झेन गुरु आपल्या शिष्याबरोबर विश्रांती घेत सुखानं बसले होते. एका क्षणी त्यांनी पिशवीतून कलिंगड काढलं आणि त्याचे दोन भाग केले, ज्यायोगे गुरु आणि शिष्य दोघेही ते खाऊ शकतील.ते दोघं कलिंगड खात असताना, शिष्य म्हणाला, “गुरुजी, प्रत्येक गोष्टीत काही तरी अर्थ सामावलेला आहे त्यामुळे, तुम्ही मला हे कलिंगड दिलंत याचा अर्थ तुम्हाला मला कोणतातरी पाठ शिकवायचा आहे.”
गुरु शांतपणे कलिंगड खात राहिले.
“तुमची शांतता एक प्रश्न उपस्थित करते”, शिष्य परत म्हणाला, “तो असा, हे मधुर फळ खाताना मला जो आनंदाचा अनुभव येतो आहे, तो या फळात सामावलेला आहे का माझ्या जिभेवर आहे?” गुरु काहीच बोलला नाही. शिष्य अजूनच उत्तेजित होत म्हणाला :
“आणि प्रत्येक गोष्टीत अर्थ सामावलेला आहे त्यानुसार, मला वाटतं याही प्रश्नाच्या उत्तराच्या मी अगदी जवळ आलो आहे : आनंद प्रेमात आणि परस्परावलंबित्वात साठलेला आहे, कारण त्याविना कलिंगड आनंदाचं धन असू शकत नाही आणि मला जीभ असल्याशिवाय..”
“आता पुरे..” गुरु म्हणाला. “खरे मूर्ख स्वत:ला प्रचंड बुध्दिमान समजतात आणि प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्याच्या मागे लागतात. हे कलिंगड गोड आहे, तेवढं पुरेसं आहे, आता तरी मला शांतपणे ते खाऊ दे.”
नीलांबरी –
मूळ झेन कथा - Pleasure and the tongue
Painting : Jana Forsyth