Ad will apear here
Next
तो एक ‘राजहंस!’


सेरेब्रल पाल्सीमुळे ज्याचं अवघं आयुष्यच पणाला लागलं होतं, लहानपणी जो पाण्याला घाबरत होता, तो हंसराज पाटील आज आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जलतरणपटू आहे. स्पर्धा परीक्षेमध्येही उत्तम यश मिळवून तो आज नाशिकमध्ये नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. तो आणि त्याच्या आई-वडिलांनी जिद्दीने अडचणींवर मात करत केलेल्या प्रयत्नांमुळे आज तो सर्वांसाठीच एक प्रेरणास्थान ठरला आहे. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ सदरात आज त्याची प्रेरणादायी कहाणी...
.....
काही वर्षांपूर्वी नाशिकमध्ये अपंगांच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. मी एक कार्यकर्ता या नात्यानं त्यात सहभागी झाले होते. खूप उत्साहानं भारलेलं ते वातावरण होतं. उद्घाटनाचं सत्र सुरू झालं आणि एक सतरा-अठरा वर्षांचा तरुण क्रीडा सत्राचा उद्घाटक म्हणून उभा राहिला. तो बोलत होता... त्यानं एका मिठाच्या बाहुलीचं उदाहरण दिलं होतं. तो म्हणत होता, ‘आपण या मिठाच्या बाहुलीसारखं प्रयत्नरूपी सागरात इतकं विरघळून जायला हवं, की आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्या अस्तित्वाचा दंभच नष्ट करावा लागतो.’ टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं बोलणं संपलं. त्या मुलाला भेटावं आणि तो छान बोललाय म्हणून त्याचं अभिनंदन करावं, म्हणून मी गर्दीतून वाट काढत त्याच्यापर्यंत पोहोचले. जवळ येऊन बघते तर काय, दुरून दिसणाऱ्या दृश्यापेक्षा हे दृश्य एकदम वेगळं होतं. 

हा मुलगा एकदम वेगळा होता. त्याचं शरीर स्थिर राहू शकत नव्हतं. प्रत्येक हालचालीसाठी कुणाचा तरी आधार घ्यावा लागत होता. काय झालंय याला नेमकं? तेवढ्यात कोणीतरी जवळ येऊन त्याची आणि माझी ओळख करून दिली. तो होता नाशिकमधला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा जलतरणपटू हंसराज पाटील! याला उभं राहायला जमत नाहीये, याला बोलतानाही शब्द नीट उच्चारता येत नाहीयेत आणि हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा जलतरणपटू कसा असू शकतो, असे अनेक प्रश्न मनात उमटत राहिले. मी मुंबईत परतले आणि त्यानंतर मात्र हंसराजशी जमेल तसा फोन करून संवाद सुरू झाला. वय, धर्म, जात, आर्थिक स्तर यांपैकी कशाचाही अडसर न येता आम्ही एकमेकांचे मस्त दोस्त बनलो. मी त्याच्या आईच्या वयाची असूनही तो मला ‘दीपा’ या नावानंच एकेरी हाक मारायला लागला. त्याचं अडखळणं, प्रयत्नपूर्वक एक एक शब्द उच्चारणं मला समजायला लागलं. या मैत्रीतून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे हंसराज खूप प्रसन्न आणि सकारात्मक दृष्टी असलेला तरुण आहे. तो कायम हसतमुख असतो. अनेकदा कामाच्या गडबडीत मला फोन उचलता आला नाही, तरी तो कधीच रागावत नाही. पुढल्या फोनवर आपण दिलगिरी व्यक्त करावी, तर तो लगेच हसून म्हणतो, ‘एवढीशी गोष्ट, तू किती मनाला लावून घेतेस आणि आता आपण बोलतोच आहोत ना!’ त्याच्या त्या समंजसपणाचं मला तेव्हाही आणि आताही तितकंच कौतुक वाटतं. 

