Ad will apear here
Next
ये हौसला कैसे झुके, ये आरजू कैसे रुके...
रत्नागिरी जिल्ह्यातल्या साखरप्यासारख्या लहानशा गावातून एक मुलगा पुण्यात पोहोचला आणि नंतर त्याच्या स्वप्नांनी त्याला थेट अमेरिकेत नेऊन पोहोचवलं. अमेरिकेत जाऊनही त्यानं आपलं मूळ गाव साखरपा आणि पुणे यांच्याशी असलेली नाळ तोडली नाही. या तरुणाचं नाव आहे मंदार मोरेश्वर जोगळेकर! ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदराच्या आजच्या ५०व्या भागात पाहू या ,मराठी पुस्तके जगभर घरोघरी पोहोचवणाऱ्या ‘बुकगंगा’चे संस्थापक मंदार जोगळेकर यांची वाटचाल...
.........
‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सदरातली ही पन्नासावी गोष्ट! या सदरात दर पंधरा दिवसांनी एका अनोख्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देता आली, तिची अनवट वाट न्याहाळता आली. या वाटेवरचे अडथळे पार करत ती कशी चालतेय, हे बघून प्रेरणा मिळाली. त्याच वाटेवरून चालणाऱ्या एका तरुणानं माझं लक्ष वेधून घेतलं. नेहमी हसतमुख आणि प्रसन्न असणाऱ्या तरुणाच्या डोळ्यात मी शेकडो/हजारो स्वप्नांची फुलपाखरं बघितली. दुर्दम्य आशावाद बघितला. स्वप्नं बघितलीच पाहिजेत आणि मग ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे, हेच त्याच्या प्रवासानं सांगितलं. त्याच्याकडे बघून वाटलं, खरंच ‘ये हौसला कैसे झुके, ये आरजू कैसे रुके......’

एके दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मला या तरुणाची मुलाखत घ्यायची होती. आम्ही विद्यापीठात पोहोचलो, तेव्हा या तरुणाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसला. याचं कारण ज्या विद्यापीठात आपण शिकलो, तिथेच आज अतिशय सन्मानपूर्वक आपल्याला बोलावलं जातंय आणि आपला प्रवास जाणून घेण्याची तिथं अपार उत्सुकता आहे, हेच त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या साखरप्यासारख्या लहानशा गावातून हा मुलगा पुण्यात पोहोचला आणि नंतर त्याच्या स्वप्नांनी त्याला थेट अमेरिकेत नेऊन पोहोचवलं. अमेरिकेत जाऊनही त्यानं मागे वळून बघण्याचं थांबवलं नाही. आपलं मूळ गाव साखरपा आणि पुणे यांच्याशी असलेली नाळ तोडली नाही. या तरुणाचं नाव आहे मंदार मोरेश्वर जोगळेकर!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी रेडिओसाठी मंदार जोगळेकरांची मुलाखत घेताना लेखिका दीपा देशमुख

आकाशाला गवसणी घालणाऱ्या मंदार जोगळेकर या तरुणाचा प्रवास सहजसोपा नव्हता. किराणा दुकानात काम करणं असो, की घड्याळ दुरुस्तीच्या दुकानातलं पडेल ते काम करणं असो; शिकत असतानाच इतर मुलांच्या शिकवण्या घेणं असो, की पतंग विकण्याचं काम असो; हॉटेलात वेटर म्हणून चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवत टेबल पुसणं असो, की रात्रीच्या वेळी संगणक शिकण्याचा घेतलेला ध्यास असो... मंदारनं कधीही कुठल्याही कामाची आणि कष्टाची लाज बाळगली नाही. आपला स्वाभिमान अबाधित ठेवून आज तो यशस्वी झालाय. आज पुण्यातल्या डेक्कनसारख्या मोक्याच्या ठिकाणी त्याचं बुकगंगा इंटरनॅशनल दिमाखात उभं आहे. इथूनच अनेक उपक्रमांच्या शाखा विस्तारलेल्या बघायला मिळतात. मंदारचं यश त्याच्या परिश्रमात, त्याच्या चिकाटीत, त्याच्या सकारात्मक दृष्टिकोनात आणि त्याच्या माणुसकीमध्ये दडलेलं आहे. 

अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं, तर मुलाखत संपल्यावर विद्यापीठातून निघताना विद्यापीठाच्या नियमानुसार मुलाखतीचं मानधन मंदारला देण्यात आलं, तेव्हा त्यानं विनम्रपणे नाकारलं आणि म्हणाला, ‘ज्या विद्यापीठामुळे मी घडलो, जिथे शिकलो, तिथून मी पैसे घेऊ शकत नाही. या पैशातून तुम्ही एखाद्या होतकरू, गरजू विद्यार्थ्याला मदत करा.’ 

