Ad will apear here
Next
आसमानों में उड़ने की आशा...
‘तुजऐसी नाही’ या मालिकेत आतापर्यंत अनेक कर्तृत्ववान स्त्रियांच्या प्रेरणादायी गोष्टी वाचल्यात. या मालिकेच्या आजच्या शेवटच्या भागात गोष्ट आहे आसाममधल्या छोट्या खेड्यातल्या अशा एका मुलीची, की ‘शहरी मुलींच्या कर्तृत्वापुढे आपण नगण्य आहोत,’ ही भावना तिच्या डोक्यात पक्की बसलेली होती; मात्र एका सत्पुरुषाकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे तिनं स्वतःला घडवलं. आज ती पुण्यात एका नामवंत ठिकाणी फॅशन डिझायनर आहे... न्यूनगंडातून आत्मविश्वासाकडे झालेल्या तिच्या प्रवासाची ही गोष्ट आहे... ग्रामीण भागातल्या अनेक हुशार मुलींना प्रेरणा देईल अशी आणि शहरी मुलींनाही अभिमान वाटेल अशी...
.........
‘सेव्हन सिस्टर्स’मधलं आसाम म्हटलं, की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यांसमोर येतात ते चहाचे मळे... ईशान्येकडच्या काही राज्यांत मातृसत्ताक व्यवस्था असल्यानं तिथल्या स्त्रिया हाही एक विषय आपल्या (म्हणजे अन्य भारताच्या) कुतुहलाचा असतो; पण आजही त्या भागांच्या दुर्गमतेमुळे विकासाचे वारे तिथपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचलेले नाहीत. विकास म्हणजे चकाचक मॉल किंवा फ्लायओव्हर्स हे इथं अभिप्रेत नाही... तर मुख्यत्वेकरून दळणवळणाची, संपर्काची साधी-सोपी साधनं, रोजगाराभिमुख शिक्षण, त्या शिक्षणामुळे मिळणारा रोजगार आणि त्यातून स्थानिक अर्थव्यवस्थेत खेळणारे पैसे या आनुषंगिक गोष्टी अभिप्रेत आहेत. अशा विकासामुळे मुख्य गोष्ट साध्य होते, ती म्हणजे आत्मविश्वासाची निर्मिती. आपण वेगळं काही तरी करू शकतो, आपल्यात तेवढी क्षमता आहे, हा आत्मविश्वास मनामध्ये तयार होण्याचं बळ हा विकास देतो. त्याच्या अभावामुळे या राज्यांतलं ‘टॅलेंट’ जगासमोर येण्याचं प्रमाण तुलनेनं कमी आहे; पण त्या ‘टॅलेंट’ला पुरेसं खतपाणी मिळालं, तर ते कसं झळकू शकतं, याचं उदाहरण म्हणजे मूळची आसाममधली असलेली नि सध्या पुण्यात फॅशन डिझायनर म्हणून काम करत असलेली मर्सी.

सरस्वते दाम्पत्यासह मर्सीया मर्सीची ओळख करून घेण्याआधी माहिती घेऊ या पुण्याजवळ दापोडीत राहणारे अरुण सरस्वते यांची. आपल्या आजच्या कथेची नायिका मर्सी पुण्यात या सरस्वतेंकडेच राहते. ७७ वर्षांचे अरुण सरस्वते निवृत्तीनंतर गेली काही वर्षं ईशान्येकडच्या राज्यांमध्ये काम करतात. तिथल्या शाळांमधल्या मुलांना गणित, विज्ञान शिकवतात. तिथल्या गावांत सौरऊर्जेचे दिवे बसवणं किंवा तत्सम प्रकारचे सामाजिक कार्यही निरपेक्ष भावनेनं करतात. त्यांनी पुण्यातलं स्वतःचं हजार स्क्वेअर फुटांचं घर आपल्या पश्चात आपल्याकडे घरकाम करणाऱ्या मावशींना देण्याचं इच्छापत्रही केलं आहे. (त्या संदर्भातल्या लेखासाठी इथं क्लिक करा.) तर हे अरुण सरस्वते हाफलांगमधल्या विश्व हिंदू परिषदेच्या विवेकानंद हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवत असत. तिथं त्यांची मर्सीशी गाठ पडली. ती त्या वेळी ती १६-१७ वर्षांची होती. केहुराले न्यूमे हे नागा जमातीच्या असलेल्या मर्सीचं पूर्ण नाव. तिला आरा असंही म्हणत. मुलींच्या हॉस्टेलजवळच तिचं घर होतं. एक भाऊ, दोन बहिणी आणि आई-वडील असं तिचं कुटुंब. तिची आई दूरच्या एका खेड्यात शेतीवाडी करायची. तिचे वडील हाफलांगच्या कौन्सिलमध्ये माळीकाम करायचे. त्यांच्याकडे  सुतारकाम, गवंडीकाम, बांबूकाम अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्याचं सुरेख कौशल्यही होतं. काही कामानिमित्तानं सरस्वते यांचा त्यांच्याशी संबंध आला. मर्सीही तेव्हा दहावीत होती. त्यामुळे तिच्या अभ्यासाचीही ते अधूनमधून चौकशी करत. ती अभ्यासात फार हुशार नव्हती; पण होती मात्र चुणचुणीत आणि ‘शार्प.’ दहावीची परीक्षा जवळ येऊनही तिच्या अभ्यासानं काही फारसा जोर घेतलेला सरस्वते यांना दिसला नाही. अभ्यासासंदर्भात त्यांनी काही विचारलं तर ‘मालूम नहीं’ हे तिचं उत्तर ठरलेलं असायचं. दहावीतली मुलं असलेल्या पुण्या-मुंबईतल्या घरांमधलं वातावरण नकळत त्यांच्या डोळ्यांसमोर तरळून गेलं. त्यामुळे त्यांनी अखेर तिलाही मुलींच्या हॉस्टेलवर बोलावलं आणि तिथल्या बाकीच्या मुलींबरोबर ते तिचीही शिकवणी घेऊ लागले. तिची आकलनशक्ती चांगली होती. त्यामुळे तिची अभ्यासात प्रगती होऊ लागली, अशी आठवण सरस्वते यांनी सांगितली.  

‘मर्सीला पुण्यात कसं काय आणलंत, तिच्या आई-वडिलांनी तिला कसं काय पाठवलं,’ असं विचारल्यावर सरस्वतेंनी त्या संदर्भातल्या आठवणी सांगायला सुरुवात केली. ‘मॅट्रिकनंतर तुम्ही कोण होणार, असा प्रश्न मी त्या मुलींना विचारायचो. त्यावर कोणी सांगायचं नोकरी करू, नोकरी नाही मिळाली तर लग्न करू. सर्वांत महत्त्वाकांक्षी कोणी असेल, तर त्यांचं उत्तर असायचं शिक्षिका बनू. त्यावर मी त्यांना सांगायचो, ‘शहरातल्या मुली डॉक्टर, इंजिनीअर, सायंटिस्ट बनण्याची स्वप्नं बघतात. मग तुम्ही तशी का नाही पाहत?’ तेव्हा त्या म्हणायच्या, ‘त्या शहरातल्या मुली आहेत. त्या हुशार आहेत. आम्ही गावात राहतो. त्यांच्याएवढ्या आम्ही हुशार नाही. आम्ही त्यांच्याइतक्या मोठ्या कशा होणार?’ त्या मुलींचं हे बोलणं ऐकल्यानंतर त्यांच्यातली आत्मविश्वासाची कमतरता, न्यूनगंड मला जाणवला. तेव्हा मला वाटलं, की आपण काही तरी करायला पाहिजे. त्यांचा न्यूनगंड कमी करायचा, तर त्यांना शहरी वातावरणात नेऊन तिथल्या मुला-मुलींसोबत मिसळू देणं गरजेचं आहे, असं मला प्रकर्षानं जाणवलं. म्हणून मी त्यांना सांगितलं, ‘तुम्ही शहरी मुलींपेक्षा जराही कमी नाही. तुमच्यापैकी कोणी माझ्याबरोबर येणार असेल, तर मी तुम्हाला पुण्याला घेऊन जाईन आणि काही दिवसांनी परत आणून सोडीन. हो-ना करता करता मर्सी आणि रेहूली या दोन मुली माझ्यासोबत यायला तयार झाल्या. त्यांच्या पालकांनीही परवानगी दिली. त्यामुळे माझा मार्ग मोकळा झाला. मी त्या दोघींना घेऊन पुण्यात आलो. त्यापैकी रेहुली काही दिवसांनी परत गेली. मर्सी मात्र माझ्याकडे राहिली आणि रुळलीही...’ अरुण सरस्वते सांगत होते.

स्वतः डिझाइन केलेले कपडे परिधान केलेली मर्सी.
मर्सी आल्यानंतर तिला रूढ शिक्षण देण्यापेक्षा काही तरी कौशल्याधारित शिक्षण द्यावं, असा विचार सरस्वते दाम्पत्यानं केला. तिकडच्या मुलींना लग्नासाठी दोन अटी असतात. एक म्हणजे केस लांब असावे लागतात आणि विणकाम यावं लागतं. बराच काळ तिकडे राहिलेले असल्यानं सरस्वते यांना ते माहिती होतं. त्यामुळे तिच्याकडे विणकामाचं कौशल्य असेल असा अंदाज त्यांनी बांधला. शिवाय एक-दोन वेळा शिवणकामाचं तिचं कौशल्यही त्यांना दिसलं. म्हणूनच त्यांनी तिला चिंचवडच्या ‘इंडियन फॅशन अॅकॅडमी’मध्ये घातलं. तिथं तिनं हे शिक्षण घेतलं. नंतर ती काही काळ आसाममध्ये परत गेली होती. तिथं तिनं शिवणाचे क्लासेस आणि शिवणकाम सुरू केलं होतं. मात्र तिथं त्यावर उपजीविका करणं तिला कठीण जाऊ लागलं. कारण वेळेवर पैसे मिळण्याचं प्रमाण फार कमी होतं. शेवटी ती पुन्हा पुण्याला मामांकडे (अरुण सरस्वते) आली. मध्यंतरीच्या काळात तिनं कम्प्युटर कोर्स केला. टू-व्हीलर चालवायला शिकली आणि नोकरीच्या शोधात होती.

नीता देशपांडेऔंधमधलं ‘बंजाराज् – नॅचरल फॅब्रिक्स ऑफ इंडिया’ हे देशी नैसर्गिक धाग्यांपासून बनवल्या जाणाऱ्या वस्त्रांसाठीचं नामवंत दालन. नीता देशपांडे या त्याच्या संस्थापक. त्यांनी मर्सीला त्यांच्याकडे कामाची संधी दिली. आज ती त्यांच्या डिझाइनची टीमची एक प्रमुख सदस्य आहे. अनेक उच्चभ्रू व्यक्ती त्यांच्या क्लायंट आहेत. अशा ग्राहकांशी चर्चा करून, त्यांची गरज लक्षात घेऊन त्यांच्या मागणीनुसार १०-१२ डिझायनर्सकडून हवे त्या डिझाइनचे कपडे तयार करून घेणं हे तिचं मुख्य काम. ते ती चांगल्या पद्धतीनं पार पाडते, असं देशपांडे म्हणतात. ‘गावाकडच्या मुली मुळातच ‘हार्डवर्किंग’ असतात. तशीच मर्सीही आहे. ती जुळवून घेणारी आहे आणि नवनवं शिकण्याचीही तिची इच्छा आहे. शिकण्यावर तिचा ‘फोकस’ होता. त्यामुळेच ट्रेनिंग आणि ग्रुमिंगनंतर ती आता चांगली तयार झाली आहे,’ असे कौतुकोद्गार देशपांडे यांनी काढले. अर्थात, ‘असं कौशल्य विकसित झाल्यानंतर अशा मुलींनी शहरातच राहणं आवश्यक आहे. कारण इथंच त्यांच्या कौशल्याचं मूल्य मिळतं,’ असं मतही देशपांडे यांनी व्यक्त केलं. त्यांचं मत ही वस्तुस्थिती आहे आणि ग्रामीण भागातल्या मुलींवर सामाजिकदृष्ट्या अन्याय होतो, हे सिद्ध करणारीही आहे.