हंसराजविषयीचं प्रेम वाढत होतं, तितकंच त्याच्याविषयीचं कुतूहलही! तो असा का आहे, या प्रश्नाचं उत्तर मला त्याच्याचकडून मिळवायचं होतं. एके दिवशी नाशिकला जायचा प्रसंग आला आणि मी हंसराजच्या घरात जाऊन धडकले. हंसराजनं हसून स्वागत केलं. तो दिसण्याआधी त्याच्या घरातली समोरची अख्खी भिंतच पुरस्कारांनी नटलेली दिसली आणि ते सगळे पुरस्कार हंसराजविषयी अभिमानानं बोलत होते. हंसराजशी बोलत असतानाच त्याचा १७-१८ वर्षांचा प्रवास उलगडला गेला....

हंसराजचा जन्म २० जून १९८७ या दिवशी नाशिक शहरात झाला. हंसराज सातव्या महिन्यात जन्मला, त्या वेळी तो इतका किडकिडीत होता, की एखादी नाजूकशी बाहुलीच असावी! या नाजूक शरीराच्या मुलाचं नाव मात्र दमदार असायला हवं या विचारानं त्याच्या आजोबांनी त्याचं नाव हंसराज असं ठेवलं; मात्र नाजूक हंसराजला सांभाळणं खूप कसरतीचं काम होतं. तो इतका नाजूक होता, की दिवसभर त्याच्या आईला त्याला मांडीवर घेऊन बसावं लागे आणि रात्री ११-१२ वाजता कामावरून परतलेल्या वडिलांना त्याला नंतर रात्रभर सांभाळावं लागे.

हंसराजचं उभं राहणं, चालणं हे इतर सर्वसामान्य मुलांपेक्षा खूपच संथ गतीनं होतं. इतर मुलं चालतात, त्या वेळी तो कसाबसा उभा राहू लागला. हळूहळू होईल सगळं सुरळीत, असा विचार त्याचे आई-वडील करत असतानाच हंसराज तीन वर्षांचा झाला आणि आपला मुलगा इतर मुलांसारखा शारीरिकदृष्ट्या नॉर्मल नाहीये, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. मनात शंका येताच, त्याला घेऊन ते एका तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेले. तेव्हा अनेक गोष्टी त्यांना समजल्या. हंसराजचा जन्म झाला, तेव्हा त्याच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला नव्हता. त्यामुळे त्याला बहुविकलांगता (सेरेब्रल पाल्सी) हा विकार झाला होता. हा एक स्नायूंचा विकार असून, सर्वसामान्य मुलांप्रमाणे अशा मुलांचे स्नायू लवचिक असत नाहीत. कुठलीही हालचाल करताना अतिशय कष्टानं आणि प्रयत्नांनी ती करावी लागते. कोणाच्या आधाराशिवाय ही मुलं काहीच करू शकत नाहीत. डोळ्यांच्या हालचालींपासून ते बोलणं असो वा इतर गोष्टी, त्यावर त्यांचं नियंत्रण असत नाही. डॉक्टर बोलत होते आणि हंसराजचे आई-वडील सुन्न होऊन ऐकत होते. डॉक्टर सांगत होते, की यावर उपाय म्हणजे फक्त फिजिओथेरपी आणि अॅक्वाथेरपी!

हैदराबादचे डॉ. बेडेकर यांनी अॅक्वाथेरपी सांगितली. हंसराजला पाण्यात पोहण्याचा सराव करायला लावला, तर त्याचे स्नायू बळकट होतील आणि त्याची प्रकृतीही सुधारेल, असं त्यांनी सांगितलं. याचं कारण अशा मुलांच्या स्नायूंमध्ये लवचिकता आली नाही, तर ते कडक होण्याचा संभव जास्त असतो. त्यामुळे अशा मुलांना आयुष्यभरासाठी व्यायामाची आवश्यकता असते. हंसराजच्या आई-वडिलांनी हंसराजला पोहायला न्यायचं ठरवलं. 

