पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशकांना व पुस्तकविक्रेत्यांना ग्रंथ प्रदर्शनात गाळा मिळण्यासाठीचे अर्ज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) कार्यालयात उपलब्ध आहेत.
हे संमेलन ११, १२ आणि १३ जानेवारी २०१९ या कालावधीत होत आहे. यात होणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनात गाळा अथवा गाळे मिळण्यासाठीचे अर्ज ‘मसाप’च्या कार्यालयात सकाळी नऊ ते दुपारी १२ व सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत उपलब्ध आहेत. गाळे आरक्षणासाठी साडेसहा हजार रुपये नोंदणी शुल्क असून, ही नोंदणी १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत रोख शुल्कासह किंवा डीडी (धनाकर्ष) स्वरूपात जमा करायची आहे. गाळ्यांची सोडत २५ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत यवतमाळ येथे संमेलन कार्यालयात काढण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे ज्या साहित्यप्रेमींना संमेलनासाठी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहायचे आहे. त्यांच्यासाठी तीन हजार रुपये (तीन दिवस निवासाहित भोजन व नाश्ता) प्रतिनिधी शुल्क आकारण्यात येणार आहे. ज्या गाळेधारकांना किंवा प्रतिनिधींना नोंदणी करायची असेल त्यांनी ‘मसाप’त दिलेल्या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे.