
नेपाळमधील राज्यघटना दिवसाच्या निमित्ताने नेपाळ सरकारच्या मालकीची वाहिनी असलेल्या ‘एनटीव्ही’ने अलीकडेच संस्कृत भाषेतील बातमीपत्राचे प्रक्षेपण करण्यास सुरुवात केली आहे. फ्रान्समध्ये संस्कृत हेरिटेज वेबसाइट तयार करण्यात आली आहे. विविध देशांनी संस्कृतच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा आणि भारताने त्याच्या मागोमाग जावे, हे काही बरे नाही. संस्कृतच्या पुनरुत्थानाचे प्रयत्न भारतातूनही व्हायला हवेत. मित्राने आपला पराभव करायला नको, हेच बरे!...........
‘आकाशवाणी’ म्हणजेच ‘ऑल इंडिया रेडिओ’ची सिग्नेचर ट्यून ही अनेकांच्या भावविश्वातील एक महत्त्वाचा घटक आहे. अगदी मनोहर आणि मनोवेधक म्हणता येईल अशी ही धून ही वॉल्टर कॉफमन नावाच्या एका जर्मन कलाकाराची देणगी! स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच ‘आकाशवाणी’साठी त्यांनी रचलेली ही सुरावट आजही कानांना तृप्त करते आहे, अनेकांचा दिवस या सुरावटीने सुरू होत आहे. याच वॉल्टर कॉफमन यांच्या नावे आणखी एक श्रेय नोंदलेले आहे, ते म्हणजे जगातील संस्कृतचे पहिले प्रक्षेपण सुरू करण्याचे!
दूरचित्रवाणी वाहिन्यांनी लोकांच्या मनावर राज्य करण्यापूर्वीच्या काळात नभोवाणी केंद्रांच्या कार्यक्रमांची जगावर सत्ता होती. त्यातील एक नभोवाणी केंद्र होते ‘डॉयट्शे वेले’ या संस्थेचे. आधी पश्चिम जर्मनीच्या व नंतर एकीकृत जर्मनीच्या सरकारचे प्रचाराचे साधन असणाऱ्या या केंद्राचे भारताशी विशेष नाते होते. या केंद्राला मिळणाऱ्या श्रोत्यांच्या पत्रांमध्ये, भारतातून येणाऱ्या पत्रांची संख्या कित्येक वर्षे सर्वाधिक होती.
‘डॉयट्शे वेले’ याचा अर्थ होतो ‘जर्मन तरंग.’ मॅक्सम्युलर, शॉपेनहाउएर आणि गोएथेच्या परंपरेला जागून या केंद्रावर २००४पर्यंत संस्कृतमधून कार्यक्रमांचे प्रसारण होत होते. संस्कृतमधून सादर होणाऱ्या या कार्यक्रमात संस्कृतविषयक घडामोडींची चांगली माहिती मिळत असे. या केंद्राचे हिंदीतील कार्यक्रम दररोज ४५ मिनिटे प्रसारित करण्यात येत असत, त्यातील दर पंधरवड्याला सोमवारी १५ मिनिटे संस्कृतच्या वाट्याला येत असत. त्यामुळे जगभरच्या संस्कृतप्रेमींना विविध विद्यापीठांमध्ये चालणारे संशोधन, विविध चर्चासत्रे आदींची माहिती मिळत असे. नव्या व्यापारी हिशेबांच्या काळात हे कार्यक्रम चालू ठेवणे ‘डॉयट्शे वेले’ला परवडेनासे झाले. त्यामुळे आधी संस्कृत आणि नंतर हिंदीतील प्रक्षेपण थांबविण्यात आले.
‘डॉयट्शे वेले’च्या हिंदी प्रसारणाला सुरुवात झाली १५ ऑगस्ट १९६४ रोजी. त्यानंतर तीन फेब्रुवारी १९६६ रोजी या केंद्रावरून संस्कृत कार्यक्रमांचे प्रसारण सुरू झाले. त्यामागे शफर यांनी केलेली शिफारसच होती. ‘डॉयट्शे वेले’च्या या उपक्रमाचे भारतात भरघोस स्वागत झाले. देशातील २०हून अधिक वर्तमानपत्रांनी या घटनेचे स्वागत केले. अलाहाबाद येथे झालेल्या जागतिक हिंदू परिषदेत ‘डॉयट्शे वेले’च्या अभिनंदनाचा खास ठराव संमत करण्यात आला.
त्याचप्रमाणे जर्मनीतून संस्कृत कार्यक्रम ऐकू येतो आणि भारतातून नाही, यावर भारतीय संसदेत जोरदार चर्चा झाली. अनेकांना हा आपल्या देशाचा अपमान वाटला. सरकारवर टीका झाली. पुण्यातील संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ यांनीही पंतप्रधानांच्या नावे एक खरमरीत पत्र लिहिले. त्यानंतर सूत्रे हलली आणि ’आकाशवाणी’वरून संस्कृतमधून बातम्या सादर करण्यात येऊ लागल्या.
नंतरच्या काळात भारतात वाढत गेलेल्या ‘मॅक्सम्युलर भवन’ आणि ‘गोएथे इन्स्टिट्यूट’चा पाया या केंद्राने घातला.
‘डॉयट्शे वेले’ आजही चालू आहे; मात्र त्यावरील हिंदी नभोवाणी कार्यक्रम बंद आहेत. संस्कृत कार्यक्रम तर केव्हाच बंद झाले. या केंद्रांवरील संस्कृत ‘वाणी’ नाहीशी झाल्याने सुमारे चार दशकांच्या सु‘संस्कृत’ ऋणानुबंधांची इतिश्री झाली.

हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे नेपाळ सरकारच्या मालकीची वाहिनी असलेल्या नेपाळ टेलिव्हिजनने (एनटीव्ही) अलीकडेच उचललेले पाऊल. नेपाळ सरकारच्या मालकीची वाहिनी असलेल्या ‘एनटीव्ही’ने संस्कृत भाषेतील बातमीपत्राचे प्रक्षेपण करण्यास सुरुवात केली आहे. या संस्कृत बातम्या प्रत्येक शनिवारी नऊ वाजता ‘एनटीव्ही’वर प्रसारित केल्या जातात. ‘बहुभाषक देश म्हणून ओळख असलेल्या नेपाळच्या भावना व्यक्त करण्यासाठी संस्कृतमधील हे बातमीपत्र चालू करण्यात येत आहे. यातून जगातील सर्वांत प्राचीन भाषांपैकी एक असलेल्या संस्कृतच्या प्रचारासाठी आणि संवर्धन करण्यासाठी मदत होईल,’ असे ‘एनटीव्ही’चे कार्यकारी अध्यक्ष महेंद्र बिस्ता यांनी ही घोषणा करताना सांगितले.
सध्या एनटीव्ही थारू, लिम्बू, भोजपुरी, मैथिली, नेवारी, अवधी भाषेतील नियमित कार्यक्रम सादर करते. तसेच नेपाळी आणि इंग्रजी भाषेतील बातम्या वाहिनीवरून सादर होतात. या बातमीपत्राला मिळणारा प्रतिसाद पाहून विविध संस्कृत ग्रंथांवर आधारित रेडिओ टॉक शो सुरू करण्याचीही सरकारची योजना आहे.
नेपाळमधील राज्यघटना दिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम सुरू करण्यात आला. ‘रेडिओ नेपाळ’वरून १९९५पासून संस्कृत बातम्या प्रक्षेपित होत आहेतच. भारतात आकाशवाणीवरील संस्कृत बातम्या दिवसातून दोनदा प्रत्येकी पाच मिनिटांच्याच असतात. ‘रेडिओ नेपाळ’वरील संस्कृत बातम्या दररोज साडेसहा मिनिटांच्या असतात.
याच नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूमध्ये जगातील सर्वांत प्राचीन मंदिरांपैकी एक असलेले आणि हिंदूंसाठी सर्वांत महत्त्वाच्या असलेल्या धर्मस्थानांपैकी एक मंदिर आहे ते म्हणजे पशुपतिनाथ मंदिर. अन् याच मंदिरात आहे श्री भागवत संन्यास आश्रम आणि गुरुकुल स्कूल. या गुरुकुलात संस्कृत भाषा शिकविली जाते. आपल्याकडे असणारी तक्रारच तेथेही आढळते. ‘पाश्चिमात्य जगतात संस्कृत लोकप्रिय होत आहे. परंतु नेपाळमध्ये तिची लोकप्रियता घसरत आहे. नेपाळची ८० टक्के लोकसंख्या हिंदू असली, तरी संस्कृत शाळा आणि शिक्षणाला सरकारकडून कोणतेही प्रोत्साहन मिळत नाही,’ असे या शाळेतील एक वरिष्ठ शिक्षक डॉ. धुर्बा श्री यांनी सांगितले होते. आज ही शाळा ३५ वर्षे जुनी झाली आहे. हिंदू धर्मशास्त्र शिकविण्यासाठी, तसेच संस्कृतचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी तिची स्थापना झाली आहे.
आज संस्कृतचे दूरचित्रवाणी कार्यक्रम भारतातही प्रक्षेपित होतात. दूरदर्शनवर दर आठवड्याला साधारण अर्ध्या तासांचा
‘वार्तावली’ कार्यक्रम असतो. केरळमधील
‘जनं’ या मल्याळी वाहिनीवरही संस्कृत बातम्या सादर होतात. केरळमध्येच ‘सम्प्रति वार्ताः’ हे संकेतस्थळ मल्टिमीडिया बातम्यांद्वारे संस्कृतचा प्रसार करत आहे.
(हे संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.) मृत भाषा म्हणून हिणवण्यात येणाऱ्या संस्कृतचा हा नवोन्मेष पाहून आनंद होण्यासाठी संस्कृतप्रेमीच असले पाहिजे असे नाही. कोणत्याही भाषाप्रेमीसाठी ही एक पर्वणीच असायला हवी.
...मात्र संस्कृतचे प्रेम एकीकडे आणि तिच्या जतनासाठी-संवर्धनासाठी प्रयत्न होणे वेगळे. संगणकासाठी संस्कृत सर्वांत उपयोगी भाषा आहे म्हणणे वेगळे आणि प्रत्यक्ष संगणनाच्या साहाय्याने संस्कृतचा वापर करणे वेगळे. ते कसे करायचे हे फ्रान्समधील इन्रिया (INRIA) या संस्थेची संस्कृत हेरिटेज साइट पाहिल्यावर कळते.
(ती साइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
‘शिष्यात् इच्छेत् पराजयम्’ असे एक संस्कृत वचन आहे. प्रत्येक गुरूची हीच इच्छा असते, की शिष्याने त्याचा पराभव करावा. जर्मनी काय किंवा नेपाळ काय, हे काही भारताचे शिष्य नाहीत, तर मित्रच म्हणता येतील; मात्र त्या देशांनी संस्कृतच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा आणि भारताने त्याच्या मागोमाग जावे, हे काही बरे नाही. संस्कृतच्या पुनरुत्थानाचे प्रयत्न भारतातूनच व्हायला हवेत. मित्राने आपला पराभव करायला नको, हेच बरे!