Ad will apear here
Next
दि. बा. मोकाशी, गणेश मावळणकर, बप्पी लाहिरी
ज्येष्ठ लेखक दि. बा. मोकाशी, पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश मावळणकर आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचा २७ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय .....

ज्येष्ठ लेखक दि. बा. मोकाशी :
मराठी नवकथेत मोलाची भर घालणारे ज्येष्ठ लेखक  दिगंबर बाळकृष्ण मोकाशी उर्फ दि. बा. मोकाशी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९१५ उरण येथे झाला. दि. बा. मोकाशी हे विसाव्या शतकातल्या श्रेष्ठ मराठी लेखकांपैकी एक होते. मराठी नवकथेत मोलाची भर घालणाऱ्या प्रारंभीच्या आघाडीच्या कथाकारांत त्यांची गणना होते. दि. बा. मोकाशी हे १९४० नंतर नवकथेत झळकणारे महत्त्वाचे नाव. तीन कादंबऱ्या, तीन ललित व प्रवासवर्णनपर लेखसंग्रह, सात कथासंग्रह आणि पाच बालवाङ्मयपर पुस्तके असा त्यांचा भरगच्च साहित्यसंभार आहे. 

लामणदिवा हा १९४७ साली प्रसिध्द झालेला मोकाशी यांचा हा पहिलाच कथासंग्रह. रोजच्या जीवनातल्या साध्यासुध्या प्रसंगांतून आकारणारी लेखकाची कथा सौम्य आणि संयत प्रकृतीची आहे. या पुस्तकात प्रारंभी ‘पहिली पावले’ ह्या शीर्षकाखाली त्यांनी आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या कालखंडाविषयी लिहिले आहे. तेही कथेइतकेच रंजक आहे. माणूस साप्ताहिकात ७९-८० च्या कालखंडात प्रसिध्द झालेले, ‘संध्याकाळचे पुणे’ हे पुण्यातील सांस्कृतिक हालचालींचे दर्शन घडवणारे लेख चांगलेच गाजले. पुण्यात रोज घडणाऱ्या उपक्रमांबद्दल, व्यक्तींबद्दल आणी संस्थांबद्दल अत्यंत रसिकतेने लिहिलेले हे लेख आहेत. प्रसन्नता आणि निर्व्याजता, चिंतनशीलता आणि ताजेपणा ही मोकाशी यांच्या साहित्यातील वैशिष्ट्ये या लेखांमध्ये आढळतील. ‘आम्ही मराठी माणसं’ हा १३ वैशिष्ट्यपूर्ण कथांचा संग्रह त्यांच्या  मृत्यूनंतर प्रकाशित झाला. आपल्या अवतीभवतीच्या माणसांचे नितळ विश्व सरळ साध्या पध्दतीने उभे करावे, ते नाट्यपूर्ण आणि शैलीदार पध्दतीने मांडण्यात त्यामागच्या वास्तवाची हानी होते, असे त्यांना वाटे. या संग्रहातील हलक्या-फुलक्या कथा सामान्यांच्या सुप्तासुप्त भावनांचे खेळकर भूमिकेतून चित्र रेखाटणाऱ्या आहेत.

त्यांच्या निधनानंतर साहित्य अकादमीने १९८८ मध्ये ‘दि. बा. मोकाशी यांची कथा’ (निवडक कथांचा संग्रह) हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्याच्या प्रस्तावनेत मोकाशींच्या इतर साहित्याचा परामर्श घेताना ‘कामसूत्रकार वात्स्यायन’ या कादंबरीचा मात्र उल्लेख नाही. मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. सरोजिनी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली माधुरी पणशीकर यांनी मोकाशी यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट घेतली. दि. बा. मोकाशी यांनी लामणदिवा, वणवा मिळून ११ कथासंग्रह, देव चालले, आनंद ओवरी या कादंबऱ्या, तसेच पालखी, अठरा लक्ष पावलं अशी प्रवासवर्णने, संध्याकाळचे पुणे (ललित), रेडिओदुरुस्ती व्यवसाया-बद्दलचे पुस्तक व बालसाहित्यदेखील त्यांनी लिहिले. 

