Ad will apear here
Next
‘या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं’


हुरडा आणि रानमेवा या गोष्टींनी जो आनंद दिलाय, तो कुठल्याही महागड्या फूड चेनमधल्या एकाही पदार्थात मला मिळाला नाही. कारण, हे एकट्यानं खाण्याचे पदार्थच नाहीत. हे सहकुटुंब, सहपरिवार, मित्र, आप्त, इष्ट यांच्याच सोबत आनंद देतात. ते चवीनं तर श्रीमंत आहेतच; पण मनं समृद्ध करण्यातही यांचा हात कुणी धरू शकणार नाही...!

वनभोजन, वनविहार, वनक्रीडा हे शब्द आपण केवळ जुन्या गोष्टींमध्ये ऐकलेले असतात; पण त्यांची योजना का केली जात असे, याच्या तपशीलात डोळसपणे डोकावून पाहिलं पाहिजे. गावापासून, शहरापासून दूर एखाद्या अजिबात चकचकाट नसलेल्या ठिकाणी लोक का जात असावेत? तिथं गर्दी नाही, मोठमोठ्या इमारती नाहीत, सोयीसुविधा नाहीत, पैशांचा पूर नाही, झगमगाट नाही अशा ठिकाणी माणसांना खरोखरच आनंद मिळतो का? तिथं टीव्ही नाही, होम थिएटर नाही, मोबाइल फोनला रेंज नाही, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही, तरीही माणसं तिथं का जातात? पावभाजी, पिझ्झा, बर्गर, सिझलर्स, डाल्गोना, मिल्क शेक्स, मस्तानी, आइस्क्रीम्स या गोष्टींनी आनंद मिळावा म्हणून पार्ट्या करणारी माणसं पिठलं-भाकरी, भरली वांगी, भाजलेले कांदे-बटाटे, सुगडातलं दही, ताक, विहीरीचं शेंदलेलं पाणी, ढाळा, बोरं, चिंचा, आवळे, ऊस यांत आनंद कसा काय मानतात बरं? महागड्या गाड्यांमधून फिरण्याला आयुष्याचं ध्येय करून टाकलेल्या माणसांना बैलगाडीतून फिरणं कसं काय आनंद देऊ शकतं? रिलॅक्स होण्यासाठी स्पा पार्लर्समध्ये वारंवार खेटे घालणारी माणसं ओढ्याच्या पाण्यात किंवा झऱ्याच्या पाण्यात पाय सोडून बसल्यावर आपोआपच खूश कशी काय होतात? एसी लावून, इम्पोर्टेड मऊ गादीवर झोपणाऱ्या माणसांना घोंगडं टाकलेल्या काथ्याच्या बाजेवर स्वर्गसुखाची गाढ झोप कशी काय लागते? ज्या गोष्टी गावात, ग्रामीण जीवनात मिळत नाहीत म्हणून शहराची वाट धरलेल्यांना तिथं त्या सगळ्या गोष्टी मिळवूनही आनंद मिळतच नाहीये. म्हणूनच तर आपली पावलं पुढं आली असली तरी सुख मात्र मागेच राहिलंय... 

किती किंमत असते या आनंदाची? ‘व्यावसायिक हुरडा पार्टी’ हा नवा ट्रेंड आताशा रुजतोय, त्यासाठी प्रति व्यक्ती सातशे-आठशे रुपये मोजावे लागतात. (त्याला माझा मुळीच विरोध नाही, विरोध असण्याचं काही कारणही नाही.) पण एखाद्या मित्राच्या शेतात किंवा नातेवाइकांच्या शेतात जाण्यासाठी तिकीट कुठं लागतं? बुकिंग कुठं लागतं? 

