Ad will apear here
Next
डॉ. जगन्नाथ वाणी आणि स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा)
डॉ. जगन्नाथ वाणीस्वतःच्या पत्नीला स्किझोफ्रेनिया हा विकार झाल्यानंतर आपल्या दुःखाचा बाऊ न करता, त्यातून मार्ग काढत ‘ते’ पुढे जात राहिले. या विकाराची भीषणता समजल्यानंतर त्यांनी ‘स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा)’ या संस्थेची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. त्याबद्दल जनजागृतीसाठी पुस्तकं लिहिली, ‘देवराई’ नावाचा सिनेमा काढला आणि बरंच काही केलं. त्या व्यक्तीचं नाव डॉ. जगन्नाथ वाणी. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज पाहू या डॉ. वाणी आणि त्यांच्या कार्याबद्दल...
........
ही गोष्ट आहे एका अतिशय बुद्धिमान अशा, सहृदय, संशोधक डॉक्टरची! आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यानं अमेरिका गाठली. आपल्या कुटुंबासह तिथं आपला संसार आणि आपलं काम सुरू असतानाच अचानक सुरळीत चाललेल्या त्याच्या आयुष्यात एका वादळानं प्रवेश केला. या तरुणाची पत्नी कमलिनी विचित्र वागायला लागली. तिला आपले भारतातले नातेवाईक इतक्या दूर अंतरावरूनदेखील आपल्याविरुद्ध काही तरी कट करताहेत असं वाटायला लागलं. कधी कधी तर तिला आपल्या नवऱ्याच्या वागण्यावरही शंका उपस्थित व्हायला लागल्या. तिचं वागणं अनाकलनीय होत चाललं होतं. मुलांना आपली आई अशी का वागतेय हे कळणं शक्य नव्हतं. कारण ती वयानं लहान होती. अशा वेळी तारेवरची कसरत करत असताना एके दिवशी आपल्या मित्राच्या सल्ल्यानं या तरुणानं आपल्या पत्नीला एका मानसोपचारतज्ज्ञाला दाखवलं आणि निदान झालं - स्किझोफ्रेनिया या विकाराचं!



या तरुणानं ‘स्किझोफ्रेनिया’ हा शब्द प्रथमच ऐकला होता. त्या विकाराची तीव्रता त्याला मुळीच ठाऊक नव्हती. घरातल्या समस्यांमुळे त्याचं ऑफिसचं कामही ठप्प झालं होतं. मुलांची आबाळ होत होती ती वेगळीच... अशा सगळ्या अवस्थेत असताना एका मानसोपचारतज्ज्ञानं तर ‘तुला यातून घटस्फोट मिळू शकतो’ असंही सांगितलं; मात्र अशा बिकट परिस्थितीत आपल्या पत्नीची साथ सोडणं या संवेदनशील तरुणाला रुचणारं नव्हतं. त्यानं तो सल्ला धुडकावून लावला. आपल्या पत्नीचे उपचार, तिची मानसिक स्थिती हे सर्व काही सांभाळण्याचा निर्णय त्याने घेतला आणि एक वेगळी वाटचाल सुरू झाली. 

रुग्णांसाठी नृत्यकला

आपल्या दुःखाचा बाऊ न करता, त्यातून मार्ग काढत तो पुढे जात राहिला आणि इतकंच नाही तर या विकाराची भीषणता समजल्यानंतर त्यानं ‘स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा)’ या संस्थेची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. ‘स्किझोफ्रेनिया’ या विकाराची सर्वसामान्यांना माहिती होण्यासाठी ‘देवराई’ नावाचा अप्रतिम असा चित्रपटही त्याने काढला. या तरुणाचं नाव होतं - डॉ. जगन्नाथ वाणी! 

