Ad will apear here
Next
‘त्यांना’ स्थैर्य मिळालं...! (गिरीश प्रभुणे विशेष मुलाखत - ४)


‘भटक्या-विमुक्तांना स्थिर करण्यासाठी वसाहत उभी करायला सुरुवात झाली. नंतर लिखाण, गणिताचा संबंध नसलेल्या वेगवेगळ्या व्यवसायांच्या माध्यमातून ५० कुटुंबांतली तीस कुटुंब दहा वर्षं एका ठिकाणी स्थिर झाली....’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या आरती आवटी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा चौथा भाग...
...........
पुनर्वसनाची सुरुवात कशी झाली?

गिरीश प्रभुणे : भटक्या जातीतल्या सर्वांसाठी एकीकडे आंदोलन सुरू होतं, दुसरीकडे पुनर्वसन. पुनर्वसनाला आम्ही प्रथमवसन म्हणायला लागलो. या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असं पहिल्यांदाच घडत होतं. त्यामुळे काही नवीन प्रयोग आले. नवीन गोष्टी आल्या. करायचंच तर मग एक वसाहत करू या, असं ठरलं. वसाहत करायची असेल तर कशी करावी? लॉरी बेकर यांच्या कल्पनेतून विकास आमटेंनी घराचं एक मॉडेल तयार केलं होतं. माती, सिमेंट आणि वाळू यांचं मिश्रण करून, न भाजलेल्या कॉम्प्रेस्ड विटांचं, डोम स्वरूपातलं ते घर होतं. मग आम्ही तशी पन्नास घरकुलं बांधली. त्याआधी जमीन खरेदी केली. बचत गट केले. आज बचत गटांची एवढी मोठी लाट आहे सगळीकडे. आम्ही १९९० सालाच्या आधी बचत गटांची रचना केली. पारध्यांमध्ये दोनेकशे बचत गट उभे राहिले. डोंबाऱ्यांमध्ये, कोल्हाट्यांमध्ये उभे राहिले. सर्व ठिकाणी बचत त्यांनीच करायची. बचत करण्यामध्ये कष्टार्जित पैसा आणायचा; पण मग आमच्या लक्षात आलं, की कष्ट म्हणजे काय? शिकार केली तर चालेल? आता शिकारीलासुद्धा कायद्याने बंदी आहे; पण मग शिकारीला बंदी आहे, तर हे चोऱ्या करतील. चोरी चालेल का? तर चोरी नको. कारण दुसऱ्यानं कष्ट करून मिळवलेले पैसे चोरण्यापेक्षा शिकार करा. कारण ती परंपरेने आलेली आहे. म्हणून मग शिकारीचे पैसे चालतील, असं ठरलं. 

शिकारीच्या कामातून वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या पारध्यांच्या शंभर कुटुंबांनी जवळपास सहा महिन्यांत दहा हजार रुपये जमा केले. रोज ठिकाण बदलायचं; पण ते आठवड्यातनं एकदा जमा व्हायचे अन्‌ पैसे जमा करायचे. अत्यंत अडाणी असणाऱ्या एका पारधी कार्यकर्त्याकडे आम्ही त्या सगळ्यांच्या पैशांची जबाबदारी ठेवली. म्हटलं, बघू, चोऱ्या करतात की पैशांचा हिशेब ठेवतात. त्यांचा हिशेब तोंडपाठ असायचा. कोणी किती दिले, किती वेळा दिले, कुठल्या दिवशी दिले, कुठे दिले, मी कुठं उभा होतो आणि त्यांनी कसे आणून दिले, कुठल्या नोटा दिल्या, कॅश कशा प्रकारची होती. असं सगळं म्हणजे बँकेत भरणा करताना आपण लिहितो, ते प्रत्येकाचं तोंडपाठ होतं. म्हणजे स्मरणशक्ती प्रचंड आहे. आणि मग असे पैसे एकत्र करून खात्यामध्ये भरणं. असं सगळं करून सहा महिन्यानंतर आम्ही एक जमीन खरेदी केली आणि तिथून खरी पारध्यांच्या एका वेगळ्या विषयाला सुरुवात झाली. 

