Ad will apear here
Next
‘आमचा करोनामुक्तीचा अनुभव’


करोनाचे संकट आता अगदी आपल्या दारापर्यंत आले आहे आणि काही जणांच्या घरात ते येऊनही गेले असेल. तीव्र लक्षणे नसतील, तर होम क्वारंटाइन राहून आणि डॉक्टरी सल्ल्याचे पूर्ण पालन करून या संकटातून सहीसलामत बाहेर पडता येते. घाबरून न जाता केवळ पाळायला हवा तो संयम. ही गोष्ट आहे पुण्यातील अशाच एका दाम्पत्याची, ज्यांचा दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह; पण होम क्वारंटाइन, नव्हे नव्हे, अक्षरशः रूम क्वारंटाइन राहून त्यांनी या संकटावर मात केली आहे. त्यांचे शेजारी, कार्यालयीन सहकारी आणि त्यांचा मुलगा अशा सर्वांनीच त्यांना उत्तम सहकार्य केले. त्याची ही गोष्ट...
........
२२ जुलै २०२०. आज आमच्या क्वारंटाइनचा शेवटचा दिवस! १७ दिवस एका खोलीत काढले. खरं सांगू... सोप्पं नव्हतं बिलकुल. मला थोडा क्लॉस्ट्रोफोबियाचा त्रास होतो. म्हणजे बंद जागेत घुसमटल्यासारखं होतं; मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे परिस्थितीप्रमाणे स्वतःला बदलणं हा माणसाचा एक उत्तम गुणधर्म आहे!

२८ जूनला केतनला थोडा ताप आला आणि तो थोडा खोकत होता. मग आम्ही स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेचा विचार करून क्वारंटाइन व्हायचे ठरवले. दोन दिवसांनी आमच्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी औषधे दिली. केतनला दोन डोसनंतरच बरे वाटायला लागले. आणखी दोन दिवसांनी केतन आणि माझी वास येण्याची क्षमता गेली. त्यामुळे आम्ही ठरवले, की आता कोविडची चाचणी करायची.

चार जुलै रोजी आम्ही तिघांनी कोविडची चाचणी करून घेतली. सहा जुलैला पक्के झाले, की मी आणि केतन पॉझिटिव्ह आहोत आणि नाद निगेटिव्ह. अगदी कोणालाही वाटेल तसं मलाही ‘धस्स’ झालं; मात्र संजयशी (संजय भंडारे, केतनचा मित्र, जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सच्चा कार्यकर्ता आहे) बोलल्यावर मला खूपच बरे वाटले. त्याने आमची खूप उत्तम सोय केली (अगदी चाचणीपासून क्वारंटाइन होईपर्यंत सर्वच!) आणि त्यानंतरही त्याचे फोन चालूच होते. तो प्रत्यक्ष कोविड संबंधित कामांमध्ये कार्यरत असल्यामुळे संजयचा शब्द माझ्यासाठी परवलीचा शब्द होता!

आम्ही सोसायटीमध्ये लगेचच आमच्या चाचणीच्या निकालाबद्दल सांगितले. सर्वांनी खूप सकारात्मक दृष्टीने या गोष्टीचा स्वीकार केला. काळजीपोटी सर्वांनी आमची चौकशी केली. ‘लवकर बरे व्हा, आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत,’ अशा मेसेजेसचा अक्षरशः वर्षाव झाला आमच्यावर! आम्ही घरी पोहोचल्यावर आमच्या गाडीवर, सोसायटीमध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली. जिना आणि घराच्या व्हरांड्यातदेखील जंतुनाशक फवारले. सावधगिरी म्हणून आमच्या विंगमध्ये उर्वरित सभासदांनी लिफ्टचा वापर करण्याचे ठरवले. 

आता माझ्यापुढे सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न उभे होते. जसे की, स्वयंपाकपाण्याचे काय करायचे... नादचे काय करायचे... मग असे ठरवले, की रोज डबा मागवायचा. असा विचार करतच होतो, तेवढ्यात बिल्डिंगमधल्या मैत्रिणीचा मेसेज आला ‘मेघना, आज मी तुम्हा तिघांचा डबा देत आहे.’ लगेचच फोनपण आला ‘पुढचे १५ दिवस आम्हाला नाश्ता, जेवण सगळे दिले जाईल आणि आम्ही कोणतेही टेन्शन न घेता आराम करायचा आहे.’ त्यांनी आपापसांत चर्चा करून वेळापत्रकच ठरवले आणि मला कळवले. त्यानंतर कोणी फळे आणून दिली, कोणी इतर वस्तू आणून दिल्या. 

