‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या दोन भागांत आपण कोल्हापूर शहरातील पर्यटनस्थळांची माहिती घेतली. कोल्हापूरच्या जवळ असणाऱ्या पन्हाळा, जोतिबा अशा काही पर्यटनस्थळांची माहिती आजच्या भागात घेऊ या...........
सिद्दी जौहरने घातलेला वेढा व त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांची सुटका, तसेच शिवा काशीद व बाजीप्रभूंच्या बलिदानाने पन्हाळा किल्ला अजरामर झाला आहे. पन्हाळा किल्ल्याचा उल्लेख इतिहासात १२व्या शतकापासून दिसून येतो. राष्ट्रकूट राज्य लयाला गेल्यावर शिलाहार प्रबळ झाले. त्यापैकी राजा भोज नृसिंह याने सन ११७८ ते १२०९ या कालावधीत हा किल्ला बांधला. त्याच्या पश्चात हा भाग सिंधणदेव या देवगिरीच्या राजाच्या अमलाखाली आला. बिदरच्या बहामनी सुलतानाचा वजीर महमूद गावान याने भर पावसाळ्यात सन १४६९मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर याचा ताबा विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. या कालावधीत आदिलशहाने हा किल्ला बळकट केला. अरब जगाशी संबंध ठेवण्याच्या, तसेच व्यापाराच्या दृष्टीने या किल्ल्याचे आदिलशहाला खूप महत्त्व वाटत होते. याच वेळी इंग्रजांनी कोकणात राजापूर येथे पाय रोवण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे कोकणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विजापूर सुलतानास हे ठिकाण महत्त्वाचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हीच गोष्ट लक्षात घेऊन पन्हाळा १६५९मध्ये काबीज केला.
सन १६६०मध्ये सिद्दी जौहरने बरेच दिवस या किल्ल्याला वेढा घालून ठेवला होता. छत्रपती शिवाजी महाराज तेथून निसटल्यावर तो त्याच्या ताब्यात आला. १६७३मध्ये कोंडाजी फर्जंदबरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला परत ताब्यात घेतला. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हा किल्ला औरंगजेबाकडे आला. सन १६९२मध्ये विशाळगडाचे काशी रंगनाथ सरपोतदार यांनी पन्हाळा परत घेतला. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर १७०१मध्ये याचा ताबा औरंगजेबाकडे गेला. या वेळी औरंगजेब पन्हाळ्यावर स्वतः उपस्थित होता.
त्या वेळी २८ एप्रिल रोजी इंग्रजांचा वकील सर विल्यम नॉरीस याने औरंगजेबाची गाठ घेतली. तेव्हा त्यांच्यात अत्यंत गुप्त वाटाघाटी झाल्या होत्या; पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. काही दिवसांतच रामचंद्रपंत अमात्य यांनी धनाजी व संताजी यांच्या साह्याने हा किल्ला पुन्हा छत्रपती ताराराणी बाईसाहेबांकडे आणला. १७०७पासून कोल्हापूर संस्थानची राजवट येथून सुरू झाली. सन १७८२मध्ये राजधानी पन्हाळ्यावरून कोल्हापूरला हलविण्यात आली.
थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला निसर्गनिर्मित आहे. चार दरवाजामार्गे कोल्हापूर बाजूने शहरातून वाहनाने थेट किल्ल्यावर जाता येते. वारणानगर मार्गही याच रस्त्याला येऊन मिळतो. तीन दरवाजामार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो. हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे.
वीर शिवा काशीद समाधी : चार दरवाज्याजवळच किल्ल्यात प्रवेश करताना दर्शन होते ते वीर शिवा काशीद यांच्या समाधीचे. (आता हा दरवाजा भग्नावस्थेत आहे.) शिवा काशीद हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसत होते. आपण सिद्दी जौहरच्या हाती पडल्यावर जिवंत राहणार नाही, हे माहीत असूनही आपल्या राजाच्या रक्षणार्थ शिवा काशीद यांनी धोका पत्करला व तोतया शिवाजी होऊन पालखीने सिद्दी जौहरची छावणी गाठली. ही गोष्ट सिद्दीच्या लक्षात येताच शिवा काशीद यांचे शीर धडावेगळे झाले. या बलिदानाला तोड नाही. शिवा काशीद अमर झाले. आपली मान येथे आदराने झुकतेच.
वीर बाजीप्रभू यांचा पुतळा : दोन हातात तलवार घेऊन आवेशाने लढण्याच्या पवित्र्यात असलेल्या बाजीप्रभूंच्या पुतळ्याचे दर्शन पुढे आल्यावर होते. शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने गेल्यावर बाजीप्रभूंनी घोडखिंडीत सिद्दीचे सैन्य थोपवून धरले होते. लढाई करीत असतानाच त्यांना वीरमरण आले. त्यांच्याबरोबर संभाजी जाधव (म्हणजे प्रसिद्ध धनाजी-संताजीपैकी धनाजीचे वडील) व फुलाजीप्रभू हे बाजीप्रभू देशपांडे यांचे बंधू यांनाही वीरमरण आले.
सोमाळे तलाव : गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. या मंदिराला महाराजांनी व त्यांच्या सहस्र मावळ्यांनी चाफ्याची लक्ष फुले वाहिली होती.
रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी : सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची समाधी रामचंद्रपंत अमात्यांची व बाजूची त्यांच्या पत्नीची आहे.
रेडे महाल : समाधीच्या बाजूला एक आडवी इमारत दिसते. त्यास रेडे महाल म्हणतात. वस्तुतः ही घोड्यांची पागा होती; मात्र त्यात नंतर जनावरे बांधत. म्हणून त्याला रेडे महाल म्हणत.
अंबरखाना : येथे पूर्वी बालेकिल्ला होता. याच्या सभोवती खंदक आहे. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे आहेत. सुमारे २५ हजार खंडी धान्य त्यात मावत असे. याशिवाय सरकारी कचेऱ्या, दारूगोळ्याची कोठारे आणि एक टाकसाळ येथे होती.
अंधारबाव : तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर तीन कमानीची, काळ्या दगडांची एक वास्तू दिसते. ही वास्तू तीनमजली आहे. सर्वांत तळाला पाण्याची खोल विहीर आहे, तर मधला मजला चांगला ऐसपेस आहे. त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो.
राजवाडा : हा छत्रपती महाराणी ताराबाईंचा वाडा असून, प्रेक्षणीय आहे. यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉइज हॉस्टेल आहे.
तीन दरवाजा : हा पश्चिमेकडील सर्वांत महत्त्वाचा दरवाजा. दरवाज्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. कोंडाजी फर्जंद यांनी येथूनच अवघ्या ६० मावळ्यांनिशी हा किल्ला जिंकला होता.
महालक्ष्मी मंदिर : राजवाड्याजवळील नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वांत प्राचीन मंदिर आहे. ते साधारण १००० वर्षांपूर्वीचे असावे, असे त्याच्या बांधणीवरून वाटते. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.
संभाजी मंदिर : ही एक छोटी गढी असून, येथे संभाजी मंदिर आहे.
धर्मकोठी : संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते, ती धर्मकोठी. येथून गरिबांना दानधर्म केला जात असे. सरकारमधून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.
सज्जाकोठी : राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते. ही कोठी इब्राहिम आदिलशाह यांनी सन १५००च्या सुमारास मुघल शैलीत बांधली. याच इमारतीत संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी स्थानबद्ध केले होते. महाराजांच्या मृत्यूची बातमी येताच ते येथूनच निसटले व रायगडाकडे गेले होते. शिवरायांची गुप्त खलबते येथेच चालत.
राजदिंडी : पश्चिम बाजूने ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजीमहाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटले. म्हणून याला राजदिंडी असे नाव पडले. येथून ४५ किलोमीटर अंतरावरील विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाज्यातून महाराज विशाळगडावर पोहोचले.
पाराशर गुहा : या ठिकाणी महर्षी पाराशर यांचा निवास होता, असे सांगतात. करवीर पुराणात यांचा उल्लेख पन्नगालय म्हणजे सर्पांचे निवासस्थान असा येतो. महाराष्ट्राचे आद्यकवी मोरोपंत यांनी येथेच त्यांचे काव्यलेखन केले, असेही सांगितले जाते.
तबक उद्यान : नगरपालिकेचा दर्जा मिळाल्यावर (सन १९५४) पन्हाळ्यावर बगीचे विश्रामगृह, तबक उद्यान, नेहरू उद्यान, नागझरी ही ठिकाणे विकसित करण्यात आली आहेत. तबक उद्यान वनखात्याच्या अखत्यारीत असून, शासनाने विकासाकरिता ८२ लाख ७८ हजार रुपये मंजूर केले आहेत.
