
अंध आणि गतिमंद मुलांना चित्रकला शिकवून त्यांच्या आयुष्यात रंग भरणारा तरुण म्हणजे डॉ. सुमीत पाटील. त्याशिवाय तो आर्ट डिरेक्टर म्हणूनही कार्यरत आहे. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज डॉ. सुमीत पाटीलची प्रेरक गोष्ट... .......
इस लिए राह संघर्ष की हम चुने
जिन्दगी आसूओं मे नहाई न हो
शाम सहमी न हो, आँख हो ना डरी,
भोर की आँख फिर डबडबाई न हो...

चळवळीतलं हे गाणं मला खूप आवडतं. या गाण्याचा अर्थ मनाला स्पर्शून जाणारा आहे. या गाण्याला, त्यातल्या अर्थाला आपल्या आयुष्याचा भाग बनवणाऱ्या काही व्यक्ती असतात, त्यातलीच एक व्यक्ती म्हणजे डॉ. सुमीत पाटील. माझी साहित्यिक मैत्रीण रमा नाडगौडा हिच्याकडून मला सुमीतविषयी कळलं आणि त्याच्याशी संवाद साधण्याची, त्याला जाणून घेण्याची उत्सुकता मनात निर्माण झाली.
सुमीतला २००४ साली बालश्री हा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळाला. राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळालेला हा तरुण त्यानंतर शेकडो पुरस्कार मिळवत राहिला; पण त्याला गर्वाची कुठलीही बाधा झालेली मला आढळली नाही. अतिशय नम्र, विनयशील असा स्वभाव असलेला सुमीत मला भावला.

खरं तर सुमीत हा मूळचा मुंबईचा, अगदी दादरचा! वडील पोलीस खात्यात, तर आई शिक्षिका! मुंबईतच सुमीतचं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर अकरावी-बारावीत सुमीत कीर्ती कॉलेजमध्ये होता. बारावीत खूपच चांगले गुण सुमीतनं मिळवले. म्हणजे अर्थशास्त्रात ९४, तर अकांउटन्सीमध्ये ९८! चांगल्या गुणांमुळे घरच्यांच्या, नातेवाईकांच्या अपेक्षा वाढल्या. त्याच वेळी सुमीतनं आपल्याला ‘अप्लाइड आर्ट’मध्ये पुढलं शिक्षण घ्यायचं आहे, असं घरात जाहीर केलं. घरात कोणालाही चित्रकलेची पार्श्वभूमी नव्हती. चित्रकला म्हणजे फावल्या वेळात करायचे उद्योग हेच सगळ्यांचं मत होतं. त्यात शिक्षण घ्यायचं, म्हणजे पुढे करिअरच्या नावानं पूर्णविराम असं घरच्यांना वाटायला लागलं. त्यांनी सुमीतला प्रचंड विरोध केला. त्या वेळी या विषयात शिक्षण घ्यायचं तर दिल्ली, बडोदा आणि औरंगाबाद अशी मोजकी ठिकाणं होती, की जिथे सुमीत शिकू शकणार होता.

सुट्टीच्या मधल्या काळात सुमीतनं चित्रकलेचे खासगी क्लासेस घ्यायला सुरुवात केली. अनेक हौशी लोक चित्रकला शिकतात. त्यांच्याकडे अर्धवट रंग शिल्लक राहतात. ते रंग असतानाच ते दुसरे रंग विकत आणतात. हे उरलेले रंग काहींच्या आयुष्यात वेगळे रंग भरू शकतात, असं सुमीतच्या लक्षात आलं. अशा वेळी ज्या मुलांना चित्रकला शिकायची आहेत; पण त्यांच्याकडे रंग आणण्याची कुवत नाही अशांनाही सुमीतनं शिकवायला सुरुवात केली. अशा लोकांना आवाहन करून उरलेले रंग त्यानं गोळा केले. त्याला प्रतिसाद चांगला मिळत चालला होता. पैसेही भरपूर मिळू लागले; मात्र जुलै महिन्यात मुंबईत ११ ठिकाणी एकापाठोपाठ एक असे बॉम्बस्फोट झाले आणि प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याआधी ती दुर्घटना घडल्यामुळे सुमीत बालंबाल वाचला. या दुर्घटनेमुळे घरून त्याला हे क्लासेस बंद करण्याची ताकीद मिळाली.