हे काही सोपं काम नव्हतं. पाण्याचा स्पर्श होताच चिमुकल्या हंसराजनं जोरजोरात रडायला सुरुवात केली. पाण्याची प्रचंड भिती त्याच्या मनात बसली. पाण्याचा स्पर्श झाला रे झाला, की सुरू झालेलं त्याचं रडणं थांबतच नसे. त्याच्या रडण्याच्या आवाजानं आजूबाजूचे लोक कंटाळत आणि वैतागून हंसराजच्या आईला म्हणत, ‘अहो, तुम्ही आई आहात की कोण? तुमच्या मुलाला पोहायला आवडत नाही, तर त्याच्यावर जबरदस्ती का करता आणि इथलं वातावरण का बिघडवता? तुमची हौस म्हणून याला का छळताय? तुमच्या मुलाच्या या तार स्वरातल्या रडण्याचा आसपासच्या लोकांना किती त्रास होतोय, याची जाणीव तरी आहे का तुम्हाला?’ हंसराजच्या आईला खूप वाईट वाटे. लोकांना काय सांगणार? त्यांना सांगितल्यावर त्यांची सहानुभूतीची नजरही त्यांना नको होती. 

आईसह हंसराज पाटीललोकांच्या कटाक्षाकडे, बोलण्याकडे आणि हंसराजच्या रडण्याकडे जराही लक्ष न देता हंसराजच्या आईनं दृढ निश्चयानं हंसराजला पोहायला लावायचंच, असं ठरवलं. आपल्या मुलामध्ये नक्कीच बदल दिसेल, याची आईला खात्री वाटायची. अर्थातच हंसराज मात्र रोज जलतरण तलावातलं पाणी दिसलं, की आधीच रडायला सुरुवात करायचा. हळूहळू हंसराजचं वय वाढत होतं. त्याला शाळेत घालायला हवं होतं. रडक्या हंसराजला कुठेही घेऊन गेलं, की त्या त्या शाळेत प्रवेश द्यायला तिथले लोक तयार होत नसत. कुठल्याही शाळेत प्रवेश मिळत नव्हता. तसंच सततचं आजारपण, नेहमी होणाऱ्या तपासण्या यांनी त्या छोट्याशा जिवाला बेजार करून सोडलं होतं. त्यामुळे कदाचित मोठमोठ्यानं रडणं इतकंच आपल्या हातात आहे, असं त्याला वाटत असावं. 

हंसराजचे वडील चंद्रविलास पाटीलअखेर एका शाळेत हंसराजला प्रवेश मिळाला; मात्र त्याच्या उठसूट रडण्याला कंटाळून त्याच्या वर्गशिक्षिकेनं त्याला वर्गाबाहेर बसवलं. मधल्या सुट्टीत हंसराजची आई त्याचा डबा घेऊन शाळेत आली, तेव्हा रडणारा हंसराज तिला वर्गाबाहेर दिसला. आईचा जीव कळवळला. तिनं वर्गशिक्षिकेजवळ विचारणा केली, तेव्हा त्या निर्विकारपणे म्हणाल्या, ‘इतका लाडाचा मुलगा आहे, तर त्याला घरीच बसवा की!’ समजून घेणं तर दूरच; पण सगळीकडून एक प्रकारची तुच्छता आणि उपेक्षा वाट्याला येत होती. त्याही शाळेतून हंसराजला कायमची सुट्टी मिळाली. अखेर अथक प्रयत्नांनंतर एका मराठी माध्यमाच्या शाळेत त्याला प्रवेश मिळाला. या शाळेचे मुख्याध्यापक स्वतः अपंगत्वाशी सामना करत असल्यामुळे त्यांना हंसराज आणि त्याच्या पालकांची परिस्थिती समजत होती. हंसराजबरोबर पालकांपैकी एकानं शाळेत यावं, त्याला वॉशरूमला नेणं-आणणं करावं, अशी सगळी जबाबदारी एका पालकानं शाळा सुटेपर्यंत घ्यावी, अशी अट शाळेनं घातली. हंसराजची आई एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होती; पण मुलासाठी त्यांनी आपल्या कामाचा राजीनामा दिला आणि ही नवीन ड्युटी निभवण्याची तयारी सुरू केली. 