बुकगंगा इंटरनॅशनल

मंदारचा निरोप घेऊन मी घरी परतले; मात्र मंदारचं वागणं मनात तसंच रेंगाळत होतं. मंदारची आणि माझी ओळख झाली ती अच्युत गोडबोले यांच्यामुळे! तो फिलाडेल्फियावरून भारतात येई, तेव्हा फर्ग्युसन रोडवरच्या वाडेश्वर किंवा चाई रेस्टॉरंटमध्ये आमची भेट होत असे. या प्रत्येक भेटीत तो नवं काहीतरी करत असल्याचं सांगत असे. गरवारे चौकातलं ‘इंटरनॅशनल बुक हाउस’ हे पुस्तकांचं ऐतिहासिक दुकान आपण घेतल्याचं सांगून, त्याच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलं. इंटरनॅशल बुक हाउस हे खरोखरच ऐतिहासिक दुकान. याचं कारण पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अनेक मान्यवर या दुकानात येऊन बराच वेळ पुस्तकं वाचत बसायचे! या दुकानाचे मालक वृद्ध झाल्यामुळे ते पुढे चालवणं अवघड होत होतं आणि हे दुकान बंद होईल की काय अशी भीती प्रत्येक पुणेकरालाच सतावत होती. नेमक्या याच वेळी मंदार हे दुकान आपण घेतल्याचं सांगत होता. या दुकानाच्या मूळ ‘इंटरनॅशनल’ या नावामागे बुकगंगा हे नाव त्यानं दिलं. त्यामुळे पहिलं नाव कायम राहिलं. त्या दुकानाच्या आठवणी त्यानं तशाच जपल्या. 

ज्या वेळी मी ‘बुकगंगा इंटरनॅशनल’ला भेट दिली, तेव्हा या संपूर्ण दुकानाचा कायापालट झाला होता. कात टाकून चमकत राहावं, तशी ही इमारत झळाळत होती. आतलं अंधारलेलं वातावरण नाहीसं होऊन स्वच्छ हसरा सूर्यप्रकाश स्वागताला उभा होता. तिथला स्टाफ अगत्यानं विचारपूस करत होता. त्यानंतर ‘बुकगंगा’बरोबरचं नातं वृद्धिंगत होत गेलं. मंदारबरोबरच्या भेटीही वेळोवेळी होत राहिल्या. त्यातूनच ई-बुक असोत, वा ऑडियो बुक असे अनेक प्रकल्प प्रत्यक्षात साकारले गेले. 

एके दिवशी मंदारला बोलतं केलं, तेव्हा तोही आपल्या भूतकाळाची सैर करून आला आणि मलाही त्यानं ती सफर घडवली. मंदारचे वडील सैन्यात होते. रत्नागिरीजवळच्या साखरप्यासारख्या छोट्याशा गावात मंदारचं कुटुंब राहत होतं. गावातल्या वातावरणात मुलांच्या खोडकरपणाला भरपूर वाव होता. घरातली परिस्थिती बेताची होती; मात्र त्याचा बाऊ करण्याचा कुटुंबाचा स्वभाव नव्हता; मात्र अशा परिस्थितीत ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ असं न मानता मंदार या खेळायच्या वयात कागदी/प्लास्टिकची झुंबरं करून विकायचा, तर कधी पतंग विकायचा, तर कधी इतर वस्तू तयार करून विकायचा. आपला छंद आणि त्यातून कमाई हे बरोबरीनंच चाललेलं असायचं. याच वेळी त्याचं वाचनही चालू असायचं. जे दिसेल ते वाचायचा मंदारला नादच लागला होता.  