सुमीत आपली ‘अप्लाइड आर्ट’मधली पदवी घेण्यासाठी औरंगाबादला पोहोचला. तिथं त्यानं ‘मास्टर ऑफ फाइन आर्टस्’ ही पदवी घेतली. त्यानं शारीरिक आणि मानसिक विकलांग मुलांशी संवाद साधण्याच्या विषयावर (How to teach mentally and physically challenged people from visual communication) पीएचडी केली.

जेव्हा २००४ साली दिल्लीला सुमीत बालश्री स्पर्धेत भाग घेऊन एका रस्त्यात चित्र काढत होता, त्या वेळी सभोवती गर्दी जमलेली होती, सभोवती उभं राहून जजेस निरीक्षण करत होते. अशा वेळी मनश्री सोमण नावाची एक मुलगी जोरात उत्स्फूर्तपणे ओरडली, ‘दादा, काय छान चित्र काढलं आहेस.’ सगळ्यांनी तिच्याकडे वळून आश्चर्यानं बघितलं. कारण ती अंध होती. सुमीत तर आपल्या हातातला ब्रश सुकेपर्यंत आश्चर्यानं तिच्याकडे बघतच राहिला. ‘तुला काय माहीत हे चित्र छान काढलंय,’ असा प्रश्न तिला विचारला गेला, तेव्हा तिनं उत्तर दिलं, ‘इथं या चित्राविषयी सगळे बोलताहेत त्यावरून मला समजलं. मला अभिमान वाटतो सुमीतला सुमीतदादा म्हणायचा. मी आता त्याच्याकडून चित्रं शिकणार.’ या प्रसंगानं सुमीतच्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं. त्याच्या आयुष्यात अंधांनी प्रवेश केला आणि त्याचं सगळं जगणं व्यापून टाकलं. सुमीतनं डोळ्यांना पट्टी बांधून चित्रं रंगवायला सुरुवात केली. अनेक अडथळे, अनेक अडचणी पार करत त्याला अंधांना कसं शिकवायला हवं याचे धडे मिळाले. आज तो अंध मुलांबरोबरच गतिमंद मुलांनाही चित्रकला शिकवतो.


सुमीतकडे मनश्री चित्रं शिकायला लागली आणि हळूहळू अनेक जण त्यात सहभागी झाले. या मुलामुलींना चित्रं शिकवणं एक प्रकारचं आव्हान होतं, ते आव्हान सुमीतनं स्वीकारलं. त्यांना टेक्श्चरचा फील कसा घेता येईल, त्यांना रंग कसे कळतील, याची पुरेपूर काळजी सुमीतनं घेतली. सुरुवातीला ती मुलं सुमीतवर अवलंबून असायची. लाल रंग दे, पिवळा रंग दे, अशा प्रकारे ते रंग मागून घेत असत. खरं तर त्यांना हे माहीत होतं, की रस्त्यानं जाताना लाल रंग म्हणजे थांबायचं असतं, हिरवा रंग म्हणजे जायचं असतं. त्यांच्या कानावर ‘अरे काय लालभडक साडी आहे’ अशी वाक्यंही पडत... मात्र सुमीतनं त्यांना रंगांच्या क्वालिटीबद्दल सांगायला सुरुवात केली. पिवळा रंग सूर्याचा आणि पिवळा रंग मैत्रीचाही, लाल रंग प्रेमाचा आणि लाल रंग शौर्याचाही, हिरवा रंग निसर्गाचा आणि हिरवा रंग शांततेचाही, असं सुमीत त्यांना सांगायचा. या मुलांच्या रंग लक्षात ठेवण्याच्या युक्त्या सुमीतनं समजून घेतल्या. एखाद्या कुर्त्याच्या खालचं बटन आतून लावलेलं असेल, तर तो लाल रंगाचा कुर्ता असं त्यांनी ठरवलेलं असतं हे सुमीतला कळलं. या प्रकारे त्याला त्यांच्याचकडून बरंच शिकायला मिळालं. अंध मुलामुलींच्या मनातली व्हिज्युअल पॉवर कशी वाढवायची हे शिकवण्यासाठी सुमीतनं प्रयत्न सुरू केले.

