मुंबई : ‘शहरातील भयावह ट्रॅफिक जाम व अडचणीच्या पार्किंग समस्येवर उपाय करण्यासाठी मुंबईमध्ये सरकारला मंत्रालय व राजभवनसहित सर्व सरकारी ठिकाणी सार्वजनिक पार्किंगची सुविधा सुरू केली पाहिजे,’ अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत केली आहे. मुंबईच्या नियोजनबद्ध विकासासाठी वेगळे मंत्रालयही स्थापन केले जावे.
विधानसभेमध्ये सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर ‘अर्धा तास चर्चेचा’अंतर्गत २८ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंबईतील पार्किंग समस्या, ट्रॅफिक जाम आणि मूलभूत सुविधांच्या विकासाविषयी आपला प्रस्ताव ठेवत आमदार लोढा म्हणाले, ‘मुख्यमंत्री मुंबई व महाराष्ट्राच्या विकासासाठी अतिशय पारदर्शितेसह व वेगाने कार्यरत आहेत. मेट्रोचे काम वेगाने होत आहे; परंतु गाड्यांसाठी रस्त्यांवर जागा नसूनही रोज हजारो नवीन वाहनांची नोंदणी होत आहे. परिणामी अनेक तास ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडणे अशी या शहराची सर्वांत मोठी ओळख बनली आहे.’

फुटपाथवर पायी चालणाऱ्यांसाठी कुठेच जागा नाही याचा उल्लेख करून आमदार लोढा यांनी मुंबईतून जितका कर वसूल केला जातो, त्यातील फार थोडा मुंबईसाठी वापरला जात असल्याचे नमूद केले. ‘दीर्घ काळापासून प्रलंबित हाजी अली सर्कलवर फ्लायओव्हरचे काम करून बाणगंगावरून रॉकी हिलकडे जाणाऱ्या रस्त्याला तातडीने सुरू करण्याची मागणीही लोढा यांनी केली आहे.
‘मुंबईमधील पायाभूत सुविधांचा आराखडा बनवणाऱ्या नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या नावे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या नामकरणाची फाइलही सरकारी विभागामध्ये अडकून पडली आहे आणि त्याहून अधिक दुर्लक्ष योजनांकडे केले जाऊ शकत नाही. मुंबईला वाचवण्यासाठी तत्काळ उपाय केले जावेत. मुंबईच्या सुनियोजित विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय बनवले, तर फक्त मुंबई शहरच नाही, तर राज्याचा विकासही अधिक वेगाने होईल,’ असे लोढा यांनी सांगितले.