जमीन खरेदी करत असताना आम्ही सांगितलं, की आता जमीन खरेदी करायची आहे आपल्याला. या सामाजिक प्रश्नामध्ये एक लक्षात आलं होतं, की बायकांच्या समस्या अधिक आहेत. पुरुष पळून जातो किंवा जेलमध्ये राहतो. पळून गेल्यानंतर तो गरजेपोटी तिकडे दुसरी बाई करतो. ही बाई या नवऱ्याची मुलं सांभाळत बसते आणि म्हातारी होईपर्यंत त्या पोरांना बघत असते. मध्ये दुसरा कोणी मिळाला, तर लग्नही करते. लग्न केलेला तो नवरासुद्धा तिच्याबरोबर कायम राहत नाही. तो पुन्हा दुसरीकडे जातो. त्याची मुलं ही सांभाळते. म्हणजे पहिल्याची मुलं, दुसऱ्याची मुलं, तिसऱ्याची मुलं, चार-चार नवऱ्यांची मुलं ही सांभाळते. समस्या तिच्या आहेतच. म्हणून मग आम्ही ठरवलं. घर बांधायचं असेल, उद्योग करायचा असेल, तर बाईला स्थिर करू. पुरुषाला स्थिर केलं, तर तो रोज नवीन बायको आणेल. ही नाही आवडली हिला हाकलून देणार, ती नाही आवडली तिला हाकलून देणार, दुसरी आणणार. बाईचं घर करू आणि बाईचा त्या वेळेला जो नवरा आहे, त्याच्याबरोबर तिला संसार करायला सांगायचं. समजा नाही पटलं आणि तो निघून गेला, तरी तू, तुझं घर, तुझा प्रपंच, तुझी मुलं, तुझा उद्योग आहेच. असं आम्ही एक मुक्तीनगर उभं केलं.... तुळजापूरच्या जवळ. त्या पन्नास स्त्रियांच्या नावावर केलं. सगळ्यांनी विरोध केला. म्हणाले, ‘बाईला कसे काय देणार तुम्ही? बाई म्हणजे अपवित्र. ती कुल्टा. जिच्या नावावर फक्त एक नवरा आहे ती फक्त सती सावित्री.’ अशी एक नवरा असलेली देवतेसारखी. म्हणजे तिला प्रचंड मान आणि अशा बायका हाताच्या बोटावर म्हणजे एका हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्यासुद्धा मला सापडल्या नाहीत. अशा देवतांपैकी एक बाई वयोवृद्ध होऊन मेली. तिचं मंदिर उभं केलंय त्यांनी. म्हणजे ही देवी होण्याची प्रक्रिया. कारण बाकीच्यांना सरसकट दुसरा तरी नवरा आहेच. त्यामुळे मग त्या कुल्टा. अशा समजुतीतून त्यांना बाहेर आणायचं म्हणजे अवघड काम; पण तरीसुद्धा आम्ही सहा महिने वाट पाहिली. मग सगळ्यांना सांगितलं, ‘हिच्या नावावर जमीन घेणार नसलो, तर आपण हे करणारच नाही.’ मग शेवटी म्हणाले, ‘ठीक आहे, हिच्या नावावर करा. आता तरी ती मला सांभाळते आहे. मी तिच्याबरोबर राहतो.’ असं करत-करत ५० घरकुलं उभी राहिली. 

वेगवेगळ्या व्यवसायांचं प्रशिक्षण दिलं. बेकरीचं शिक्षण दिलं. मग लिखाण-वाचन करावं लागणार नाही, असे व्यवसाय सुरुवातीला निवडले. कारण मग शाळा, मग प्रौढ साक्षरता वर्ग असं सगळं सुरू होतं. ते काही सहीच्या पलीकडे जात नाही. म्हणून मग लिखाण नाही, ज्याच्याशी अंकगणिताचा संबंध नाही, ज्याच्याशी अक्षराचा संबंध नाही, असे व्यवसाय निवडले. त्यात बांधकामाचं चालू शकतं. असे सगळे व्यवसाय करून जवळ-जवळ त्या ५० कुटुंबांतली तीस कुटुंबं दहा वर्षं एका ठिकाणी स्थिर झाली. त्यांचे नवरे बदलले.

आता अजून वाढली आहेत घरं? की पन्नासच आहेत?

