Ad will apear here
Next
ये जिंदगी के मेले...
संगीतकार नौशादसंगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेले नौशाद हे उत्तम गीतकार, कथाकार आणि चित्रपट निर्मातेही होते. पाच मे हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदराच्या आजच्या भागात आस्वाद घेऊ या ‘ये जिंदगी के मेले...’ या त्यांनी संगीत दिलेल्या एका सुंदर गीताचा...
..........
सुप्रसिद्ध संगीतकार नौशाद यांचा स्मृतिदिन पाच मे रोजी असतो. २००६मध्ये त्यांचे निधन झाले. मे महिन्यात त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त काही विचार मांडावा असे ठरवले आणि लक्षात आले, की नौशाद हे फक्त संगीतकार नव्हते, तर शेरोशायरी लिहिण्याची प्रतिभाही त्यांच्याजवळ होती. तरुण असताना त्यांनी आपली ही काव्ये प्रसिद्धीसाठी पाठवली होती. त्या काळात चित्रपटसृष्टीवर महाराष्ट्राच्या बरोबरीने बंगाली लोकांचाही पगडा असायचा. त्यामुळे ही शेरोशायरी प्रसिद्धीसाठी पाठवताना त्यांनी स्वतःचे नौशाद हे नाव न वापरता ‘एन. ए. दास’ या टोपण नावाने पाठवले होते. एन. ए. दास म्हणजे नौशाद अली दास असे त्यांना अभिप्रेत होते. 

अर्थात पुढे चित्रपटाच्या संगीताचे काम वाढल्यानंतर त्यांना शेरोशायरी करण्यासाठी जास्त वेळ देता येईना. त्यामुळे त्यांनी आपला हा लेखनाचा छंद आपल्या हौसेखातर जोपासला; पण शेरोशायरी छापणे, प्रसिद्धीस पाठवणे हे बंद केले. शायरीबरोबर नौशादजी कथालेखनही करत असत. त्यांनी संगीत दिलेल्या अनेक कथांचे विषय लिहून ते कथाविस्तारासाठी पुढे त्यांचे मित्र अझम बाजिदपुरी यांच्याकडे देत असत. ‘संगीत, शायरी आणि कथा यांच्या कलानंदातच मी आकंठ बुडून गेल्याने मला मदिरा किंवा तत्सम व्यसनांपासून परमेश्वराने दूर ठेवले,’ असे ते सांगत असत. 

एस. यू. सनी यांच्या सहकार्याने नौशाद यांनी ‘उडनखटोला’ व ‘पालकी’ या दोन चित्रपटांची निर्मिती केली. म्हणजे संगीतकार नौशाद निर्मातेही होते. त्यांनी संगीत दिलेल्या ‘शबाब’, ‘मेला’, ‘बाबुल’, ‘दीदार’, ‘पालकी’, ‘साज और आवाज’ या चित्रपटांच्या कथा नौशाद यांनी स्वतःच लिहिल्या होत्या. त्यांनी संगीत दिलेल्या प्रत्येक चित्रपटात एखाद-दुसरे गाणे त्यांनी लिहिलेले होते. फक्त ते शकील बदायुनी यांच्या नावावर गेले.

अशा या नौशादांची महत्त्वाची ओळख संगीतकार म्हणून होती व आहे. परंतु त्यांना संगीताचा वारसा घरातून मिळाला नव्हता. त्यांचे खानदान धार्मिक प्रवृत्तीचे असल्यामुळे एखाद्या उरुसाच्या ठिकाणी जेवढे संगीत चाले, तेवढेच ऐकण्याची त्यांना परवानगी होती; पण नौशाद यांच्या खानदानात संगीताची आवड नसली, तरी त्यांना संगीताची आवड होती, जाण होती. ते शिकण्याची तळमळ होती. त्यामुळेच त्यांनी गुरुबत अली, युसूफ अली आणि बब्बनखानसाहेब या उस्तादांकडे शास्त्रोक्त संगीताचे धडे घेतले. ते वाद्ये शिकले आणि सिनेमात ते पियानोवादक म्हणून आले. काही काळाने ते सहायक संगीत दिग्दर्शक बनले. संगीतकार झंडेखान, तसेच मुश्ताक हुसेन यांच्याकरिता ते सहायक म्हणून काम करत. ओघानेच ते दोघे चित्रपटसृष्टीत यांचे गुरू बनले. संगीतकार खेमचंद प्रकाश यांच्याकडेही त्यांनी काही दिवस शागिर्दी केली.

भवानी प्रोडक्शनचा ‘प्रेमनगर’ हा नौशाद यांनी स्वतंत्रपणे संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट. नंतर ‘दर्शन’, ‘माला’, ‘नई दुनिया’, ‘शारदा’ अशा काही चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. परंतु नौशाद यांच्या नावाचा बोलबाला झाला तो ‘रतन’ या चित्रपटामुळे. त्याची गाणी भारतभर गाजली. हा चित्रपट सिने-संगीतात क्रांती घडवणारा होता असे समजले जाते.

