पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते. त्यामुळे इंटरनेट किंवा तंत्रज्ञानाचा वापर हा कलात्मकता वाढविण्यासाठी करा, मारण्यासाठी नव्हे,’ असे मत महाराष्ट्र राज्य कला पुरस्काराचे मानकरी चित्रकार श्रीकांत कदम यांनी व्यक्त केले.
टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित ‘व्हीनस यंग आर्टिस्ट’, ‘व्हीनस बडिंग आर्टिस्ट’ व ‘व्हीनस चाइल्ड आर्टिस्ट’ या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. सुरेंद्र करमचंदानी यांचे व्हीनस ट्रेडर्स व कोकुयो कॅम्लिन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ चित्रकार उमाकांत कानडे व श्रीकांत कदम यांच्या हस्ते ‘एलिमेंटरी’ व ‘इंटरमीजिएट’ चित्रकला स्पर्धांत मेरिटमध्ये आलेल्या पुण्यातील ६९ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पाच वर्षांची चित्रकार अवनी पंडित हिचादेखील विशेष सन्मान या वेळी करण्यात आला.
सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व ५०० रुपयंचे गिफ्ट व्हाउचर असे पुरस्काराचे स्वरूप होते. राज्य शासनाकडून देण्यात येणारा ‘महाराष्ट्र राज्य कला पुरस्कार’ यंदा श्रीकांत कदम व प्रेम आवळे या चित्रकारांना मिळाल्याबद्दल त्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ चित्रकार प्रा. सुधाकर चव्हाण, कॅम्लिनचे सुनील दासवेकर, श्रीपाद भालेराव, सुरेंद्र करमचंदानी आदि उपस्थित होते.
शालेय मुलांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांना योग्य ते प्रोत्साहन मिळावे म्हणून व्हीनस ट्रेडर्सद्वारा विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्यातीलच एक भाग म्हणून नुकतीच सुलेखन हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. चित्रकलेच्या क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे व बालचित्रकारांना प्रेरणा मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने शालेय स्तरावर सुरू केलेल्या ‘एलिमेंटरी’ व ‘इंटरमीजिएट’ चित्रकला स्पर्धांना दर वर्षी लाखो विद्यार्थी सहभागी होतात. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना ‘ग्रेड्स’ दिल्या जातात; मात्र त्यातही सर्वोत्तम, मेरिटमध्ये असलेल्या प्रत्येकी पहिल्या १०० विद्यार्थ्यांची यादी काढली जाते. यंदा संपूर्ण राज्यातून सात लाख विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी ७५ हजार विद्यार्थी हे पुणे व पिंपरी-चिंचवड भागातील होते.
राज्य शासनाकडून निवडल्या जाणाऱ्या मेरिटमधील प्रत्येकी पहिल्या १०० विद्यार्थ्यांपैकी ३४ (एलिमेंटरी) व ३५ (इंटरमीजिएट) विद्यार्थी हे पुण्यातील आहेत. यात कोमल वागस्कर, प्रांजली कोंडे, अश्विनी स्वामी, ऐश्वर्या शिंदे, यश शहा, वसिमा देसाई, अभिषेकसिंग संधू, समृद्धी वळसे, आद्या पाटील, समीक्षा शेटे इत्यादी ३४ (एलिमेंटरी) व गौरी चंदनशिवे, श्रीया जोशी, प्रीती अरोरा, सिद्धी डेरे, श्रुती गरुड, हेमन पवार, सानिका उबळे, आर्य पाटील, प्रतीक तरस, संस्कृती शिरतर इत्यादी ३५ (इंटरमीजिएट) विद्यार्थ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
या वेळी कदम म्हणाले, ‘प्रत्येक मूल वेगळे असते. त्याची सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, अनुभव वेगवेगळे असतात. त्यामुळे त्यांची कलाही वेगळी असते. शिक्षक म्हणतील तशीच किंवा पालक सांगतील तशीच कलाकृती निर्माण व्हावी असा आग्रह धरणे हे चुकीचे आहे. कला शिकवता येत नाही. आपण केवळ पोषक वातावरण निर्माण करू शकतो. कला आपल्या सातत्यपूर्ण साधनेतूनच घडते.’
मुलांना मार्गदर्शन करताना कानडे म्हणाले, ‘शालेय जीवनात मुलांच्या कलागुणांना जेवढे प्रोत्साहन दिले जाते, तेवढे त्यांच्या १०-१२वी नंतर दिले जात नाही. कला क्षेत्र वाटते तेवढे सोपेही नाही. तसेच यात करिअरच्या संधीदेखील खूप आहेत. त्यामुळे मुलांबरोबरच पालकांनीही गांभीर्याने बघायला हवे.’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विनया देसाई यांनी केले.