मलयाळममधील प्रसिद्ध कवी बालचंद्रन चुळ्ळिकाड यांनी शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमातून आपल्या कविता चक्क काढून टाकण्याची मागणी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. ‘ज्या विद्यार्थ्यांना मलयाळम भाषेची अक्षर ओळखही नाही आणि व्याकरणही येत नाही, त्यांना उच्च गुण दिले जातात. शिक्षकांच्या नियुक्त्या हितसंबंध पाहून केल्या जातात. शिक्षकांची प्रतिभा किंवा त्यांचे कौशल्य तपासले जात नाही,’ अशी टीका त्यांनी केली आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या या वेदनेच्या निमित्ताने विशेष लेख... .........
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः।
उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ॥
ही माझी कविता अज्ञान लोकांसाठी नाही. ज्यांना कवितेचे ज्ञान आहे, त्यांच्यासाठीही हा माझा प्रयत्न नाही. कधी तरी माझ्यासारखी एखादी व्यक्ती, माझी समानधर्मा व्यक्ती, निर्माण होईल. कारण काळ अनंत आहे आणि पृथ्वी विशाल आहे.
भवभूतीने उत्तररामचरितात व्यक्त केलेली ही सर्व कवींची वेदना. संस्कृतमध्ये निव्वळ कवींच्या वेदना व्यक्त करणाऱ्या अशा अनेक सुभाषितांची रेलचेल आहे. उदा.
बोद्धारो मत्सरग्रस्ताः प्रभवः स्मयदूषिताः।
अबोधोपहताश्चान्ये जीर्णमङ्गे सुभाषितम्॥
‘ज्यांना कवितेतले काही कळते ते मत्सरग्रस्त असतात आणि सामर्थ्यवान लोक अहंकारी असतात, ते केवळ वरवरच्या चमत्कृतीला भूलतात. बाकीच्या लोकांना तर काहीही कळत नाही, त्यामुळे माझे सुभाषित माझ्याकडेच राहिले,’ असे भर्तृहरीने म्हटले आहे.
आणखी एक कवी म्हणतो,
इतरकर्मफलानि यदृच्छया विळिख तानि सहे चतुरानन।
अरसिकेषु कवित्वनिवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख ॥
हे ब्रह्मदेवा, अन्य शेकडो कर्मफले वाटेल तशी माझ्या नशिबात दे; पण अरसिक माणसाला कविता वाचून दाखवण्याचे दुःख माझ्या भाळी लिहू नको.
अर्थात संस्कृत कवींनी अशा प्रकारे अनेक वेदना व्यक्त केल्या असल्या, तरी त्यांच्या नशिबी एक जबरदस्त दुःख यायचे बाकी होते. त्यामुळे ते शल्य त्यांना व्यक्त करायचे राहिले होते. ते दुःख म्हणजे या कवींच्या रचना अभ्यासक्रमात समाविष्ट होणे. पु. ल. देशपांडे यांच्या भाषेत सांगायचे झाले, तर ‘ज्ञानेश्वर बारा मार्कांना तर आमची काय वाट?’ आता एकविसाव्या शतकातील कवींच्या वाट्याला आलेल्या या कर्मभोगाला वाचा फोडली आहे केरळमधील एका कवीने. या कवीने चक्क शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमातून आपल्या कविता काढून टाकण्याची मागणी केली आहे.
बालचंद्रन चुळ्ळिकाड हे मलयाळममधील प्रसिद्ध कवी. अलीकडेच त्यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर कडक ताशेरे ओढले आणि या व्यवस्थेचा आपण भाग होऊ इच्छित नसल्याचेही जाहीर केले. ज्या विद्यार्थ्यांना मलयाळम भाषेची अक्षर ओळखही नाही आणि व्याकरणही येत नाही, त्यांना विद्यापीठे आणि शिक्षण मंडळे उच्च गुण देतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यातील विशेष हे, की बालचंद्रन यांनी हे मत एखाद्या कार्यक्रमात किंवा चर्चासत्रात व्यक्त केलेले नाही, तर त्यांनी यासाठी खास पत्रकार परिषद बोलावली आणि त्यात ही मागणी केली.
‘या शिक्षण मंडळावरील नियुक्त्या राजकीय आणि आर्थिक हितसंबंध पाहून केल्या जातात. शिक्षकांची प्रतिभा किंवा त्यांचे कौशल्य तपासले जात नाही. त्यांच्यापैकी बहुतेक जण याकडे केवळ उत्पन्नाचे स्रोत म्हणून पाहतात, ध्यास म्हणून नाही,’ अशी टीका त्यांनी केली. ‘माझ्या कविता समजून घ्यायच्याच नसतील, तर त्या पाठपुस्तकांमध्ये ठेवता कशाला,’ असा त्यांचा सवाल आहे.