चित्रकला

फॅशन परेड

स्किझोफ्रेनियावरचा मराठीत प्रदर्शित झालेला ‘देवराई’ हा पहिला चित्रपट! स्किझोफ्रेनियावर अप्रतिम भाष्य करणाऱ्या डॉ. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित या चित्रपटात अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, तुषार दळवी, देविका दफ्तरदार आणि डॉ. मोहन आगाशे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रत्येकानं बघितलाच पाहिजे असा हा चित्रपट. यातला नायक शेष (अतुल कुलकर्णी) हळूहळू स्किझोफ्रेनिया या विकारात जास्त गुरफटला जातो. लहानपणापासून त्याला देवराईचं (राखलेलं जंगल) वेड असतं; मात्र हा आजार सुरू झाल्यावर त्याला देवराईचे वेगवेगळे भास होऊ लागतात. सुरुवातीला आनंदी असणारा, उत्साही असणारा शेष हळूहळू स्वतः एका कोषात बंदिस्त होत जातो. त्याचं एकलकोंडेपण वाढतं. कधी त्याला अकारण भीती वाटते, तर कधी तो गोंधळून जातो, कधी तो हिंसक होतो, तर कधी अवघडलेपणानं अस्वस्थ होतो. शेषच्या व्यक्तिमत्त्वात या विकारामुळे होणारे बदल या चित्रपटात खूप चांगल्या रीतीनं टिपले आहेत. या सगळ्या कोसळलेल्या आपत्तीत शेषची बहीण त्याला कशी साथ देते, त्याला डॉक्टरी सल्ला आणि आपलं प्रेम यांच्या साह्याने कशा प्रकारे यातून बाहेर काढायला मदत करते, हे चित्रपटात दाखवलं आहे. 

गार्डन अॅक्टिव्हिटी

चित्रपट बघताना आपल्याला शेषची अवस्था आणि एकूणच सगळी ओढाताण असह्य करत राहते. त्याचप्रमाणे आपल्या वाट्याला अशी परिस्थिती आली, तर आपण कसे तोंड देऊ या विचारानं बेचैनही व्हायला होतं. हेच नेमकं डॉ. जगन्नाथ वाणी यांच्या बाबतीत घडलं. 



डॉ. जगन्नाथ वाणी यांच्या पत्नीला - कमलिनीला - स्किझोफ्रेनिया झाल्याचं निदान झालं आणि त्यानंतरचा काळ त्यांच्यासाठी खूपच कसोटीचा होता. पत्नीची शारीरिक आणि मानसिक स्तरावर काळजी घेण्याबरोबरच स्वतःलाही खंबीर ठेवणं, अशा दोन्हीही गोष्टी करणं अत्यंत कठीण होतं. या दिव्यातून जात असताना त्यांना अनेकविध अनुभव आले. स्किझोफ्रेनियाच्या शुभार्थीला (रुग्णाला) सतत भ्रम (डिल्यूजन) होत राहतात. त्याला सतत आभास व्हायला लागतात (हॅल्युसिनेशन). तसंच तो विस्कळीत किंवा असंबद्ध बोलायला लागतो, असंबंद्ध वागायला लागतो, नकारात्मक विचार बळावतात आणि तो एका आभासी जगाला खरं समजायला लागतो. ही सगळी लक्षणं सहा महिने किंवा त्यापेक्षाही जास्त काळ दिसायला लागली, तर या विकाराला ‘स्किझोफ्रेनिया’ असं म्हटलं जातं. या विकारामुळे घरातलं संपूर्ण वातावरण बिघडून जातं. आपल्यावर बाहेरची कुठली तरी शक्ती नियंत्रण ठेवते आहे, आपला कोणीतरी पाठलाग करतो आहे, आपल्याविरुद्ध कोणी तरी कटकारस्थान करतंय, असं त्याला वाटत राहतं. वेगवेगळे आवाज त्याला त्रास देत राहतात. शंभरामधून एकाला स्किझोफ्रेनिया झालेला बघायला मिळतो. 