दहावीनंतर मंदार पुढलं शिक्षण घेण्यासाठी विद्येचं माहेरघर समजलं जाणाऱ्या पुणे शहरात पोहोचला. याच दरम्यान गावाकडे पावसामुळे खूप नुकसान झालं होतं. मंदारच्या वडिलांनी उभं केलेलं एक छोटंसं दुकानही पाण्यामुळे जमीनदोस्त झालं होतं. आर्थिक नुकसान प्रचंड झालं होतं आणि अशा परिस्थितीत पुण्यात पोहोचलेल्या मंदारच्या हातात ना फारसे पैसे होते ना कुठला वशिला! पायात स्लिपर, अंगात पायजमा आणि शर्ट अशा अवस्थेत तो जेव्हा फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेण्यासाठी पोहोचला, तेव्हा तिथलं चकचकीत आणि आधुनिक वातावरण बघून तो बावचळून गेला. आपण या वातावरणात कुठेच बसत नाही, आपण परत जायला हवं, असं त्याचं एक मन सांगू लागलं. तसंच नातेवाईकांकडे उतरलेल्या मंदारला त्याच्या वडिलांनी सांगून पाठवलं होतं, की कॉलेजमध्ये आणि हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला, की नातेवाईकांकडे राहू नकोस. तुझी व्यवस्था तू करावीस आणि शिकावंस. आपल्या विचारचक्रासोबतच मंदार फर्ग्युसन कॉलेजमधून बाहेर पडला आणि तो आपटे रोडवरच्या आपटे प्रशालेमध्ये जाऊन पोहोचला. तिथल्या रांगेत प्रवेशासाठी उभा असताना तिथल्या प्राचार्यांनी त्याला बघितलं. हा गावाकडला मुलगा दिसतोय, म्हणून त्याला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं, त्याची सगळी चौकशी केली आणि त्याला प्रवेशही दिला; मात्र हॉस्टेलची व्यवस्था होऊ शकणार नव्हती.

मंदारला विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहाची माहिती कळताच तो तिथे जाऊन पोहोचला. ज्या मुलांचं पुण्यात कोणी नाही आणि आर्थिक परिस्थितीही धड नाही, अशा मुलांना तिथे प्रवेश दिला जायचा. मंदारनं बोलताना आपण आपल्या नातेवाईकांकडे उतरलो आहोत असं सांगितलं. त्यामुळे तिथल्या लोकांना वाटलं, अरे याची तर पुण्यात राहण्याची व्यवस्था आहेच, मग याला कशाला प्रवेश द्यायचा. त्यांनी नकार दिल्यावर मंदार नाउमेद झाला नाही. त्यानं आपल्याला फक्त सहा महिने इथं राहू द्यावं, नंतर वाटेल तो निर्णय घ्यावा, असं कळकळीनं सांगितलं. आपल्या घरच्या आर्थिक परिस्थितीबद्दलही कल्पना दिली. त्याच्या बोलण्यातला प्रामाणिकपणा पाहून त्याला वसतिगृहात प्रवेश मिळाला. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना, परिस्थिती आणि भेटलेली अनेक माणसं आपल्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावत असतात. आपल्या वाटचालीत आपण या वसतिगृहात अनेक चांगल्या गोष्टी शिकलो असं मंदारला आजही वाटतं. आपलं व्यक्तिमत्त्व इथंच फुललं असं तो अभिमानानं सांगतो. आणि आजही वेळोवेळी तो विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहात जाऊन मुलांना भेटतो, त्यांच्याशी संवाद साधतो आणि त्यांना प्रेरित करून परततो. 



या वसतिगृहात राहत असताना एकदा तिथल्या कार्यालयातला फोन वाजत होता. मंदारसह अनेक मुलं तिथंच होती; पण एकानंही फोन उचलला नाही. त्याच वेळी वसतिगृहाचे रेक्टर तिथे आले आणि त्यांनी मंदारला बोलावून विचारलं, ‘इतर मुलांचं जाऊ दे; पण तुझ्याकडून अशी अपेक्षा मला नव्हती. तू फोन का उचलला नाहीस?’ त्या वेळी मंदारनं तोपर्यंत आपण फोनला कधी हातही लावला नसल्याचं आणि तो उचलल्यावर नेमकं काय करतात, हे ठाऊक नसल्याचं सांगितलं. त्याचं निरागस आवाजातलं बोलणं ऐकताच रेक्टर विचारमग्न झाले. मंदारसारखीच इतर मुलांची स्थिती असणार हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी वसतिगृहातल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही सत्रांचं आयोजन केलं. त्यातूनच मुलं अनेक गोष्ट शिकली. अगदी फोन उचलल्यानंतर काय बोलायचं, कसं बोलायचं, किती बोलायचं हेही मुलं शिकली. या आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी शिकता शिकता मंदारचं व्यक्तिमत्त्व फुलत होतं, त्याच्यातला आत्मविश्वास वाढत होता. 