गिरीश प्रभुणे : आता पन्नासच्या बरीच वर गेली संख्या. वस्त्या वाढल्या, जवळजवळ दहा ठिकाणी वेगवेगळ्या अशाच वस्त्या उभ्या राहिल्या. काही ठिकाणी आपण सरकारला हे करायला लावलं. कळम नावाच्या भागात गावकऱ्यांनी अत्याचार केले. अत्याचाराची एक मालिकाच झाली. कळममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दीडशे पारध्यांच्या वस्त्या होत्या. गावातल्या सर्वांनी सगळ्या वस्त्या जाळून टाकल्या. ही १९९८ची गोष्ट आहे. दीडशे घरं जाळल्यानंतर आम्ही गेलो तिथे. त्या वस्तीतली मुलं होती यमगरवाडीत. आम्ही सर्व कार्यकर्ते घेऊन गेलो. गावकरी बघायला तयार नाहीत आणि सगळे पारधी तहसील कचेरीच्या समोर बसलेले. ‘का जाळलं हे,’ तर दारू गाळत असत पारधी. मूळचे चोऱ्या-माऱ्या करणारे, शिवाय दारू गाळायला लागले. दारू प्यायला येईल त्याला भरपूर दारू पाजायची. दारू प्याल्यानंतर खिशात असलेला सगळा माल काढून घ्यायचा. त्यामुळे सगळं गाव पारध्यांच्या विरोधात गेलं. दलितांपासून सर्व जण त्यात होते आणि सर्व पक्षांची मंडळी होती. सगळ्यांनी मिळून जाळून टाकली वस्ती. आम्ही पुन्हा आंदोलन केलं आणि मग सगळ्याचा एक आराखडा तयार केला, शासनाला दिला. त्यांना सांगितलं, की एक तर त्यांना स्थिर केलं पाहिजे आणि शिक्षण दिलं पाहिजे. सरकारला आराखडा दिला, सरकारनं स्वीकारला. सरकारने आमच्या सहकार्याने त्यांची वसाहत उभी केली. आमचं असं म्हणणं होतं, की आपण किती करणार, कुठे-कुठे करणार? कार्यकर्ते नाहीत. बरं याचा लाभ म्हणावा, तर कामाला प्रसिद्धी भरपूर मिळाली, काम खूप उभं राहिलं. त्यातनं कार्यकर्तेही उभे राहिले; पण शहरातनं कार्यकर्ते येण्याचा एक काळ होता. गेल्या पंधरा-वीस वर्षांत कार्यकर्ता बनण्याची प्रक्रिया कमी झाली. शाखांमधनं उपस्थिती कमी झाली. शहरातून येऊन काम करणारा घटक कमी झाला, घटला. त्यामुळे माझ्या मागोमाग कुणी आणखी दहा-वीस जण आले, असं काही घडलं नाही. त्यामुळे म्हटलं, की एकदा हे सरकारच्या गळ्यात पडलं, तर सरकार काय भ्रष्टाचार करील, आणखी काही करील; पण जे काही होईल त्यातून निदान गावं उभी राहतील. त्याचा लाभ झाला. त्यामुळे कळमच्या परिसरामध्ये आज पारध्यांची जवळपास दोन-एकशे घरं उभी राहिली. सरकारी मदतीने आणि आपल्या प्रयत्नांनी ती उभी राहिली.

