Ad will apear here
Next
विद्यार्थ्यांची माय वर्देबाई

       
" कुंदा, तुझ्या कारेकर बाईंमध्ये एक माय दडलेली आहे. जिचं सारं जग विद्यार्थ्यांमध्ये सामावलेलं आहे."
    राजश्री या माझ्या मैत्रिणीचा हा शेरा पाहिला . डोळे टचकन भरून आले. आणि लगेच श्रीहरी विद्यालयातली दुसरी "माय" आठवली.
"वर्दे बाई."

    पौर्णीमेच्या चंद्रासारखा गोल मोहक चेहरा, गोरापान रंग, अंगावर कायम पांढरे नऊवारी पातळ, पांढराच ब्लाऊज , कपाळावर कायम काल्या  गंधाची टिकली , ठेंगण्या ठुसक्या, सुदृढ शरीराच्या, काखेत पर्स अडकवलेल्या आमच्या या बाई कायम हसतमुख असत. आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यावर भरभरून प्रेम करत. मायेनं खाऊपिऊ घालत. गरजूंना उदार हस्ते मदत करत.

बाईंचे माहेर आणि सासर तोलामोलाचे सधन होते. लग्नाच्या वेळी त्या फक्त मॅट्रिक होत्या. अर्थात त्या वेळेला तशा त्या खूप शिकलेल्याच होत्या. पण त्यांच्या पतीचे निधन लवकर झाले. त्यांना नोकरीची गरज नव्हती पण बाईंनी स्वतःच्या पायावर उभे रहायचे ठरवले. कॉलेज जॉईन केले व त्या बीए बीटी झाल्या. दुर्गाताई शिरगावकर यांनी त्यांना उगारला आणले श्रीहरी विद्यालयाला छान बाई मिळाल्या. त्या इतिहास छान शिकवायच्या. हिंदी सुद्धा छान शिकवायच्या.

     श्रीहरी विद्यालयाजवळ उगार शुगर वर्क्सचा दवाखाना होता. त्याच्या शेजारी दोन बैठे बंगले होते. एकात रहात प्रभाताई नर्स .  दुसऱ्या बंगल्यात रहात विद्यार्थीप्रिय वर्दे बाई. दोघीही  एकेकट्याच रहात असत.
       शाळेजवळ घर असल्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी वर्दे बाईंच्या घरी वरचेवर जात असू. बाईंचे ते आखीव-रेखीव टापटिपीचे स्वच्छ घर आम्हाला फार आवडायचे. तिथे शेल्फात ओळीने खाऊच्या( लिमलेटच्या गोळ्या, प्राण्यांच्या आकाराची बिस्किटे, खारे शेंगदाणे, चुरमुरे फुटाणे, खमंग भाजलेले वाटाणे) बरण्या भरून ठेवलेल्या असत. केव्हाही घरी गेलं की बाई त्या बरणीतला प्रसाद आम्हाला मुठी भरून भरून देत असत. कामानिमित्त गेलो की चहा कॉफी सरबत असा पाहुणचार असायचाच.

       बाई शाळेत उत्तम शिकवतच पण त्यांना अनेक छंद होते. विणकाम भरतकाम रांगोळ्या पेंटिंग टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे सजवणे यात त्यांचा हातखंडा होता. हे सारे शिकवताना बाईंना अनोखा आनंद मिळत असे. त्यासाठी लागणारे साहित्य त्याच पुरवत असत." क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे"
        हा त्यांच्या जगण्याचा मूलमंत्र होता. रिकाम्या काड्या पेट्यांची माळीण, चिंध्यांच्या बाहुल्या, फुलांचे
         गजरे,( पायाला दोरा बांधून) दोरा न वापरता फुलांची देठेच एकमेकात गुंतवून गुलबक्षी च्या फुलांचा हार शिकवताना बाई आमच्या मैत्रीण होत.

         बाईंच्या घरी पाहुण्यांची वर्दळ खूप होती. सुट्टीत भावाची,  बहिणीची, दीरांची मुलं यायची. त्यांच्याबरोबर खेळायला बाई आम्हाला बोलवायच्या.
 खायला-प्यायला द्यायच्या. त्यांच्या हाताला फार चव होती. 
         बाईंचं माहेर बेळगाव . तिथे एकदा वक्तृत्व स्पर्धेसाठी बाई मला घेऊन गेल्या. एक दिवस त्यांच्या भावाकडे व एक दिवस बहिणीकडे आम्ही राहिलो . त्या सर्वांना बाईंच्या बद्दल अतोनात आदर होता. बाईच्या बरोबर माझाही  मस्त पाहुणचार झाला.