होम क्वारंटाइन व्हायला सांगितलेलं असल्यामुळे, आम्ही ठरवलं, की मी आणि केतन पॉझिटिव्ह असल्यामुळे आम्ही आमच्या खोलीतच राहू. सगळ्या सोयी असल्यामुळे खोलीतून बाहेर पडावं लागणार नव्हतं. नाद (वय १७ वर्षे) निगेटिव्ह असल्यामुळे तो घरातल्या बाकीच्या खोल्या मुक्तपणे वापरू शकेल. आणि त्याप्रमाणे आम्ही दोघं १७ दिवस आमच्या खोलीमध्ये आयसोलेटेड (वेगळे) होतो. अगदी नादशीही आम्ही व्हिडिओ कॉलवर बोलत होतो. तो पाणी, चहा, खाणे सगळे खोलीच्या दरवाज्याच्या बाहेर ठेवायचा आणि नंतर आम्ही दार उघडून ते घ्यायचो. आमची भांडी, कपडे आम्हीच धुवत होतो. त्यामुळे १७ दिवस खोलीच्या बाहेरील जगाशी आमचा संपर्क पूर्णपणे बंद होता. आम्ही दिवसातून दोनदा ऑक्सिमीटरद्वारे रक्तातील ऑक्सिजन, तसेच बीपी, तापमान असे सगळे नोंद करून ठेवत होतो. मास्क वापरत होतो. भरपूर पाणी पीत होतो आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पूर्णपणे पालन करत होतो.

रोज सकाळी गरम गरम नाश्ता, दुपारचे चविष्ट जेवण, मधला खाऊ, रात्रीचे जेवण असे सगळ्यांनी आमचे खूप लाड केले. नादच्या मित्रमैत्रिणींनी त्याच्यासाठी निरनिराळे पदार्थ करून पाठवले. काही काका-काकूंनी आम्हाला सरप्राइज पदार्थ व खाऊ करून पाठवला. शिवाय सगळ्यांचे रोज चौकशीचे फोन चालूच होते. ‘नादला आमच्याकडे राहायला पाठवा’ असे निरोपही आले; पण तो आमचा केअरटेकर असल्याने आम्हाला तसे करता आले नाही. आमची काही कागदपत्रे पोस्टात आली आहेत, असे सांगितल्यावर आमच्या खाली राहणाऱ्या काकूंनी लगेच पोस्टात जाऊन ती आणून दिली. 

हा सर्व अनुभव आम्हाला खूपच सुखावून गेला. म्हणजे आमच्या मनातील कोविडचे विचार कुठल्या कुठे पळून गेले. तसा आम्हाला फारसा काही त्रास होत नव्हता. केतनला थोडा खोकला होता, माझे डोके दोन दिवस खूप दुखले आणि आमच्या दोघांचीही वास घेण्याची क्षमता गेली होती; पण हळूहळू आम्ही पूर्वपदावर येत होतो. 

केतनने या काळात मलनिःसारण केंद्राचे (आमच्या एका साइटवर चालू असलेल्या कामाचे) मॉडेल तयार केले. अतिशय सुंदर, रेखीव आणि माहितीपूर्ण असे हे मॉडेल तयार झाले आहे. मी खूप सारी चित्रे रेखाटली. खूप गाणी ऐकली आणि कधी नव्हे ते आम्हाला खूप गप्पा मारता आल्या! या सगळ्या अनुभवानंतर मला सांगावेसे, बोलावेसे वाटले म्हणून लिहिण्याचा हा प्रपंच! 

आपण व्यावहारिक जगात वावरत असताना आपल्याला नानाविध प्रकारची माणसं भेटतात. काही चांगल्या, सुखावणाऱ्या, काही कष्टदायक, अनुभव देणाऱ्या अशा प्रसंगांतून आपण जात असतो. कळत-नकळत आपण प्रवाहाबरोबर चालत राहतो. मग अचानक उद्भवलेल्या अडचणींना सामोरं जाताना आपल्या लक्षात येतं, की या जगात चांगल्या माणसांची संख्या खूप जास्त आहे, ज्यामुळे माणुसकी टिकून आहे आणि म्हणूनच हे जग खूप सुंदर झालं आहे. 

