Ad will apear here
Next
भाषेचे जगणे-मरणे...
एका ज्येष्ठ पत्रकार मित्राची ‘अचूक मराठी’वरील एक नोंद वाचली आणि त्यांची तळमळ अस्वस्थ करून गेली. मराठीच्या चिंधड्या उडविण्याची स्पर्धा स्वजनांकडूनच सुरू असून माध्यमे - विशेषत: चित्रवाणी माध्यमे - त्या स्पर्धेत हिरीरीने उतरलेली दिसतात.

त्या नोंदीमुळे मग एक स्वगत-चिंतन-होऊन गेले. सहज वाटलं, हा तर अपरिहार्य बदलाचा प्रभाव आहे.

बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. हे एकदा मान्य केले की आपोआपच बदल स्वीकारायची मानसिकता तयार होते. आणि आपण कसे बदलत गेलो तेही लक्षातदेखील येत नाही. फार पूर्वी, सात-आठ पिढ्यांपूर्वी आपल्या घरातील पुरुष मंडळीचा पंचा, उपरणं, पागोटं असा वेश असायचा, बायका लुगडं नेसायच्या. काळाबरोबर बदल होत गेला आणि पंचा-उपरण्याची जागा धोतर-सदऱ्याने घेतली. कालांतराने समाजातच सुधारणा होऊ लागली, विकास होऊ लागला, पायी चालण्याऐवजी मोटारी दिसू लागल्या आणि सदऱ्यावर कोट आला. वहाणांची जागा चप्पलने घेतली. काळ आणखी बदलला. 
धोतर-कोट-सदऱ्याची जागा ‘पँट-शर्ट’ने घेतली, चप्पलऐवजी ‘बूट’ आले. पुढे ‘सूट’ आला, पायात ‘शूज’ आले, गळ्यात ‘टाय’ आला, डोक्यावर ‘कॅप’ आली. आता ‘ब्लेझर्स’ वगैरे वापरतो...

हा केवळ वेषातला बदल आहे, असे वरवर वाटत असले तरी ते तेवढेच नाही.

मराठी भाषा या वेषाबरोबरच कशी बदलत गेली, त्याचं प्रतिबिंबही या बदलातून दिसतं.

भाषेच्या विकासाची प्रक्रिया सुमारे ७० हजार वर्षांपूर्वी सुरू झाली. तेव्हा फक्त वर्तमानकाळाची भाषा होती. पुढे तीस हजार वर्षांनंतर भूतकाळाची भाषा आली. आता आपण भविष्यकाळाच्याही पुढची भाषा बोलत आहोत, म्हणून मराठीचं काय होणार याची कधीकधी चिंता व्यक्त होते.

काही महिन्यांपूर्वी कधी तरी, पुण्याच्या एका एफएम स्टेशनवर ‘सलग ३० सेकंद मराठीत बोलून दाखवा’ अशी स्पर्धा घेत होते. पुण्यात!

कुणीही बोलू शकले नाही, असं मला कळलं!

मराठीत इंग्रजीची मोठी घुसखोरी झाली आहे.

मागे एकदा, १४ सप्टेंबर २०१५ या दिवशी दुपारी बारा-साडेबारा वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर एक भाषण ऐकलं. मराठीतून होतं. ते मी ऐकता ऐकता लिहून घेतलं.

‘बॉडी आणि माइंड यांच्यावर नॉइज पोल्यूशनचा डायरेक्ट ॲडवर्स इफेक्ट होत असतो. म्हणून लहान मुलांच्या एरियातील नॉइज पोल्यूशनचे नॉर्म्स स्ट्रिक्ट असायला हवेत. या सगळ्याचा विचार करून सायन्स रिलेटेड काही गाइडलाइन्स आहेत, ज्या ॲक्टिव्हिस्ट्सनी थरो रिसर्च करून चॉकआउट केल्या आहेत. रेसिडेन्शियल एरियाला किती नॉइज एक्स्पोजर असायला हवेत, त्याचा सीरियसली विचार करायला हवा. इन शॉर्ट, नॉइज पोल्यूशनला लाइटली घेऊन चालणार नाही. कारण ते हेल्थ हजार्ड आहे. इररिव्हर्सिबल हियरिंग लॉस झाला नाही तरी बरेचसे ॲडव्हर्स इफेक्ट्स होऊ शकतात हे सायन्सने सिद्ध केले आहे.’

...नंतर हे मी एका मित्राला ऐकवलं. त्याने खांदे उडवले. तो म्हणाला, इट हॅपन्स! ॲट टाइम्स मराठी वर्ड रिमेम्बर करायला डिफिकल्ट जातं!

भाषाप्रदूषण. मराठी मरणार नाही; पण प्रदूषित होणार.

या पार्श्भूमीवर मला भाषातज्ज्ञ गणेश देवींचं एक वाक्य कायम आठवतं - ‘भाषा कधी मरत नसते. ती मारली जाते - भाषा टिकवणे आपल्या हातात नसेल पण ती मारून टाकू नये. कारण भाषा आपण निर्माण केलेल्या नाहीत. त्यामुळे त्या मारण्याचा अधिकार आपल्याला नाही.’

भाषा जगविणे म्हणजे ती भाषा बोलणारे लोक जगविणे. आपण स्वत:ला तसे जगविले तर भाषा मरणार नाही.

फक्त सध्या आपण भाषा मारतो आहोत की समृद्ध करत आहोत याचा विचार करायला हवा. अर्थात आज एकाच भाषेवाचून काही अडत नाही अशी स्थिती असल्याने आपण भाषेच्या अस्मितेची फार चिंता करत नाही.
- दिनेश गुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HYUPCN
Similar Posts
कवितेचे भाषांतर, अनुवाद, रूपांतर किंवा अनुसर्जन गेली काही वर्षे इतर भारतीय भाषांतून, तसेच जगातील इतर भाषांतून मराठी भाषेत भाषांतरित होऊन आलेल्या पुस्तकांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली दिसते. कवितेतला माणूस असल्याने कवितेपुरते सांगायचे झाल्यास इतर भाषांतून मराठीत भाषांतरित होऊन आलेल्या कवितांच्या भाषांतराच्या दर्जाबद्दल माझ्या मनात एक कायम असमाधान असते
आकाशफुले...! जीए नावाचं गूढ थोडंसं उकलताना...! एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला
तुमचा अनुग्रहो गणेशु... श्रीगणेशाची कृपा म्हणजे काय हे सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीतील पाच ओव्या आणि त्या ओव्यांतील शब्दरत्ने वेचण्याचा प्रयत्न करू या. आपले सद्गुरू हे प्रत्यक्ष गणेशाची विभूती आहेत असं सांगणाऱ्या या पहिल्या पाच ओव्या! सद्गुरू निवृत्तीनाथांचं वर्णन करताना माउलींच्या वाग्वैभवाला नेहमीच उधाणाची भरती यावी तसं झालंय.
देवनागरी लिपी म्हणजेच गणेशविद्या...! देवनागरी लिपीलाच गणेशविद्या असेही म्हणतात. गणपतीने ज्या वर्णसंचाचा वापर करून महाभारत लिहिले असे मानतात, त्या वर्णसंचात स्वर, व्यंजनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आहे. त्या वर्णसंचासाठी वेळोवेळी नवी चिन्हे निर्माण केली गेली. ती चिन्हे अनेकदा बदललीही गेली. त्या चिन्हांच्या सध्याच्या प्रचलित संचाला देवनागरी लिपी म्हणतात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language