पन्हाळ्यावरील आकर्षक बंगले : लता मंगेशकर यांचा कलात्मक बंगलाही पन्हाळ्यावर आहे. या बंगल्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या वरील मजल्यांवरील कोणत्याही खोलीच्या दरवाजातून खाली असलेल्या गणेश मंदिरातील मूर्तीचे दर्शन होते. अर्थात हा बंगला पर्यटकांसाठी खुला नाही. बाहेरून बघता येतो. कोल्हापुरातील अनेक उद्योगपती, सिने कलावंत यांचे बंगले पन्हाळ्यावर आहेत. येथे चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण सतत चालू असते.
जोतिबा : वाडी रत्नागिरीजवळील जोतिबा मंदिर पन्हाळा किल्ल्याच्या बाजूसच आहे. हे महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कोल्हापूरला, पन्हाळ्याला येणारा प्रवासी येथे भेट देतोच.
पौराणिक कथेनुसार, श्री जोतिबा अथवा केदारेश्वर हे बद्रिकेदारचेच रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नीचा क्रोधांश या सर्वांचा मिळून एक तेजो:पुंज अवतार म्हणजेच केदारनाथ किंवा जोतिबा! ‘जोतिबा’ या नावाची उत्पत्ती ‘ज्योत’ या शब्दापासून झाली असून, ज्योत म्हणजे तेज, प्रकाश! वायू, तेज, आप (पाणी), आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी ‘तेजाचे’ शक्तिदैवत म्हणजेच वाडी रत्नागिरी जोतिबा! पौगंड ऋषींच्या वंशाला दिवा नव्हता. त्यांनी तपश्यर्या करून बद्रिनाथांना संतुष्ट केले. बद्रिनाथांनी पौगंड ऋषींना त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्माला येण्याचे वचन दिले. त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्ठीयुक्त सप्तमीच्या दिवशी रविवारी सूर्योदयाला विमलांबुजेच्या ओंजळीत नाथ, ज्योती रूपात प्रकटले. पुढे विमलांबुजेचा भाव जाणून आठ वर्षांचे बटू म्हणून प्रकटले, अशी एक कथा आहे.
आणखी एका कथेप्रमाणे रत्नासूर आणि कोल्हासूर या राक्षसांनी लोकांवर अत्याचार सुरू केला होता. करवीरवासीयांना या दैत्यांचा त्रास होत असे. म्हणून देवी महालक्ष्मीने केदारनाथांचा धावा केला. तेव्हा केदारनाथांनी जोतिबाचे रूप घेऊन त्यांचा नायनाट केला. ११ दिवसांच्या घनघोर संग्रामानंतर श्री जोतिबांनी श्री चर्पटअंबेच्या म्हणजेच चोपडाईच्या साह्याने रत्नासुराचा त्रिशुळाने वध केला. तेव्हा लोकांनी आनंदाने ‘चां ऽ ऽ ग भलं - चां ऽ ऽ ग भलं’ असा एकच जयघोष केला. तेव्हापासून भक्तगण ‘जोतिबाच्या नावानं ‘चां ऽ ऽ ग भलं - चां ऽ ऽ ग भलं’ असा गजर करू लागले.
जोतिबास ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही संबोधले जाते. जोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते, त्या ठिकाणी पूर्वी छोटेसे देवालय होते. हे मूळ मंदिर कराडनजीच्या किवळ येतील नावजी नामक भक्ताने बांधले. त्यानंतर आजचे जे देवालय आहे, ते इ. स. १७३०मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधले. हे मंदिर हेमाडपंती, मराठा शैलीत असून, त्याचे बांधकाम उत्तम प्रतीच्या काळ्या बेसॉल्ट दगडात करण्यात आले आहे. मंदिर ५७ फूट लांब, ३७ फूट रुंद असून, त्याच्या शिखराची उंची ७७ फूट आहे.
केदारेश्वराचे मंदिर खांबांच्या आधाराशिवाय असून, ते इ. स. १८०८मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले. मंदिराची लांबी ४८ फूट असून, रुंदी २२ फूट आहे, तर शिखर ८९ फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर पाषाणाचे दोन नंदी आहेत. जवळच असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम १७८०मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराची लांबी १३ फूट, रुंदी १३ फूट असून, शिखर ४० फूट उंच आहे. या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर असून, या मंदिराचे बांधकाम १७५०मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मतबहादूर यांनी केले आहे. या देवळांपासून थोड्या अंतरावर यमाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम १७५०मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची दोन तीर्थे असून जवळच सहा कुंडे व दोन विहिरी आहेत. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले. तळापासून शिखरापर्यंत ‘रथपट्ट’ पद्धतीची साधी नक्षी आहे.
