Ad will apear here
Next
‘माणूस हा सारखं शिकवावं लागणारा प्राणी’ (गिरीश प्रभुणे विशेष मुलाखत - २)
‘ग्रामायण’साठी काम करता करता अनेक चांगले बदल घडून आले. नंतर हळूहळू ‘पारधी’ हा विषय पुढे आला आणि नंतर भटके विमुक्त विकास परिषदेची स्थापना झाली.... ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या आरती आवटी यांनी घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीचा हा दुसरा भाग...
.................
‘ग्रामायण’साठी काम करतानाच्या काही अनुभवांबद्दल सांगा. त्यातूनच पुढे ‘पारधी’ हा विषय कसा सुरू झाला?

गिरीश प्रभुणे : पाणलोटाच्या क्षेत्रात रोप लावलं, बी लावलं, की काही दिवसांत झाड फोफावतं; पण माणसाचं तसं नाही. ज्या झाडाचं बी घेतलं, त्या झाडाला त्याच जातीचं फळ येतं. तितकंच मधुर. माणसाचं वेगळं आहे. याला शिकवलं, म्हणजे त्याचा मुलगा आपोआप शिकेल, असं नाही. त्यालाही शिकवावं लागतं. त्याला जन्मापासून सर्व द्यावं लागतं. मनुष्य हा जगातला एकमेव प्राणी असा आहे, की त्याला सतत शिकवावं लागतं. कुत्र्याचं पिल्लू कुत्रा बनतं, सापाचं पिल्लू साप बनतं. म्हणजे प्राण्यांमध्ये आपल्या आई-बापाचे गुणधर्म आहेत पिल्लांमध्ये आपोआप येतात. माणसामध्ये आई-वडिलांचे गुणधर्म त्याच्या मुलांमध्ये बिलकुल येत नाहीत. ते शिकवले, त्याला संस्कार दिले तरच येतात. आणि त्यामुळे हे सतत करण्याचं काम आहे. या पिढीत केलं, तर पुढची पिढी तशी होईल म्हणाल, तर तसं नाही. पुढची पिढी बिघडणार. आणि म्हणून शिक्षणाची रचना प्राचीन काळापासून आहे. 

नामांतराच्या चळवळीमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा घटक होता, बौद्ध मंडळी, वडार मंडळी. मी प्रामुख्याने त्यांच्याच बरोबर काम करत होतो. त्यांचे पुढारी यायचे, बघायचे आणि मग त्यांना फितवायचे, ‘अरे हे काय हे पुण्याचे संघवाले आहेत. बामणं आहेत.’ कारण आमच्या ग्रुपमध्ये सर्व विचारांची लोकं असली, तरी सुदैवाने म्हणा, की दुर्दैवाने म्हणा, कशानेही म्हणा, समाजवादी, कम्युनिस्ट, संघ आणि काँग्रेस या सगळ्या विचारातले जे होते, ते एका विशिष्ट जातीतलेच म्हणजे सगळे ब्राह्मणच होते. त्यामुळे कुणीही आला, कुठल्याही विचारांचा आला, तरीसुद्धा त्याला ते ‘बामणं’ समजायचे, ‘संघवाला’ समजायचे आणि ‘जातीयवादी’ समजायचे. म्हणजे त्यांना कशातला फरकच कळत नसे. त्यातून त्यांना हळूहळू लक्षात आलं, की हे काम वेगळं आहे. संघ काही तरी वेगळा आहे, हिंदुत्ववाद वेगळा आहे. म्हणजे आधीच्या जयंत्या, पुण्यतिथ्यांमध्ये सतत शिवीगाळ असायची, ती नंतर कमी झाली. मग तिथे प्रकाश आंबेडकर आले, रामदास आठवले येऊन गेले, शंकरराव खरात येऊन गेले, रा. सु. गवई येऊन गेले, दलितांचे जेवढे पुढारी आहेत, ते सगळे येऊन गेले. निमगाव माडुंगे जलप्रकल्प म्हटलं, की सगळे म्हणायचे ‘वेगळं आहे,’ सर्व कौतुक करायचे. याचं कारण असं, की बाबा देवलांचा महिसाळचा जो प्रकल्प होता, तिथे त्यांनी हे सर्व ‘प्रयोग’ केलेले होते. 