याच कालखंडात परांडा नावाच्या गावात पाच जणांची हत्या झाली. जबरदस्त मोठं प्रकरण झालं होतं. पोलिसांनी केस लावली होती. त्या केसच्या तारखेकरिता रोज हेलपाटे घालणारं, बसमधून जाणारं, असं एक कुटुंब होतं चार-पाच जणांचं. ते चाललं होतं त्याच ठिकाणी एक दरोडा झाला आदल्या दिवशी रात्री. त्या दरोड्यामध्ये एका दाम्पत्याची हत्या झाली. त्यांचे मृतदेह घेऊन सगळे जण पोस्टमॉर्टेमसाठी शेळगावात आलेले होते. हे पारध्यांनी केलेलं असणार, अशा अंदाजाने सगळे गावकरी संतप्त होते. तिथे एसटी येऊन थांबली आणि त्यात हे पाच जणांचं कुटुंब होतं. एक महिला आणि चार पुरुष. अख्खं गाव म्हणजे दोन-चारशे मंडळी, त्या एसटीवर तुटून पडली. त्या पारध्यांना बाहेर काढलं. ते उघडपणे चालले होते. म्हणजे त्यांचा काही दोष नाही. ते कोर्टकचेरीच्या फेऱ्यात अडकलेले होते. जो चोरी करतो, तो तिथे थांबत नाही, दूर निघून जातो; पण या सगळ्यांच्या डोक्यामध्ये इतका राग होता, की त्यांना बाहेर ओढून काढलं आणि दगडांनी ठेचून मारलं. रस्त्यावर पाच मृतदेह पडले होते. मारणारे सगळे उच्च समाजातले होते. स्थानिक राजकारणातले होते. त्यांनी मारताना जबरदस्त ठेचून मारलं. बाईला अत्यंत विकृत पद्धतीनं मारलं. त्याचं व्हिडिओ शूटिंग पत्रकारांनी केलं. ही घटना घडली आणि दोन तासांत आम्ही तिथे पोहोचलो. यमगरवाडीत जबरदस्त आंदोलन केलं. संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला होता. अशीच केस शेवटपर्यंत नेली. जिल्हा परिषदेचे सगळे उपस्थित होते. पद्मसिंह पाटील आमच्यासमोर होत्या. आम्हाला म्हणाल्या, ‘तुम्ही यांच्यात सुधारणा केली पाहिजे.’ आम्ही म्हटलं, ‘यांच्यात सुधारणा केल्या, तरी तुम्ही लोकांना ठार मारणार आणि आम्ही नुसतंच शिकवलं पाहिजे त्यांना.’ शाळेतली, यमगरवाडीतली तीनशे-साडेतीनशे मुलं आम्ही घराघरात, वस्त्यावस्त्यांवर नेऊन जागृती केली. केस उभी राहिली. त्याही केसमध्ये सहा जणांना जन्मठेप झाली; पण दुर्दैव असं आहे, की ज्यांनी केलं त्यांना पकडलंच नव्हतं. ज्यांनी केलं नाही, त्यांना पकडलं, असा थोडासा प्रकार होता. म्हणून अपील अजून चालू आहे. बहुतेक आता तेही सुटतील आणि हेही सुटतील, अशी परिस्थिती आहे.

अशा वेगवेगळ्या आंदोलनांतून, तसेच या विषयाची तीव्रता ‘विवेक’सारख्या साप्ताहिकाने मांडल्यामुळे संघपरिवारामध्ये हा विषय एक वेगळ्या जाणिवेचा विषय म्हणून पुढे आला. अनेक महिला कार्यकर्त्या उभ्या राहिल्या. अनेक जण पहिली ते दहावीपर्यंत शिकल्या. यमगरवाडीच्या प्रकल्पामध्ये शेती, भाजीपाला, खेळ, क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आले. पहिलीला यमगरवाडीत आलेली दहा-बारा मुलं दहावीपर्यंत शिकली. त्यातला परमेश्वर काळे आणि गणेश शिंदे हे दोघे दहावीनंतर पुण्यात आले. त्यांना मॉडर्न महाविद्यालयात घालण्यात आलं. बारावीला एकाला ७३ टक्के, तर एकाला ६० टक्के गुण पडले. परमेश्वर काळेच्या आईचे तीन विवाह झाले होते. दोन वडील. त्यातल्या एका वडिलांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. आईने स्वतःला जाळून घेतलं आणि ती मेली. असा तो पूर्ण निराधार झाला होता. तो ७३ टक्के गुण मिळवून पास झाला. त्याला ‘डीएड’ला प्रवेश मिळाला. तो यमगरवाडीतला पहिला शिकलेला आणि शिक्षक म्हणून येणारा. दुसरा गणेश शिंदे कॉलेजमध्ये शिकतोय आणि ‘एमपीएससी’च्या परीक्षेची तयारी करतोय. चाचणीत पुण्यातल्या मुलांमध्ये त्याचा तिसरा क्रमांक आला. म्हणजे यमगरवाडीतली एक पिढी हळूहळू तयार होते आहे. यमगरवाडीत शिकून दहावी झालेल्या चार मुली पोलिस खात्यामध्ये भरती झाल्या आणि त्या आता हवालदार, ट्रॅफिक पोलिस म्हणून काम करत आहेत. 