मराठीबरोबरच आपल्याला इंग्रजी भाषा चांगल्या तऱ्हेनं येणं आवश्यक आहे, ही गोष्ट लवकरच मंदारच्या लक्षात आली. त्यानं इंग्रजी शिकण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं. याच वेळी पहाटे पाच वाजता तो आणखी एक काम करत होता. एका श्रीमंत वृद्ध बाईंच्या कुत्र्याला फिरायला नेण्याचं काम! तसंच त्यांना सोबत म्हणून रात्री झोपायलाही त्यांच्याकडे जात होता. मधल्या वेळात इतर कुठे कुठे काम करून पैसेही मिळवत होता. शिकवण्या, बागकाम, घड्याळदुरुस्ती अशी अनेक कामं! वसतिगृहात राहताना ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वानुसार कमाईतूनच वसतिगृहाचे पैसे भरावे लागत असत. या सगळ्या कामांनी मंदार सगळ्याच कामांत तरबेज तर झालाच; पण कुठलंही काम हलकं किंवा उच्च दर्जाचं नसतं, उलट प्रत्येक काम आपल्याला स्वावलंबी बनवतं आणि आपल्यातला आत्मविश्वास वाढवतं, हे त्याला कळलं. तसंच ही वेगवेगळी कामं करत असताना अनेक प्रकारची माणसं त्याला भेटत गेली. त्यामुळे माणसांना जाणून घेणं, त्यांना समजून घेणं यातलं कसबही त्याला प्राप्त झालं. 

कामं करत शिक्षण सुरू होतं; मात्र आपण आपल्याला आवडणारे वैद्यकीय शिक्षण घेऊ शकणार नाही ही गोष्ट मंदारच्या लक्षात आली. त्याला बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं कठीण होतं. कारण तितके गुण त्याला मिळाले नव्हते आणि इतरत्र प्रवेश मिळाला असता; पण त्यासाठी डोनेशन देण्यासाठीचे पैसे त्याच्याकडे नव्हते. आपण डॉक्टर होऊ शकत नाही, या वास्तवानं मंदार निराश झाला नाही. त्यानं ते वास्तव स्वीकारलं आणि त्यानं त्याच वेळी जपानी ही सगळ्यात क्लिष्ट असलेली भाषा शिकायचं ठरवलं. मेडिकल नाही, तर आता आपण मायक्रोबॉयलॉजी करू या असं म्हणून मंदारनं या शाखेत प्रवेश घेतला. त्याच वेळी त्यानं ‘अॅ प्टेक’चा कम्प्युटरचा कोर्सही पूर्ण केला. हे सगळं करत असतानाच मंदारला प्रयोग करण्यासाठी उपस्थिती देता येत नसे. त्यामुळे मग त्यानं कला शाखेतलं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. 



शिक्षण पूर्ण झालंय, त्यामुळे आता नोकरी शोधायला हवी असा विचार करून मंदार नोकरीच्या मुलाखतींसाठी जायला लागला; मात्र त्याचा बायोडेटा बघून त्याला मिळू शकणाऱ्या संधींची दारं बंद होत. कारण त्या त्या कामासाठी येणारी मुलं ही इंजिनीअर झालेली असत आणि मंदारच्या नावापुढे तर बीएची म्हणजेच कला शाखेची पदवी चिकटलेली होती. त्याच्या कम्प्युटर कोर्सकडे कोणीही पाहत नसे. अनेक मुलाखतींना जाऊन काहीच उपयोग होत नसल्याचं पाहून मंदारनं ठरवलं, की आता बस्स! आता यापुढे मुलाखत द्यायची नाही, तर आता आपण स्वतःच काही करायला हवं. 

मध्यंतरीच्या काळात पुण्यातल्या मोदीबागेत राहत असलेल्या एका कुटुंबातल्या मुलाचा गृहपाठ नीट करवून घेण्याचं काम मंदारला मिळालं; मात्र या मुलाकडे त्याला पहाटे पाच वाजता जावं लागे. या मुलाला शिकवायला आणखी दिग्गज असे तीन प्राध्यापक वेगवेगळ्या वेळी येत असत; मात्र या मुलाला मंदारचं शिकवणं खूप आवडायला लागलं आणि काहीच दिवसांत त्याची मंदारशी गट्टी तर जमलीच; पण तो अभ्यासातही चमकायला लागला. पुढला प्रवास त्यानंतर खूप वेगात झाला. मंदारनं संगणक प्रणाली विकसित करण्याचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. 