पाच-पन्नास जणांनी एकत्र शेतात जायचं म्हणजे काय थोडा व्याप असतो का? कढया, पातेली, द्रोण, पत्रावळींपासून सगळं बघावं लागतं. गूळ, शेंगादाण्याची चटणी, हुरड्यासाठीची राजा-राणी चटणी, डाळीचं पीठ, पानाचा डबा, एक ना दोन अनेक गोष्टी... सगळ्यांना निरोप जातात, शेतातल्या वस्तीवर आधीच वर्दी गेलेली असते. ज्याचं शेत असतं तो कार्यकर्ता आदल्या दिवशीच शेतावर गेलेला असतो, बाकीचे दुसऱ्या दिवशी पोहोचतात. गेल्या गेल्या मस्तपैकी विहिरीवर गार पाण्यात हात-पाय-तोंड धुवून पितळीतून चहा प्यायचा, की रानात उतरायला तयार. शेतात चक्कर मारून येईस्तोवर रानशेण्या येतात, गोवऱ्या येतात, झाडाखाली भट्टीसाठी खड्डा खोदला जातो, सावली बघून घोंगडी टाकली जातात, पाण्याच्या कळशा भरून ठेवल्या जातात. सगळे फिरून आले, की समोर गूळ, भुईमुगाच्या शेंगा, कोवळ्या काकड्या, गाजरं, बोरं, पेरू, ढाळा, चिंचा ठेवल्या जातात. माणसं मस्त गप्पा मारत या गोष्टींचा आस्वाद घेत असतात. ‘शहरात पंचवीस रुपये पाव किलो या दरानं बोरं विकत घेण्यात मजा नाही, गावचं आयुष्यच बेष्ट असतंय’ यावर परिसंवाद रंगलेले असतात. 

तोवर तीन-चार गडीमाणसं ज्वारीची ताटं घेऊन येतात. शेण्या घालून आगटी पेटवली जाते. दोन जणं ताटं भाजायला बसतात. दोन जणं घोंगडं घेऊन कणसं चोळायला बसतात. गरमागरम हुरडा प्रत्येकाच्या हातावर द्यायला सुरुवात होते. असल्या गोष्टी डिशमधून खायच्या नसतात, शास्त्र मोडतंय. कणसं चोळणारा माणूस ‘घ्या दादा, घ्या की ओ वैनी’ असं म्हणून आग्रह करत असतो. हुरडा रंगायला लागतो. पुन्हा पुन्हा कणसं आणली जातात, पुन्हा आगटी फुलवली जाते. शेणाच्या धुराचा वास थंडीच्या वातावरणात मस्त सुखावत असतो. दीड-दोन तास हुरड्याचा कार्यक्रम बहरत जातो. तोवर मधूनच उसाचा रस येतो. एका ग्लासातच माणूस गार होतो. पोट आणि मन दोन्ही तृप्त झालेलं असतं. माणसं तिथंच झाडाखाली घोंगड्यावर आडवी होतात, काही जणांची तर बसल्या जागी ब्रह्मानंदी टाळी लागते. स्ट्रेस को मारो गोली..! 
दोनेक तासांनी वस्तीवरून निरोप येतो. आता जेवण... पिठलं, भात, भरली वांगी, भाकरी, ठेचा, दही, ताक असा बेत असतो. सगळ्यांच्या सहवासात चार घास जरा जास्तच जातात, पोटाचे एकदम मस्त टुमटुमीत नगारे होतात. विडे लावून दिले जातात. आता पडी मारणं अपरिहार्य असतं. पुन्हा गाढ झोप. चार वाजता चहाचा निरोप येतो. तोंडावर पाणी मारून झोप उडवायची आणि चहा घ्यायचा. पाय निघत नसतो; पण पर्याय नसतो. बोरं, चिंचा, भाज्या यांनी पिशव्या भरल्या जातात. माणसं तृप्त मनानं शहराची वाट धरतात. 

पांढरा सदरा किंवा बंडी, ढगळ पायजमा किंवा धोतर, डोक्याला टोपी एवढ्या पोशाखात माणसं आयुष्यभर जगतात. वस्तीवर कशाला लागतायत भारंभार कपडे? फार फार तर एखादा स्वेटर आणि लोकरीची कानटोपी किंवा माकडटोपी. महिलावर्गाला दोन लुगडी पुरतात. व्हॅनिटी म्हणजे काय ते ठाऊकही नसतं. तरीही त्या गोष्टीला ते अज्ञान मानत नाहीत. 

अंगात कोपरी, ढगळ पायजमा घालून डोक्याला मफलर गुंडाळून शेतातून मधमाश्यांची पोळी शोधत फिरलायत का तुम्ही? खांद्यावर एखादं करडू घेऊन फिरलायत का? कोंबड्याच्या मागं धावलायत का? पाखरांचे थवे हुसकून लावण्यासाठी पत्र्याचे डबे वाजवत धावलायत का? शेणानं घरं सारवण्याचा उद्योग तुम्ही कधी केलाय का? मानेला रग लागेस्तोवर दगड मारून मारून चिंचा, आवळे, बोरं, जांभळं, कैऱ्या पाडल्यात का? मातीतल्या रस्त्यांवरून एकाचवेळी तीन-तीन जणांना घेऊन सायकल हाणली आहे का? एकदा हे आयुष्य जगून बघा. सध्या तरी यासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत; पण भविष्यकाळात याचाही कृषिपर्यटनात समावेश झाला तर आश्चर्य वाटायला नको. 

