मुंबई : देवयानी या मालिकेतून रसिकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री दीपाली पानसरे तब्बल पाच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. ‘स्टार प्रवाह’वर २३ डिसेंबरपासून सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दीपालीच्या व्यक्तिरेखेचे नाव संजना असून, ती अतिशय स्मार्ट, करिअरला महत्त्व देणारी आणि आत्मविश्वासू मुलगी आहे. या भूमिकेविषयी सांगताना दीपाली म्हणाली, ‘ही मालिका प्रत्येकाला आपल्या घरातलीच वाटेल. आपल्या सुखासाठी आयुष्यभर झटणाऱ्या आपल्या माऊलीला आपण नेहमीच गृहीत धरतो. कामाच्या गडबडीत बऱ्याचदा आईला फोनही करायचा राहून जातो. आईच्या त्यागाचं मोल पटवून देणारी ही मालिका आहे आणि त्या मालिकेचा एक भाग होता आला, याचा मला आनंद आहे. देवयानीनंतर पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’सोबत मालिका करताना माहेरी आल्याचीच भावना आहे. देवयानी प्रमाणेच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेवरही प्रेक्षक मनापासून प्रेम करतील याची मला खात्री आहे.’