पंढरपूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रोपळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयातील विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले. विद्यालयातील एकूण नऊ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. ग्रामीण भागातील या शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले जात आहे.
पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. बुधवारी, १७ मे रोजी या परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. त्यात या विद्यालयातील पाचवीतील सहा व आठवीतील तीन विद्यार्थ्यांनी बाजी मारली. रविराज हनुमंत रोकडे (२१२), संध्या सत्यवान माने (१७२), अस्मिता अनिल सरवदे (१६०), शिवम सिद्धेश्वर पाटील (१५४), ऋतुजा रामचंद्र कोरके (१४४) आणि साहिल मोहन काळे (१२८) हे पाचवीतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. (कंसात त्यांचे गुण) आठवीतील ओम बाळासाहेब आदमिले, विनायक सदाशिव गोडसे आणि कांचन चंद्रकांत सांगोलकर हे तीन विद्यार्थी समान, म्हणजेच १७४ गुण मिळवून पात्र ठरले.
पात्र विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एस. एम. बागल, पर्यवेक्षक टी. बी. ताटे, विभागप्रमुख सोमनाथ जगताप, उपविभागप्रमुख एन. जी. वाघमारे, गुरुकुल प्रमुख संतोष रोकडे, टी. टी. ननवरे, पी. टी. ताटे, व्ही. एम. रेडे, सी. एस. मलपे, व्ही. एस. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गटशिक्षणाधिकारी सुलभा वठारे, सरपंच दिनकर कदम, उपसरपंच गणेश भोसले, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य शिवाजी पाटील, नागनाथ माळी व नारायण गायकवाड आदींसह भूमी अभिलेख उपअधीक्षक शिवाजी भोसले यांनीही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.