इथल्या दोघांनी लग्न करायचं ठरवलं. सविता भोसले नावाची मुलगी. तिचे वडील येरवडा जेलमध्ये आहेत जन्मठेपेवर. तिच्या आईने अगदी लहान तरुण मुलाशी दुसरं लग्न केलं. सविता पहिली ते दहावीपर्यंत अत्यंत कष्टामध्ये शिकली. तिचीच अरुणा नावाची दुसरी बहीण आता पुण्यात आहे. कर्वे संस्थेमध्ये. यमगरवाडीतून आलेल्या पाच मुली आहेत तिथे आहेत. आता लक्षात येणार नाही इतका लक्षणीय बदल त्यांच्यात झाला आहे. दहावी झाल्यानंतर सवितानं यमगरवाडीतल्याच एका मुलाशी विवाह ठरवला. मग पळून आले दोघे जण. साधारणतः ज्या शाळेत शिकले, तिथे विवाह ठरला तर सगळ्यांना आवडत नाही. म्हणजे अशा प्रकारच्या प्रकल्पावर राहत असतील आणि विवाह केला, तर ते बाद होतात; पण मी असं ठरवलं, की तिनं समजा याच्याशी लग्न ठरवलं नसतं, तर तिच्या योग्य तरुणच नाहीत. म्हणजे मग तिला कोणीतरी दारूड्या किंवा चोरी करणारा मिळणार. किंवा अशाच्या गळ्यात पडली असती, म्हणजे पुन्हा तिचं आयुष्य बरबाद झालं असतं. म्हणून मग त्यांना आधार दिला आणि त्यांना सांगितलं, ‘तुम्ही पुण्यात या.’ पुण्यात आले. त्याला वेगळ्या प्रकारचं काम दिलं. हिला कोसबाडला शिक्षिका होण्याच्या कोर्सला पाठवलं. एक वर्षभर कोर्स करून आले. दोघांनाही या चिंचवडच्या गुरुकुलामध्ये नोकरी दिली. ती आता इथे शिक्षिका म्हणून काम करते, अशी कथा आहे. 

समृद्धी ढोलकर नावाची यमगरवाडीतली आणखी एक मुलगी आहे. ती मूळची गोव्यातली ‘मातृछाया’मधली आहे. तिलाही असाच कोर्स दिला. तीही आता इथे आली. अशा या सगळ्या उभ्या राहिल्या; पण यमगरवाडीचा प्रकल्प पहिली ते सातवीपर्यंतचा आहे. आठवी, नववी, दहावीसाठी दुसरीकडे जावं लागतं. दुसरं असं लक्षात आलं, की जे शिक्षण आपण देत नाही, बाहेरच्या शाळेत होतं, तिथे जाणं-येणं दूर आहे. म्हणजे दुसऱ्या गावात जावं लागतं. जवळपास रोजचं १५ ते २० किलोमीटर चालणं होतं. बसने गेलं, तर सकाळी जायचं ते एकदम रात्री नऊला यायचं. चालत गेलं, तर एक तास जाण्या-येण्यासाठी जाऊ शकतो; पण त्यातनंही काही समस्या निर्माण होतात. म्हणून मग त्यांनी आठवीच्या नंतरचं शिक्षण पुण्यात येऊन करावं, असं ठरवलं. सेवासदन आणि कर्वे स्त्रीशिक्षण या दोन संस्थांमध्ये. आता चिंचवडला हे गुरुकुल सुरू केल्यामुळे इथेही आता १५ मुली आहेत सातवीनंतरच्या. त्या इथेच राहतात. इथल्या शाळेत जातात, इथेच राहतात. यमगरवाडीच्या साडेतीनशे कुटुंबातून तयार झालेली ही पहिली पिढी आहे. त्यातले काही जण आता नोकरीला लागलेले आहेत. एक मुलगा असा आहे, की जो कॉल सेंटरमध्ये काम करतो. त्याला आम्ही ड्रायव्हिंग शिकवलं. आता तो इंग्रजीही उत्तम बोलायला लागलेला आहे. पुण्यात आहे. आणि आश्चर्य वाटेल असं आहे, की तो कुठल्या जातीचा आहे, असं कोणीही विचारत नाही त्याला. त्याला फक्त आठ तासांची ड्युटी असते. सात-आठ हजार रुपये पगार मिळतो. उत्तम पद्धतीने राहतो तो. तो म्हणजे आई-वडील सगळेच. आता ते चोऱ्या, मारामाऱ्या करणारे असे नाहीत. त्यामुळे बदलत्या काळाशी जुळवून घेणारा असा एक वर्ग त्या प्रकल्पातून इकडे तयार झाला.