आम्हाला हे प्रयोग करत असताना सर्वांना सांभाळून घेणं आणि त्याप्रमाणे काम यशस्वी करणं शक्य झालं होतं. या अनुभवातून, त्याच्या आधीची ३०-३५ वर्षं जे शिकलो, त्या काळात आणि शालेय जीवनामध्ये जे शिकायला मिळालं नाही, तेवढं सगळं मला या या कालावधीत शिकायला मिळालं. मानवी संबंध, जातीजातीतले संबंध, बी-बियाणं, नियोजन, नियोजनाकरिता काय करावं, इत्यादी इत्यादी. दुष्काळ होतेच. त्या गावामध्ये पाणी भरपूर आलं, पीक चांगलं आलं, तरीसुद्धा लोक तिथं जाताना तलाठ्याला पैसे देणार. सांगणार, की ‘नाही नाही आठ आणे लावू नको, चार आणे वारी लाव.’ चार आणे वारी लावली की, गावात दुष्काळ आहे हे कळतं, सरकारी योजना मिळतात. म्हणजे खोटी आकडेवारी जमा होऊन नियोजन मंडळाकडे जाते आणि मग प्लॅनिंग होतं. सर्व खेड्यापाड्यांमध्ये आणेवारी लावली जाईल, त्याच्या आधारावर दुष्काळ ठरवला जातो. त्याच्या आधारावर पाण्याचे टँकर, त्या आधारावर कामं, अशी भ्रष्टाचाराची एक साखळी आहे. त्यामुळे आम्ही विकास करत होतो; पण कागदोपत्री तो दिसत नव्हता. दुसरीकडे प्रस्थापित वर्ग, शासकीय सेवेतला आणि गावातला, सगळा जसाच्या तसाच. त्याच्यात बदल करण्याची कुठली यंत्रणा नाही. या सगळ्याच्यात बदल करायचा असेल, तर पुन्हा मुळातून काहीतरी केलं पाहिजे, हा विचार आला. 

मग संघाच्या बैठका, समरसता मंचाच्या बैठका, ‘ग्रामायण’च्या बैठका, यातून आम्ही ते मांडायचो. हे आपलं काम आहे. जमीन सुधारते, माणसं नाही सुधारत. आणि म्हणून जमिनीवर काम केलं, ती हिरवीगार झाली. पाणी अडवलं, पाणी अडलं. राळेगणचा तोच अनुभव. तिथे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ केलं. गाव, शिवार सगळं हिरवंगार झालं. दुसरी पिढी गावात नाही राहिली. ती शहराकडे गेली. यासाठी काय करणार आपण? त्याला काही उपाय नाही? म्हणून मग शासनाकडे काही मांडणी करणं, शासनानं काही योजना आखणं, असं सगळं सुरू झालं. योजना म्हणजे, मुंबईत सरकारने प्रवेश बंद करावा, शहरात प्रवेश बंद करावा. झोपडपट्ट्यांना नंबर द्यावेत. सध्या जेवढी कुटुंबं आलेली आहेत, त्यात नवीन कुणाला येऊ देऊ नये, असे काही बदल शहरी कायद्यात नव्याने झाले. तरी शहराकडचा ओघ काही थांबला नाही. हळूहळू ‘ग्रामायण’ची गरज संपली. शासनानं पाणलोटाचे कार्यक्रम स्वीकारले, शासनानं वनीकरण स्वीकारलं, शासनानं महिला विकासाच्या योजना स्वीकारल्या. महिला हळूहळू ग्रामपंचायतीमध्ये येऊ लागल्या. म्हणजे वीस वर्षापूर्वींचा खेडेगावातला जो मागासलेपणा होता, तो सुधारला. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याच वेळेला सामाजिक समरसता मंचाची स्थापना झालेली होती. समरसता मंचाच्या एका बैठकीत असं ठरलं, की आता आपण अशी कामं करावीत, की दोन जाती, सगळ्या जाती-जातींमधील जे भेदभाव आहेत, ते कमी होतील. मग त्यातून भटक्या-विमुक्तांमध्ये काम करावं, असंही ठरलं. मी निमगावला असताना, पारधी, वडार, कैकाडी, गोसावी, गोंधळी अशा वेगवेगळ्या जातींमध्ये (प्रामुख्याने बौद्धांव्यतिरिक्त) कामं केली. त्यामुळे मला त्यातला अनुभव होता. माझ्या मांडणीमध्ये, अनुभवातून, सांगण्यामध्ये सतत त्या कामाचे उल्लेख यायचे. पोलीस स्टेशन, कायदे अशा सगळ्याची माहिती झाली होती. त्यामुळे असेल कदाचित, हे काम/ही जबाबदारी माझ्याकडे आली. आणि मग तो ‘पारधी’ हा विषय सुरू झाला. म्हणजे भटके विमुक्त विकास परिषदेची स्थापना झाली. भटके विमुक्त विकास परिषदेची स्थापना १९९० साली डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीच्या निमित्ताने झाली. ती करत असताना एकदम पारधी हा विषय काही आला नव्हता. काही तरी काम करावं, कसं करावं, काय करावं, असा तोपर्यंत थोडासा संभ्रमाचाच विषय होता.

