Ad will apear here
Next
२१व्या शतकातील संगीत नाटक : ‘सूर माझे सोबती’
'सूर माझे सोबती' या संगीत नाटकातील एक दृश्य

संगीत नाटक हे मराठी रंगभूमीचं खास वैशिष्ट्य आहे. बालगंधर्वांनी अजरामर केलेला तो मखमली पडदा, दुसऱ्या कोणत्याही भाषिक रंगभूमीला लाभला नाही. त्याची गोडी अवीट आहे. फास्टफूडच्या जमान्यात कितीही इंन्स्टंट पदार्थ आले, तरी पुरणपोळीची गोडी जशी वेगळीच आहे, तसंच काहीसं संगीत नाटकाचं आहे. म्हणूनच सव्वाशे वर्षांची ही संगीत नाटकांची परंपरा जपण्याचे प्रयत्न वेळोवेळी होत असतात.... ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत त्यांनी लिहिलेल्या ‘सूर माझे सोबती’ या २१व्या शतकातील संगीत नाटकाबद्दल... 
...........................................
याआधीच्या संगीत नाटकाविषयीच्या लेखात मी संगीत नाटकाबद्दल भरभरून लिहिलं होतं. या संगीत नाटकाच्या परंपरेत माझाही खारीचा वाटा, म्हणून एका नव्या संगीत नाटकाची मी निर्मिती केली. त्याबद्दल आज मला सांगायला आवडेल. 

संगीत नाटक हे आजही नाट्यरसिकांना तितकंच आवडू शकतं. मात्र कालानुसार त्याच्या स्वरूपात बदल होत राहिले पाहिजेत. नव्या पिढीला आपले वाटतील, असे नाट्यविषय, त्यातील संगीताचं स्वरूप, आजकालच्या धावपळीच्या जीवनात सर्वांना रुचेल असा नाटकाचा कालावधी, तरूण कलाकारांचा सहभाग याबाबत योग्य विचार व्हायला हवा, असं मला नेहमी वाटतं. म्हणूनच या सर्व गोष्टींचा विचार करून, मी ‘सूर माझे सोबती’ या नव्या नाटकाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. असं आजच्या जीवनशैलीचं भान ठेवून सादर केलेलं नाटक आजच्या तरुणांना बघायला आवडतं, असं मी स्वानुभवानं म्हणू शकते. तरुणांनी तरुणांसाठी सादर केलेलं, २१व्या शतकातील संगीत नाटक निर्मित करण्याचा माझा हा प्रयत्न यशस्वीही झाला. 

हा प्रयत्न यशस्वी झाला असं मी म्हणू शकते, कारण संगीत रंगभूमीच्या ८० वर्षांच्या घडामोडींचे साक्षीदार, सुप्रसिद्ध ऑर्गनवादक पं. तुळशीदास बोरकर यांच्याकडून मला लेखन, संगीत, माझी भूमिका आणि निर्मितीचा हा प्रयत्न यांबद्दल शाबासकी मिळाली. बोरीवलीच्या आमच्या पहिल्या प्रयोगाला ते आशीर्वाद द्यायला उपस्थित होते, हे माझं भाग्य. १९७९मध्ये मी सुभद्रेची भूमिका केलेल्या ‘संगीत सौभद्र’च्या प्रयोगांना बोरकर यांची ऑर्गनसाथ लाभली होती. तेव्हापासून माझ्या संगीत क्षेत्रातील कामावर त्यांचं लक्ष होतं आणि त्यांच्याकडून मला वेळोवेळी प्रोत्साहनही मिळत होतं. मला आशीर्वाद म्हणून लाभलेला या नाटकाबद्दलचा त्यांचा लेखी अभिप्राय पुढील लेखात मी नक्कीच मांडेन.

लहानपणापासून आजपर्यंत घेतलेल्या विविध अनुभवांवरून, माझ्या संगीत नाटकाविषयीच्या जाणीवा प्रगत होत गेल्या. त्यामुळे मी जेव्हा ‘सूर माझे सोबती’ हे नवीन संगीत नाटक लिहिलं, तेव्हा मला त्यांत नक्की काय मांडायचंय हे मनात स्पष्ट होतं. नाटकाचा कथाविषय आजच्या तरुणांच्या जीवनशैलीशी निगडीत होता. त्यातील संघर्ष हा आजच्या तरुणांच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेला होता. मनात एक विषय खूप दिवस घोळत होता. त्यामुळे प्रत्यक्ष लिहायला घेतल्यावर, चार दिवसांत संपूर्ण नाटक लिहून झालं. तसा नाट्यलेखनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न असला, तरी याआधी ‘संगीत ओंकार’ नाटकाची रंगावृत्ती लिहिली असल्यानं, नाटकाच्या आकृतीबंधाबद्दल समज आली होती. दिग्दर्शक संजीव पंडित यांच्या नाटक बसवण्याच्या सहजसुंदर शैलीची ओळख झाली होती. त्यामुळे हे नाटक लिहिणं सोपं गेलं. 