पारधी समाजातल्याच आणखी दोन मुली आता पुन्हा कोसबाडला शिकायला गेलेल्या आहेत. बारावी झालेल्या आहेत. रमेश पानसेंचा शैक्षणिक ऐना नावाचा एक वेगळा प्रयोग आहे. त्याच्यामध्ये त्या शिकताहेत. अशी आता शिकून पुढे जाणारी आणि पुन्हा कार्यकर्ता बनणारी किंवा शिक्षक बनणारी, २५-३० जणांची एक बॅच आता वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर पडते आहे. त्यातले किमान पाच-सात जण यमगरवाडीला याच क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ कामाला जातील. बाकीचे नोकरीत राहतील. त्य़ांना योग्य अशा मुली मिळाव्यात, अशीही सोय आता आपण केली आहे. म्हणजे आम्ही त्यांची लग्नं जुळवतो. लग्न करा, एकत्र राहा आणि काम करा. नाही तर पुन्हा कुठे तरी अडाणी बायको, अडाणी नवरा असं होऊ नये. यमगरवाडीचा जवळपास १६-१७ वर्षांचा हा प्रवास असा आहे.

(क्रमशः)
(ही मुलाखत २००८च्या सुमारास घेतलेली आहे. त्यामुळे स्थळ-काळाचे संदर्भ त्यानुसारच लक्षात घ्यावेत, ही विनंती.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZYPBQ
Similar Posts
‘आधुनिक आणि प्राचीन ज्ञानाचा संगम घालणारं गुरुकुल’ (गिरीश प्रभुणे विशेष मुलाखत - ५) ‘आपल्या प्राचीन परंपरेत विज्ञान होतं आणि ते घराघरापर्यंत गेलेलं होतं. घराशी विद्यापीठ जोडलेलं होतं. आता विद्यापीठात जाऊन शिकावं लागतं. मग लक्षात आलं, की इथे आपण ‘मेकॉले’ घेऊन चाललोय. आपण हे शिक्षण देणार आणि जाणार, त्याच्याऐवजी त्यांच्याकडे जे ज्ञानाचं भांडार आहे, त्याच्यात आपण आधुनिकतेची भर घालावी आणि
... आणि यमगरवाडी प्रकल्प सुरू झाला! (गिरीश प्रभुणे विशेष मुलाखत - ३) ‘यमगरवाडीत फिरून, त्यांच्या समस्यांवर उत्तरं शोधण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्यातूनच अनेक टप्प्यांनंतर मग यमगरवाडी प्रकल्प सुरू झाला. एकेक कार्यकर्ते घडत गेले आणि मग पारध्यांसह अन्य भटक्या समाजांसाठीही काम सुरू झालं....’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या आरती आवटी यांनी घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीचा हा तिसरा भाग
‘माणूस हा सारखं शिकवावं लागणारा प्राणी’ (गिरीश प्रभुणे विशेष मुलाखत - २) ‘ग्रामायण’साठी काम करता करता अनेक चांगले बदल घडून आले. नंतर हळूहळू ‘पारधी’ हा विषय पुढे आला आणि नंतर भटके विमुक्त विकास परिषदेची स्थापना झाली.... ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या आरती आवटी यांनी घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीचा हा दुसरा भाग...
असिधारा व्रताची सुरुवात (गिरीश प्रभुणे विशेष मुलाखत - १) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे भटक्या-विमुक्त समाजाच्या पुनर्वसनासह अनेक प्रकारचं समाजकार्य गेली अनेक वर्षं अहोरात्रपणे करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन २५ जानेवारी २०२१ रोजी त्यांना पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने, गिरीश प्रभुणे यांच्या कार्याची सविस्तर ओळख करून देणारी, Bytesofindia

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language