भटके विमुक्त विकास परिषद सुरू करावी ही कोणाची कल्पना होती?

गिरीश प्रभुणे : संघामध्ये दोन प्रकारची कामं सुरू झाली होती. महिलांची कामं ९० साली सुरू झाली होती. सामाजिक समरसता मंच सुरू होऊन जवळपास सात-आठ वर्षे झाली होती. आणि असं लक्षात आलं होतं, की केवळ या कामांनी भागत नाही, तर जो अधिक वंचित घटक आहे, त्यासाठीही वेगळे काम आवश्यक आहे. त्याच वेळेला लक्ष्मण मानेंची चळवळ चालू होती. ‘उपरा’ प्रसिद्ध झालेलं होतं. ‘उचल्या’ प्रसिद्ध झालेलं होतं. आणि प्रामुख्याने ख्रिश्चनीकरण किंवा इस्लामचं आक्रमण... या मुस्लिम होणाऱ्या जमातींमध्ये भटकणाऱ्यांचं प्रमाण जास्त होतं. तेव्हा म्हटलं, की आपण भटके-विमुक्तांमध्ये काम करावं. इथे तर परिषदेच्या नावापासूनच सुरुवात होती. त्या वेळी दामूअण्णा दाते, दादा इधाते, रमेश पतंगे, नामदेवराव धाडगी, मोहनराव गवंडी अशी मंडळी होती. आम्ही सगळे बसून चर्चा करत होतो, की हे भटक्या विमुक्त जाती जमाती अशा प्रकारचं नाव घ्यावं का? पण भटकी, भटक्या हा शब्दप्रयोगही जरा चुकीचा आहे. कारण मग ‘भटकी’ म्हणावं, तर भटकी कुत्री असा शब्दप्रयोग तयार होतो. ‘भटक्या’ म्हणावं, तर तेही उपेक्षित झालं. मग ‘भटके’ असं ठरलं.... भटके विमुक्त विकास परिषद. भटक्या जमाती, विमुक्त म्हणजे गुन्हेगार जमाती आणि मग या सगळ्यांचा विकास करायचा, अशा प्रकारे त्याची चर्चा होत गेली. भटके विमुक्त विकास परिषदेची स्थापना झाली. दादा इदाते त्याचे अध्यक्ष होते. मग संपूर्ण महाराष्ट्रातली गावं, ४२ जाती-जमातींमध्ये काम करायचं ठरलं. ते कसं करायचं, त्यांना कुठे शोधायचं याबद्दल चर्चा झाली. मग माझ्याकडे काम दिलं. मला त्यातला जेवढा अनुभव या निमगावचा होता, त्या पुरचुंडीवरती मी ते सुरू केलं. संघटनमंत्री अशी जबाबदारी माझ्याकडे होती; पण संघटनमंत्री म्हणजे काय? अन्य संघटनांमध्ये काही ना काही तरी संघटित समाज असतो. बाकीच्यांना एकत्रित करायचं. इथं जायचं तर हे म्हणणार ‘तुम्ही कोण?’ माझा पहिला अनुभव असा होता. 