दहा-बारा हजार रुपयांच्या पगाराकरिता शहराची वाट धरलेल्यांना हे कुठं माहिती असतं, की गावात दुसऱ्याच्या शेतात राबायला गेलं तरी सकाळी साडेआठ ते दुपारी दीड या वेळेकरिता पाचशे रुपयांची नोट रोज मिळते. दुपारी दीडनंतर सुट्टी. कामाच्या दिवसांमध्ये कुटुंबांचं आठवड्याचं उत्पन्न दहा हजाराच्या घरात जातं. घरचं दूधदुभतं असतं. भाजी घरची मिळते. कोंबड्या असतील तर अंडी मिळतात. बऱ्याच गोष्टी स्वकष्टानं मिळवता येतात. प्रत्येक गोष्ट विकत आणण्याची गरज भासत नाही. काही काळ त्या वातावरणात राहिल्यावर तिथली सवय होते. मोकळ्या वातावरणात मन मोकळं व्हायला लागतं. स्वत:शी संवाद घडायला लागतो, सुधारायला लागतो. त्यातून तुम्हाला पुस्तकांशी मैत्री जुळवण्याची कला अवगत झाली असेल तर मग दुधात साखर. वाचनासाठी शेतासारखी दुसरी जागा नाही. दुपारी झाडाखाली, रात्री कंदिलाच्या उजेडात घोंगडीवर पडून पुस्तक वाचण्यात फार सुख आहे. एकच दगड निवडून, तो पायांनी उडवत उडवत, शाळेत चालत जाणं आणि येणं हा शालाबाह्य शिक्षणातला किती मोठा भाग आहे..! रोज निसर्गभेट, रोज अभ्याससहल..!

आपल्याला शहरात सकाळच्या वेळी हॉटेलात जाऊन गरमागरम इडली, वडा, डोसा, उत्तप्पा, आप्पे, वडापाव, ब्रेड पॅटिस असा नाश्ता चवदार वाटत असेलही; पण कुठपर्यंत? जोवर तुम्ही सकाळी सकाळी निरसं दूध आणि गरमागरम फोडणीचा भात, फोडणीची पोळी किंवा भाकरीचा काला खात नाही तोपर्यंतच..! संध्याकाळी तुम्हाला भजी, वडे, बेकरी पदार्थ, भेळ वगैरे गोड वाटेलही; पण कुठपर्यंत? जोवर तुम्ही तुम्ही उन्हं उतरणीला लागल्यावर कच्चा चिवडा आणि पसाभर भुईमुगाच्या शेंगा, एखादी पपई किंवा शेंदाडं, झालंच तर एक-दोन पेरू किंवा कैऱ्या तिखट-मीठ लावून खात नाही तोपर्यंतच..! एकदा ही असली गोडी लागली, की ती शेवटपर्यंत नाहीच जात..! करवंदं-जांभळांचा नाद लागला, की स्ट्रॉबेरी किंवा ड्रॅगन फ्रूट कुणाला आठवणार हो? निसर्ग आपल्याला दोन्ही हातांनी भरभरून देतच असतो, आपल्याला ते गोड मानून घेता येत नाही, हा आपला दोष. आपल्याला स्वत:ची जेवढी काळजी असते, त्याहून जास्त काळजी निसर्गाला आपली असते. आपल्याला ती काळजी समजतच नाही, म्हणूनच तर सगळं गणित उलटलंय..!

कुडातून सारवलेल्या जमिनीवर पडणारे नाचरे कवडसे पाहणं हे कुठल्याही मल्टिप्लेक्समधल्या सिनेमापेक्षा लाखपटींनी छान असतं. गायी, म्हशी, शेळ्या, तुरूतुरू धावणारी कोंबडीची पिल्लं, घरभर नाचत फिरणाऱ्या चिमण्या, फुलपाखरं, मधमाश्या, पोपट यांचा सहवास जोवर आपण मिळवत नाही, तोवर त्यातला आनंद उमगणार नाही. सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी आपण जे आयुष्य सोडलं, त्याची कारणं काहीही असोत; पण आपण बरंच काही गमावलं. मानसिक सुखसुद्धा..! 

