रत्नागिरी : ‘संस्कृतमध्ये सर्व शास्त्रांवर ग्रंथ आहेत. संस्कृतमधील तत्त्वज्ञान आणि विचार उदार आणि विश्वबंधुत्वाचे आहेत. भारताचा तिरंगा ध्वज भारतीयांना एकत्र आणतो, त्याप्रमाणे संस्कृत ही सर्वांना एकत्र आणणारी भाषा आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने संस्कृत शिकले पाहिजे,’ असे प्रतिपादन गोदूताई जांभेकर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका अस्मिता फाटक यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत विभागातर्फे २४ ऑगस्ट रोजी संस्कृत दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते ‘गीर्वाणकौमुदी’ या हस्तलिखिताचे प्रकाशन झाले. संस्कृत विभागप्रमुख तथा कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांनी संस्कृत विभागाच्या उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला.
प्राचार्य डॉ. सुखटणकर म्हणाले, ‘महाविद्यालयात संस्कृत, उर्दू व गणित या विषयांकरिता विशेष उपक्रम राबवले जातात. गेल्या पाच वर्षांत संस्कृतचे तीन विद्यार्थी मुंबई विद्यापीठात गुणवत्ताधारक ठरले. नाट्य, गीत, नृत्य या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास होत आहे. संस्कृत विभाग सक्षमपणे समाजासाठीही काम करत आहे.’
संपूर्ण कार्यक्रम संस्कृतमधून सादर झाला. विद्यार्थ्यांनी संस्कृतमधील नाटिका, नांदी, नृत्य आदींचे सादरीकरण केले. या सर्व कार्यक्रमांबद्दल अस्मिता फाटक यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. संस्कृत दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.