आता आपण कधीच पूर्वीसारखे छान बोलू शकणार नाही, अशी भीती त्याच्या मनात बसली. हा नकारात्मक विचार त्याच्या मनात इतका पक्का बसला, की त्याने, आपण छान बोलू शकतो हा विश्वासच गमावला. एका वाक्याने त्याच्या मनात अनेक नकारात्मक विचार पेरले गेले... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या नकारात्मक विचारांचा मुलांवर होणाऱ्या परिणामाबद्दल.... ...............................
आठवीमध्ये शिकणाऱ्या समरला सोबत घेऊन त्याची आई एक दिवस भेटायला आली. आल्यावर त्यांनी प्रथम स्वतःची व नंतर समरची ओळख करून दिली. समर आठवीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी. तो इंग्रजी माध्यमात शिकत असला, तरी मराठी भाषेवर त्याचे प्रभुत्व होते. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धांमध्ये तो नेहमीच शाळेचे प्रतिनिधित्व करायचा आणि उत्तम यश मिळवायचा. पाचवीमध्ये असल्यापासून त्याने विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आतापर्यंत शाळेला चार-पाच बक्षिसं मिळवून दिली होती. त्यामुळे आता शाळेत वक्तृत्व स्पर्धा म्हटलं की समर हे समीकरणचं होऊन गेलं होतं.
यंदाही आंतरशालेय स्पर्धेच्या विषयाची समरने उत्तम तयारी केली होती. सर्वांनाच त्याचे भाषण फार आवडले होते. त्यामुळे तो ही उत्साहाने स्पर्धेची वाट पाहत होता. स्पर्धेचा दिवस आला खरा, पण त्याच्या दोन दिवस आधी समरला अचानक खूप ताप आला. त्यामुळे तो अगदी थकून गेला. शरीरात ताकदच उरली नाही. डॉक्टरांनी त्याला पूर्णपणे विश्रांती घ्यायला सांगितली होती, पण स्पर्धेची तयारी चांगली झाली असल्याने त्याला स्वस्थ बसवेना. घरच्यांनी खूप समजावलं पण समर ऐकेचना. त्याने बाबांकडे स्पर्धेला घेऊन जाण्याचा हट्टच धरला. त्यामुळे नाईलाजाने बाबा त्याला घेऊन स्पर्धेला गेले.
तिथे स्पर्धेसाठी समर उभा राहिला खरा, पण ताप आणि अशक्तपणा यामुळे तो नेहमीसारखे भाषण करू शकला नाही. शिवाय भाषणातला शेवटचा काही भाग त्याला तिथे आठवलाच नाही. या सगळ्या प्रकारामुळे त्याची आणि शाळेची निराशा झाली. त्या स्पर्धेसाठी ज्या शिक्षकांनी त्याची तयारी करून घेतली होती, ते शिक्षक स्वभावाने जरा तापट होते. त्यामुळे बरा झाल्यावर समर जेव्हा शाळेत गेला, तेव्हा त्या शिक्षकांनी त्याला भेटायला बोलावले आणि ते त्याला बरंच रागावले.
समरने हे सगळं घरी सांगितलं, पण त्या दिवसापासून समर एकदम गप्प-गप्प झाला. कोणाशीही विशेष बोलेनासा झाला. काही सांगेनासा झाला. त्याच्या मित्रांना विचारलं, तर वर्गातही तो तसाच वागायला लागला होता. पूर्वी वर्गात विचारलेल्या प्रश्नांची तो छान उत्तरं द्यायचा, पण आता मात्र हात वरच करत नाही. शिक्षकांनी काही विचारलं की घाबरून जातो. त्याच्या आई-वडिलांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग होईना. म्हणून आई त्याला भेटायला घेऊन आली.
हे सगळं ऐकल्यावर आईला थोड्या वेळासाठी बाहेर जाण्यास सांगितले व समरसोबत संवाद साधायला सुरूवात केली. ओळख नसल्यामुळे अर्थातच तो सुरुवातीला फारसं काही बोलला नाही. पण संवाद हळूहळू वाढल्यावर तो मोकळा झाला आणि त्याच्या बदललेल्या वागण्यामागचं कारण समोर आलं. ज्या दिवशी शिक्षकांनी त्याला बोलावलं आणि ते त्याला रागावले, तेव्हा, ‘आता तुला कधीच स्पर्धेसाठी घेणार नाही’, असं ते म्हणाले. या एका वाक्याने समर खूप अस्वस्थ झाला. आपल्याकडची मोठी जबाबदारी आपण आपल्या चुकीमुळे गमावली. आता आपण कधीच पूर्वीसारखे छान बोलू शकणार नाही, अशी भीती त्याच्या मनात बसली. हा नकारात्मक विचार त्याच्या मनात इतका पक्का बसला, की त्याने, आपण छान बोलू शकतो हा विश्वासच गमावला. इतका की वर्गात उत्तरं देण्याचीही त्याला भीती वाटायला लागली. या एका वाक्याने त्याच्या मनात अनेक नकारात्मक विचार पेरले गेले. आत्मविश्वास गमावल्यामुळे आणि नकारात्मक विचारांमुळे तो इतका अस्वस्थ झाला, की वास्तविक परिस्थिती, तो भाषण का विसरला, या आणि अशा अनेक गोष्टींचा तो विचारच करू शकत नव्हता. त्यामुळे त्याला शांत करून प्रथम वास्तव परिस्थितीची जाणीव करून दिली. असं का घडलं? आणि सर असं का म्हणाले असतील, यावर वास्तव परिस्थितीला धरून त्याला विचार करायला प्रोत्साहित केलं आणि नंतर त्याचा आत्मविश्वास परत येण्यासाठी त्याला विचारात कोणते व कसे बदल करायचे तेही सांगितलं.
या सांगितलेल्या उपायांना आणि धनात्मक विचार करण्याला समरने उत्तम प्रतिसाद दिला. त्याचा आत्मविश्वास परत आणण्यासाठी हे धनात्मक विचार खूप उपयुक्त ठरले. तो हळूहळू पूर्वीसारखा वर्गात उत्तरं द्यायला लागला. त्याच्या मनातली भीती हळूहळू कमी होत गेली. शाळेच्या मदतीने त्याला पुन्हा स्पर्धेची तयारी करायला सांगण्यात आले. सुरुवातीला तो थोडा घाबरला, पण नंतर त्याने या स्पर्धेची तयारी करण्याचा निर्णय घेतला आणि आता तो भाषणाची पूर्वीसारखीच तयारी करत असल्याचे त्याच्या आईने सांगितले.
- मानसी तांबे – चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com
(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)