जगातील अन्य भाषांप्रमाणेच फ्रेंच भाषेलाही इंग्रजी शब्दांनी ग्रासले आहे; मात्र शुद्ध फ्रेंच भाषेसाठी लढा देत असलेले लोक परकीय शब्दांचा हा लोंढा अडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘स्टार्टअप’, ‘व्हेंचर कॅपिटल’ आणि ‘क्राउडफंडिंग’ या शब्दांना त्यांनी हद्दपार केले असून, ‘स्मार्टफोन’ या इंग्रजी शब्दालाही पर्यायी शब्द वापरण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सरकारचाही अशा उपक्रमांना पाठिंबा आहे. भाषाशुद्धीसाठी त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. .............
फ्रेंच आणि इंग्रजांची खुन्नस जगजाहीर आहे. नेपोलियन आणि त्याच्याही पूर्वीपासून या दोन देशांमध्ये वर्चस्वाची लढाई चालू आहे. त्या लढाईचा काही भाग भारतातही घडला आहे. आज जागतिकीकरणाच्या काळात ती साम्राज्याची लढाई काहीशी आकुंचित झाली आहे. आता ती आर्थिक जगतापुरती उरली आहे आणि आणखी एक क्षेत्र आहे जिथे ती ठाशीव स्वरूपात दिसते - ती म्हणजे भाषा.
जगातील अन्य भाषांप्रमाणेच फ्रेंच भाषेलाही इंग्रजी शब्दांनी ग्रासले आहे. काही जण या भाषेला फ्रांग्लै (फ्रेंच + इंग्लिश. फ्रेंचमध्ये इंग्रजीला आंग्लै म्हणतात) या नावानेही संबोधतात; मात्र शुद्ध फ्रेंच भाषेसाठी लढा देत असलेले लोक परकीय शब्दांचा हा लोंढा अडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वभाषेचा अभिमान फ्रेंचांच्या ठायी-ठायी दिसून येतो. असे म्हणतात, की फ्रान्समध्ये छापलेल्या पुस्तकांत मुद्रणदोष (प्रिंटिंग मिस्टेक) नावाचा प्रकारच नसतो.
आज सर्वच तांत्रिक संज्ञांचे जेव्हा आंतरराष्ट्रीयीकरण होत आहे, तेव्हा त्यांना प्रतिशब्द देण्यासाठी फ्रेंच भाषेचे अभिमानी धडपडत आहेत. इंग्रजीतून आपले शब्द घेण्याला फ्रेंचभाषकांचा नेहमीच विरोध असतो. इतका, की इंग्रजीचे आक्रमण हा नाझींनी केलेल्या आक्रमणापेक्षाही फ्रेंच भाषेला मोठा धोका असल्याचे सांगण्यापर्यंत या अभिमानाची मजल गेली होती.
स्वतःला फ्रेंच भाषेच्या समर्थक म्हणविणाऱ्या आठ संघटनांनी सात वर्षांपूर्वी ही घोषणा केली होती. नाझी जर्मनीच्या ताब्यात असतानाही फ्रान्सच्या राष्ट्रीय अस्मितेला जो नव्हता, तो गंभीर धोका इंग्रजी शब्दांच्या आक्रमणामुळे निर्माण झाला आहे, असे या संघटनांचे म्हणणे होते. अवेनिर द ला लांग्व फ्रान्सेज (फ्रेंच भाषेचे भविष्य) ही त्यांपैकी प्रमुख संघटना. ‘नाझी आधिपत्याखालील पॅरिसच्या भिंतींवर जेवढे जर्मन शब्द होते त्यापेक्षा अधिक इंग्रजी शब्द आता दिसत आहेत,’ असे मायकेल सर्रेस या फ्रेंच तत्त्वज्ञाचे वचन त्यांनी उद्धृत केले होते.
या संघटनांनी हा इशारा दिला होता, त्याच दरम्यान फ्रान्समध्ये एक पाहणी करण्यात आली होती. त्या वेळी ८० टक्के फ्रेंचभाषकांनी भाषा हीच फ्रान्सच्या राष्ट्रीय अस्मितेचा केंद्रबिंदू असल्याचे मत व्यक्त केले होते. लोकांच्या या भाषाप्रेमाला सरकारचेही सक्रिय सहकार्य असते. फ्रान्समध्ये १९९४मध्ये ‘टुबॉन’ कायदा मंजूर करण्यात आला होता. या कायद्यानुसार अधिकृत सरकारी प्रकाशनांमध्ये, सरकारी अनुदानित शाळांमध्ये, जाहिरातींमध्ये आणि कार्यालयांमध्ये फ्रेंच भाषा वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यानुसार जाहिरात फलकांवरील सर्व इंग्रजी शब्दांचे त्याखाली फ्रेंच भाषेमध्ये भाषांतर करणे आवश्यक आहे.
अगदी गेल्या वर्षी मार्चमध्ये फ्रान्समधील इल दे फ्रान्स या प्रदेशाने एक कायदा केला. इमारतीच्या बांधकामांच्या जागी फक्त फ्रेंच भाषेत बोलायचे, असे हा कायदा फर्मावतो. अर्थातच फ्रेंच उद्योगांना फायदा व्हावा, यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे. ‘छोटे उद्योग कायदा,’ असे या कायद्याचे नाव असून सरकारी इमारतींच्या बांधकामांची अधिकाधिक कंत्राटे फ्रेंच कंपन्यांना मिळावीत, यासाठी तो जारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
याच कायद्यात ‘मोलियर क्लॉज’ नावाची तरतूद आहे. त्याअंतर्गत सार्वजनिक निधी पुरवठ्यातून बांधल्या जाणाऱ्या इमारतींच्या प्रकल्पासाठी फ्रेंच हीच व्यवहाराची भाषा असणे आवश्यक ठरेल. मोलियर हा १७व्या शतकातील प्रसिद्ध फ्रेंच नाटककार होता. एखाद्या साहित्यिकाच्या नावाने कायदा होणे, हेही तसे आक्रितच.
