Ad will apear here
Next
नवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत
कुलगुरू डॉ. पेडणेकर यांचे प्रतिपादन; जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेचे रत्नागिरीत उद्घाटन
रत्नागिरी : ‘जग झपाट्याने बदलत आहे. चौथी औद्योगिक क्रांती होत आहे. २० वर्षांनंतर ५० टक्के नोकऱ्या इंटरनेटवर आधारित असतील. ऑफिस ही संकल्पना आता कमी होत जाणार आहे. त्यामुळे काळानुरूप शाळा-महाविद्यालयांतही डेटा, थ्रीडी प्रिंटिंग, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे अभ्यासक्रम सुरू झाले पाहिजेत,’ असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले. मुंबई विद्यापीठात ‘एआय मास्टर सायन्स’ अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून, लवकरच पालघर आणि वेंगुर्ले येथे नवीन उपकेंद्र सुरू करून, तिथे ओशनोग्राफी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

रत्नागिरी १५ डिसेंबर २०१८ रोजी जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. रत्नागिरीतील प्रमोद महाजन मैदानावर उभारलेल्या आर. सी. काळे नगरीत सुरू झालेली ही परिषद १६ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या परिषदेत देवरुखे ब्राह्मण ज्ञातीतील बांधव, तसेच अनेक नामवंत जगभरातून सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, विद्यार्थी सहायक संस्था व परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर, देवरुखे विद्यार्थी वसतिगृह संस्थेचे अध्यक्ष विनोद जोशी, सतीश शेवडे, नगरसेवक उमेश कुलकर्णी, राजू भाटलेकर, अभिनेत्री संपदा कुलकर्णी, दिवाकर निमकर, श्रीनिवास कानडे, इंद्रनील भोळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. आनंद जोशी, श्रीकांत मुकादम, वीणा ढापरे, प्रशांत जोशी, सुरेश शितूत, दीपक निमकर, उल्हास मुळे, सुरेंद्र कुलकर्णी, अनिल पिंपुटकर, अॅड. श्रीनिवास भोळे, जयंत चापेकर, वृंदा निमकर, अरुण जोशी, समीर निमकर, अरविंद कोकजे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

‘नवे शिकेल, तोच टिकेल’
डॉ. पेडणेकर म्हणाले, ‘विद्यापीठातर्फे दर वर्षी ७२० परीक्षा घेतल्या जातात. १६१ वर्षे इतिहास असलेल्या या विद्यापीठाने पाच भारतरत्न, तसेच राष्ट्रपती, पंतप्रधानही देशाला दिले. विद्यापीठाच्या कलिना कँपसमध्ये इन्क्युबेटर सेंटर सुरू केले जाणार आहे. जर्मनीमध्ये कौशल्यावर आधारित ५० लाथ व चीनमध्ये दोन कोटी नोकऱ्या उपलब्ध आहेत. भारतातही काम वाढणार आहे. समाज आणि देशासाठी शिक्षणाचा उपयोग करता आला पाहिजे. बदलणाऱ्या जगात नवे ज्ञान शिकेल तोच टिकेल. मुलांना आधुनिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.’ 

प्रशांत जुवेकर‘करिअरसाठी नव्या संधी’
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा अॅनालिसिस अशा स्वरूपाचे नवे अभ्यासक्रम येत आहेत. त्याचा उपयोग बँकिंग, विमा व वैद्यकीय क्षेत्रात केला जातोय. त्यामुळे करिअरसाठी नव्या संधी आहेत. युरोप, अमेरिकेतील अनेक कंपन्या चीनमध्ये गेल्या आणि आयटी कंपन्या येथे येत आहेत. विद्यार्थ्यांनी विचार करून याचा लाभ घेतला पाहिजे,’ असे आवाहन अमेरिकेतील सिटी ग्रुपच्या ‘ग्लोबल केमिकल’चे व्यवस्थापकीय प्रमुख प्रशांत जुवेकर यांनी केले.