कवितावाचन

या विकाराचं गांभीर्य कळल्यामुळेच डॉ. जगन्नाथ वाणी यांनी पुढे स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) या संस्थेची स्थापना केली. या विषयाबद्दल लोकांमध्ये जागृती आणण्यासाठी अनेक लेख त्यांनी लिहिले. इतकंच नाही, तर स्वतःच्या प्रवासाविषयी, आयुष्याविषयी त्यांनी ‘बिनघडीचा डाव’ हे आपल्या पत्नीच्या स्किझोफ्रेनियावरच्या अनुभवावरचं पुस्तकही लिहिलं. हे पुस्तक प्रत्येकानं आवर्जून वाचायला हवं. (डॉ. जगन्नाथ वाणी यांच्या पुस्तकांसाठी येथे क्लिक करा.)

संस्थेत राखीपौर्णिमेसारखे सणही साजरे केले जातात.

स्किझोफ्रेनिया असो, वा इतर मानसिक विकार असोत, याकडे आपण, समाज कसे बघतो, मानसिक विकारानं ग्रस्त असलेल्या त्या व्यक्तीपेक्षाही आपल्याला जेव्हा त्रास होतो तेव्हा आपलं त्याच्या त्रासाकडे लक्ष जातं, ही दृष्टी कशी बदलली जाईल, आपलं काम करत असताना आलेले प्रत्येकाचे अनुभव, मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्यांची आजची आकडेवारी, त्यावर काम करणाऱ्यांची अतिशय नगण्य असलेली संख्या या गोष्टी लक्षात घेऊन त्यांचे काम सुरू आहे. माध्यमांमध्ये हे विषय अतिशय सशक्तपणे, पण संवेदनशीलतेनं हाताळलं जाणं खूप महत्त्वाचं आहे. 

आज पुण्यातल्या धायरी भागात असलेल्या कमलिनी या चार मजली वास्तूत ‘सा’चं काम सुरू आहे. स्किझोफ्रेनियानं ग्रस्त असलेल्या व्यक्ती इथं येतात. त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम इथं घेतले जातात. कम्प्युटर कौशल्य, हस्तकौशल्याच्या वस्तू, खाद्यपदार्थ, संगीत, व्यायाम अशा अनेक प्रकारच्या उपक्रमांमुळे येणारा रुग्ण व्यग्र तर राहतोच, पण त्याचबरोबर त्याच्या हातून काहीतरी ‘क्रिएटिव्ह’ गोष्टही घडते. त्याच्या सोबतीला ‘सा’चे स्वयंसेवकही असतात. त्यामुळे एकट्याला विचार करणं, भास होणं या गोष्टींना फारसा वाव राहत नाही. तसंच या गोष्टी तो करत असल्यामुळे त्याचा योग्य मोबदला त्याला मिळतो. 

थोडक्यात आपण काहीतरी कमाई करतोय, ही भावना त्या रुग्णाच्या मनात आत्मविश्वास निर्माण करते. इतकंच नाही, तर स्किझोफ्रेनियानं ग्रस्त असलेले रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी अभ्यासाबरोबरच काही मनोरंजनात्मक कार्यक्रमाचंही आयोजन केलं जातं. त्यामुळे परस्परांतले संबंध दृढ तर होतातच; पण त्याचबरोबर एकमेकांचा आधारही लाभतो. 

रांगोळी

‘सा’तर्फे प्रत्येक वर्षी स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त जनजागृतीच्या दृष्टिकोनातून कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. ‘सा’चं काम जाणून घेण्यासाठी मी पुण्यातल्या धायरी भागात असलेल्या ‘सा’च्या संस्थेला भेट देऊन आले. ही संस्था बघून, या संस्थेचं काम बघून मी थक्क झाले. स्किझोफ्रेनिया या आजारावर काम करताना किती किती गोष्टींचा सखोलतेनं विचार केलाय, हे इथं आल्यावर मला जाणवलं. आपले दैनंदिन ताणतणाव बाजूला सारून दिवसभर प्रसन्न चित्तानं राहणाऱ्या इथल्या सर्व कार्यकर्त्यांना माझा मनापासून सलाम! 