मी पुण्यात वेगवेगळ्या व्याख्यानांना जायचो. लक्ष्मण माने एका कार्यक्रमाला पुण्यामध्ये आले होते. तिथे मी जाऊन भेटलो. भटके विमुक्त विकास परिषदेचं असं असं काम माझ्याकडे आहे, असं सांगितलं. म्हणाले, ‘नाव काय तुमचं?’ म्हटलं, ‘गिरीश प्रभुणे.’ ‘तुम्ही करूच शकत नाही काम.’ ‘का नाही करू शकत?’ तर म्हणाले, ‘जातीकरिता माती खावी लागते.’ आता मला काही कळेना, जातीकरिता माती का खावी लागते? मातीचा काय संबंध? नंतर आलं लक्षात, माती खाणं किती कठीण आहे ते. ते म्हणाले, ‘तुम्ही करणारच नाही, पळून जाल. आणि तुम्ही काम करणार म्हणजे काय?’ मी म्हटलं, ‘मी संघाचा स्वयंसेवक आहे, कामाचा अनुभव आहे.’ मग तर म्हणाले, ‘बिलकुलच शक्य नाही. जातीयवादी संघटना आहे ती.’ त्यांनी खूप निर्भर्त्सना केली आमची. म्हटलं, ‘ठीक आहे.’ दहा वर्षांनंतर माझी आणि लक्ष्मण मानेंची पुन्हा भेट झाली. त्यांनी लेख लिहिला होता एके ठिकाणी. यमगरवाडीचं काम सुरू झालं होतं. अनेक आंदोलनं झालेली होती. ते ज्या स्तरापर्यंत पोहोचले होते, त्यापेक्षाही कितीतरी स्तरापर्यंत आत पोहोचलो होतो आम्ही. त्यांच्या एका कार्यक्रमाला मी गेलो होतो लातूरला. एका उद्यानात मोठी बैठक होती. मी आपला सगळीकडेच जात असतो. त्यामुळे त्याही कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांनी तिथे जाहीररीत्या उल्लेख केला, ‘संघाचे लोक बघा, यमगरवाडीला कसं काम सुरू केलं आहे. आपण ३०-४० वर्षं एक चळवळ करतो; पण आपण एक काम नाही उभं करू शकलो. सरकारच्या मदतीशिवाय त्यांनी केलेलं आहे.’ म्हणजे एकेकाळी जो टीका करत होता, त्यांनी या सर्व कामाचा सन्मानपूर्वक उल्लेख केला होता. 

या दहा वर्षांच्या काळात देवदत्त दाभोळकर, प्रभाकर मांडे, असे अनेक जण आले. संघाची, हिंदुत्वाची विरोधक मंडळीही त्या ठिकाणी आली. त्यांनी हे सगळं बघितलं. मला जो अनुभव निमगावला आला, तोच इथं आला. ते म्हणाले, ‘हे कसं काय केलंत?’ मग त्यांना सांगितलं, हे कसं काय झालं आणि ही मुलं शिकायला का लागली! सरकारी आश्रमशाळा जवळपास २०० आहेत. भटक्या विमुक्तांच्या आणि आदिवासींच्या ३०० ते ४०० आहेत. म्हणजे महाराष्ट्रात अशा किमान ४०० ते ५०० आश्रमशाळा आहेत, की ज्यांना सरकारी अनुदान मिळतं. तरीसुद्धा केवळ चार वर्षांत ३००-३५० मुलं कुठेच नव्हती. एकाच जमातीची, पारधी जमातीची मुलं कुठेच नव्हती. टिकतच नाहीत. आणि इथे तर लोकं स्वतः आणून सोडत होती. मग त्यांना प्रश्न पडला, की हे काय आहे नेमकं? सुरुवातीला आम्ही सांगायचो, की इथे शाखा आहे संघाची. समितीची शाखा आहे यमगरवाडीला. शिवाय इथं आम्ही प्रातःस्मरण शिकवतो. मग हे प्रातःस्मरण काय? त्यात अगदी प्राचीन काळच्या ऋषी-मुनींपासून, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी अशा ३०० ते ४०० महापुरुषांची नावं आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी या कार्यक्रमात आहेत. त्या सगळ्या आम्ही त्यांना समजावून सांगतो. आम्ही फक्त आंबेडकरच सांगतो असं नाही, आम्ही सर्व काही सांगतो. शिवाय त्यांच्यामध्ये जे गुण आहेत.. म्हणजे पळण्याचे, शिकार करण्याचे, उंच उडी मारण्याचे, त्यांचा उपयोग कसा करता येईल, हे पाहतो. हे मारामारी करायला लागले, तर दगड, धोंडे अचूकपणे एकमेकांच्या डोक्यात घालतील. हाही त्यांचा एक गुण आहे. त्याचा उपयोग अन्यत्र करता येईल का, तो कसा करता येईल, त्याचा विचार केला. 