माझ्या काही मैत्रिणींच्या बाबतीत, लग्नानंतर त्यांचं तंबोरा वाजवणं बंद झाल्याचं मी पाहिलं होतं. लहानपणापासून आवडीनं जोपासलेली कला अशी अचानक सोडून द्यायची, याचं दु:ख किती होत असेल याची कल्पना मी करू शकत होते. खरं तर लग्नानंतरच्या सहजीवनात, दोघांनीही आपल्या जोडीदाराच्या करिअरला प्रोत्साहन दिलं पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. पूर्वीपासूनच सहजीवनाबद्दलचे माझे विचार ठाम होते, जे मी प्रत्यक्षातही अनुभवले. माझ्या जीवन साथीदारानं माझं कलाजीवन खुलवलं होतं, पण असा पाठिंबा नाही मिळाला, तर काय होतं, हे मला नाटकातून मांडायचं होतं. तसंच जीवनात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन (पॉझिटिव्ह ॲटिट्यूड) असावा हा माझा विचार मी आचरणात आणला होता. येईल त्या परिस्थितीतून सामोपचारानं मार्ग कसा काढावा लागतो, नाती तुटेपर्यंत न ताणता कशी सांभाळावी लागतात, सांभाळता येतात याबाबतचे विचार मी या नाटकातून मांडले. 

नाटकाला संगीत देताना मी रागदारीचा आधार जरूर घेतला. पण विविध गीतप्रकारांचाही उपयोग केला. शास्त्रीय संगीतावर आधारित पारंपरिक नाट्यपदं केली. त्याचप्रमाणे एका प्रवेशात मी माझ्या स्वत:च्या बंदिशीही वापरल्या. रागदारी संगीताच्या बंदिशी जर अर्थपूर्ण असतील आणि जर ते शब्द रसिकांपर्यंत पोहोचतील अशा रीतीनं गायले गेले, तर रागदारी संगीत ऐकायची सवय नसलेल्यांनाही ते आवडतं, यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे नाटकातील पाच तरूण कलाकार, फक्त रागदारी बंदिशीतून आपल्या मनातले भाव व्यक्त करत एकमेकांशी संवाद साधतात, तो प्रवेश नाटकाचा हायलाईट ठरला होता. नाटकात भावगीत, भक्तीगीत या ढंगाचीही पदं होती. 

संगीत क्षेत्रात करिअर करणाऱ्या कलाकारानं, आपल्या गायन कार्यक्रमाइतकंच, संगीत शिकवण्यालाही महत्त्व द्यावं, असं मला नेहमी वाटतं. संगीत क्षेत्रातील गुरू जर स्वत: परफॉर्मिंग आर्टिस्ट असेल, तर तो शिष्याला सादरीकरणाची कलात्मक नजर देऊ शकतो. असे तरूण शिष्य तयार करणं ही महत्त्वाची गोष्ट असते. हा विचारही मी या नाटकात आग्रहानं मांडला.

नायिकेची भूमिका करणारी कलाकार रागेश्री आगाशे-कुळकर्णी ही तयारीची गायिका होती. शास्त्रीय संगीताबरोबरच सुगम गायनाचीही तिला चांगली समज होती. संगीत नाटकांतून भूमिका करण्याचा अनुभव गाठीशी होता. तिच्याबरोबरच आणखी चार कलाकार गाणारे होते. सर्व माझे तरुण शिष्य होते. माझ्या गायन शैलीची छाप त्यांच्यावर होती. त्यामुळे माझ्या चाली त्यांनी उत्तम रीतीनं रसिकांपर्यंत पोहोचवल्या.

नायकाची गद्य भूमिका माझ्या मुलानं, राहून पेठेनं उत्तम साकारली. त्यालाही नाटकांतून भूमिका करण्याचा अनुभव होता. दिग्दर्शक संजीव पंडित यांच्या दिग्दर्शनाखाली त्यानं नाटक, एकांकिका यातून भूमिका केल्या होत्या. त्यामुळे संगीत आणि नाट्य या दोन्हींचा तोल चांगला सांभाळला गेला. याचं श्रेय दिग्दर्शक संजीव पंडित यांना द्यायला हवं. या आधी केलेल्या संगीत ओंकार नाटकापासून आमचं ट्युनिंग छान जमलं होतं. तरुण कलाकारांकडून सहजतेनं काम करून घेण्यात त्यांचा हातखंडा. नेपथ्याचा सुंदर उपयोग करून घेत, ते निरनिराळ्या फ्रेम्स सुंदरतेनं वापरायचे. त्यातून याही नाटकात आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, गाणाऱ्या कलाकारांसाठी लेपल माईक्स वापरल्यामुळे, कलाकारांचा गाताना रंगमंचावरचा वावर अधिक सहज झाला. 