‘जगभरातील पेट्रोकेमिकल उद्योगांचा आम्ही सर्वांगीण अभ्यास करतो. ब्राझीलमध्ये मक्यापासून इथेनॉल निर्माण करतात व ते लिटरमागे १० टक्के वापरतात. प्रदूषणामुळे इकेक्ट्रिक कार्स वापरणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. २०२५मध्ये ही संख्या १० टक्क्यांवर पोहोचेल,’ असे ते म्हणाले.
प्रशांत जुवेकर यांचा सत्कार

‘सावरकरवाद स्वीकारण्याची गरज’
‘आज सावरकरवाद स्वीकारण्याची गरज असून, तो स्वीकारला तरच भारत हिंदू राष्ट्र म्हणून यशस्वी ठरेल. विज्ञानाची कास, भाषाशुद्धी, संरक्षण सज्जता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार सावरकरांनी मांडला होता,’ असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.

शरद पोंक्षे‘स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या भूमीत स्थानबद्ध होते आणि त्यांनी राष्ट्राला वंदनीय कार्य केले, तिथे बोलताना मला नेहमीच भरून येते. १९४७ला स्वतंत्र झालो, तरी सावरकरांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून सिद्ध करण्यासाठी १९६३पर्यंत प्रयत्न करावे लागले, हे दुर्दैव. स्वा. सावरकरांना हिंदुत्ववादी सरकार अजूनही भारतरत्न देत नाही, यापेक्षा दुर्दैव कोणते,’ अशी खंत पोंक्षे यांनी व्यक्त केली. 

‘नेहरूंनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर स्वा. सावरकरांनी काही सूचनांचे पत्र पाठवले होते. विज्ञानवादी राहा आणि सुरक्षा व्यवस्थेतील सैनिक, पोलिस आणि शिक्षणकार्य करणाऱ्या शिक्षकांना समाधानी ठेवा, अशी त्यांची सूचना होती. ही सूचना न ऐकल्यामुळेच आज सैनिक किंवा पोलिसांबद्दल वाट्टेल ते बोलले जाते. शिक्षक मनापासून शिकवत नाहीत. गुरुकुल शिक्षण पद्धत अमलात आणा. सर्वाधिक संहारक शस्त्रे आपल्या दलामध्ये समाविष्ट करा, या सूचनांचे पालन झाले नाही. त्यामुळे चीनविरुद्ध आपण हरलो. दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही. चरख्यावरच्या सुताने नव्हे तलवारीच्या पात्याने व रक्ताने देशाच्या सीमा सुरक्षा करायल्या हव्या होत्या,’ असे पोंक्षे म्हणाले. 

‘कस्तुरबा व गांधी आणि स्वा. सावरकर व त्यांच्या पत्नीची भेट रत्नागिरीतील वास्तव्यात झाली होती. गांधी व सावरकर यांची दीड तास चर्चा झाली; पण मते भिन्न होती. त्यानंतर गांधीजींनी सौभाग्यवती सावरकरांना वंदन करून ‘मी आज यांच्या मतांमध्ये पोळून निघालो तू संसार कसा करतेस,’ असे त्यांनी विचारले होते,’ असे पोंक्षे यांनी सांगितले.



‘लोकांनी विकासात्मक भूमिका घ्यावी’
‘देशात असिष्णुता वाढली म्हणून पुरस्कार परत करायची पद्धत येते. लोक रस्त्याला विरोध करतात. गंभीर हल्ले करायला तयार होतात. अंतर्गत व बाह्य मार्गाने ही संकटे देशावर आघात करत असतात. देशाच्या प्रगतीच्या आड न येता लोकांनी विकासात्मक भूमिका घ्यावी,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी केले.

निकम यांच्यासमवेत लेखक अच्युत गोडबोले व बाळासाहेब ठाकरे यांचे वकील बाळकृष्ण जोशी यांची प्रकट मुलाखत झाली. त्या वेळी निकम यांनी आपली सडेतोड मते मांडली. वकिलीचा प्रवास, विविध खटले व तपास या संदर्भात त्यांनी दिलखुलास मुलाखत दिली.

स्मरणिकेचे प्रकाशन

निकम म्हणाले, ‘हल्ल्यांसाठी काही वेळा काही कारणांचे भांडवल केले जाते. त्यांना राजकीय हवापाणी मिळते. देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू नये, यासाठी नागरिकांनी लक्ष ठेवले पाहिजे. ट्रंप यांनी अमेरिकेत व्हिसासंदर्भात निर्णय घेतला, त्याबद्दल मला आनंद वाटला. कारण भारतीय हुशार विद्यार्थी तिथे जाऊन आपली बुद्धिमत्ता वापरतात. त्यांनी भारतातच राहून विकासासाठी आपली बुद्धी वापरावी.’

