्तम चित्रपटांची मालिकांच प्रेक्षकांसमोर आली. ‘अरे संसार संसार’, ‘शापित’, ‘सर्जा’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘मर्दानी’, ‘गुपचूप गुपचूप’, ‘गोष्ट धमाल नाम्याची’, ‘नेताजी पालकर’, ‘पायगुण’, ‘हिरवा चुडा’, ‘खरा वारसदार’, ‘एकापेक्षा एक’, ‘आई तुळजाभवानी’, ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘देवाशपथ खोटं सांगेन, खरं सागंणार नाही’, ‘वजीर’, ‘तहान’, ‘सुपारी’, ‘श्रीनाथ म्हस्कोबाचं चांगभलं’, ‘नवरे सगळे गाढव’, ‘संसार पाखरांचा’, ‘मला एक चानस हवा’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘भारतीय’ इ. चित्रपट करणाऱ्या कुलदीप पवार यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. भूमिकांचे असे वैविध्य फारच कमी जणांच्या वाट्याला येते.

कुलदीप पवार यांनी ‘प्रोफेसर प्यारेलाल’, ‘दूध का कर्ज’, ‘जीत’ असे मोजके हिंदी चित्रपटही केले. त्यांच्या ‘परमवीर’, ‘तू तू मै मै’, ‘वक्त की रफ्तार’ या हिंदी तर ‘बंदिनी’ ही मराठी मालिका लोकप्रिय झाली. त्यांची ‘परमवीर’ ही डिटेक्टिव्ह मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांत बिग बी अमिताभ बच्चन यांचाही समावेश होता. अभिनेता कुलदीप पवार यांच्यामध्ये एका पटकथाकाराचे काही पैलूही आहेत. त्यांनी ‘बंदिनी’, ‘परमवीर’ या मालिकांचे काही भाग स्वतः लिहिले होते. कुलदीप पवार यांच्या ‘सत्ताधीश’मधील भूमिकेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहाय्यक अभिनेता म्हणून, ‘हळद-कुंकू’ चित्रपटातल्या भूमिकेला विशेष लक्षवेधी भूमिका म्हणून आणि ‘एन्काऊंटर’ या नाटकाला नाट्यगौरव पुरस्कार मिळाले होते. 

कुलदीप पवार यांच्या पत्नीचे नाव नीलिमा पवार. नीलिमा पवारया देखील नाट्यक्षेत्रात कार्यरत होत्या. नीलिमा आणि कुलदीप पवार यांना दोन अपत्ये - थोरला ऐश्वर्य आणि धाकटा समृद्ध. ऐश्वर्य याने कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरची पदवी प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी कंपनीत असोसिएट डायरेक्टर पदावर ते कार्यरत आहेत. त्यांची पत्नी अवंती या शिक्षिका म्हणून खासगी शाळेत कार्यरत आहेत.

कुलदीप पवार यांचा धाकटा मुलगा समृद्ध याचे श्वेतासोबत लग्न झाले. या कुटुंबाने या झगमगत्या दुनियेपासून दूर राहणे पसंत केले आहे. कुलदीप पवार यांचे निधन २४ मार्च २०१४ रोजी झाले. 

माहिती संकलन : संजीव वेलणकर

(कुलदीप पवार यांच्याविषयीचा लेख : स्वाती प्रभुमिराशी)

(नामवंत लेखक श्री. ना. पेंडसे यांचाही २४ मार्च हा स्मृतिदिन. त्यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ख्यातनाम नाट्यनिर्माते मोहन वाघ यांचाही २४ मार्च हा स्मृतिदिन. त्यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)








 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZOJCK
Similar Posts
राम गणेश गडकरी, डी. एस. खटावकर, पं. दिनकर कैकिणी नामवंत लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी, ख्यातनाम शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर आणि आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अशोक समेळ, मिलिंद इंगळे, स्मिता सरवदे-देशपांडे, शेख मुख्तार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, प्रसिद्ध संगीतकार व गीतकार मिलिंद इंगळे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता सरवदे-देशपांडे यांचा १२ मे हा जन्मदिन. तसेच, बॉलीवूडचे पहिले ‘माचो मॅन’ अभिनेते शेख मुख्तार यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
नंदू भेंडे, जेम्स पार्किन्सन, शुभांगी अत्रे-पुरी मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे यांचा ११ एप्रिल हा स्मृतिदिन. तसेच, पार्किन्सन्स डिसीजचा शोध लावणारे ब्रिटिश डॉक्टर जेम्स पार्किन्सन आणि अभिनेत्री शुभांगी अत्रे-पुरी यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
बाबा आमटे, राजा परांजपे, शोभना समर्थ, मीना शौरी ख्यातनाम समाजसेवक बाबा आमटे, नामवंत अभिनेते-दिग्दर्शक राजा परांजपे, अभिनेत्री शोभना समर्थ आणि अभिनेत्री मीना शौरी यांचा नऊ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language