गिनी प्रजासत्ताक या देशातील कोनक्री या शहराला यंदाच्या पुस्तक राजधानीचा मान मिळाला आहे. ‘युनेस्को’कडून दर वर्षी अशा राजधानीची घोषणा केली जाते. वाचनाला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम वर्षभर त्या शहरात राबवले जातात. ‘बुक कॅपिटल’च्या या संकल्पनेविषयी...
...............
वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट यांसंदर्भात जागृती करण्यासाठी, वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात ‘युनेस्को’कडून दर वर्षी २३ एप्रिल रोजी ‘वर्ल्ड बुक अँड कॉपीराइट डे’ साजरा केला जातो. पहिला जागतिक पुस्तक दिन १९९५मध्ये साजरा केला गेला होता.
सन २००१ पासून ‘युनेस्को’तर्फे दर वर्षी ‘वर्ल्ड बुक कॅपिटल’ची अर्थात पुस्तकाच्या राजधानीची घोषणा केली जाते. या वर्षीची पुस्तक राजधानी होण्याचा मान ‘रिपब्लिक ऑफ गिनी’च्या राजधानीला म्हणजे ‘कोनक्री’ या शहराला मिळाला आहे. पुस्तकं आणि वाचनाला चालना देण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यासंदर्भात १९९६मध्ये ‘युनेस्को’तर्फे चर्चा करण्यात आली. त्यानंतर २००१ साली पहिल्यांदा ‘माद्रिद’ हे शहर ‘पुस्तक राजधानी’ म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर, दर वर्षी असे शहर घोषित करण्याचा निर्णय ‘युनेस्को’ने घेतला. आजपर्यंत न चुकता दर वर्षी अशा प्रकारे ‘युनेस्को’कडून पुस्तक राजधानी जाहीर केली गेली आहे. निवड झालेल्या शहरांना ‘युनेस्को’तर्फे कोणतीही आर्थिक मदत अथवा पुरस्कार दिला जात नाही. दर वर्षी २३ एप्रिलपासून पुढील १२ महिने पुस्तकांच्या राजधानीत अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्या निमित्ताने अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक, प्रकाशक त्या शहरांना भेट देतात व उपक्रमात सहभागी होतात.
आपण वर्षभरात काय उपक्रम राबवू, त्यांचे बजेट काय असेल, त्यांचे नियोजन कसे असेल याची माहिती इच्छुक शहरांनी ‘युनेस्को’कडे आपल्या अर्जासोबत पाठवायची असते. आलेल्या अर्जांमधून ‘युनेस्को’कडून राजधानीची निवड करण्यात येते. ‘युनेस्को’सोबतच इंटरनॅशनल पब्लिशर्स असोसिएशन, इंटरनॅशनल बुकसेलर्स फेडरेशन व इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन अँड इन्स्टिट्यूशन या संस्थांच्या सहभागाने शहर निवडण्याची प्रक्रिया पार पडते.
कोनक्री या शहराने दिलेल्या अर्जातील कार्यक्रमांची आखणी, बजेट, तरुणांना आणि साक्षरतेला दिलेले महत्त्व, विकासाची ध्येये या साऱ्या गोष्टींमुळे त्या शहराची पुस्तक राजधानी म्हणून निवड करण्यात आली असल्याचे ‘युनेस्को’च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. २००३ साली दिल्लीला हा मान मिळाला होता. त्या वेळी वर्षभर दिल्लीत पुस्तके आणि वाचनाशी निगडित उपक्रम राबवले गेले होते.
आतापर्यंतच्या ‘बुक कॅपिटल्स’
२००१ : माद्रिद (स्पेन)
२००२ : अलेक्झांड्रिया (इजिप्त)
२००३ : नवी दिल्ली (भारत)
२००४ : अँटवर्प (बेल्जियम)
२००५ : माँट्रियल (कॅनडा)
२००६ : ट्युरिन (इटली)
२००७ : बोगोटा (कोलंबिया)
२००८ : अॅमस्टरडॅम (नेदरलँड्स)
२००९ : बैरुत (लेबनॉन)
२०१० : लुब्लियाना (स्लोव्हेनिया)
२०११ : ब्युनॉस आयरिस (अर्जेंटिना)
२०१२ : येरेवान (अर्मेनिया)
२०१३ : बँकॉक (थायलंड)
२०१४ : पोर्ट हारकोर्ट (नायजेरिया)
२०१५ : इंचिऑन (दक्षिण कोरिया)
२०१६ : रॉक्लॉ (पोलंड)
२०१७ : कोनक्री (गिनी प्रजासत्ताक)
२०१८ : अथेन्स (ग्रीस)
(संकलन : अदिती अत्रे)