आम्ही आमची अभ्यास करण्याची एक पद्धत लावून घेतली. शाळा आहे; पण शाळेशिवायच्या अनेक गोष्टी आम्ही यांना शिकवायचं ठरवलं. आणि त्यातून आता ही सगळी विकासाची गंगा आलेली आहे. आणि त्यामुळे तुम्हाला जी प्रगती दिसते आहे ती आहे. पारधी कुटुंबंच्या कुटुंबं मुलं, महिला आणून इथं सोडतात. आता त्यांना विश्वास वाटायला लागला, की आपली मुलं इथं चांगली सुधारायला लागली आहेत. मग ती दुसरीकडे शाळेत का जात नाहीत? अन्य ठिकाणच्या शाळेत का जात नाहीत? तिथला शिक्षक हा केवळ त्या शाळेपुरता मर्यादित राहतो. इथला शिक्षक हा त्यांच्या पालापालापर्यंत जातो. इथला कार्यकर्ता हा त्यांच्या कोर्टकचेऱ्या, अत्याचार, अन्याय या सगळ्यापर्यंत जातो. त्यामुळे मुलगा, आई-वडील आणि सर्व अत्याचारितांशी ही शाळा, आमचा हा प्रकल्प जोडला गेलेला आहे. या सगळ्या आखणीमुळे, कामामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी या प्रकल्पाचा उल्लेख सर्वदूर व्हायला लागला आहे. 

(क्रमशः)
(ही मुलाखत २००८च्या सुमारास घेतलेली आहे. त्यामुळे स्थळ-काळाचे संदर्भ त्यानुसारच लक्षात घ्यावेत, ही विनंती.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZZJBQ
Similar Posts
‘आधुनिक आणि प्राचीन ज्ञानाचा संगम घालणारं गुरुकुल’ (गिरीश प्रभुणे विशेष मुलाखत - ५) ‘आपल्या प्राचीन परंपरेत विज्ञान होतं आणि ते घराघरापर्यंत गेलेलं होतं. घराशी विद्यापीठ जोडलेलं होतं. आता विद्यापीठात जाऊन शिकावं लागतं. मग लक्षात आलं, की इथे आपण ‘मेकॉले’ घेऊन चाललोय. आपण हे शिक्षण देणार आणि जाणार, त्याच्याऐवजी त्यांच्याकडे जे ज्ञानाचं भांडार आहे, त्याच्यात आपण आधुनिकतेची भर घालावी आणि
... आणि यमगरवाडी प्रकल्प सुरू झाला! (गिरीश प्रभुणे विशेष मुलाखत - ३) ‘यमगरवाडीत फिरून, त्यांच्या समस्यांवर उत्तरं शोधण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्यातूनच अनेक टप्प्यांनंतर मग यमगरवाडी प्रकल्प सुरू झाला. एकेक कार्यकर्ते घडत गेले आणि मग पारध्यांसह अन्य भटक्या समाजांसाठीही काम सुरू झालं....’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या आरती आवटी यांनी घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीचा हा तिसरा भाग
‘त्यांना’ स्थैर्य मिळालं...! (गिरीश प्रभुणे विशेष मुलाखत - ४) ‘भटक्या-विमुक्तांना स्थिर करण्यासाठी वसाहत उभी करायला सुरुवात झाली. नंतर लिखाण, गणिताचा संबंध नसलेल्या वेगवेगळ्या व्यवसायांच्या माध्यमातून ५० कुटुंबांतली तीस कुटुंब दहा वर्षं एका ठिकाणी स्थिर झाली....’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या आरती आवटी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा चौथा भाग..
असिधारा व्रताची सुरुवात (गिरीश प्रभुणे विशेष मुलाखत - १) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे भटक्या-विमुक्त समाजाच्या पुनर्वसनासह अनेक प्रकारचं समाजकार्य गेली अनेक वर्षं अहोरात्रपणे करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन २५ जानेवारी २०२१ रोजी त्यांना पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने, गिरीश प्रभुणे यांच्या कार्याची सविस्तर ओळख करून देणारी, Bytesofindia

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language