पुणे : ‘‘पुलं’चा प्रत्यक्ष सहवास मला लाभला नसला, तरी त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून मी कायमच त्यांच्या सहवासात असतो. साहित्यातून पात्र उभे करण्याची ‘पुलं’ची शैली अवगत करून मी ती माझ्या अभिनयाद्वारे चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी यशस्वी ठरलो आहे. मी ‘पुलं’चा एकलव्य आहे. माझ्या आजपर्यंतच्या वाटचालीत ‘पुलं’च्या साहित्याचा सिंहाचा वाटा असून, ते माझ्यासाठी दैवत आहेत,’ अशा भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या.
पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुलं परिवाराच्या सहयोगाने, आशय सांस्कृतिक व स्क्वेअर वनने वर्षभर आयोजित केलेल्या ‘ग्लोबल पुलोत्सवा’चा समारोप सोहळा नुकताच झाला. त्या वेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पुलोत्सव जीवनगौरव आणि ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. त्या वेळी अशोक सराफ बोलत होते. पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि २५ हजार रुपये असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
या वेळी व्यासपीठावर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे क्षेत्रीय प्रबंधक सुशील जाधव, व्ही. शांताराम फाउंडेशनचे प्रमुख किरण व्ही. शांताराम, ‘आशय सांस्कृतिक’चे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, स्क्वेअर वनचे नयनीश देशपांडे आणि मयूर वैद्य, दी कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे संचालक आणि कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.
पोंक्षे म्हणाले, ‘या पुरस्काराने माझी जगण्याची उमेद वाढवली. आजाराला हसत हसत सामोरा गेल्यामुळेच आज तुमच्यासमोर उभा आहे.’
‘दलित साहित्याविषयी ‘पुलं’ना प्रचंड आस्था होती. ज्या ज्या दलित साहित्याला ‘पुलं’चा परीसस्पर्श झाला, ते साहित्य प्रचंड गाजले,’ असे प्रतिपादन डॉ. जाधव यांनी केले.
(अशोक सराफ यांचा मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)