यानंतर सुमीतनं एक अनोखा प्रयोग हाती घेतला. सुमीत या मुलांना शिकवायला जायचा, तेव्हा त्याच्या बॅगेत चाफ्याची फुलं असायची. सुमीतला चाफा खूप आवडतो. त्यामुळे सुमीत यायच्या आधीच मुलंमुली सुमीत आला हे ओळखायची. चाफ्याचा गंध त्यांना सुमीतच्या येण्याची बातमी द्यायचा. यावरून सुमीतला कळलं की अत्तर हा अंध व्यक्तींचा स्ट्राँग पॉइंट आहे. कोण कुठलं अत्तर वापरतं यावरून ते त्या व्यक्तीला ओळखतात. चाफा हा पिवळा असतो, त्यामुळे चाफ्याचं अत्तर म्हणजे किंवा तो गंध म्हणजे पिवळा रंग असं करत करत १० रंग आणि १० गंध यांचं एकत्रीकरण सुमीतनं केलं. यावर त्यानं ‘तरंग’ नावाची शॉर्ट फिल्मदेखील बनवली. ही फिल्म वेगवेगळ्या स्पर्धांसाठी आणि फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल होण्यासाठी जात असल्यानं काही काळानंतर ती सगळ्यांनाच यू-ट्यूबवर बघायला मिळेल.
आज सुमीतची मुलं गंधावरून रंग ओळखतात आणि त्याप्रमाणे चित्रांत रंग भरतात. ही मुलं गणपती तयार करतात, हस्तकलेच्या वैविध्यपूर्ण वस्तू तयार करतात. जसं ती सुमीतकडून शिकताहेत, तसंच सुमीतही त्यांच्याकडून बरंच काही शिकतोय. अंधांकडे असलेली आकलनशक्ती, एकाग्रता, गंधावरून, स्पर्शावरून अनेक गोष्टी माहीत करणं, या गोष्टी सुमीतला कळल्या. या मुलांमधली ताकद त्यांच्या कामी आली पाहिजे, यासाठी सुमीत आज अनेक शाळांशी जोडलेला आहे. अशा मुलांना घेऊन मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये त्यांच्या चित्रांचं प्रदर्शनही सुमीतनं भरवलं होतं.


सुमीतचा कमाईचा मार्ग ‘आर्ट डिरेक्टर’ या त्याच्या प्रोफेशनमध्ये आहे; पण त्याचबरोबर त्यानं श्रीरंग नावाची संस्था काढली असून यू-ट्यूबवर श्रीरंग नावाचं सुमीतचं चॅनेलही आहे. यावर अनेक व्हिडिओज आहेत. मध्यंतरी मध्य रेल्वेसाठी सुमीतबरोबर अंध मुलांनी सीएसटी स्टेशनच्या भिंतीवर चित्रं रंगवलं आणि त्यातून संदेश दिला, ‘आम्ही स्टेशनची स्वच्छता राखू शकतो, तुम्ही का नाही?’ ते चित्र बघून पंतप्रधान मोदींनाही ट्विट करण्याचा मोह आवरला नाही. चित्रांबरोबर आपला वारसा, आपली संस्कृती जतन केली पाहिजे, तसंच या अंध मुलांना त्याबद्दल कळलं पाहिजे, या हेतूनंही तो मुलांना ती माहिती करून देतोय. सुमीतला वाचन करायला आवडतं, तसंच तो देशभर व्याख्यानं देतो.



आज डॉक्टरेट मिळवलेला सुमीत आर्ट डिरेक्टर म्हणून काम करतो. त्यानं ५३ एकांकिका/नाटकं, १९ मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट यांत आर्ट डिरेक्टर म्हणून काम केलंय. एक होता काऊ, काकस्पर्श, पोरबझार, चूकभूल द्यावी घ्यावी, आम्ही दोघी, ड्राय डे, सायलेंट फिल्म, लय भारी, ए बॅचलर पार्टी, क्लासमेट्स, मस्का अशा अनेक फिल्म्सचा आर्ट डिरेक्टर म्हणून सुमीतनं काम केलंय. यात महेश मांजरेकर, प्रियदर्शन जाधव, विजू माने, मनवा नाईक, प्रतिमा जोशी, निशिकांत कामत, आदित्य सरपोतदार यांच्यासह अनेक दिग्गज दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा सुमीतला अनुभव मिळाला. आजपर्यंत सुमीतनं ६४६ पुरस्कार पटकावले आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आणि राष्ट्रीय, राज्य स्तरावरचेदेखील आहेत. २०१२ साली त्याला झी गौरव पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं.
आपल्यातल्या कलेला विकसित करून, समाजातल्या वंचित घटकांपर्यंत पोहोचून, त्यांनाही कलेचं शिक्षण देणाऱ्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करणारा असा हा बहुगुणी तरुण आहे.
संपर्क :
मोबाइल : ८१०८१९ १७५९, ९८७०५ १६७३०
ई-मेल : crowpatil@gmail.com