दहा वर्षांपूर्वी आलेला ‘चक दे इंडिया’ चित्रपट बघितला असेल, तर त्यातला एक सीन आठवतोय का पाहा... महिलांच्या टीममध्ये निवड झालेल्या एक-एक खेळाडू आपापल्या राज्यांतून दिल्लीत दाखल होत होत्या. त्यात ईशान्येकडच्या राज्यांतल्याही दोन मुली होत्या. त्यांच्या चेहऱ्याच्या ठेवणीवरून त्या चिनी किंवा नेपाळी असल्याचं वाटत होतं. त्यामुळे त्यांना उद्देशून ‘मेहमानों का स्वागत है’ असं म्हटलं जातं. त्यावर त्या नाराज होतात. ‘अपने ही देश में मेहमान बनकर कोई खुश कैसे हो सकता है?’ हे त्यांचे बोल खूप काही सांगून जाणारे होते. दशकभरानंतरही परिस्थिती फारशी बदललेली नाही. कारण मर्सीलाही अनेकदा ‘नेपाळी’ असं संबोधण्यात आलं आहे. तेव्हा वाईट वाटल्याचं आणि त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिल्याचंही सांगितलं.

सरस्वते दाम्पत्यानं मर्सीला जीव लावला आणि तिनंही त्यांना. त्यामुळे ती त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग बनून गेली आहे, जणू काही त्यांची मानसकन्याच... (त्यांनी स्वतःच्या मुलीसारखंच तिलाही वाढवलं आणि त्यासाठी तिच्या कुटुंबीयांकडून एकही पैसा घेतलेला नाही. केवळ सामाजिक भावनेनं आपण हे केल्याचं ते सांगतात.) वेळ पडल्यास आपली नोकरी सांभाळून जेवण करण्यापासून घरातली कोणतीही कामंही ती करते. अजून ती मराठी सुस्पष्ट बोलत नाही; पण तिला मराठी व्यवस्थित कळतं. ती मैत्रिणींबरोबर मराठी सिनेमा पाहायलाही जाते. वरणभात आणि वडापाव हे तिचे आवडीचे पदार्थ बनले आहेत. थोडक्यात काय, तर इथल्या विश्वात ती रममाण होऊन गेली आहे; पण ती आपलं घर विसरलेली नाही. लहान बहिणीच्या शिक्षणासाठी आणि अन्य कारणांसाठी अधून-मधून ती घरी पैसेही पाठवते. आठ-नऊ वर्षांपूर्वी सरस्वते यांना भेटलेली मर्सी जशी लाजरी-बुजरी होती, तशीच ती आजही आहे. फक्त परिस्थितीत खूप मोठा फरक पडला आहे. तेव्हाच्या तिच्या लाजण्यात भित्रेपणाची झाक होती; आज मात्र तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासपूर्ण हसू दिसतं. तिनं कर्तृत्वानं स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. त्याचं तेज आजच्या तिच्या लाजण्यात नि हसण्यात दिसतं.