हंसराजची आई त्याला रोज शाळेत घेऊन येत असे. मधल्या सुट्टीत त्याला डबा खाऊ घालत असे. मधल्या सुट्टीत इतर मुलं सुसाट वेगात इकडून तिकडे, तिकडून इकडे धावताना बघायला मिळत. हंसराज मात्र हे दृश्य फक्त बघूच शकत असे. आपल्याला आपल्या आईच्या आधाराशिवाय काहीच करता येत नाही, ही गोष्ट त्याला कळून चुकली होती. कधी कधी वर्गातली इतर मुलं त्याला त्याच्या अपंगत्वावरून चिडवत, त्याच्या खोड्याही काढत. असहाय हंसराज त्याला प्रतिकार करूच शकत नसे; मात्र हळूहळू शाळेतलं वातावरण बदललं. शिक्षक आणि इतर मुलं त्याला मदत करू लागली. हंसराजला शाळेत आणणारे रिक्षावाले काका असोत वा त्याचे वर्गमित्र, ही सगळी मंडळी त्याला प्रत्येक गोष्टीत साह्य करत. याचा परिणाम असा झाला, की चौथीत असताना हंसराजचा आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मान करण्यात आला. त्यानंतर हंसराजनं हाच पायंडा पुढे चालू ठेवला. त्रास होत असतानाही तो प्रत्येक स्पर्धेत भाग घेत असे. मग ती वक्तृत्व स्पर्धा असो वा स्तोत्रपठणाची स्पर्धा असो! अथक कष्ट करून तो त्या स्पर्धेत यशही मिळवत असे.

हंसराज सहाव्या इयत्तेत गेला असताना त्याच्या पायांवर शस्त्रक्रिया करायचं ठरलं. पायाचे जॉइंट्स थोडे कट केले, तर ते ताणले जाऊन त्यात लवचिकता येईल, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. त्यानुसार हंसराजच्या पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. १८० टाके घालावे लागले. सहा महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार होती. अशा अवस्थेत शाळेचा विचार करणंही अशक्य होतं. अशा वेळी शाळेतल्या सर्व शिक्षकांनी आळीपाळीनं हंसराजच्या घरी येऊन त्याला शिकवलं. त्याची अभ्यासाची तयारी करून घेतली. शिक्षकांच्या प्रेमामुळे आणि परिश्रमामुळे हंसराज अतिशय उत्तम तऱ्हेनं उत्तीर्ण झाला आणि त्यानं सातव्या इयत्तेत प्रवेश मिळवला. हंसराजचं शिक्षण सुरू होतं. दहावीत त्याला गणित विषय आवडायचा नाही. मग त्यानं ‘नॅशनल ओपन स्कूल’द्वारे दहावीची परीक्षा दिली आणि त्यात गणिताऐवजी बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन हा विषय घेतला. 

अपंगांसाठी वेगळ्या क्रीडा स्पर्धा होतात, अशी माहिती दहावीत असताना हंसराजला मिळाली. २००२ साली ग्वाल्हेरला अपंग क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. एकेकाळी पाण्याला घाबरणाऱ्या आणि स्नायूच्या विकारानं ग्रस्त असलेल्या या मुलानं त्या स्पर्धांमध्ये ‘५० फूट/बॅक स्ट्रोक/ फ्री स्टाइल/ १०० फूट फ्री स्टाइल’ पोहण्याच्या स्पर्धेत तीन सुवर्णपदकं मिळवली. नाशिक शहरासाठी ती राष्ट्रीय पातळीवर घडलेली आणि शहराचं नाव उज्ज्वल करणारी घटना होती.

