Ad will apear here
Next
नाट्यसंजीवनी : भाग तिसरा (ऑडिओसह)
संगीत घन अमृताचा या नाटकातील एक दृश्य

रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा तिसरा भाग...
.......
नमस्कार. नवीन ऊर्जा देणाऱ्या नाट्यगीतांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचताना खूप आनंद होत आहे. ऊर्जा हा शब्दप्रयोग माझा नाही. खल्वायन संस्थेच्या श्रीनिवास जोशी यांचा काल संदेश आला. ‘‘नाट्यसंजीवनी’द्वारे आम्हा सर्व नाट्यकर्मींना पुन्हा त्या काळात नेऊन त्याचा आनंद तर आपण देत आहातच; शिवाय या करोनाच्या निराशाजनक वातावरणात, आमच्यातील नाट्यऊर्जा आपण जागृत ठेवीत आहात!’ अशा शब्दांत त्याचा संदेश मलाही सकारात्मक ऊर्जा देऊन गेला. 

आजपासून रत्नागिरीतील आणखी काही कलाकारांनी गायलेली माझी काही नाट्यगीते सादर करणार आहे. ‘स्वरयात्री’च्या तुफान पडझडीनंतर आणि प्रचंड अपयशानंतर, संगीत नाट्यलेखन संन्यास घेण्याचा निश्चय मी केव्हाच केला होता. मूलतः कथा, कादंबरी, कविता हेच माझे विश्व असल्याने त्यातच गुंतून राहायचे ठरवले होते. 

याच काळात ‘खल्वायन’चे सदस्य ‘स्वरयात्री’चे प्रयोग नेटाने करीत होते. त्यांना त्यात आनंद मिळत होता. ते कथानकात, गाण्यात रमत होते. अर्थात जास्त प्रयोग नाही झाले म्हणा. स्पर्धेच्या नाटकांचे हेच भागधेय असते. स्पर्धेच्या नाटकांचे आयुष्य फार अल्प असते. हा महाराष्ट्रातील सार्वत्रिक अनुभव आहे. मग ते गद्य नाटक असो वा संगीत, जास्तीत जास्त पाच ते दहा प्रयोगांपर्यंत मजल जाते. तोपर्यंत पुढच्या वर्षीची स्पर्धा खुणावू लागते. 

अर्थात माझ्या काही नाटकांनी चाळीस, पन्नास प्रयोगांचा टप्पा ओलांडला, तो भाग वेगळा. अन्यथा दोन अंकी संख्या गाठली की आनंदाने बेहोष होण्यासारखी परिस्थिती. 

... तर माझ्या संगीत नाट्यलेखन संन्यासाबद्दल सांगत होतो. स्पर्धेत झालेली पडझड आणि अपयश यामुळे निराशा आलीच होती; पण त्याहीपेक्षा वेगळी स्थिती मी अनुभवत होतो. 

माझी एक सवय आहे. मी लिहिलेल्या नाटकाचा प्रयोग सुरू असताना प्रेक्षकांत जाऊन बसायचे आणि ते नाटक पाहायचे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अनुभवायच्या आणि त्यातून आत्मबोध घ्यायचा. 

‘स्वरयात्री’चा एक प्रयोग पाहत असताना, प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया ऐकत होतो, त्यामुळे खूपच अस्वस्थ व्हायला झाले. उगीच या नाटकाच्या फंदात पडलो, असे वाटू लागले. त्यामुळे ‘खल्वायन’च्या मित्रांना सांगून टाकले, ‘आता तुम्ही चांगला नाटककार निवडा, त्यासाठी शुभेच्छा.’ 

पण ते सगळे खूप जिद्दी होते. त्यांना अपयशाचा थोडा-फार अनुभव होताच. त्यातून सावरून कसे उभे राहायचे हे त्यांना पक्के माहीत होते. त्यामुळे जवळपास पंधरा-वीस दिवस त्यांनी, मी पुन्हा लेखन करावे, म्हणून युक्तीप्रयुक्तीने किल्ला लढवला आणि अखेर मी लेखन संन्यासाचा विषय सोडून दिला. 

... आणि आकाराला आले नवीन संगीत नाटक, संगीत घन अमृताचा. 

त्याबद्दल पुन्हा लिहिणार आहेच; पण एक मात्र नक्की, अपयशाने खचून जायचे नसते, तर अपयशाच्या डोक्यावर पाय देऊन पुन्हा भरारी घ्यायची असते, हा बहुमोल अनुभव मला या निमित्ताने मिळाला. 

‘घन अमृताचा’ नाटकातील नांदी आणि आणखी एक पद अशी दोन गाणी आज सादर करीत आहे. 

‘अतुल विमल परि तेज जयाचे’ ही शंकरा आणि एका कडव्यासाठी तोडी रागात बांधलेली नांदी गायली आहे स्वतः संगीतकार विजय रानडे यांनी आणि सौ. प्राजक्ता लेले यांनी. ‘बरसे घन अमृताचा’ हे यमन कल्याण रागातील पद गायले आहे सौ. प्राजक्ता लेले यांनी. ऑर्गनसाथ आहे वरद सोहनी याची, तर तबलासाथ आहे केदार लिंगायत याची. 

ऐकू या नांदी आणि नाट्यगीत... 

- डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.

संपर्क : ९४२३८ ७५८०६

(नाट्यसंजीवनी या मालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://bit.ly/2XwoQN6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZDPCN
Similar Posts
नाट्यसंजीवनी : भाग दुसरा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा दुसरा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग पहिला (व्हिडिओसह) नवीन नाटक, नवीन कथानक, नवीन गाणी, नवीन संगीत अशा नावीन्याने भारलेल्या काळात रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी संगीत नाटकांच्या लेखनाकडे वळले आणि रत्नागिरीच्या ‘खल्वायन’ संस्थेनं त्यांची अनेक नाटकं संगीत रंगभूमीवर आणली. त्यातील काही नाटकांतील नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत
नाट्यसंजीवनी : भाग दहावा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा दहावा भाग...
नाट्यसंजीवनी : भाग पाचवा (ऑडिओसह) रत्नागिरीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांतील काही नाट्यपदे ‘नाट्यसंजीवनी’ या उपक्रमाद्वारे रसिकांसमोर सादर केली जात आहेत. त्या मैफलीचा हा पाचवा भाग...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language