रिक्रिएशन

इथले अनेकविध उपक्रम बघून इथे येणाऱ्या शुभार्थींना (रुग्णांना) व्यग्र ठेवण्याचा, त्यांच्या मनातल्या कोलाहलाला आळा घालण्याचे प्रयत्न दिसत होते. हे उपक्रम सुरू असताना त्यांना एकटंही सोडलं जात नाही. त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्ती त्यांच्यासोबत असतात. 

वारली चित्रकला

स्किझोफ्रेनिया या विषयावर काम करत असताना लोकांच्या मनात घट्टपणे चिकटलेले पूर्वग्रह दूर करणं, माहितीपट, लेख, कार्यशाळा, चर्चासत्रं, साहित्य, पोस्टर प्रदर्शनं अशा अनेक माध्यमांच्या साह्यानं जनजागृती करणं, स्किझोफ्रेनियानं ग्रस्त असलेल्या व्यक्ती आणि त्यांचे नातेवाईक, कुटुंबीय यांनाही सक्षम करणं हा ‘सा’ या संस्थेचा हेतू असल्यामुळे हे विषय वारंवार लोकांसमोर आणले जातात. 

संस्थेतील रुग्णांनी केलेल्या विविध वस्तू

आपल्याकडे स्किझोफ्रेनियाकडे बघण्याचा, त्याचा स्वीकार करण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलतो आहे. पूर्वी मानसोपचारतज्ज्ञाकडे जाणं म्हणजे आपला मुलगा किंवा मुलगी यांच्यावर वेडेपणाचा शिक्का मारून घेणं असे गैरसमज पालक करून घेत; मात्र आता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं, उपचार घेणं यात बदल घडतो आहे. अर्थात मनोविकाराच्या क्षेत्रात काम करण्यासाठी अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स, अनेक कार्यकर्ते, स्वयंसेवक, हॉस्पिटल्स, संस्था यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. 

सा संस्थेची टीम

मानसिक विकारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तींना ममत्वाची वागणूक मिळण्याची नितांत आवश्यकता असते. अशा वेळी सहानुभूतीचा किंवा उपेक्षेचा एक कटाक्ष त्याला किंवा तिला त्रासदायक ठरू शकतो. अशा वेळी या विकाराविषयीची जागरूकता निर्माण होणं, अशा व्यक्तींशी कसं वागावं याचं प्रशिक्षण घेणं हेही तितकंच गरजेचं आहे. ‘देवराई’ असो वा ‘ब्युटिफुल माइंड’... यांसारखे चित्रपट समाजप्रबोधनाचं काम करू शकतात. त्यामुळे चित्रपट, कार्यशाळा, पोस्टर प्रदर्शनं, चर्चासत्रं, साहित्य प्रसिद्ध करणं, माहितीपट निर्माण करणं हे सातत्यानं करणं गरजेचं आहे. अशा विषयांवरची पुस्तकं जरूर वाचायला हवीत. 

सा संस्थेची टीम

अच्युत गोडबोले यांनी मानसशास्त्रावर लिहिलेलं ‘मनात’ आणि मनोविकारांवर लिहिलेलं ‘मनकल्लोळ,’ डॉ. आनंद नाडकर्णी यांचं ‘देवराईच्या सावलीत,’ डॉ. सविता आपटे यांचं ‘रोज नवी सुरुवात’ ही पुस्तकं, तसंच डॉ. राजेंद्र बर्वे, डॉ. प्रदीप पाटकर यांचीही या विषयावरची पुस्तकं जरूर वाचायला हवीत. स्किझोफ्रेनिया असो वा इतर मानसिक विकार, प्रत्यक्ष रुग्ण आणि त्याचे पालक, नातेवाईक आणि समाज यांचंही प्रबोधन आवश्यक आहे. शास्त्रीय कारणं लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करणं हा डोळसपणा असेल. अंधश्रद्धा, गैरसमज यांच्यापासून दूर राहता येईल. 

संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत बक्षी यांच्यासह लेखिका दीपा देशमुख आणि अच्युत गोडबोले

डॉ. जगन्नाथ वाणी यांनी ‘सा’ संस्था सुरू केली. आज ते हयात नसले, तरी त्यांच्या संस्थेची धुरा संस्थेचे इतर कार्यकर्ते खूप समर्थपणे सांभाळत आहेत. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत बक्षी, हरीभाऊ आठवले, अनिल वर्तक यांसारखे ध्येयनिष्ठ संस्थाचालक या विकाराचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. ‘सा’ संस्थेला जरूर भेट द्या आणि आपण योगदान करू शकत असाल तर अवश्य करा.

संपर्क : स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) 
अमृत बक्षी : ९८८११ ९००००, हरीभाऊ आठवले : ९८२३१ ६१३५२
वेबसाइट : http://www.schizophrenia.org.in
ई-मेल : schizpune@gmail.com

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

योगा थेरपी
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZFOBW
Similar Posts
ये हौसला कैसे झुके, ये आरजू कैसे रुके... रत्नागिरी जिल्ह्यातल्या साखरप्यासारख्या लहानशा गावातून एक मुलगा पुण्यात पोहोचला आणि नंतर त्याच्या स्वप्नांनी त्याला थेट अमेरिकेत नेऊन पोहोचवलं. अमेरिकेत जाऊनही त्यानं आपलं मूळ गाव साखरपा आणि पुणे यांच्याशी असलेली नाळ तोडली नाही. या तरुणाचं नाव आहे मंदार मोरेश्वर जोगळेकर! ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदराच्या
रुक जाना नहीं, तू कहीं हार के... बीए, एलएलबी झालेल्या, लग्न होऊन संसारात रुळलेल्या शारदा बापट नावाच्या एका स्त्रीनं आपल्या आईच्या सततच्या आजारपणाचं कारण शोधण्यासाठी चक्क वयाच्या पस्तिशीत डॉक्टर व्हायचं ठरवलं. रीतसर कॉलेज करून, असंख्य अडचणींना तोंड देत त्या डॉक्टर झाल्याही. त्याच दरम्यान त्या वैमानिकही झाल्या, कम्प्युटर्स-इलेक्ट्रॉनिक्स यांवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं
श्रीकृष्णाचं ‘अल्फा’ स्वप्न! आपला मुलगा ऑटिस्टिक आहे, हे समजल्यानंतरही पुण्यातील श्रीकृष्ण गोडबोले आणि त्यांच्या पत्नीनं वास्तव स्वीकारून वाटचाल करायचं ठरवलं. श्रीकृष्ण यांनी नोकरी सोडून स्वतःची फॅक्टरी सुरू केली आणि त्यात मानसिक विकलांग, अपंगांनाही कामाची संधी दिली. त्यांना जणू आपल्या कुटुंबातच सामावून घेतलं. अशा मुलांसाठी आणखीही बरंच काही करण्याची त्यांची इच्छा आहे
धुंद-स्वच्छंद बाळ्या ‘आयआयटी’मधून मेकॅनिकल इंजिनीअर होऊन बाहेर पडलेला एक तरुण आयटी क्षेत्रातली गलेलठ्ठ पगाराची नोकरी न करता, जेव्हा गिर्यारोहण, फोटोग्राफी, लेखन अशा क्षेत्रांत लीलया मुशाफिरी करून त्यात उत्तुंग यश मिळवतो, तेव्हा त्याच्याविषयीचं कुतूहल मनात जागं होतं. त्या अवलियाचं नाव आहे वसंत वसंत लिमये. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language