या १७ दिवसांत स्वतःलाच नव्याने भेटण्याची संधी मिळाली. विचार आला, आपण सगळे पळतो आहोत. आपल्याला नक्की कुठे जायचे आहे? थोडा वेळ थांबून विचार करायलाही वेळ नाही आपल्याकडे! ऐश्वर्य, सुख म्हणजे नक्की काय... आपण कमावलेली माणसं हेच खरं ऐश्वर्य, आपल्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं आपल्या आजूबाजूला असणं म्हणजेच खरं सुख! आणि या बाबतीत आम्ही खूप श्रीमंत आहोत या गोष्टीचं आम्हाला खूप समाधान वाटलं. 

लक्षणं दिसताच स्वतःला क्वारंटाइन केल्यामुळे आणि वेळेत केलेल्या कोविड चाचणीमुळे आम्ही ऑफिस आणि सोसायटीमधील कोणाच्याही संपर्कात आलो नाही. त्यामुळे बाकी कोणालाही काही लक्षणं आढळली नाहीत.

स्वतःवर लक्ष ठेवणं, काही लक्षणं जाणवत असल्यास लगेच डॉक्टरांशी बोलणं, घाबरून न जाता सत्य परिस्थितीचा अतिशय सकारात्मकतेनं स्वीकार करणं, अशा काही गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. कारण औषधांइतकेच किंबहुना अधिकच, आपले विचार आपल्याला कोविडच्या या संकटात उपयोगी पडणार आहेत असं मला वाटतं.

मदत करताना अगदी कुटुंबीयांप्रमाणे प्रेमाने आमची काळजी घेणाऱ्या आमच्या सर्व मित्रमैत्रिणींच्या, काका-काकू आणि सहकाऱ्यांच्या कायम ऋणात राहायला आम्हाला आवडेल. म्हणून आभार नाही मानत; पण मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. कोविडबद्दलचे गैरसमज आणि भिती जाण्यासाठी अशाच सहकार्याची आणि साहचर्याची नितांत आवश्यकता आहे.  We are really very lucky and blessed to have you all in our life! आणि त्यासाठी देवाचे मनापासून आभार!!

Stay safe always!!

- मेघना दंताळे

(पौड रोड, कोथरूड, पुणे)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UYBMCO
Similar Posts
टोकियो ते पुणे - करोना काळातलं प्रवासवर्णन... बिनचेहऱ्याच्या योद्ध्यांचं दर्शन घडविणारं..! अतिशय द्विधा मनस्थितीत आम्ही जपान सोडलं. आता पुण्यात येऊन तीन दिवस झाले आणि भारतातल्या करोनाविरुद्धच्या लढाईचं जवळून दर्शन झालं. आपापल्या आरामदायी घरांच्या चार भिंतींत बसून जमिनीवर कुठे व किती प्रकारची लढाई चालू आहे ह्याची काहीच कल्पना येत नाही. आमच्या संपूर्ण प्रवासात आम्ही किती तरी करोना योद्धे जवळून पाहिले
करोना काळातही निर्भयपणे काम करणारे पुण्यातील ज्येष्ठ डॉक्टर दिलीप देवधर यांचे अनुभव माझ्यासारखा एक सामान्य फॅमिली डॉक्टर गेल्या चार महिन्यांपासून जे काही चालले आहे हे चुकीचे चालले आहे, हे सातत्याने सांगत आहे; पण इपिडेमिक अॅक्टप्रमाणे आम्ही डॉक्टर सरकारच्या निर्णयाविरुद्ध बोलू शकत नाही. म्हणून आपण आपल्या अनुभवाप्रमाणे व ‘प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन’च्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आचरणात आणायचे ठरविले
... आणि मी करोनामुक्त झाले; एका बँक कर्मचाऱ्याचा अनुभव मी एक बँक कर्मचारी. पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे स्थायिक! सगळीकडेच करोनामुळे भीतिदायक वातावरण, लॉकडाउनमुळे सगळेच घरात बंद; फक्त जीवनावश्यक गोष्टींसाठी लोक बाहेर पडत होते, कुटुंबासोबत वेळ घालवत होते, वेगवेगळ्या रेसिपी करत होते; तरीही त्यांच्या मनात प्रचंड भीती! आम्ही मात्र आमच्या कामासाठी रोज बाहेर पडत होतो
जीवनदान मिळाले, यापेक्षा दुसरा आनंद कोणता!; पुण्यातील करोनामुक्त कुटुंबाच्या भावना पुणे : ‘करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आम्ही भयभीत झालो होतो. जेव्हा आमची चाचणी करण्यात आली, तेव्हा अख्खे कुटुंब पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाले. आमचं कसं होणार, आयुष्याचं काही खरं नाही, अशी चिंता लागली होती. परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे आम्ही बरे झालो,’ अशी भावना पुणे स्टेशन परिसरातील एका कुटुंबाने व्यक्त केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language