पिंपरी : ‘देशभरात विखुरलेला सिंधी समाज एकत्रित यावा, तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून द्यावे, तसेच मोबाइल-इंटरनेटच्या जाळ्यात न अडकता मैदानावरील खेळण्याला प्राधान्य द्यावे यासाठी आयोजित केली जाणारी सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा यंदा दोन डिसेंबर ते १८ डिसेंबर २०१९ या कालावधीत पिंपरी येथे रंगणार आहे. पिंपरी येथील एमसीसी, मृणाल क्रिकेट ग्राउंडवर या क्रिकेट स्पर्धा होणार असून, त्याचे फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपण होणार आहे. या स्पर्धेतून मिळालेला निधी समाजोपयोगी आणि विधायक कामासाठी देण्यात येणार आहे,’ अशी माहिती कन्वल खियानी, हितेश दादलानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी कमल जेठानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण अस्वाणी, अवि तेजवानी, अवि इसरानी, रवी दर्यानी आदी उपस्थित होते.
हितेश दादलानी म्हणाले, ‘पिंपरी चिंचवडमधील विविध क्षेत्रातील उदयोजक तरुणांनी एकत्र येऊन या क्रिकेट लीगचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन दोन डिसेंबर रोजी माजी रणजी क्रिकेटपटू कैलास घटानी, उद्योजक राजेश उत्तमचंदानी आणि रोहित गेरा यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी खेळाडू, संघ मालक आणि विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. ही स्पर्धा देशभरातील सिंधी समाजापर्यंत पोहोचवायची आहे. ‘सिंधी फक्त व्यवसायापुरतेच मर्यादित आहेत’ हा समज खोडून काढावा यासाठीही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत.’
कन्वल खियानी म्हणाले, ‘गेल्या वर्षी या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात खेळाडूंकडून प्रतिसाद मिळाला होता. फेसबुकवर जवळपास ५१ हजार लोकांनी ही स्पर्धा पहिली. त्यामुळे यंदा होत असलेल्या स्पर्धेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून, पुणे आणि लगतच्या भागातून मोठ्या प्रमाणात खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. ‘आयपीएल’च्या धर्तीवर या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. स्पर्धेच्या उद्घाटनादिवशी प्रत्येक खेळाडूने आपल्या सात वर्षांखालील मुलांनाबरोबर घेऊन येणे बंधनकारक करण्यात आले आहे, जेणेकरून संपूर्ण कुटुंब या स्पर्धेत सहभागी होईल. त्यातून याला क्रीडा महोत्सवाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. आपली संस्कृती साजरी करणे आणि त्याचा प्रसार करणे हेही यामुळे साध्य होणार आहे. त्यातून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वंचितांच्या शिक्षणासाठी, विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य केले जाणार आहे. तीन सामाजिक संस्थांना प्रत्येकी ५१ हजार रुपये देणगी दिली जाणार आहे.’
या स्पर्धेतील प्रत्येक संघाचे नाव सिंधी समाजाशी आणि संस्कृतीशी निगडित आहे. मस्त कलंदर (गीता बिल्डर्स, मयूर तिलवानी), सुलतान ऑफ सिंध (आशुतोष चंदीरमणि, चंदीरमणि असोसिएट्स), मोहेंजोदरो वॉरियर्स (मिलेनियम सेमीकंडक्टर, हरीश अभिचंदानी), सिंधफूल रेंजर्स (अनूप झमटानी, झमटानी ग्रुप), एसएसडी फाल्कन (विकी सुखवानी, सुखवानी लाइफस्पेस), इंडस डायनामॉस (सुमित बोदानी, शगुन टेक्सटाईल), दादा वासवानीज ब्रिगेड (अनिल अस्वाणी, अस्वाणी प्रमोटर अँड बिल्डर), झुलेलाल सुपरकिंग्ज (पियुष जेठानी, जेठानी ग्रुप), हेमू कलानी ग्लॅडिएटर्स (बिपिन डाखनेजा, ट्रिओ ग्रुप), गुरुनानक नाइट्स (प्रकाश रामनानी, पीव्हीआर टाईल्स वर्ल्ड), संत कंवरम रॉयल्स (राहुल लाडकानी, व्हीआरए रोहित सेल्स), आर्यन युनायटेड (राजीव मोटवानी, रोहित इन्फ्रा) अशी या संघांची नावे आहेत. स्पर्धेत १२ संघ असून, १५१ खेळाडूंची नोंदणी झालेली आहे.