ही ऊर्जाच निराळी आहे. या आनंदाची तुलना बँकेच्या पासबुकावरच्या लठ्ठ आकड्यांशी होऊच शकत नाही. जगण्याची नवी ऊर्मी, नवा उत्साह मिळवण्यासाठी निसर्गसान्निध्य फार महत्त्वाचं आहे, हेच तर यामागचं तत्त्व आहे. आपला निसर्गसहवास जितका वाढेल, तितकी आपल्या जगण्यातली गुणवत्ता वाढेल. तिथल्या माणसांसोबत आपला संवाद घडेल. वेगळ्या आयुष्याची ओळख घडेल. त्यांनाही चिंता आहेत, आर्थिक अडचणी तर चिक्कार आहेत; पण त्यांची शरीरं रोगांनी पोखरलेली नाहीत, हेही तितकंच खरं आहे. त्यांची जीवनशैली जवळून जाणून घेतलीत, तर आपली आयुष्यं त्यांच्यासारखी निरामय का नाहीत, याचा शोध तुम्हाला लागेल. हेच महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे. 

एखाद्या हॉटेलात सगळ्यांनी जेवायला जाणं आणि त्याच सगळ्यांनी मस्तपैकी मजेत शेतात हुरडा खायला जाणं यांतल्या आनंदात खूप फरक असतो. तो आनंद ज्यांनी अनुभवला आहे, त्यांना त्यातला गोडवा कळला असेलच. कौटुंबिक आणि सामाजिक सौख्य देणारे हे प्रसंग आपण जपायला लागलो, नियमितपणे जगायला लागलो तर सगळ्यांच्याच आयुष्यातली कृत्रिमता संपून जाईल आणि समाधानाच्या पौर्णिमेचे चंद्र रोजच उगवतील...!

- मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख,
आस्था काउन्सेलिंग सेंटर, पुणे 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FVKZCT
Similar Posts
शेतकरी बांधवांसाठी रोजच्या जगण्यात काय काय करता येऊ शकतं? ‘वाढदिवसाला केक कापण्याऐवजी फळं कापा, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल,’ असा एक मेसेज वाचला. मुळातच कसलीही कापाकापी करणं ही वाढदिवस साजरा करण्याची आपल्या संस्कृतीतली रीत आहे का? पोस्टकर्त्याचा हेतू चांगला आहे; पण त्यासाठी वाढदिवसच कशाला हवा? वर्षातला एकच दिवस ही कृती करून काय फायदा होणार? वर्षातून एकदा
बायडिंग हवं की पेपरवेट? जग प्रगत झालं, आधुनिक झालं, विकास होतोय असं अनेक जण म्हणतात. म्हणोत बापडं; पण ‘स्वस्थचित्त’ असणं वेगानं नामशेष होत चाललंय! हे खोटं आहे का? माणसांचं स्वस्थचित्त नसण्याचं प्रमाण फार वाढत चाललंय. ज्याला बघावं तो माणूस कसल्या ना कसल्या विवंचनेतच. कुणाकडे काम नाही म्हणून विवंचना, कुणाकडे काम आहे पण त्या प्रमाणात पैसे मिळत नाहीत म्हणून विवंचना
‘कागज के फूल’ फक्त आपल्या राहत्या घराची कल्पना आणि राहण्याचं ठिकाण बदललं, की आयुष्यच बदलून जाईल... ‘पुढे आणि मागे अंगण, पुढच्या अंगणात फुलझाडं आणि मागच्या अंगणात परसबाग, दर नऊ घरांमागे चार एक जनावरांचा गोठा, प्रत्येक घर बांधताना जाणीवपूर्वक टाळलेला सिरॅमिक टाइल्सचा आणि सिमेंटच्या विटांचा वापर, प्रत्येक घराच्या
आठवणीतली कोजागरी आणि संक्रांतीच्या यात्रेची प्रतीक्षा उदयोस्तुऽऽऽऽ । अंबे उदयोस्तुऽऽऽऽ ॥ हे चंड मुंड भंडासूर खंडिनी जगदंबेऽ उदंड दंड महिषासूरमर्दिनी दुर्गेऽऽ महाराष्ट्रधर्म रक्षिकेऽऽ आता भक्तांच्या हाकेला साद दे... धावून येऽऽऽ असं गर्जून आई आदिशक्तीला कडं-संबळीच्या फडकणीच्या साथीनं साकडं घालून गोंधळी हातात पोत घेऊन उभा राहिला अन् अंत:करणापासून त्यानं

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language