नौशाद युग सुरू झाले. त्यांनी शास्त्रीय संगीतातील रागदारी चित्रपटगीतांतून पुढे आणली. त्यासाठी खूप प्रयत्न करून मधुर चाली तयार केल्या. त्यांनी संगीत दिलेल्या एकेका गाण्याच्या हकीकतींवर एखादे पुस्तकच लिहावे लागेल, असे नौशाद यांचे कर्तृत्व होते. त्यांनी पार्श्वगायक मुकेश, तलत मेहमूद आणि महेंद्र कपूर यांना काही मोजकीच गाणी देऊन पुरुषी आवाजातील अन्य सर्व गाणी मोहम्मद रफी यांच्याकडून गाऊन घेतली.

हाच प्रकार गीतकारांच्या बाबत झाला. नौशाद यांनी संगीत दिलेल्या सर्व गीतांवर एक दृष्टिक्षेप टाकला, तर शकील बदायुनी यांनी लिहिलेल्या गीतांची संख्या जास्त दिसून येईल. तसेच दिलीपकुमार नायक आणि नौशाद यांचे संगीत हा सुवर्णकांचन योग जवळजवळ १५ चित्रपटांत जुळून आला. अर्थात त्या व्यतिरिक्त अन्य नायकांच्या चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. परंतु दिलीपकुमार नायक असलेल्या चित्रपटांची संख्या जास्त आहे.

टीव्ही मालिकांची सुरुवात झाली, तेव्हा ‘टिपू सुलतान की तलवार’ या मालिकेलाही त्यांनी संगीत दिले होते. हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात प्रदीर्घ काळ आणि वैशिष्ट्यपूर्ण कारकीर्द गाजवलेल्या या महान संगीतकाराने तशी अनेक ‘सुनहरी’ गीते दिली आहेत. त्यापैकी एकाच गीताची निवड करणे अवघड आहे; तरीही हे एक सुनहरे गीत आपण पाहू या.

१९४४-४५च्या सुमाराची ही घटना आहे. जे. बी. एच. वाडिया, एस. यू. सनी हे एक नवीन चित्रपट काढायच्या विचारात असतानाच संगीतकार नौशाद यांनी लिहिलेल्या एका कथेचे वाचन करायचे एका बैठकीत ठरले. नौशाद तेव्हा नुकतेच लखनौची यात्रा करून आले होते. तेथे यात्रेला गेले असताना तेथील दर्ग्याच्या ठिकाणी झालेल्या बदलाबद्दल एक वयोवृद्ध जाणकार म्हणाले, की, ‘बेटे यही दुनिया का मेला ही तो है.’ त्यांच्या या विधानाने नौशाद यांना कथेचे बीज मिळाले.

...आणि त्यावर त्यांनी कथा लिहिली व त्याच कथेवर तयार झालेला ‘मेला’ हा चित्रपट आठ ऑक्टोबर १९४८ रोजी मुंबईत प्रदर्शित झाला. दिलीपकुमार व नर्गिस हे कलाकार या चित्रपटाचे नायक-नायिका होते. या चित्रपटातील गीते सुंदर होती. त्या चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश मिळवले. त्या चित्रपटातील कथानकानुसार एका गीताची आवश्यकता होती.  तेव्हा त्या चित्रपटाचे गीतकार शकील बदायुनी यांना नौशाद यांनी सांगितले, ‘एका वृद्ध शायराचा मी ऐकलेला एक शेर मला खूप भावला होता. तो तुम्हाला सांगतो. त्या आधारे तुम्ही काही लिहू शकाल.’ तो शेर असा होता -

दुनिया के जो मजे है, हरगीज ये कम न होंगे 
चर्चे यही रहेंगे, अफसोस हम न होंगे

आणि या शेराचा आधार घेऊन शकील यांनी गीत लिहिले. मोहम्मद रफीने ते गाऊन अजरामर केले. नौशाद यांचे संगीत मदतीला होतेच. रफी गातात...

यह जिंदगी के मेले दुनिया में कम न होंगे, 
अफसोस हम न होंगे

जीवनाच्या या जत्रा, हे मेळे (अर्थातच जन्म-मृत्यूचे हे चक्र), मानवाचे येणे-जाणे इथे अव्याहत सुरूच राहणार आहे. फक्त दु:ख याच गोष्टीचे वाटते, की (उद्याच्या त्या जगात) आम्ही असणार नाही.

इक दिन पडेगा जाना, क्या वक्त क्या जमाना,
कोई न साथ देगा, सब कुछ यही रहेगा 
जाएंगे हम अकेले, ये जिंदगी के मेले...