‘अठरा लक्ष पावलं’मध्ये त्यांनी प्रवासवर्णनातून समाजजीवनाचा शोध घेतला. त्यांच्या ‘आनंद ओवरी’ या संत तुकारामांच्या जीवनावरील कादंबरीचे अमेरिकन अभ्यासक जेफ ब्रेकेट यांनी इंग्रजीत भाषांतर करून ते ‘ट्विटर’वर ठेवले आहे. त्यांच्या इतरही अनेक पुस्तकांची हिंदी व इंग्रजी भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या ‘पालखी’ या पुस्तकातून पंढरीच्या वारीवर विपुल लेखन केलंय. ‘कामसूत्रकार वात्स्यायन’ ही त्यांची १९७८ मध्ये प्रकाशित झालेली चरित्रात्मक कादंबरी. त्यांच्या या कादंबरीची मात्र फारशी दखल घेतली गेली नाही. जानेवारी २०१४ मध्ये त्यांची कन्या ज्योती कानेटकर यांनी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर अमेझॉनवर टाकले आहे. दि. बा. मोकाशी यांचे २९ जून १९८१ रोजी निधन झाले.

‘डिस्को किंग’ बप्पी लाहिरी :
‘डिस्को किंग’ अर्थात सुप्रसिद्ध संगीतकार व गायक बप्पी लाहिरी यांचा वाढदिवस यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५३ रोजी झाला. बप्पी लाहिरी उर्फ़ अलोकेश लाहिरी यांचे आई आणि वडील दोघेही शास्त्रीय गायक आणि कंपोझर होते. त्यांच्याकडूनच त्यांना संगीताचा वारसा मिळाला. तीन वर्षांचा असताना ते तबला वाजवायला शिकले. वयाच्या चौथ्या वर्षीच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गाण्यासाठी तबला वाजवला होता. यामुळे त्यांना ‘मास्टर बप्पी’ ही ओळख मिळाली. तेच त्यांचे व्यावसायिक नाव बनले. 

त्यांनी हिंदी चित्रपटांना  फक्त डिस्को संगीत दिले नाही, तर स्वतः डिस्को संगीतावर आधारीत गाणीही गायली आहेत. संधी मिळाली तेव्हा शास्त्रीय रागांवर आधारित सुमधुर गाणीही त्यांनी तयार केली आहेत, मात्र त्यांची डिस्कोवर आधारित गाणी बरीच लोकप्रिय झाली. बप्पी लाहिरींनी जितकी डिस्को गाणी बनवली, त्यापेक्षा अधिक भजने ध्वनिमुद्रित केलेली आहेत. त्यांची गणेश आराधनेची गीतेही लोकप्रिय आहेत. १९८० च्या दशकात त्यांच्या डिस्को डान्सर, नमक हलाल व शराबी या चित्रपटांमुळे ते खूप प्रसिद्ध झाले. 

बप्पी लाहिरींनी डिस्को नृत्यांसाठी दिलेल्या चालींमुळे ते डिस्को किंग म्हणूनही ओळखले जातात. बप्पी लाहरी यांची क्रेझ अद्यापही संपलेली नाही. त्यांची ‘बंबई से आया मेरा दोस्त’, ‘आय एम अ डिस्को डान्सर’ पासून ते अलीकडच्या ‘ऊ लाला ऊ लाला’ पर्यंत अनेक गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. काळे चश्मे व दाग-दागिने यांची त्यांना खूप आवड आहे. 

पहिल्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेश मावळणकर :   
पहिल्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर यांचा २७ नोव्हेंबर १८८८ हा जन्मदिन. गणेश वासुदेव मावळणकर हे १९५२ मध्ये स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधून ते लोकसभेवर निवडून गेले होते. 

गणेश वासुदेव मावळणकर यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळचे मावळंगे. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले. त्यांचे वास्तव्यही अहमदाबाद येथेच होते. गणेश वासुदेव मावळणकर यांचे २७ फेब्रुवारी १९५६ रोजी निधन झाले.   

(माहिती संकलन : संजीव वसंत वेलणकर)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZQDCG
Similar Posts
मनोहर पर्रीकर, प्रतिभाताई पवार, पांडुरंग नाईक गोव्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले नेते आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा, तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार आणि चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक यांचा १३ डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
प्रख्यात चित्रकार सावळाराम हळदणकर, निवेदक सुधीर गाडगीळ प्रख्यात चित्रकार सावळाराम हळदणकर, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांचा २५ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा अल्प परिचय....
स्मिता पाटील, तात्यासाहेब कोरे छोट्या कारकिर्दीत आपल्या चतुरस्र अभिनयाने जगभर नाव कमावलेली अभिनेत्री स्मिता पाटील आणि मुरबाड माळातून नंदनवन उभारणारे सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांचा १३ डिसेंबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अजित आगरकर, दादा साळवी, मोतिलाल क्रिकेटपटू अजित आगरकर, मराठी चरित्र अभिनेते दादा साळवी आणि हिंदी अभिनेते मोतिलाल यांचा चार डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language