‘सहकुटुंब सहपरिवार’ ही नवी मालिका ‘स्टार प्रवाह’वर २४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. विभक्त कुटुंबपद्धतीच्या आजच्या युगात एकत्र कुटुंबपद्धतीचं महत्त्व या मालिकेतून दाखवले जाणार आहे. सुनील बर्वे आणि नंदिता पाटकर या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या मालिकेतील भूमिकेविषयी अभिनेत्री नंदिता पाटकर यांच्याशी साधलेला हा खास संवाद.............
- ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेच्या प्रोमोजनी सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेत तुम्ही साकारत असलेली वहिनी नेमकी कशी आहे?
- या मालिकेत मी सरिता ही व्यक्तिरेखा साकारते आहे. दीरांना मुलांप्रमाणे जपणारी आणि संपूर्ण कुटुंब प्रेमाने बांधून ठेवणारी अशी ही वहिनी आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही नावाप्रमाणेच एका कुटुंबाची गोष्ट आहे. मालिकेचा विषय खूप छान आहे. त्यामुळे मालिकाविश्वात कमबॅक करायचा विचार मनात आला, तेव्हा यापेक्षा चांगला रोल असूच शकत नाही हे मी मनाशी पक्कं ठरवलं आणि तातडीने होकार दिला. साताऱ्यातल्या भुईंज गावातलं हे एक कुटुंब आहे. दादा, वहिनी आई आणि तीन भावंडं असं हे हसतं खेळतं कुटुंब आहे. कितीही कठीण प्रसंग आले, तरी त्याचा मिळून सामना करणारं असं हे कुटुंब. नंतर कुटुंब जसं वाढत जातं, नवी माणसं कुटुंबात यायला लागतात, त्यानंतर नेमकं काय घडतं याची गोष्ट मालिकेत पाहायला मिळेल.
- सुनील बर्वेंसोबत तुम्ही पहिल्यांदाच काम करत आहात. त्याविषयी काय सांगाल?
- मी सुनीलदादाची खूप मोठी चाहती आहे आणि ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेच्या निमित्ताने एकत्र काम करण्याची संधी मिळते आहे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. सुनीलदादा कमाल आहे. समोरच्या कलाकाराला तो खूप कम्फर्टेबल करतो. त्यामुळेच आमचे सीन खूप छान होतात. मला वाटतं सहकलाकारासोबत उत्तम केमिस्ट्री असली, की ते सीन्स खूप खरे वाटतात. सुनीलदादाची ही खासियत आहे मला खूप भावते.
- सिनेमा आणि टीव्ही यामध्ये नेमका काय फरक जाणवतो?
- दोन्ही माध्यमं खूप वेगळी आहेत. त्यामुळे फरक नक्कीच आहे. सिनेमाप्रमाणेच टेलिव्हिजन हेही अत्यंत प्रभावी माध्यम आहे. दिवसभर कामात बिझी असणाऱ्या गृहिणींचं विश्व संध्याकाळ झाली की बदलतं. टीव्हीचा रिमोट हातात आला, की टेलिव्हिजन हेच त्यांचं विश्व होऊन जातं. मला वाटतं टेलिव्हिजनमुळे तुम्ही प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचता. प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग होता. त्यामुळे सिनेमा आणि टीव्ही ही दोन्ही माध्यमं मला तितकीच आव्हानात्मक वाटतात.
- मालिकेतल्या तुमच्या लूकविषयी काय सांगाल?
- सरिता वहिनीचा साधेपणा तिच्या लूकमधूनही दिसून येतो. सर्वसामान्य गृहिणीप्रमाणेच रोजच्या वापरातल्या साड्या, वेणी आणि कपाळावरचं हळदी-कुंकू हेच सरिताच्या लूकचं वेगळेपण आहे. सरिता तुम्हाला तुमच्या घरातलीच वहिनी आणि सून नक्कीच वाटेल. २४ तारखेपासून सायंकाळी सात वाजता आम्ही तुम्हाला ‘सहकुटुंब सहपरिवार’ दररोज भेटायला येणार आहोत.