पुणे : माती व पाण्याशिवाय केवळ हवेतील प्राणवायूवर केल्या जाणाऱ्या शेतीचे ‘एरोपोनिक्स’ हे नवीन तंत्रज्ञान अमेरिकेतील ‘नासा’ संस्थेने मंगळावर शेती करण्यासाठी विकसित केले आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी पुण्यात शिकणारी शेतकऱ्यांची पाच मुले दुबईला जात आहेत. गणेश अहेर, सौरभ चौधरी, अबूबाकर शेख, मदिपल्ली अखिल, गोपीकृष्ण रेड्डी अशी त्यांची नावे असून, ते प्रोलर्न इंडिया संस्थेचे विद्यार्थी आहेत.
दुबईतील अॅरो फ्रेशफार्म संस्थेमध्ये एक वर्षभर ते या तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणार असून, त्यानंतर त्यांना तिथेच प्रत्यक्ष नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. प्रोलर्न इंडिया शिक्षण संस्थेचे संचालक नितीन ठाकूर यांच्यासह हे पाच विद्यार्थी लवकरच दुबईला रवाना होत आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना प्रोलर्न इंडिया संस्थेचे संचालक नितीन ठाकूर म्हणाले, ‘हवेत धुक्याचे प्रमाण असणाऱ्या वातावरणात मातीशिवाय व पाण्याशिवाय ही शेती करता येते. यूएईमधील (युनायटेड अरब अमिराती) एरोपोनिक्स हा सर्वांत मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यात भारतीय व महाराष्ट्रातील बळीराजाच्या सुपुत्रांना सहभागी होण्याची संधी मिळत आहे, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. दुबईमध्ये पहिल्यांदाच येऊ घातलेले एरोपोनिक्स हे तंत्रज्ञान आपल्याकडेही विकसित करण्याची सुवर्णसंधी आमच्या पाच विद्यार्थ्यांना मिळाली आहे. त्या अर्थाने कृषी पदवीधरांसाठी परदेशी प्लेसमेंटमधली ही एक मोठी झेप म्हणावी लागेल. आमची संस्था कृषी पदवीधर विद्यार्थ्यांना प्रगत देशात पाठवून नवनवीन कृषी तंत्रज्ञान शिकण्याची संधी देते. कृषी पदवीधर विद्यार्थ्यांना प्रगत देशात प्रशिक्षण घेण्याची व कृषी तंत्रज्ञान शिकणे यातून शक्य होते.

ठाकूर पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपुढे दुष्काळ, पाणीटंचाई यांच्यासारखे ज्वलंत प्रश्न उभे असताना रोज निसर्गाशी झुंज द्यावी लागते. त्यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने मात करण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. माती व पाण्याशिवाय केवळ हवेतील प्राणवायूच्या माध्यमातील शेती हे नवीन तंत्रज्ञान असून, त्याचा महाराष्ट्रातील व देशातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी आम्ही हे पहिले पाऊल उचलत आहोत.’
‘प्रोलर्न इंडिया संस्थेचा अमेरिका, इस्रायल, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड आणि डेन्मार्क या देशांशी शैक्षणिक करार झाला असून,आतापर्यंत ५५ विद्यार्थ्यांना अमेरिका आणि इस्रायल या देशांमध्ये प्रगत डेअरी तंत्रज्ञान, हॉर्टिकल्चर आणि पोल्ट्री (कुक्कुटपालन) अशा क्षेत्रात ‘कमवा आणि शिका’ या उपक्रमांतर्गत वर्षभर प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे,’ असेही ठाकूर यांनी नमूद केले.