पुणे : ‘डाउन सिंड्रोमवर मात करून, नृत्यासारखी कठीण कला आत्मसात करून आत्मविश्वासाने सर्वांसमोर सादर करणारी, सायली नुसतीच ‘अमेझिंग चाइल्ड’ नाही, तर ‘एक्स्ट्रा ऑर्डिनरी अमेझिंग चाइल्ड’ आहे. तिच्या प्रतिभेने मी थक्क झालो आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी सायली अगावणे हिचे कौतुक केले.
सायलीच्या वाटचालीबद्दल सांगणारे ‘अमेझिंग चाइल्ड सायली, एक सत्यकथा’ या पुस्तकाचे सोमवारी (२६ फेब्रुवारी) रोजी पुण्यात गोखले यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते. हे पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले असून, ‘बुकगंगा डॉट कॉम’ने त्याचे ई-बुक प्रकाशित केले आहे.
या कार्यक्रमाला कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या देवयानी अभ्यंकर, ‘बुकगंगा डॉट कॉम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, सायलीसह तिचे आई-वडील मनीषा आणि नंदकिशोर अगावणे, तिच्या नृत्यगुरू आणि रूपक विद्यालयाच्या संचालिका मंजिरी कारूळकर, पुस्तकाचे शब्दांकन करणाऱ्या शशिकला उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
विक्रम गोखले म्हणाले, ‘आपल्या शारीरिक, बौद्धिक कमतरतेवर मात करून सायली हिमालयाएवढी उंच झाली आहे. तिच्याकडे मान उंच करून बघावे, इतकी ती मोठी झाली आहे. तिच्यासाठी कोणतीही मदत करायला मी तयार आहे. ती निरोगी राहील, याची काळजी मात्र घ्या.’
‘डाउन सिंड्रोम असणारे मूल सांभाळताना, वाढवताना, त्याला काय येत नाही, याचा विचार न करता, त्याला काय येते, याचा विचार करून ते कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करणे, यासाठी आपले आयुष्य उधळून टाकणारे तिचे आई-वडीलही विलक्षण आहेत. तिची बहीण जुईली हिचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे. आपले आई, वडील, बहीण एवढा खटाटोप कशासाठी करत आहेत, याची जाण असणारी सायली आणि तिचे कुटुंबीय विलक्षण आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी सायलीच्या कुटुंबाचे कौतुक केले.
‘मला या पुस्तक प्रकाशनासाठी बोलावले याने मीच उपकृत झालो आहे. सायलीचे हे पुस्तक सर्वांना प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचेल यासाठी मी प्रयत्न करीन,’ असेही गोखले यांनी सांगितले.
‘वाचन संस्कृती टिकवायची असेल, तर पुस्तके वाचणे खूप महत्त्वाचे ठरते. मानवी मनाचा अभ्यास करायचा असेल, तर वाचन अत्यंत महत्त्वाचे ठरते. चांगली पुस्तके देणारे प्रकाशक, प्रकाशन संस्था टिकल्या पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. मराठी टिकली पाहिजे असे नुसते म्हणून चालणार नाही, सर्वांनी मराठी पुस्तके वाचली पाहिजेत,’ असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
सायलीच्या आई-वडिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. ‘सायलीमुळेच एक सकारात्मक आयुष्य जगण्याचे कारण मिळाले, सायलीच माझा आधार आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मंदार जोगळेकर म्हणाले, ‘वाचन संस्कृती संपत चालली आहे अशी ओरड आजकाल केली जाते; पण लोकांपर्यंत चांगली पुस्तके पोहोचत नाहीत, हेही वास्तव आहे. चांगले मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने ‘बुकगंगा’ची स्थापना केली. तो उद्देश साध्य करण्याकरिता चांगली पुस्तके वाचकांना देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. आजची पिढी वाचत नाही, तर त्यांना ऑडिओ बुकचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ई-बुकमुळे चांगले साहित्य सहजपणे लोकांपर्यंत पोहोचू शकते. सायलीच्या या पुस्तकामुळे एक चांगले पुस्तक ई-बुकच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली आहे.’
या पुस्तकाचे ऑडिओ बुक करण्याची इच्छाही जोगळेकर यांनी प्रदर्शित केली; तसेच या पुस्तकाचे इतर भाषांमध्ये अनुवाद व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘व्यंगावर मात करून पुढे कसे जायचे, डाउन सिंड्रोम असलेल्या मुलांचे आयुष्य कसे घडवायचे, हे या पुस्तकातून समजते. अशा मुलांचे पालक, कुटुंबीय, शिक्षक या सर्वांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. म्हणून हे पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला,’ असे देवयानी अभ्यंकर यांनी सांगितले.
सायलीच्या नृत्यगुरू मंजिरी कारूळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सायली गेली १७ वर्षे त्यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेत आहे. सुरुवातीला तिला शिकवण्यास फारशा उत्सुक नसणाऱ्या मंजिरीताईंचा आणि सायलीचा सहप्रवास गेली १७-१८ वर्षे अथक सुरू आहे. आज सायली स्वतः नृत्य बसवते. तिच्या आजच्या यशाबद्दल गुरू म्हणून खूप कौतुक आणि अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या वेळी अगावणे कुटुंबीयांच्या वतीने विक्रम गोखले, मंदार जोगळेकर, देवयानी अभ्यंकर, शशिकला उपाध्ये यांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले. आभारप्रदर्शन जुईली अगावणे यांनी केले.
(‘अमेझिंग चाइल्ड सायली’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी किंवा ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
(सायलीने या कार्यक्रमावेळी सादर केलेल्या नृत्याची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत. तसेच मराठी भाषा दिनाच्या औचित्याने विक्रम गोखले यांनी व्यक्त केलेल्या मनोगताचा व्हिडिओही देत आहोत.)