‘ही तरतूद महत्त्वाची असून, ती परदेशी कंपन्यांना लक्षात घेऊन करण्यात आली आहे. या कंपन्या स्वतःचे कर्मचारी घेऊन येतात आणि त्यातील कोणीही फ्रेंच बोलत नाही. या कंपन्यांनी सुधारायला हवे,’ असे इल दे फ्रान्स प्रांताचे उपाध्यक्ष जेरोम चार्टियर त्या वेळी म्हणाले होते. नॉर्मंडी, हॉत्स-दे-फ्रान्स आणि ऑवर्ने-ऱ्होन-आल्पे या प्रांतांनीही असे कायदे यापूर्वी केले आहेत.
अगदी गेल्या आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर गेलेले फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनीही फ्रेंच भाषेचा प्रचार करण्याच्या या निश्चयाची चुणूक दाखवली. ‘चीन हा फ्रँकोफोनी देश व्हायला हवा,’ असे मॅक्रोन यांनी चीनच्या भूमीवरच जाहीर केले. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मॅक्रोन यांनी फ्रान्सचा प्रचार करण्याची संधी घेतली. ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ दी फ्रँकोफोनी’च्या मते चीनमध्ये सध्या एक लाख २० हजारांहून अधिक चिनी विद्यार्थी फ्रेंच भाषा शिकतात. त्यातील काही विद्यार्थ्यांसमोर मॅक्रोन यांनी भाषण केले. ‘फ्रेंच ही वर्चस्ववादी भाषा नाही. ही भाषा अनेक भाषांमधून निर्माण झाली आहे आणि तुम्ही ही भाषा शिकण्याची निवड केली, ही माझ्या दृष्टीने आशेची गोष्ट आहे,’ असे ते म्हणाले.
मॅक्रोन यांच्या मते, फ्रेंच भाषा ही चिनी लोकांच्या दृष्टीने भविष्यासाठी एक संपत्ती आहे. याचे कारण म्हणजे आफ्रिकेत पाय पसरण्याचा चीनचा इरादा आहे आणि आफ्रिका खंडात फ्रेंच ही मुख्य भाषा आहे. जागतिक पातळीवर पाहिले, तर फ्रेंच ही पाचव्या क्रमांकाची सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. ती इंटरनेटवर वापरली जाणारी चौथी, व्यवसायांमध्ये वापरली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची आणि जगातील सर्वांत जास्त शिकली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. या शतकाच्या मध्यात ७० कोटींपेक्षा जास्त लोक फ्रेंच बोलणारे असतील, असा अंदाज आहे आणि त्यांपैकी ८५ टक्के आफ्रिकेत आहेत. मॅक्रोन यांनी तर येत्या ३० ते ४० वर्षांत फ्रेंच भाषेला जगातील पहिली भाषा बनविण्याची
इच्छा व्यक्त केली आहे.
अशा प्रकारे डोळ्यांत तेल घालून स्वभाषेची काळजी घेणारे फ्रेंचभाषक फ्रांग्लैला थारा देतील, हे शक्यच नव्हते. म्हणूनच भाषा सुधारणेचा यज्ञ त्यांच्याकडे अहोरात्र चालू असतो. ‘स्टार्टअप’, ‘व्हेंचर कॅपिटल’ आणि ‘क्राउडफंडिंग’ यांसारख्या इंग्रजी शब्दांना त्यांच्याकडून हद्दपार करण्यात आले आहे. आता फ्रेंच भाषायोद्ध्यांची नजर ‘स्मार्टफोन’ या शब्दावर पडली आहे. या शब्दाला पर्याय म्हणून याआधी ‘ऑर्डिफोन’ आणि ‘टर्मिनल दे पोश’ असे शब्द देण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो यशस्वी ठरला नाही. फ्रेंच भाषा संवर्धन आयोग आणि अकादमी फ्रांसेज या सर्वोच्च संस्थांनी आता त्यासाठी कंबर कसली आहे. फ्रेंचभाषकांना फ्रँकोफोन या नावाने ओळखण्यात येते. स्मार्टफोनसाठी ‘मोबाइल मल्तिफोंक्शोन’ किंवा त्याचे संक्षिप्त रूप म्हणून ‘मोबाइल’ हा शब्द वापरावा, असे या संस्थांनी गेल्या आठवड्यात म्हटले आहे. स्मार्टफोन हा इंग्रजी शब्द असून तो वापरू नये, यासाठी फ्रान्समध्ये आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. तसेच स्मार्ट टीव्ही म्हणण्याऐवजी त्यांनी तेलिविज्यूर कनेक्ते ही संज्ञा वापरण्यास त्यांनी सांगितले आहे.
आज आपण म्हणतो, की भारत महासत्ता होणार, होईल इत्यादी इत्यादी. परंतु महासत्ता अशी फुकाफुकी घडत नाही. त्यासाठी अशा प्रकारचे अस्मिता जपण्याचे, तिला फुलवण्याचे प्रयत्न सतत करावे लागतात. फ्रान्सच्या उदाहरणावरून आपण धडा घ्यायचा तो हा!