Ad will apear here
Next
मातृभूमीसाठी सावरकरांनी घेतलेली शपथ
 स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी शपथ घेतली होती. ती त्यांनी खरी करून दाखवली. ‘अभिनव भारत’ ही संघटना सुरू करताना त्यांनी या कार्यात सहभागी होण्यासाठी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तींनाही कसे मार्गदर्शन केले होते आणि त्यांचे विचार किती स्पष्ट होते, याची झलक दाखविणारा, वि. स. वाळिंबे यांनी लिहिलेल्या सावरकरांच्या चरित्रातला प्रसंग सावरकरांच्या स्मृतिदिनाच्या औचित्यानेयेथे प्रसिद्ध करत आहोत. सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला चालले असतानाच्या प्रवासातील हा प्रसंग आहे.
.........
सावरकरांचे विचार केशवानंदांना पटले; पण अजूनही शिष्टाचाऱ्यांच्या मनाची तयारी होत नव्हती.

सावरकर त्यांना समजावून देऊ लागले, ‘‘आज आपण तिघं-चौघंच आहोत, हे खरं आहे; पण म्हणून आपण आपल्याला कमी लेखायचं कारण नाही. निर्धारानं उभे ठाकलेले मूठभर लोकदेखील कधीकधी फार मोठं कार्य करून जातात. याचं, एक अगदी अलीकडचं उदाहरण सांगतो - चाफेकर बंधूंचं. तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेल. आठ-नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्यात प्लेगनं थैमान मांडलं होतं. पण आपल्या घरात प्लेगची लागण झालेली आहे, हे लोक लपवून ठेवू लागले. कारण, मग घर सोडून गावाबाहेर जावं लागे. यावर सरकारनं उपाय योजला तो प्लेगपेक्षाही अघोरी होता. इंग्रज शिपाई कुणाच्याही घरात घुसू लागले, सामानसुमान बाहेर फेकू लागले. लोक या उन्मत्त अरेरावीला वैतागले. सरकारला शिव्याशाप देऊ लागले. पण आपला हा संताप व्यक्त करण्याचं धाडस कुणीही दाखवेना. चाफेकर बंधूंना राहावलं नाही. त्यांनी इतरांची वाट पाहिली नाही. ते पुढे झाले आणि त्यांनी दोघा इंग्रज अधिकाऱ्यांना कंठस्नान घातलं. चाफेकर बंधू फासावर गेले, पण लोकांची सरकारच्या आततायी वर्तनातून सुटका झाली. कारण त्यानंतर इंग्रज शिपाई पूर्वीपेक्षा खूपच जबाबदारीचं भान ठेवून वागू लागले. म्हणून, मला असं वाटतं की उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतंही बलिदान वाया जात नाही. त्याचा काही ना काही चांगला परिणाम पाहायला मिळतोच. कदाचित थोडा काळ जावा लागत असेल, इतकंच. म्हणूनच मला मॅझिनीइतके आमचे चाफेकर बंधूही आदरणीय आहेत. कारण मॅझिनीप्रमाणे त्यांनीही मला हे शिकवलं की, आपण एकटे असलो तरी हरकत नाही, आपल्यामागे कुणी येवो ना येवो, जे आपल्याला करावंसं वाटतं ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे. अहो, आधी एकच ठिणगी असते. पण ती जर विझली नाही, तर साऱ्या अरण्याला वेढून टाकणारा वणवा उभा करण्याचं सामर्थ्य तिच्यात असतं.’’

सावरकरांनी आणखी काही सांगण्याची गरजच उरली नाही. केशवानंद आणि शिष्टाचारी विलक्षण प्रभावित होऊन गेले होते. हरनामसिंगला नवल वाटले. कारण केशवानंद आणि शिष्टाचारी वयाने सावरकरांपेक्षा बरेच मोठे; पण त्या दोघांनाही आज सावरकर मोठे वाटत होते. 

स्वत: सावरकरांना मात्र याचे नवल वाटले नाही. कारण, पागे-म्हसकरांच्या बाबतीत पूर्वी असेच घडले होते. पागे-म्हसकर बाबांचे मित्र. बाबांपेक्षाही वयाने मोठे; पण त्यांनी सावरकरांचे नेतृत्व मान्य केले होते. आज तेच घडत होते.

केशवानंद सांगत होते, ‘‘तुम्ही आमचे पुढारी आहात. तुम्ही सांगाल तसं आम्ही करू.’’

‘‘मग आपण गुप्तसंस्था स्थापन करायची?’’

‘‘मुळीच वेळ न घालवता. पहिली शपथ तुम्ही घ्यायची.’’

‘‘अगदी आनंदानं.’’

‘‘आणि तुमच्या पाठोपाठ मी,’’ केशवानंदांनी ग्वाही दिली.

सावरकरांनी शिष्टाचाऱ्यांकडे पाहिले.

ते म्हणाले, ‘‘मी उद्या काय ते सांगतो.’’