एक दिवस या जगातून आम्हाला जावेच लागणार आहे. ती वेळ, तारीख कोणती असेल? (कोण जाणे? पण एवढे मात्र खरे, की त्या वेळी जाताना आम्हाला) कोणीही साथ देणार नाही. (आमचे आमचे म्हणून आम्ही जे काही म्हणतो ते) सर्व काही मात्र इथेच राहणार आहे. (आणि) आम्ही (मात्र) एकटेच (या जगातून) जाणार आहोत.

दुनिया है मौज दरिया, कतरे की जिंदगी क्या
पानी में मिल के पानी, अंजाम है के पानी 
दमभर तो सास ले ले, ये जिंदगी के मेले...

असंख्य लाटा, असंख्य तरंग, थेंब असणारा एक समुद्र म्हणजे हे जग आहे. आणि मग अशा समुद्रात एका थेंबाचे जीवन ते काय असते? (तसेच विश्वाच्या पसाऱ्यात माणसाचे अस्तित्व नगण्यच असते.) आणि अशा या विश्वसागरातील आपण पाण्याचा एक थेंब. या विश्वात आपण मिसळल्यानंतर काय होणार? तर पाणीच होणार! (मानवी जीवनाची क्षणभंगुरता, अस्तित्व नगण्य आहे, हे सर्व या उपमांच्या साह्याने शकीलनी मांडले आहे.) अर्थातच आपण नाशवंत आहोत (अरे मानवा) क्षणभर श्वास घेऊन थांब. (आणि हा विचार लक्षात घेऊन तुझे वर्तन ठेव. अर्थातच द्वेष, क्रोध, मत्सर, लोभ सोडून दे!)

अखेरच्या कडव्यात शायर सांगतो -

होंगी यही बहारे उल्फतकी यादगारे 
बिगडेगी और बनेगी, दुनिया यही रहेगी 
होंगे यही झमेले, ये जिंदगी के मेले...

हे सौख्याचे वसंत ऋतू, प्रीतीच्या स्मृती येतच राहतील, बनत राहतील. (कारण कालचक्राचा तो एक भाग आहे.) ही दुनिया उद्ध्वस्त होईल आणि पुन्हा वसवलीही जाईल. विस्कटून टाकली जाईल आणि पुन्हा तिची घडीही बसवली जाईल. येथे हे असे जनसमूह असतीलही, राहतीलही. मानवी जीवनांचे मेळावे/मेळे कधीच कमी होणार नाहीत. फक्त आम्ही त्यामध्ये नसणार.

हे गीत लिहिणारा शकील, गाणारे मोहम्मद रफी व संगीतबद्ध करणारे नौशाद. यांपैकी आज कोणीही हयात नाही. परंतु यासारख्या गीतांमुळे ते कलावंत आपल्यातच आहेत. फक्त ऐकायला छान असणे, एवढेच ‘सुनहऱ्या’ गीताचे वैशिष्ट्य नसते ना! आशयपूर्ण शब्दरचना, वास्तव मांडणारे शब्द आणि त्यासाठीचे संगीत या सगळ्याच गोष्टी त्यासाठी आवश्यक असतात. या ‘सुनहऱ्या’ गीताचे संगीतकार नौशाद यांच्या स्मृतीस अभिवादन.

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZXUCM
Similar Posts
हम भी अगर बच्चे होते... हिंदी चित्रपटसृष्टीसाठी विविध प्रकारची अजरामर प्रेमगीते लिहिलेले गीतकार शकील बदायुनी यांचा २० एप्रिल हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ या सदरात या वेळी पाहू या त्यांच्या प्रतिभेचा एक वेगळा आविष्कार असलेले गीत.... ‘हम भी अगर बच्चे होते...’
रहा गर्दिशों में हरदम... संगीतकार आणि गीतकार रवी यांचा जन्मदिन तीन मार्चला असतो, तर स्मृतिदिन सात मार्चला असतो. त्या औचित्याने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या रवी यांनी संगीतबद्ध केलेल्या एका गीताचा...
चौदहवी का चाँद हो! दिग्दर्शक एम. सादिक यांच्या दिग्दर्शनातील चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा एक भाग! तीन ऑक्टोबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या ‘चौदहवी का चाँद’ या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटातील गीताचा आस्वाद...
कभी खुद पे कभी हालात पे... ‘हम दोनों’च्या लोकप्रिय गाण्यांसह अनेक गाण्यांना श्रवणीय संगीत देणारे संगीतकार जयदेव यांचा जन्मदिन तीन ऑगस्टला होऊन गेला. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज आस्वाद घेऊ या त्यांनी संगीत दिलेल्या ‘हम दोनों’मधीलच ‘कभी खुद पे कभी हालात पे...’ या गीताचा...

Is something wrong?
Select Location
OR

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
Share This Link
Select Language