या स्पर्धेतील सहभागामुळे हंसराजची पाण्याची भीती दूर झाली. त्याला पाण्याची गोडी वाटू लागली. २००३ साली दिल्लीत राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन तिथंही त्यानं तीन सुवर्णपदकं मिळवली. २००४ साली मुंबईत एक सुवर्णपदक, दोन रजत आणि एक कांस्यपदक त्यानं मिळवलं. आता आपल्याला जास्त परिश्रम केले पाहिजेत, असं हंसराजच्या लक्षात आलं. त्यानं आपला सराव वाढवला. आणि या कष्टाचं फलित म्हणजे २००५ साली इंग्लंडला होणाऱ्या  आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. ५६ देशांमधल्या ५०० स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. हंसराज त्या सगळ्यांत लहान वयाचा होता. या स्पर्धेमध्ये हंसराजला चौथ्या क्रमांकावर राहावं लागलं; मात्र त्याच्या कामगिरीमुळे हंसराजचं खूप कौतुक झालं. 

त्यानंतर २००६ साली कोलकात्याला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही हंसराजनं दोन सुवर्ण आणि दोन रजतपदकं पटकावली आणि २००६मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जाण्यासाठीचा आपला मार्ग खुला केला. त्यात तिसरा क्रमांक मिळवून तो आंतरराष्ट्रीय विजेता ठरला. त्याच वर्षी मलेशियामध्ये आशियायी क्रीडा स्पर्धांना होणाऱ्या समांतर क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याची संधी हंसराजला मिळाली. मलेशियाला पोहोचताच हंसराजला तिथलं वातावरण मानवलं नाही. ताप आणि खोकला यांनी तो त्रस्त झाला. या सगळ्या अवस्थेत स्पर्धेची तयारी कशी करावी हे त्याला कळत नव्हतं. तसंच स्पर्धेमध्ये उतरल्यामुळे स्पर्धेच्या नियमानुसार औषधं आणि गोळ्या घेता येत नव्हत्या. इतर ठिकाणच्या औषधांना तिथे बंदी होती. मग तिथल्याच डॉक्टरांनी दिलेली औषधं हंसराजनं घेतली; पण काहीही फरक पडेना. आता इतक्या दूर येऊनही आपल्याला स्पर्धेत भाग घेता येणार नाही, या विचारानं हंसराज अस्वस्थ झाला. स्पर्धेच्या दिवशी पाण्यात प्रवेश करताच हंसराजचा ताप तर पळालाच; पण या स्पर्धेत त्याला तिसरा क्रमांक पटकावता आला. 

यानंतर राज्याराज्यांमधल्या स्पर्धा असोत वा आंतरराष्ट्रीय स्पर्धा, हंसराज प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन निर्विवादपणे यश मिळवत राहिला. हे सगळं करत असताना त्यानं आपल्या अभ्यासाकडे जराही दुर्लक्ष केलं नाही. दहावीनंतर पुन्हा अकरावीत प्रवेश मिळवताना त्याच अडचणी समोर येऊन उभ्या ठाकल्या. या अडचणींवर मात करत हंसराजनं फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तसंच त्यानं कला शाखेतली पदवी मिळवली. आता हंसराजला स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा ध्यास लागला होता. त्यानं तयारी सुरू केली. 

याच दरम्यान हंसराजनं आणखी एक काम सुरू केलं. आपल्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी, आपल्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, आपल्यातला न्यूनगंड घालवण्यासाठी, नैराश्य आपल्या जवळपासही फिरकू नये यासाठी झटणारे आई-वडील हंसराजचे आदर्श होते. आपणही हेच काम करायला हवं, असं त्याच्या मनानं घेतलं. त्यानंतर हंसराज आपल्यासारख्या अपंगत्व असलेल्या मुलांच्या संपर्कात राहायला लागला. त्यांच्याशी मैत्री करून त्यांना बोलतं करायला लागला. त्यांच्यातली सहानुभुतीची भावना काढून त्यांना स्वाभिमानानं जगण्याचे मार्ग सुचवायला लागला. आपल्याप्रमाणेच आणखी स्पर्धक कसे तयार होतील, या गोष्टीकडे हंसराज लक्ष देऊ लागला. अशा मुलांना प्रोत्साहित करू लागला. अशा मुलांच्या सहली काढण्यात पुढाकार घेऊ लागला. आज हंसराज आपल्या अपंगत्वावर मात करून देशातच नव्हे, तर देश-विदेशातही देशाचं नाव उंचावण्याचं काम करतोय. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीतून इतर अपंग बांधवांसाठी अनेक उपक्रम योजून ते प्रत्यक्षात साकारतोय. त्यांच्यातला न्यूनगंड काढून त्यांना स्वाभिमानानं जगायचं शिकवतोय. पालकांचा आधार कमीतकमी कसा करता येईल आणि त्यांच्या आधाराशिवाय आपण रोजचं जगणं कसं जगू शकू, याबद्दल तो मुलांना मार्गदर्शन करतोय. अपंगांसाठी असलेल्या अनेक शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कामदेखील तो करतो आहे. 