त्यांनी याबाबत काही उदाहरणेही दिली. ‘माझ्या कवितेवर संशोधन करणाऱ्या एका व्यक्तीने मला एक प्रश्नावली पाठवली होती. दुर्दैव म्हणजे त्यात शुद्धलेखनाच्या प्रचंड चुका होत्या आणि प्रश्नही निरर्थक वाटत होते. मी अनेक विद्यापीठांना त्यांच्या पाठपुस्तकांमध्ये माझ्या कविता वापरायची परवानगी या अपेक्षेने दिली होती, की कवितांमध्ये रस असलेल्या एखाद्या व्यक्तीला त्यांचा लाभ होईल; पण ते सर्व प्रयत्न आता निष्फळ ठरल्याचे दिसत आहे,’ असे चुळ्ळिकाड म्हणाले.
‘अलीकडे मी एका विद्यापीठाच्या कार्यक्रमात गेलो होतो. तिथे विद्यार्थ्यांनी विनंती केल्यामुळे मी माझ्या कवितांचे वाचन करणार होतो. त्या वेळी ‘एमए संस्कृत’च्या एका विद्यार्थिनीने मला एक कागद दिला. त्यात शुद्धलेखनाच्या अशा चुका होत्या, ज्या ‘एमए’च्या कोणत्याही विद्यार्थ्याने करू नये. याचा अर्थ स्पष्ट आहे, की तिच्या संपूर्ण शैक्षणिक कारकीर्दीत तिला तिच्या चुका कधीही दाखवून देण्यात आल्या नव्हत्या. यावरून आपले शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेबद्दल काय बोलावे,’ असा अनुभव सांगून त्यानंतरच शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडण्याचा हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांच्या या निर्णयाला एम. टी. वासुदेवन नायर यांच्यासारखे दिग्गज साहित्यिक आणि अन्य लेखकांनीही पाठिंबा दिला आहे. त्यांनी व्यक्त केलेली चिंता योग्य असल्याचेही म्हटले आहे; पण कविता मागे घेण्याचा त्यांचा निर्णय योग्य नसल्याचे म्हटले आहे; मात्र चुळ्ळिकाड यांच्या या निर्णयापेक्षाही जास्त महत्त्वाचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. आपल्या दृष्टीनेही हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. अनेक शिक्षक शुद्धलेखनाकडे डोळेझाक करतात. एका मर्यादेपर्यंत त्यातील चुका माफ कराव्यात, असे ते म्हणतात; पण चुळ्ळिकाड यांच्या मते, शुद्धलेखन महत्त्वाचेच आहे. ‘शब्दांचे लेखन महत्त्वाचे नाही, हे कोणी कसे काय समर्थनीय ठरवू शकतो,’ हा त्यांचा प्रश्न आहे आणि तो महत्त्वाचाच आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी आधी मुळाक्षरे आणि मलयाळम भाषेचे व्याकरण शिकावे आणि मगच कवितेकडे वळावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तोही मराठीला आपण तंतोतंत लावू शकतो.
विद्यापीठांमध्ये सध्या प्रबंधांचे केवळ ‘कट-पेस्ट’चे काम सुरू आहे, असा चुळ्ळिकाड यांचा आणखी एक आक्षेप. प्रबंध चांगला असेल, तर कट-पेस्ट करण्यालाही हरकत नाही. परंतु या प्रबंधांमध्ये केवळ असंबद्ध मजकूर असतो आणि त्यासाठी विद्यापीठे पीएचडीच्या पदव्या देताहेत, हा त्यांचा दुसरा आक्षेप. हाही आपण मराठीत जसाचा तसा लागू करू शकतो. वर ‘पुलं’चे जे वाक्य उद्धृत केले आहे, त्यात तरी त्यांनी वेगळे काय म्हटले होते? साहित्याचा किंवा भाषेचा खरा आस्वाद न घेता केवळ घोकंपट्टी करणाऱ्यांचीच तर त्यांनी खिल्ली उडविली होती ना!
खरे तर रसिक, श्रोता किंवा वाचक हे रचनाकर्त्याचे खरे आश्रयदाते. श्रोते केवळ कवितेचा अर्थ लावत नाहीत, तर ती कविता अनुभवतात, जगतात. हेच अन्य साहित्य प्रकारांसाठीही लागू आहे. त्यासाठीच या कृतींना श्रोते किंवा वाचक लागतात. म्हणूनच ज्ञानेश्वरांपासून सर्व संत, महंत व पंत कवींनी आधी श्रोत्यांना वंदन करून, त्यांची मनधरणी करून पुढे काव्य केले आहे.
वक्ता अतिपाडें अनुवादे। आणि श्रोतयाच्या मनी व्यग्रता नांदे।।
तरी कवित्व रसराज मंदे। जैसा जळेविण अंकुरू।।
असे कृष्णदास मुद्गल या कवीने म्हटले आहे. श्रोत्यावाचून कवी हा पाण्यावाचून अंकुर असतो, असे ते म्हणतात. चुळ्ळिकाड यांचीही वेदना तीच आहे. त्यासाठी त्यांनी पाठ्यपुस्तकांतून बाहेर पडून ‘समानधर्मा’ रसिकासाठी वाट पाहणे पसंत केले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आपल्याकडे असे कोणी तरी करावे, ही अपेक्षा.
– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com
(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)