या गोष्टीचं तात्पर्य काय, तर ‘गाँव की छोरी’सुद्धा आयुष्यात वेगळं काही तरी करून दाखवू शकते. गरज आहे फक्त प्रोत्साहनाची आणि तिला खुलू देण्यासाठी अनुकूल वातावरण विकसित करण्याची. त्या बाबतीत सरस्वते दाम्पत्याचा आदर्श नक्कीच घेण्यासारखा आहे. मर्सीसारख्या कितीतरी मुली केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातल्या प्रत्येक राज्यातल्या गावांमध्ये आजही आहेत. त्यांच्यातले गुण हेरून, त्यांना फुलू दिलं पाहिजे. ही त्या मुलींच्या आई-वडिलांची तर जबाबदारी आहेच; पण त्यांचे शिक्षक आणि त्यांच्याशी संबंधित समाजातल्या अन्य व्यक्तींचीही आहे. एकटे अरुण सरस्वते किंवा एकट्या नीता देशपांडे पुरेशा नाहीत, तर अशी अनेक उदाहरणं तयार झाली पाहिजेत. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही केवळ सरकारी योजना न राहता ती पुढे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी को बढावा दो’ अशा प्रकारे लोकांच्या मनात विकसित झाली तर गावागावांतल्या अशा अनेक ‘मर्सी’ आपलं करिअर मनासारखं ‘डिझाइन’ करू शकतील... त्यांची ‘आसमानों में उड़ने की आशा’ मूर्त रूप धारण करू शकेल. तसं झालं तर कदाचित स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांना शहरात येणंही आवश्यक राहणार नाही. यापुढेही अशाच प्रकारे आत्मविश्वासानं वाटचाल करण्यासाठी मर्सीला शुभेच्छा! 

संपर्क : अरुण सरस्वते -  ९४२३० ०२२१५

(‘तुजऐसी नाही’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/idhJdV या लिंकवर उपलब्ध असतील.)

(मर्सीच्या प्रवासाची झलक आणि तिचं मनोगत सोबतच्या व्हिडिओत पाहा.)

 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZYSBH
Similar Posts
अपूर्वाई वाटण्यासारखं ‘अपूर्व’ काम करणारी अपूर्वा अलीकडे बरेच आर्थिक घोटाळे होत आहेत, ते उघडकीस येण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे; मात्र तपासासाठी ‘फॉरेन्सिक अकाउंटंट्स’ मात्र खूप कमी आहेत. या पार्श्वभूमीवर, मूळची सोलापूरची आणि सध्या पुण्यात असलेली डॉ. अपूर्वा प्रदीप जोशी ही तरुणी गेल्या दशकभराहून अधिक काळ फॉरेन्सिक अकाउंटिंग या क्षेत्रात उल्लेखनीय काम करते आहे
अमराठी जनांना मराठीचं बाळकडू पाजणारा कौशिक मूळचा डोंबिवलीकर आणि सध्या पुण्यात असलेला कौशिक लेले हा तरुण कम्प्युटर इंजिनीअर परदेशी आणि परराज्यातल्या अमराठी नागरिकांना ऑनलाइन माध्यमातून मराठी भाषा शिकविण्याचं कार्य करतो आहे. त्याच्या या आगळ्यावेगळ्या कार्याबद्दल...
झोंपाळ्यावरची गीता श्रीमद्भगवद्गीतेत जे ज्ञान संस्कृत भाषेत आहे, ते सर्वांना उमजण्यासाठी विनोबा भावे यांनी १९३२ साली सुगम मराठीत गीताईची रचना केली. त्याआधी, १९१७मध्ये दत्तात्रेय अनंत आपटे ऊर्फ अनंततनय यांनी ‘झोंपाळ्यावरची गीता’ ही रचना केली होती. गीताईप्रमाणेच हादेखील मराठी भाषेला मिळालेला उत्तम ठेवा आहे. गीताईप्रमाणे
अर्भकाला जीवनदान देणाऱ्या कचरावेचक महिलांचा सत्कार पुणे : विश्रांतवाडीतील एकतानगरमध्ये कचराकुंडीत टाकलेल्या नवजात मुलीला जीवदान देणाऱ्या लक्ष्मी राजू डेबरे आणि मंगल जाधव या कचरावेचक महिलांचा पुणे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी स्वच्छ संस्थेच्या व येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language