चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या रवींद्र कामठे यांच्या ‘तारेवरची कसरत’ या पुस्तकाचा संदीप चव्हाण यांनी करून दिलेला परिचय...
................
अन्नाला चव यावी म्हणून जसं मीठ गरजेचं असतं, तसंच जीवनाला चव येण्यासाठी संघर्ष महत्त्वाचा असतो. मीठाविना जेवण अळणी, तर संघर्षाविना जीवन सपक. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांना बांधलेल्या जीवनतारेवरून प्रत्येकालाच प्रवास करावा लागतो; मात्र या प्रवासात कुणाची तार मध्येच तुटून पडते, तर कुणी तारेवरची कसरत करत करत दुसरे टोक गाठण्यापूर्वी आपले जीवनध्येय गाठतो. अशाच संघर्षमय जीवनाचा धांडोळा म्हणजे लेखक रवींद्र कामठे यांनी अनुभवबद्ध केलेलं ‘तारेवरची कसरत’ हे पुस्तक होय.
पाठीवरच्या आशा-आकांक्षांचं ओझं पेलत असतानाच जीवनतारेवरील सुख-दुःखांचा समतोल सांभाळता सांभाळता माणसाला कशी सावध पावलं टाकावी लागतात याचं उत्तम चित्रण म्हणजेच संतोष घोंगडे यांनी रेखाटलेलं मुखपृष्ठ. प्रा. डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांची प्रस्तावना म्हणजे या पुस्तकाचं जणू प्रतिबिंबच. प्रत्येकाच्या आयुष्यरूपी गाठोड्यात भल्या-बुऱ्या अनुभवशिदोरीचा साठा असतोच; पण वाईटातून चांगलं शोधत व ते आत्मसात करत जगण्याची कला थोड्याथोडक्यांनाच जमते. अशांच्या यादीत या लेखकाचं नाव नक्की असणार याची खात्री पटते.
पुण्यात गेलेलं बालपण, त्या वेळच्या गमतीजमती आणि सामान्य परिस्थितीत जगताना संकटांवर मात करत कसे जगायचे याविषयी आई-वडिलांकडून मिळालेलं बाळकडू लेखकानं ठळकपणे मांडलं आहे. दहावीच्या निकालाने एखादी लॉटरी लागल्यासारखा दिलेला आनंद, तर वेश्यागृहात गेल्यानंतर तेथील भयाण वास्तव पाहून झालेलं कमालीचं दुःख आदी विविध घटना मांडताना त्यांनी कुठेही आडपडदा ठेवला नाही.
प्रेमप्रकरण आणि त्याचं विवाहात झालेलं रूपांतर, १९८९-१९९४ या पाच वर्षांच्या काळात एका खासगी कंपनीत मिळालेली नोकरी व त्यामुळे करावा लागलेला लांबलचक प्रवास किंवा मित्राने घेतलेल्या कर्जाला जामीन राहताना तो अचानक जग सोडून गेल्याने त्याच्या कर्जाचे हप्ते फेडताना उडालेली तारांबळ; लेखकाने मांडलेले हे प्रत्येक प्रसंग त्याच्या आयुष्यातील प्रामाणिकतेचे दर्शन घडविण्यास पुरेसे ठरतात.
मानवी जीवनप्रवासाचं हमखास शेवटचं टोक म्हणजे मृत्यू. आत्येबहिणीचा एसटी अपघातात झालेला मृत्यू आणि त्यामुळे कुटुंबावर ओढवलेला आघात याबाबत सांगताना ‘अमावस्येशिवाय पौर्णिमेचं महत्त्व कसं कळणार?’ या एका वाक्यात लेखकानं त्या भयानक प्रसंगांचं भेदक वर्णन केलंय. ‘सोलरची ऊर्जा...’, ‘भूखंड खरेदी...’, ‘...भव्य प्रकल्प’ आदी विविध प्रकरणांमधून लेखकानं आपल्या जीवनातील कसोटीचा काळ जसाच्या तसा मांडला आहे. शिवाय आपल्या आयुष्यात वाट्याला आलेल्या चीन-आफ्रिकेतल्या सफरीही वाचकांना घडवल्या आहेत.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे प्राण वाचवणारा डॉक्टररूपी देवदूत वीस वर्षांनी अचानक समोर आल्यानं पुन्हा एकवार नजरेसमोरून तरळून गेलेला तो भीषण प्रसंग आणि ‘असंगाशी संग...’ असे जे काही म्हणतात त्यामुळं लागलेल्या व्यसनांनी उतारवयात ‘चुकवलेला काळजाचा ठोका’ या धीरगंभीर घटना लेखकाच्या आयुष्यातील जन्म-मृत्यूच्या पाठशिवणीच्या खेळाचं दर्शन घडवतात.
पहिला कवितासंग्रह, त्याचं सादरीकरण, तसेच ‘जे जे भेटीजे भूत | तयास मानिजे भगवंत’ या उक्तीनुसार आयुष्यात भेटलेल्या प्रत्येकास गुरुस्थानी मानून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत जीवनात कर्तृत्वाला नम्रतेची जोड असणंही गरजेचं असतं, हे आचरणातून दर्शविलं आहे. माणूस नोकरीतून निवृत्त होतो, समाजसेवेतून नाही याचं भान राखतानाच लेखकानं ‘निवृत्तीचा सोहळा’ या प्रकरणात आपल्याच एका कवितेतील ओळींशी समरस व्हायचं ठरवलं आहे. तो म्हणतो...
एक मन म्हणते, उरलास सकळासी।
दुजे मन सांगते, जुळवून घे समाजासी।।
आजच्या तरुण पिढीनं रवींद्र कामठे यांचं हे आत्मकथन जरूर वाचावयास हवं. कारण जीवनप्रवासात ‘तारेवरची कसरत’ करताना लेखकाचं हे अनुभवविश्व नक्की उपयोगी पडेल.
(रवींद्र कामठे यांचं ‘तारेवरची कसरत’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)