‘फक्त पैसे मिळवू नका’
अच्युत गोडबोले म्हणाले, ‘मी ३२ वर्षे आयटी क्षेत्रात नोकरी करून कोट्यवधी रुपये मिळवले; पण फक्त पैसे मिळवून उपयोग नाही. त्यामुळे मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी ३२ पुस्तके लिहिली. मला वाचकांचे भरपूर प्रेम मिळते. त्यामुळे समाधान वाटते. १४ जणांनी माझी पुस्तके वाचून आत्महत्येचा विचार सोडून दिला.’

बाळासाहेबांची आठवण
‘मी १८८५मध्ये मुलुंडमध्ये शिवसेनेचा पहिला नगरसेवक झालो. बाळासाहेबांच्या भाषणांनी प्रभावित झालो होतो आणि शिवसैनिक बनलो. बाबरी मशीद पाडली गेली, त्या वेळी बाळासाहेंबावरही खटला सुरू होता. खटला लढवायला लखनौला गेलो होतो. मी तिकडून येईपर्यंत बाळासाहेब जेवलेसुद्धा नव्हते. मला मुंबईत परत पाहिल्यावर ते जेवले,’ अशी आठवण बाळकृष्ण जोशी यांनी सांगितली. 

खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी शहर दर्जेदार बनवण्यासाठी सर्व सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी परिषदेला शुभेच्छा दिल्या. 

परिषदेला झालेली गर्दी
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZRHBV
 अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. आपणांस आमच्या हार्दिक शुभेच्छा.1
 Great Achievement for Devrukhe Bramhan1
 इतक्या मोठ्या प्रमाणात आणी ईतक्या ऊच्च दर्जाच्या लोकाना आमंत्रण देऊन हा काय्रक्रम यशश्वी रित्या केल्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन.पूढिल कार्यक्रमा साठी शुभेच्छा.2
 सर्व कार्यक्रम उत्तम झाले,सर्व मनोरंजन कार्यक्रम मनाला भावले.पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा !
Similar Posts
देवरुखे ब्राह्मण परिषद ठरली पर्यावरणस्नेही रत्नागिरी : रत्नागिरीत नुकतीच झालेली जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद अनेक अर्थांनी चांगल्या प्रकारचा पायंडा पाडणारी ठरली. प्लास्टिकमुक्ती, प्रदूषण टाळणे, स्वच्छता करणे या बाबतींमध्ये या परिषदेचे आयोजक आणि कार्यकर्त्यांनी कृतीतून आदर्श घालून दिला आणि एखादा मोठा कार्यक्रम पर्यावरणस्नेही आणि सामाजिक बांधिलकी जपणारा कसा होऊ शकतो, हे दाखवून दिले
जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद रत्नागिरीत रत्नागिरी : महाराष्ट्रासह देश-विदेशातील सर्व देवरुखे ब्राह्मण समाजाचे आकर्षण असणारी जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद १५ व १६ डिसेंबरला रत्नागिरीत होणार आहे. शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या परिषदेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. बंदररोड येथील देवर्षीनगरात नुकतीच आढावा बैठक झाली. या दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते
‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था मूल मतिमंद असले, तरी त्याच्यातही काही सुप्त गुण असतातच. मतिमंदत्वामुळे ‘निरुपयोगी’ असा शिक्का मारून अशा मुलांना दूर न ढकलता त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेणे, त्यांचा विकास करणे आणि त्यातूनच त्यांचे नवे आत्मनिर्भर व्यक्तिमत्त्व तयार करणे हे ध्येय उराशी बाळगून रत्नागिरीतील ‘आविष्कार’ संस्थेने
रत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अश्मयुगीन कातळ-खोद-चित्रांचा ठेवा सापडला आहे. त्यांच्या जतनासाठी शोधकर्ते, तसेच स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या वारशाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. ऑस्ट्रियातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एर्विन न्यूमायर आणि इंग्लंडमधील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language