‘मायविश्व टेक्नॉलॉजिज’च्या माध्यमातून लोकांचा वेळ वाचवण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानावर आधारित गोष्टी विकसित करणं, अॅप तयार करणं, यातूनच मंदारला यश मिळत गेलं. आता घरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकडेही मंदारला लक्ष द्यायचं होतं. त्यानं हळूहळू गावाकडून आपल्या भावंडांना पुण्यात आणलं. त्यांना शिकवून पायावर उभं केलं. आपल्या कष्टानं आणि विनयशील स्वभावानं मंदार अमेरिकेत जाऊन पोहोचला. त्याच्या वडिलांनी सांगितलेलं एक वाक्य त्यानं कायम लक्षात ठेवलंय. ते म्हणत, ‘तू जे करशील त्यात कधीही समोरच्याला, ‘या माणसानं आपल्याला फसवलंय’ असं वाटता कामा नये.’ वडिलांच्या बोलण्याचा मथितार्थ लक्षात घेऊन मंदारनं आपल्याला जे करायचंय ते उपयुक्त आणि लोकांच्या हितासाठी हे कायम लक्षात ठेवलं. 

पुस्तकांनी आपल्याला नेहमीच चांगली दिशा दिली, या भावनेतून त्यानं बुकगंगा इंटरनॅशनल दुकान विकत घेतलं. गावातल्या मुलामुलींना घेऊन त्यांना प्रशिक्षित करून कॉल सेंटर्स सुरू केली. त्याआधी ग्लोबल मराठी न्यूजलेटर, ऑनलाइन पुस्तकविक्री आणि ई-बुक्स निर्मिती, तसंच ई-पेपर गॅलरी सुरू झाली. अमेरिकेत भरलेल्या विश्व साहित्य संमेलनात एका साहित्यिकाने मंदारला छेडलं, की ‘अॅमेझॉनवरून इंग्रजी पुस्तकं घरपोच मिळतात; पण मराठी पुस्तकांसाठी अशी व्यवस्था नाही. तुमच्यासारख्या तरुण मराठी उद्योजकांनी यासाठी काही तरी केलं पाहिजे.’ ती गोष्ट मंदारच्या डोक्यात घोळत राहिली आणि त्यातूनच मराठी साहित्य जगभरात पोहोचवण्याच्या हेतूनं २०१०मध्ये ‘बुकगंगा डॉट कॉम’ची सुरुवात झाली.

पहिल्या ई-बुकचं प्रकाशन - भयशून्य चित्त जेथ

तंत्रज्ञानाची उपलब्धता आणि काळानुसार वाचकांची गरज ओळखून आणि जास्तीत जास्त वाचकांना मराठीकडे वळवण्यासाठी ई-बुक्स आणि नंतर ऑडिओ बुक्सची निर्मितीही सुरू झाली. याचबरोबर ऑडिओ दिवाळी अंकही सुरू झाले. आज जपानी भाषेशिवाय मंदारला अरेबिकसह सात भाषा अवगत आहेत. त्याच्या कल्पक डोक्यात सतत नवनवीन प्रकल्प घोळत असतात आणि ते वास्तवात आणण्यासाठी त्याची टीम धडपडत असते. 



अलीकडेच मंदारची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली. या भेटीत दोघांमध्ये खूप चांगली चर्चा झाली. मंदारनं शेतकऱ्यांसाठी किसान अभिमान नावाचं अॅप तयार केलं असून, शेतकरी ते थेट ग्राहक अशी भेट होऊन मधस्थ दूर करणे हा त्यामागचा उद्देश आहे. शेतकऱ्याना तंत्रज्ञानाच्या मदतीनं सक्षम बनवण्याचा मंदारचा मानस आहे. याचबरोबर मंदारनं झी मराठीसोबत होम मिनिस्टर हे अॅप तयार केलं असून, या अॅपद्वारे २० हजारांहून अधिक उद्योजक स्त्री-पुरुष एकत्र आले आहेत. ज्याची जशी गरज ती सेवा या अॅपद्वारे ग्राहकाला विनासायास मिळते आहे. कोणाला घरगुती डबा लावायचा असेल, तर असा डबा देणाऱ्या घरगुती उद्योग करणाऱ्या अनेकांची यादीच या अॅपद्वारे समोर येते. या होम मिनिस्टर अॅपमुळे लोकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. तसंच झी मराठीसोबतच सुरू केलेल्या ‘तुमचं आमचं जमलं डॉट कॉम’ याद्वारे जोडीदार मिळवून देण्याचं कामही केलं जातंय. स्वभाव गुणमीलन चाचणी हे या सेवेचं वैशिष्ट्य आहे. समाजात सकारात्मकता पसरवण्याच्या हेतूने ‘बाइट्स ऑफ इंडिया’सारखं पॉझिटिव्ह मीडिया पोर्टल सुरू करण्याची कल्पनाही त्याचीच.