चौथे रामेश्वराचे देवालय. हे इ. स. १७८०मध्ये मालजी निकम, पन्हाळकर यांनी बांधले. देवालयाच्या भिंतीवर पाच-सहा ठिकाणी वीरगळही बसविले आहेत. श्री केदारनाथाने जोतिबा डोंगराभोवती बारा ज्योतिर्लिंगे स्थापन केली. म्हणून त्यांना ‘ज्योतिर्लिंग’ असेही म्हणतात. बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करताना त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या मूळ अवतीर्ण ठिकाणाचे स्मरण म्हणून हिमालयातील केदारेश्वर लिंग स्थापन केले. म्हणून त्यांना केदारलिंग असेही म्हणतात.
जोतिबाच्या यात्रेत पन्नासहून अधिक छोट्या-मोठ्या सासनकाठ्या येतात. यामध्ये पहिला सासनकाठीचा मान सातारा जिल्ह्यातील निनाम गावाचा असतो. या पाडळी (निनाम) गावचे भक्त सासनकाठी घेऊन १०० किलोमीटरहून जास्त अंतर चालत वाडी रत्नागिरीपर्यंत येतात. सासनकाठीचा वाडी रत्नागिरी ते पाडळी (निनाम) हा प्रवास सुरू असताना सासनकाठीचे त्यावरील श्रीफळाची तोरणे, धन, हारतुरे इत्यादींसह वजन ३०० किलोहून जास्त असते. सासनकाठी म्हणजे ३० ते ३५ फूट उंचीच्या बांबूला पांढरी व तांबडी पागोटी एकाआड एक तिरपी गुंडाळलेली असतात. काठीच्या टोकाला गंगावनाचे काळे किंवा पांढरे झुपके बांधलेले असतात. या बांबूच्या तळापासून चार ते पाच फूट उंचीवर आडवी फळी घट्ट बांधलेली असते. ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात. या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताणून लोक उभे असतात. या फळीवर घोड्याची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते. पूर्वी जोतिबा देवस्थानास शिंदे सरकारांकडून अनुदान मिळत असे. सध्या इनामी गावांच्या उत्पन्नातून, तसेच यात्रेकरूंच्या देणगीवर देवस्थानचा खर्च भागविण्यात येतो.
वारणानगर : सहकारी क्षेत्रातील अग्रणी ठिकाण म्हणून याचा उल्लेख होतो. दिवंगत तात्यासाहेब कोरे यांनी उभारलेल्या या कारखान्याच्या वटवृक्षाखाली अनेक संस्था कार्यरत आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, मिलिटरी अकॅडमी, औद्योगिक प्रशिक्षण असे अनेक प्रकारचे शिक्षण येथे मिळते. वारणेचा वाद्यवृंद सर्वत्र प्रसिद्ध आहे. वारणेचे दूध साखरेबरोबर पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र जाते. एकाच ठिकाणी असलेली विविध शैक्षणिक संकुले, विद्यार्थ्यांना सर्व कलांचे शिक्षण देणारे हे एकमेव ठिकाण आहे.
पावनखिंड : पन्हाळ्याहून विशाळगडला जाताना ही खिंड लागते. शिवप्रेमी पदभ्रमण करीत या मार्गाने जातात. शिवचरित्रामध्ये अनेक लढायांचा समावेश आहे आणि प्रत्येक लढाई वीरश्री आणि बलिदानाने गाजली आहे. घोडखिंडीची लढाई ही बाजीप्रभू यांच्या पराक्रमाने इतिहासात उल्लेखली जाते. त्या वेळी त्यांचे बंधू फुलाजी प्रभू, संभाजी जाधव (धनाजी जाधवांचे वडील) यांनाही वीरगती प्राप्त झाली. या बलिदानामुळे घोडखिंडीस ‘पावनखिंड ‘ असे नाव पडले. बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातील पिढीजात देशपांडे होते. बाजीप्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य लढ्यात ते सहभागी झाले. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.