         आमच्या शाळेत दरवर्षी हस्तलिखित मासिक काढत असत. त्याची  सर्व जबाबदारी बाईंकडे असे. बाई नीटनेटकेपणाने साऱ्या सूचना देत. सर्वांना मायेने खाऊपिऊ घालत.
         संक्रांतीला सर्व विद्यार्थी बाईंच्या घरी आवर्जून जात. त्यांचा तो खास कडक  आख्खा तिळाचा लाडू, नमस्काराला खाली वाकलं की पाठीवरून फिरवलेला मायेचा हात 
 आणि तोंड भरून दिलेला आशीर्वाद
" भराभरा मोठे व्हा, खूप शिका "
आजही प्रत्येक संक्रांतीला आठवतो.

       आमच्या शाळेत दरवर्षी मेळा असायचा. मेळ्यात नाच-गाणी नाटकं अशी धमाल असायची. बाईंचा खूप मोठा सहभाग असायचा. मार्गदर्शन असायचं. एकदा आमच्या मैत्रिणींचा एक डान्स बसवला होता." हुंबा होरे". आदिवासी जमातीचा तो डान्स होता. बाईंनी आम्हाला साड्यांचे घेरदार परकर नेसवले. केसांचे पाठीमागे बुचडे बांधले. त्यात शिसपेन्सिली उंच खोचल्या. त्यावरून ओढण्यांचे पदर घेतले. बाजूने पिना लावून फिक्स केले. त्यावेळची ती ड्रेपरी पाहून सर्वजण थक्क झाले होते. फोटोचे प्रस्थ त्यावेळी नव्हते. पण माझ्या मनाच्या कॅमेरॅवर ते कायमचे कोरले गेलेले आहे.

       बाईंना अध्यात्माची आवड होती. आमच्या शाळेत श्याम नारायण कुलकर्णी हे संगीत शिक्षक आले. त्यांचा आवाज अती मधुर होता. ज्ञानेश्वरीवर त्यांचे प्रभुत्व होते. बाई त्यांना रोज आपल्या घरी ज्ञानेश्वरी वाचायला बोलावत. त्यांनी त्यांना आपला मुलगाच मानला होता. काही कारणामुळे कुलकर्णी सर राजीनामा देऊन आपल्या मूळ गावी परत गेले. पाठोपाठ बाईंनी पण राजीनामा दिला व त्या त्यांच्या गावी गेल्या. त्यांना घेऊन मुंबईला गेल्या तिथे त्यांचे दीर बँक ऑफ महाराष्ट्राचे वरिष्ठ पदाधिकारी होते. त्यांना सांगून बाईंनी कुलकर्णी सरांना बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी दिली. राहायला जागा दिली.

       बाई नंतर उगारला आल्याच नाहीत. आम्हाला भेटल्या नाहीत. पण आठवणींच्या रूपाने त्या सतत आमच्या मनात आहेत. अशा या आमच्या वर्दे बाई. तुम्हालाही आवडल्या ना?

गुरुपौर्णिमेनिमित्त आई सारख्या गुरूंना मानवंदना.

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SSMGDA
Similar Posts
इंग्लिशचे देवदूत जी एस कुलकर्णी मास्तर माझा मोठा मुलगा आणि मुलगी अमेरिकेत असल्यामुळे मला दोन वेळा सहा सहा महिने अमेरिकेत राहायची संधी मिळाली. बराचसा प्रवास एकटीने करावा लागला. अनंत अडचणी आल्या पण त्यातून सहीसलामत सुटले ते निव्वळ आमच्या जी एस कुलकर्णी मास्तरांनी शिकवलेल्या इंग्लिशमुळे.
शिवा काशीद सख्यांनो, सध्याच्या कॉम्प्युटर युगात सामान्य माणूस सुद्धा आपलं ध्येय साध्य करण्यासाठी अनेक युक्त्या वापरतो. काहीच अवघड राहिले नाही आता. पण शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक मोहरे गमवावे लागले.
शिस्तप्रिय टिकेकर बाई उगार खुर्द (बेळगाव) येथील श्रीहरी विद्यालयातल्या शिक्षिका लीलाताई टिकेकर आठ मार्च २०२१ या दिवशी नव्वदी पार करून ९१व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या एका विद्यार्थिनीने त्यांच्यावर लिहिलेला हा लेख.....
आदरणीय रामतीर्थकर मास्तर उगार (बेळगाव) येथील श्रीहरी विद्यालयाला नावारूपाला आणण्यासाठी श्रीनिवास अनंत रामतीर्थकर मास्तर यांनी आपले तन-मन-धन पणाला लावले होते. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. सात डिसेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्या एका विद्यार्थिनीने लिहिलेला हा लेख...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language