हंसराजच्या लाघवी स्वभावामुळे देश-विदेशात त्याचे अनेक मित्र जोडलेले आहेत. तसंच कम्प्युटर हाही त्याला त्याचा सच्चा दोस्त वाटतो. आपल्या सगळ्याच मित्रांच्या सुख-दुःखांशी त्याचं नातं आहे. हंसराजच्या आई-वडिलांची ओळखही एका अपंग, असाहाय मुलाचे आई-वडील, अशी राहिलेली नाही. घरी जेव्हा फोन खणाणतो, तेव्हा तो हंसराजसाठी असतो. ‘हंसराजचे आईवडील’ अशी त्यांची ओळख बनली आहे. हंसराजच्या आई-वडिलांच्या अफाट परिश्रमामुळेच आज हंसराज आपल्या अपंगत्वावर कितीतरी प्रमाणात मात करू शकला. त्याच्या आईला नुकताच सह्याद्री चॅनेलचा हिरकणी पुरस्कार मिळाला. आपल्या आवडीनिवडी, आपलं काम, सगळं सगळं बाजूला ठेवून हंसराजच्या आईनं केवळ आपल्या मुलाला घडवण्याकडेच लक्ष दिलं आणि ‘कोशीश करनेवालों की हार नहीं होती’ ही ओळ सार्थ करून दाखवली. त्यामुळेच आज हंसराज स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून नाशिकमध्येच नायब तहसीलदार या पदावर कार्यरत आहे. पूर्वी तो पुरवठा आणि निरीक्षण अधिकारी म्हणून काम पाहत असे. नुकतीच त्याच्यावर निवडणुकांची जबाबदारी सोपण्यात आली आहे. तो आज नवीन अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचंही काम करतो आहे. हंसराजच्या आजपर्यंतच्या प्रवासात त्याच्या आई-वडिलांबरोबरच त्याची बहीण पूजा हिचाही मोठा वाटा आहे. हंसराज नुकताच विवाहबंधनात अडकला असून, त्याचं कर्तृत्व आणि त्याच्या उणिवा यांसहित त्याच्या पत्नीनं - प्रियांकानं - त्याला स्वीकारलं आहे. प्रियांका उच्चशिक्षित असून, सध्या ती स्पर्धा परीक्षांची तयारी करते आहे.

पत्नी प्रियांकासह हंसराजस्वतःच्या पायावर उभं राहिलेल्या हंसराजनं आपल्या अनेक उणिवांवर उपचार आणि तीव्र इच्छाशक्ती यांच्या जोरावर मात केली आहे. मी बघितलेला १७-१८ वर्षांचा हंसराज, जो स्नायू काम करत नसल्यानं पूर्णपणे थरथरत होता, त्याला एक वाक्य नीट बोलता येत नव्हतं, तोच आज आपल्या स्नायूंवरही मोठ्या प्रमाणात ताबा मिळवायला शिकला आहे. म्हणूनच तो आपलं प्रशिक्षणही तितक्याच ताकदीनं घेऊ शकतोय. 

हंसराज कविताही अतिशय उत्तम करतो. निळ्या आभाळात पक्ष्याप्रमाणे भरारी घ्यावी असं स्वप्न पाहणाऱ्या आणि ते कवितेतून मांडणाऱ्या हंसराजनं आपल्या जीवनाची कविता मात्र प्रत्यक्षात उतरवली आहे. त्याची भरारी देशाच्या सीमा ओलांडून केव्हाच पुढे गेलीय. (एका खासगी वाहिनीवरील हंसराजची मुलाखत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.) 