नाटक निर्मिती व्यावसायिक दर्जाची करण्याचं ठरवलं असल्यानं, प्रसाद वालावलकर यांच्याकडून नाटकासाठी खास नवीन सेट बनवून घेतला होता. त्यामुळे नाटकाला एक प्रसन्न, फ्रेश लूक लाभला. सर्व कलाकार, दिग्दर्शक, साथीदार यांनी अत्यंत प्रमाणिकपणे साथ दिली. चार महिने कसून तालीम केली. त्यामुळे पहिल्या प्रयोगापासूनच नाटकात कमालीची रंगत आली. काटेकोरपणे वेळेवर प्रयोग सुरू होऊन, तो वेळेत संपायचा.   

खरी कसरत सुरू झाली, ती निर्मितीनंतर.. नाटक रसिकांपर्यंत पोहोचवण्याची. निर्माती म्हणून या क्षेत्रात मी अगदीच नवीन होते. त्या अनुभवांबद्दल आणि नाटकाच्या एकूण कथानकाबद्दल पुढच्या भागांत बोलू या. या नाटकाच्या यशात सहभागी असलेल्या सर्व कलाकारांचा उल्लेख होणे आवश्यक आहे. सुमधुरा निर्मित नवीन संगीत नाटक – ‘सूर माझे सोबती’
लेखिका : मधुवंती पेठे
दिग्दर्शक : संजीव पंडित
संगीत : मधुवंती पेठे
पार्श्वसंगीत : जसराज शिंत्रे
नेपथ्य : प्रसाद वालावलकर
कलाकार : राहूल पेठे, मधुवंती पेठे, सुमुख कासार्ले, पूर्वा म्हात्रे, ओंकार पाटील, पूजा नाचणकर, रक्षा शेट्टी आणि रागेश्री आगाशे कुळकर्णी
संगीत साथ : अमोल जोशी, मेघन आंगणे
निर्मिती सूत्रधार - सुहास पेठे

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZPHCB
 Khoop chan lekh, Madhivanti Pethe..1
 नवनवोन्मेश शालिनी प्रज्ञा प्रतिभा मता या उक्तीच मूर्तिमंत स्वरूप म्हणजे श्रीमती मधुवन्ति पेठे . सातत्याने नवनवीन निर्मिती त्या करीत असतात ! ही निर्मितिहि अप्रतीम !1
Similar Posts
‘सूर माझे सोबती’ नाटकाबद्दल आणखी काही... ‘सव्वाशे वर्षांची संगीत नाटकांची परंपरा जपण्याचे प्रयत्न वेळोवेळी होत असतात. यामधील माझा खारीचा वाटा म्हणून ‘सूर माझे सोबती’ या नव्या संगीत नाटकाची मी निर्मिती केली. या नाटकाला सुप्रसिद्ध गायिका फैयाज आणि ज्येष्ठ ऑर्गनवादक पं. तुळशीदास बोरकर यांचा आशीर्वाद लाभला.....’‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती
नाट्यसंगीत : नाट्य आणि संगीत यांचा समतोल पूर्वी संगीत ऐकण्याची इतर कोणती माध्यमं उपलब्ध नसताना रसिक केवळ संगीत ऐकण्यासाठी नाटकाला येत असत, त्यामुळे लांबलेल्या पदांसहित सहा-सहा तास नाटकं चालायची, मात्र आता संगीत आणि नाट्य यांचा समतोल राखला गेला नाही, तर ते आताच्या नाट्यरसिकांना आवडत नाही. त्यामुळे या गोष्टीचं भान ठेवूनच प्रयोग सादर केला गेला पाहिजे
संगीत नाटक आणि नाट्यसंगीत संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हा एकूणच संगीत रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि मराठी रंगभूमीचं एकमेवाद्वितीय असं वैशिष्ट्य. या नाट्यसंगीतात अशी काय जादू आहे, जिच्यामुळे शंभर वर्षांनंतरही त्याची मोहिनी कायम आहे, याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न... ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत संगीत नाटक आणि नाट्यसंगीताबद्दल
उपशास्त्रीय संगीत : ठुमरी भारतीय संगीतात धृपद-धमार गायकी, शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत अशा निरनिराळ्या गटांत विभागले गेलेले अनेक गीतप्रकार प्रचलित आहेत. यापैकी शास्त्रीय संगीत (क्लासिकल) म्हणजेच विलंबित ख्याल -द्रुत ख्याल (बडा ख्याल - छोटा ख्याल) यांबद्दल आपण जाणून घेतलं. ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत उपशास्त्रीय संगीताबद्दल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language