विशाळगड- खेळणा : पन्हाळा ते पावनखिंडीमार्गे विशाळगड हा एक पदभ्रमंतीचा मार्ग आहे. शिवचरित्रात बाजीप्रभूंच्या बलिदानाने याला महत्त्व प्राप्त झाले. या किल्ल्याची उभारणी इ. स. १०५८मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. हा गड किल्ले खेळणा या नावानेदेखील ओळखला जातो. इ. स. १४५३च्या सुमारास बहामनी राज्याचा एक सुभेदार मलिक उत्तुजार याने हा किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला. किल्लेदार शिर्के व शंकरराव मोरे यांनी गनिमी काव्याने त्याला पराभूत केले. मलिक उत्तुजार याच्या सैन्यातील एक सरदार मलिक रैहान होता. त्याचीच कबर विशाळगडावर असावी, असे जाणकारांचे मत आहे. शिवाजी महाराजांनी इ. स. १६५९मध्ये हा किल्ला जिंकला व याला विशाळगड हे नाव ठेवले. पुढे शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांनी विशाळगडावर बराचसा काळ व्यतीत केला. त्यांनी या किल्ल्याची डागडुजी, तसेच पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष दिले. गडावर वीररत्न बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे यांची समाधी आहे.
आंबा गाव : कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर आंबा घाटाच्या आधी हे गाव आहे. चहाच्या लागवडीचा येथे प्रयोग चालू आहे व तो यशस्वी होईल अशी आशा आहे. महाराष्ट्रातील चहाचे मळे येथे पाहायला मिळतील. पर्यावरणदृष्ट्या जैवविविधतेने संपन्न आणि प्रसिद्ध असलेल्या पश्चिम घाटामध्ये आंबा हे गाव आहे. थंड हवा आणि निसर्गरम्य परिसर यामुळे हे गाव पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे. गावातील बहुतेक लोकांचा शेती हा व्यवसाय आहे. बरोबरीने पर्यटनउद्योग वाढीला लागला असून, अनेक लोक रिसॉर्टमध्ये काम करतात. काही गावकऱ्यांची स्वत:च्या मालकीची रिसॉर्ट आहेत.
आंबा आणि परिसरातील जंगलात आंबा, जांभूळ, पायर, कदंब, दालचिनी, आवळा, हिरडा, बेहडा, कडुनिंब, बकुळ, कुंकूफळ, आळू, सुरू, साग, बांबू, तोरण, कुंभा, कोकम, कटक वृक्ष, कुड्याचे चांदकुडा, पांढरा कुडा, कृष्ण कुडा, नागल कुडा हे प्रकार, राळधूप, सीतेचा अशोक, काळा उंबर, भुई उंबर, साधा उंबर आवळा इत्यादी वृक्ष आहेत. करवंदाच्या जाळ्याही मोठ्या प्रमाणावर आहेत.
या भागातील जंगलात बिबट्या, शेकरू, गवे, ससे, अजगर, साप, खार इत्यादी प्राणी आढळतात. तसेच या परिसरातील जंगलात शिपाई बुलबुल, लाल बुडाचा बुलबुल, खाटीक, वेडा राघू, घार, कापशी घार, ब्राह्मणी घार, मलबार धनेश, मोठा भारतीय धनेश, सर्पगरुड, स्वर्गीय नर्तक, हरीयल, रानकोंबडा, ब्राह्मणी मैना, काडीवाली पाकोळी, टिटवी इत्यादी पक्षी आढळतात. पायरच्या झाडाला फळे आली, की मोठे भारतीय धनेश हमखास जंगलातून गावात फळे खाण्यासाठी येतात. भारतीय पिट्टा उर्फ नवरंग, ब्लॅकबर्ड, धोबी हे स्थलांतरित पक्षीसुद्धा आढळतात. हा भाग विविध प्रकारच्या वनस्पतींनी समृद्ध असल्यामुळे येथे असंख्य जातींची फुलपाखरे आढळतात. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू असलेले ‘ब्ल्यू मॉरमॉन’ हे आकाराने बरेच मोठे असलेले आणि सुंदर फुलपाखरूसुद्धा येथे आढळते.
कसे जाल या परिसरात?
रत्नागिरी-कोल्हापूर, तसेच महामार्गाने वडगाव, वारणानगरमार्गे येथे जाता येते. जवळचे विमानतळ व रेल्वे स्टेशन कोल्हापूर. पन्हाळ्यावर मुक्कामासाठी भरपूर हॉटेल्स आहेत. तसेच कोल्हापूरला मुक्काम करूनही ही ठिकाणे बघता येतात.