
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील संस्कृत शिक्षकांचे पाच दिवसांचे प्रशिक्षण १६ जुलैला सुरू झाले आहे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसारचे हे महाराष्ट्रातील पहिलेच प्रशिक्षण आहे. नागपुरातील रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, संस्कृत भारती आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण होत आहे.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. केळकर सेमिनार हॉलमध्ये शिबिराचे उद्घाटन झाले. त्या वेळी जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, विस्तार अधिकारी गोपाळ चौधरी, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, संस्कृत शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रेखा इनामदार, महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख तथा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरात प्रणव गोगटे व आशिष आठवले हे प्रशिक्षक आहेत.
उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड म्हणाले, ‘सर्वच भाषांवर अन्य भाषांचे आक्रमण झाले. तरीही संस्कृत ही शुद्ध भाषा आहे. सुंदर व गोडवा असलेली भाषा म्हणून ती जगभर प्रसिद्ध आहे. संस्कृत अभ्यासक्रम बदलला असून, बोलण्याच्या कौशल्याने भाषा शिकण्यासारखा तो अभ्यासक्रम आहे. त्याचे महाराष्ट्रातील पहिले प्रशिक्षण रत्नागिरी जिल्ह्यात होत आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. मीसुद्धा एका सत्रात ‘ओम्’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. संस्कृत विश्व विद्यालयातून एक पदवी घेण्याचा माझा मानस आहे.’
डॉ. सुखटणकर म्हणाले, ‘महाविद्यालयाचा संस्कृत विभाग दर्जेदार कार्य करत आहे. कालिदास व्याख्यानमाला, राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी आदान-प्रदान , संस्कृत संस्थान, विद्यापीठ, संस्कृत प्रचारासाठी काम करत आहे. प्रा. हातवळणे, प्रा. नेने, प्रा. घाटे, तसेच डॉ. आठल्ये यांनी संस्कृतसाठी मोठे योगदान दिले आहे.’
डॉ. आठल्ये यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, ‘संस्कृतचा बदललेला अभ्यासक्रम ही क्रांती आहे. तो प्रत्यक्षात आणणे ही उत्क्रांती आहे. कालिदास विश्वसविद्यालयातर्फे महाराष्ट्रात सर्वत्र प्रशिक्षण शिबिर होणार असून, पहिले प्रशिक्षण येथे होत आहे. याकरिता जिल्हा परिषदेचे फार मोठे सहकार्य लाभले. पाच दिवसांत संस्कृत शिक्षणाची शिदोरी शिक्षकांना मिळणार आहे.’
आधी संभाषण, नंतर व्याकरण अशा स्वरूपात शिक्षकांनी शिकवावे, असेही त्या म्हणाल्या.
हेही जरूर वाचा :