असा हा चतुरस्र, बहुआयामी असलेला मंदार शाकाहारी आणि निर्व्यसनी आहे. त्याच्या या चढ-उताराच्या प्रवासात अनेक कटू अनुभव आले, तरी तो त्या अनुभवांचा उच्चारही करत नाही. त्याला कुणाचा राग नाही आणि कोणाबद्दल द्वेषभावनाही नाही. समाजभान ठेवून वाटचाल करणारा हा अनवट वाटेवरचा तरुण रोज नवनवी स्वप्नं घेऊन चालतो आहे आणि त्यांना साकारत असताना अनेकांचा मित्र बनून त्यांना त्यांच्या आयुष्यात उभं करतो आहे!

ई-मेल : mandar.joglekar@myvishwa.com

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप







 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZKQBZ
 श्री मंदारच्या कार्याला सलाम4
 एका उत्तम व्यक्तिमत्वाची अतिशय सुंदर व प्रेरणादायी मुलाखत....
Bytes of India वर मी नियमितपणे लेखन करत आहे.2
 Yes, really great, expecting still more heights to scale up!2
 अप्रतिम कार्य मंदार
तुझ्या कार्याला मनापासून सलाम2
 मंदार उत्तम कार्य मनापासून शुभेच्छा कोकणातला मुलगा काहीही करू शकतो हे दाखवून दिलस2
 Most Inspiring and Eyeopener write up.
Thanks a lot Deepa for these details.
Proud of you Mandar.... You are a Real Hero and Youth Icon!2
 या माध्यमातून मंदार जोगळेकर यांची खूप चांगली माहिती मिळाली आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद1
 अतिशय सुंदर आणि नेमका लेख. मनःपूर्वक अभिनंदन मंदार आणि शुभेच्छा!
खूप छान वाटले लेख वाचून.
 मंदार, शुन्यातून तू तुझे विश्र्व निर्माण केलेस, तुला माझा सलाम. तुझें खूप खूप अभिनंदन.
 सुंदर लेख.प्रेरणादायी!
 Yess! Great!
Similar Posts
डॉ. जगन्नाथ वाणी आणि स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) स्वतःच्या पत्नीला स्किझोफ्रेनिया हा विकार झाल्यानंतर आपल्या दुःखाचा बाऊ न करता, त्यातून मार्ग काढत ‘ते’ पुढे जात राहिले. या विकाराची भीषणता समजल्यानंतर त्यांनी ‘स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा)’ या संस्थेची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. त्याबद्दल जनजागृतीसाठी पुस्तकं लिहिली, ‘देवराई’ नावाचा सिनेमा काढला आणि बरंच काही केलं
रुक जाना नहीं, तू कहीं हार के... बीए, एलएलबी झालेल्या, लग्न होऊन संसारात रुळलेल्या शारदा बापट नावाच्या एका स्त्रीनं आपल्या आईच्या सततच्या आजारपणाचं कारण शोधण्यासाठी चक्क वयाच्या पस्तिशीत डॉक्टर व्हायचं ठरवलं. रीतसर कॉलेज करून, असंख्य अडचणींना तोंड देत त्या डॉक्टर झाल्याही. त्याच दरम्यान त्या वैमानिकही झाल्या, कम्प्युटर्स-इलेक्ट्रॉनिक्स यांवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं
अष्टावक्र-नाथगीता पुस्तक आणि ई-बुकचे प्रकाशन पुणे : सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात अष्टावक्र-नाथगीता या पुस्तकाचे, तसेच ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. वृषाली पटवर्धन यांनी हे पुस्तक लिहिले असून, आरंभ प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे
श्रीकृष्णाचं ‘अल्फा’ स्वप्न! आपला मुलगा ऑटिस्टिक आहे, हे समजल्यानंतरही पुण्यातील श्रीकृष्ण गोडबोले आणि त्यांच्या पत्नीनं वास्तव स्वीकारून वाटचाल करायचं ठरवलं. श्रीकृष्ण यांनी नोकरी सोडून स्वतःची फॅक्टरी सुरू केली आणि त्यात मानसिक विकलांग, अपंगांनाही कामाची संधी दिली. त्यांना जणू आपल्या कुटुंबातच सामावून घेतलं. अशा मुलांसाठी आणखीही बरंच काही करण्याची त्यांची इच्छा आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language