हंसराजच्या सर्वच स्वप्नांना बळ मिळो, अशा शुभेच्छा! आपण सर्वच जण कुठलंतरी रडगाणं घेऊन फिरत असतो, जे आपल्याजवळ नाही त्यामुळे खंतावत असतो. इथे हंसराज मात्र आपलं अपंगत्व बरोबर घेऊन फिरतोय; पण त्याचा तो बाऊ करत नाहीये. आपल्या कर्तृत्वानं ते अपंगत्वदेखील त्यानं विसरायला लावलंय. या हंसराजकडे बघून इतकंच म्हणावंसं वाटतं -

भगीरथाचा वंशज तू
श्रमशक्तीचा पूजक तू
यशलक्ष्मीच्या उज्ज्वल प्रहरी
चल मित्रा, घे गरुडभरारी!
संपर्क :
ई-मेल : hansraj.patil8@gmail.com
मोबाइल :९४२११ ७७६७३

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZQVBQ
 Hats off to hansraj and his parents🙏🙏🙏🙏
Very touching and inspiring story!!
Wish you all best and good luck in life!!
 keep it up you are motivation for other cp patients just like my son
 Hats of Hansraj. Thanks Deepa Deshmukh.
 Proud of you Hansraj for your hard work and achievements!
Amazing personality and an affectionate friend!
Similar Posts
हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा... जळगावच्या यजुर्वेंद्र महाजन या तरुणाने ग्रामीण भागातल्या मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करण्याचं ध्येय ठेवून दीपस्तंभ ही संस्था सुरू केली आणि मोठं काम उभं केलं. पुढे अंध-अपंग मुला-मुलींसाठी ‘मनोबल’, ग्रामीण आदिवासी मुला-मुलींसाठी ‘गुरुकुल’ आणि निराधार वंचित मुला-मुलींसाठी ‘संजीवन’ अशा तीन संस्थाही त्याच्या कार्यातून उभ्या राहिल्या
रुक जाना नहीं, तू कहीं हार के... बीए, एलएलबी झालेल्या, लग्न होऊन संसारात रुळलेल्या शारदा बापट नावाच्या एका स्त्रीनं आपल्या आईच्या सततच्या आजारपणाचं कारण शोधण्यासाठी चक्क वयाच्या पस्तिशीत डॉक्टर व्हायचं ठरवलं. रीतसर कॉलेज करून, असंख्य अडचणींना तोंड देत त्या डॉक्टर झाल्याही. त्याच दरम्यान त्या वैमानिकही झाल्या, कम्प्युटर्स-इलेक्ट्रॉनिक्स यांवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं
किताबें कुछ कहना चाहती हैं.... ‘मेक इंडिया रीड’ अर्थात अख्ख्या भारताला वाचनाची गोडी लावण्याचं स्वप्न घेऊन अमृत देशमुख नावाचा एक तरुण कार्यरत आहे. वाचलेल्या पुस्तकांचे सारांश तो ‘बुकलेट’ या अॅपद्वारे लाखो लोकांपर्यंत तो मोफत पोहोचवतो. हे सारांश ऑडिओ स्वरूपातही दिले जातात. वाचनामृताची गोडी लावणाऱ्या अमृतची गोष्ट पाहू या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदराच्या आजच्या भागात
‘मनोहर’ कार्य करणारी ‘मुक्ता’ एखाद्याच्या दुःखानं अश्रूंना मुक्तपणे वाट करून देणाऱ्या, पण अन्यायाच्या विरोधातल्या मोर्चाचं नेतृत्व करताना कणखर, लढाऊ होणाऱ्या, कामगारांच्या हक्कांसाठी त्यांना लढण्याचं बळ देण्यासाठी प्रेरणादायी भाषणं करणाऱ्या आणि समाजाला जागृत करण्यासाठी या साऱ्यांचे प्रश्न प्रभावी लेखनातून मांडणाऱ्या संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्या म्हणजे मुक्ता मनोहर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language