डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब श्यामराव देशमुख यांचा उल्लेख आधुनिक भारताच्या इतिहासातील २०व्या शतकातील एक लोकोत्तर व्यक्तिमत्त्व म्हणून केला जातो. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व कृषी क्षेत्रातील कार्य अविस्मरणीय आहे. भारताच्या संविधान निर्मितीत अत्यंत हिरीरीने व मोलाचा सहभाग असलेल्या व्यक्तींमध्येही त्यांचा अग्रक्रमाने उल्लेख केला जातो. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून डॉ. पंजाबराव देशमुखांचे चरित्र नव्या पिढीने अभ्यासले पाहिजे.
२७ डिसेंबर १८९८ रोजी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी श्यामराव व राधाबाई या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी डॉ. पंजाबराव यांचा जन्म झाला. ते विदर्भाचे भाग्यविधाते तर होतेच; पण अखिल भारतातील एक उत्तुंग, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व (Dynamic Personality) व द्रष्टे समाजसुधारक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. शिक्षणप्रसार, कृषिसुधार, कृषककल्याण, अस्पृश्यता निवारण, गोरगरीब दलितांकरिता श्रद्धानंद वसतिगृह, कृषी, सहकार, शिक्षण, लोककर्म इत्यादी खात्यांचे मध्यप्रांताचे मंत्री, स्वतंत्र भारतातील कृषिखात्याचे मंत्री, शेतकी मंत्र्यांच्या मंडळाचे परदेशात जाणारे नेते, दिल्ली येथ डिसेंबर १९५९मध्ये भरविलेल्या जागतिक कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे प्रेरक, कृषिविषयक अनेक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष, अमरावतीच्या शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, लंडन येथील शिवाजी एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक, शेतकरी, मजूर, दलितांकरिता शाळा, खादी प्रचार इत्यादी सर्व क्षेत्रातील त्यांच्या देदीप्यमान कार्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासातील एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.
तत्कालीन परिस्थितीत उच्चविद्याविभूषित होऊन इंग्लंडहून १९२६ला भारतात परत आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींना तोंड देण्यासाठी ‘मध्यप्रांत वऱ्हाड शेतकरी संघ’ स्थापन करून शेतकरी वर्गाला राजकीय व सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले व या संस्थेमार्फत कृषिविषयक अनेक सुधारणा घडवून आणल्या.
१९२८-३० या काळात अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या विकासाच्या अनेक योजना राबविल्या. १९३०मध्ये मध्य प्रांत वऱ्हाड मंत्रिमंडळात कृषिमंत्री म्हणून कृषी क्षेत्रात नवनवीन पद्धतींचा अवलंब त्यांनी केला.
१९५२ते १९६२ अशी दहा वर्षे त्यांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. भारतीय कृषिविकासाच्या दृष्टीने त्यांनी अखिल भारतीय स्तरावर न भूतो न भविष्यति अशा स्वरूपाचे कार्य केले.
दोन पंचवार्षिक योजनांसंदर्भात त्यांनी भारताचे अन्नस्वावलंबन साध्य केले. योग्य भाव निर्धारित केले. नगदी पिकांना उत्तेजन दिले. जपानी भातशेतीचा प्रयोग १९५२पासून भारतात यशस्वीपणे राबविला. त्यामुळे तांदूळ उत्पादनाचे तज्ज्ञ म्हणून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले गेले.
त्याबरोबरच शेतकऱ्यांना कर्जे, पतपुरवठा करणाऱ्या विविध राष्ट्रीय यंत्रणा त्यांनी उभारल्या. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक कृषीविषयक संस्था त्यांनी स्थापन केल्या. अनेक लोकोपयोगी कायदे करून त्यांची अंमलबजावणी केली आणि कृषी विकासाचा पाया घातला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी १९५५ साली अराजकीय व जातपातविरहित अशी भारत कृषक समाज ही संस्था स्थापन केली. ही भारतातील हरितक्रांतीची उद्गाती राष्ट्रीय संस्था मानली जाते. या समाजामार्फत त्यांनी प्रदर्शने, परिषदा, कृषक मेळावे इत्यादींसारख्या कार्यक्रमांतून अधिक भरीव अशी कामगिरी केली. दिल्ली येथे १९५९-६० साली जागतिक कृषी प्रदर्शन भरवून विदेशी शेतकरी आपल्यापेक्षा किती पुढारलेले आहेत हे दाखवून देताना विज्ञानवादी व उद्योगशीलतेची जाणीव भारतीय शेतकऱ्यांना त्यांनी करून दिली.
