रत्नागिरी : रत्नागिरीत नुकतीच झालेली जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद अनेक अर्थांनी चांगल्या प्रकारचा पायंडा पाडणारी ठरली. प्लास्टिकमुक्ती, प्रदूषण टाळणे, स्वच्छता करणे या बाबतींमध्ये या परिषदेचे आयोजक आणि कार्यकर्त्यांनी कृतीतून आदर्श घालून दिला आणि एखादा मोठा कार्यक्रम पर्यावरणस्नेही आणि सामाजिक बांधिलकी जपणारा कसा होऊ शकतो, हे दाखवून दिले.
रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडासंकुलात १५ आणि १६ डिसेंबर २०१८ रोजी जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी संमेलनस्थळी आर. सी. काळेनगरी उभारण्यात आली होती. कार्यक्रमानंतर सर्व कार्यकर्त्यांनी परिसराची स्वच्छता करावी, अशी सूचना परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी केली होती. त्याचे तंतोतंत पालन कार्यकर्त्यांनी केले. त्यामुळे परिषद झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच परिसर स्वच्छ झाला.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याच्या, तसेच प्लास्टिक बाटल्या इतस्ततः न फेकण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आल्या होत्या. त्याचे बहुतांशी पालन झाले. तसेच कार्यक्रमानंतर परिसराची स्वच्छता केल्याने नगर परिषदेचा कामाचा भार हलका झाला.
तसेच, परिषदेच्या निमित्ताने काढलेल्या शोभायात्रेत कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण टाळले गेले. शोभायात्रेच्या एखाद्या मार्गावरून गेल्यानंतर काही कचरा झाला असल्यास पाठीमागे असलेल्या स्वच्छता पथकातील कार्यकर्ते तो कचरा लगेच उचलत होते. हा एक वेगळ्या प्रकारचा पायंडाच म्हणायला हवा.
परिषदेच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी १०० जणांनी रक्तदान केले. परिषदेतील मुख्य कार्यभागाबरोबरच या सगळ्या उपक्रमांनाही परिषदेत सहभागी झालेल्या ज्ञातीबांधवांनी सक्रिय सहकार्य केल्याबद्दल परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी आनंद व्यक्त केला.
परिषद यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी सहायक संस्थेचे विश्वस्त, कार्यकारिणी, देवरुखे विद्यार्थी वसतीगृह संस्थेचे अध्यक्ष विनोद जोशी व कार्यकारिणीचे मोलाचे योगदान लाभल्याचे डॉ. निमकर यांनी सांगितले. ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने या संमेलनाचे वार्तांकन केल्याबद्दल डॉ. निमकर यांनी विशेष आभार मानले.
(डॉ. निमकर यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. या परिषदेचे वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)