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी विषयक कार्य पाहता शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे ही त्यांची निष्ठा दिसून येते. कृषिमंत्री असताना परदेशात त्यांनी भारताचे नेतृत्व केले होते. त्या वेळी त्यांनी भारतीय शेती व युरोपियन शेती यांचा तुलनात्मक अभ्यास केला होता. त्यावर अनेक ठिकाणी विद्वत्तापूर्ण भाषणे दिली होती. त्यांनी व्यक्त केलेले विचार मौलिक आहेत.
आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ. पंजाबराव देशमुख यांचे योगदान मोठे आहे. त्यांचे कृषी क्षेत्रातील विविधांगी कार्य २१व्या शतकातील शेतकरीपुत्रांना प्रेरणादायी असेच आहे. स्वतः शेतकरीपुत्र व स्वतंत्र भारताचे कृषिमंत्री या जाणीवेतून कृषी आणि कृषकांचा विकास हाच ध्यास त्यांच्या ठिकाणी होता.
जपानी भातशेती प्रयोग, तत्कालीन भारताचे अन्नस्वावलंबन, शेतकऱ्यांच्या पिकांची विमा योजना, शेतकऱ्यांच्या विकासासाठी भारत कृषक समाज (१९५५), युवक कृषक समाज (१९५६), शेतकरी बँक (१९६१), अखिल भारतीय मधमाशी पालक संघटना (१९५३), अखिल भारतीय अखाद्य तेलबिया संघटना (१९५४), लाखोंकरिता अन्न संघटना (१९५५), अखिल भारतीय ताडगूळ महासंघ (१९५५), राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी-विक्री संघ (१९५८), भारत कृषक सहकारी अधिकोष (१९६०) इत्यादी अनेक संस्थाची उभारणी त्यांनी केली. आंतरराष्ट्रीय शेतकऱ्यांचा आदान-प्रदान कार्यक्रम, कुक्कुट पालन, दुग्धउत्पादन, मत्स्यपालन इ. जोडधंदे, प्रोत्साहन, शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे आदींना त्यांनी प्रोत्साहन दिले.
अमेरिकेतील लँड-ग्रँड कॉलेजच्या धर्तीवर भारतातही प्रत्येक राज्यात एक कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची योजना अंमलात आणून त्यानुसार भारतातील पहिले कृषी विद्यापीठ उत्तर प्रदेशातील पंतनगर या ठिकाणी सुरू झाले. महाराष्ट्रात सुरुवातीला अकोला व राहुरी अशी दोन कृषी विद्यापीठे सुरू झाली.
राजधानी दिल्लीत डॉ. पंजाबरावांनी ११ डिसेंबर १९५९ ते २९ फेब्रुवारी १९६० या कालावधीत अपूर्व असे जागतिक कृषी प्रदर्शन भरविले. यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, पोलंड, फ्रान्स, ब्रिटन, कोरिया, इराण, सिलोन, मंगोलिया, अफगाणिस्तान, व्हिएतनाम, ब्रह्मदेश, झेकोस्लोव्हाकिया, जर्मनी इ. राष्ट्रे सहभागी झाली होती. ११ डिसेंबर १९५९पासून हे प्रदर्शन पाहण्यासाठी देश-विदेशांतून लाखो शेतकरी आले होते. भारत कृषक समाजाने शेतकऱ्यांसाठी हजारो राहुट्या उभारल्या होत्या. संपूर्ण दिल्ली शहरात जिकडेतिकडे भिन्न भाषा बोलणारे, भिन्न वेष धारण केलेले कृषक आले होते. दिल्ली शहराला अफाट यात्रेचे स्वरूप आले होते. लाखो कृषकांनी हा अपूर्व सोहळा अनुभवला. या प्रदर्शनाचे स्वरूप विराट होते.
९२ दिवस चाललेले हे प्रदर्शन जवळजवळ दोन कोटी शेतकऱ्यांनी पाहिले. हे प्रदर्शन भरवून डॉ. पंजाबरावांनी भारतातील शेतकऱ्यांना पुढारलेल्या व विज्ञानवादी कृषीतंत्रज्ञानाची माहिती करून दिली. नवक्रांतीच्या मार्गाने व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. शेतकऱ्यांना संघटित केले, नवा विचार दिला, जागृत केले. म्हणूनच स्वातंत्रोत्तर भारताच्या कृषी क्रांतीचे डॉ. पंजाबराव देशमुख जनक ठरतात.
शेतकऱ्यांची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे या जाणिवेतुनच ते जगले. आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये डॉ. पंजाबराव देशमुखांचे योगदान मोठे आहे.
त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
- प्रा. डॉ. सौ. कल्पना राजीव मोहिते, इस्लामपूर