‘‘घाई नाही. उद्या कशाला, परवा सांगितलंत तरी चालेल. भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही एकदम ‘हो’ म्हणावं, अशी माझी मुळीच अपेक्षा नाही. कारण, भावनेचा आवेग ओसरला की पश्चात्ताप करण्याची पाळी येते. प्रत्येकानं आपली प्रवृत्ती, आपली प्रेरणा प्रमाण मानावी. म्हणजे मग परिणामासंबंधी आपली फसगत होत नाही. अपयश आलं तरी आपण मोडून जात नाही. उलट, त्या अपयशातही एक समाधान असतं - आपण आपल्या प्रेरणेशी प्रामाणिक राहिलो याचं. म्हणून पुन्हा सांगतो, मुळीच घाई करू नका. मला काय वाटेल याचा विचार करू नका. अहो, गुप्त संस्था स्थापन करणं सोपं असतं, ती चालवणं अवघड असतं. कारण, या कार्याचे काहीही परिणाम होऊ शकतात. अनेकांची आयुष्यं जळून जाण्याचा दाट संभव असतो. ही शक्यता दृष्टीआड करू नका. हे सगळं ध्यानात घेऊनच तुमचा होकार किंवा नकार कळवा. तुमचा होकार आला तर मला आनंदच होईल, नकार दिलात तर वाईटही वाटेल; पण त्याच्याबद्दल मी तुमच्यावर रागावणार नाही. तुमचा स्नेह झिडकारून देणार नाही. कारण, माझ्यासारखेच सगळे व्हावेत असं मला वाटत असलं तरी तसं होणं अशक्य आहे, हे मी जाणतो. म्हणून मी कधीच कुणावरही काही लादू इच्छित नसतो.’
सावरकरांना फार वाट पाहावी लागली नाही.

दुसऱ्या दिवशीच शिष्टाचाऱ्यांनी आपली अनुमती कळवली. इतकेच नव्हे, तर त्यांनीच आग्रह धरला, ‘‘आपण आजच, नव्हे, आत्ताच आपली गुप्त क्रांतिकारक संघटना स्थापन केली पाहिजे.’’

सावरकर तयारच होते.

शिष्टाचाऱ्यांनी विचारले, ‘‘पण तिचं नाव काय ठेवायचं?’’

‘‘मॅझिनीची ‘यंग इटली’ तर आपला ‘अभिनव भारत.’ नाव पसंत आहे?’’

‘‘अत्यंत अन्वर्थक नाव आहे; पण तुम्हांला ते एकदम कसं सुचलं?’’

‘‘मघाशी केशवानंदांशी बोलत होतो, त्या वेळी सुचलं. त्यांना ते तुमच्याइतकंच आवडलं आहे.’’

‘‘मग तर छानच झालं. आपण त्यांनाही इथंच बोलावून घेऊ.’’

केशवानंद आले.

सावरकरांनी शपथेचा मसुदा लिहून आणलेलाच होता. शिष्टाचारी आणि केशवानंद यांनी तो वाचला.

सावरकर जितके चांगले बोलतात तितकेच चांगले लिहूही शकतात, हे त्यांना जाणवले.

दोघे शपथ घ्यायला तयार झाले.

सावरकरांनी त्यांना पुन्हा बजावले, ‘‘काल सांगितलं तेच आज सांगतो. शपथ घेणं जड जात नाही. ती पाळणं फार जड जातं. म्हणून, हवा असेल तर तुम्ही आणखी थोडा वेळ घ्या. शांत मनानं सगळ्या गोष्टींचा विचार करा. ही शपथ घेणं हे एक कठोर व्रत आहे. कदाचित जीवनही नाकारावं लागेल. म्हणून, तुम्ही एक वेळ हे व्रत घेतलं नाही, तर मला चालेल; पण एकदा प्रतिज्ञाबद्ध झाल्यानंतर, तुम्हांला या व्रतापासून पळ काढता येणार नाही. मग आधार काय तो मृत्यूचाच.’’
सावरकरांनी त्या दोघांना परिणामांची पुन:पुन्हा स्पष्ट कल्पना दिली.

तरीही त्यांच्या निर्णयात बदल झाला नाही.

सावरकर म्हणाले, ‘‘मग ठीक आहे. काल ठरल्याप्रमाणे पहिल्यांदा मी शपथ घेतो.’’

त्या लहानशा खोलीत गंभीर शांतता पसरली.

सावरकर आपल्या जीवनमंत्राचा उच्चार, खरे म्हणजे पुनरुच्चार, करू लागले.

‘‘परमेश्वराला स्मरून,
माझी प्रिय मातृभूमी आणि पितृभूमी असलेल्या हिंदुस्थानला स्मरून, ज्यांनी माझे हे राष्ट्र महान आणि वैभवशाली केले आणि माझ्या या प्रियतम राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आणि सन्मानासाठी ज्यांनी विजयी झुंज दिली त्या सर्व ऋषिमुनींना, वीरवरांना आणि देशवीरांना स्मरून, मी विनायक दामोदर सावरकर, ‘अभिनव भारत’ या अखिल भारतीय क्रांतिकारी संघटनेचे सदस्यत्व स्वीकारत आहे.

जुलमी इंग्रजांनी शस्त्रबळाचा वापर करून माझ्या मातृभूमीला बंधनात जखडून टाकले आहे. या बंधनातून तिची मुक्तता करणे आणि तिला पुन्हा संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य मिळवून देणे हे माझे परमकर्तव्य आणि एकमेव जीवनध्येय आहे, असे मी मानतो. मातृभूमीच्या विमोचनाचे कार्य हेच खरे पवित्र आणि सन्माननीय कार्य होय, अशी माझी श्रद्धा आहे. मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जे अन्य राजकीय प्रयत्न प्रवर्तित झालेले आहेत त्यांचे महत्त्व मान्य करूनही, माझी अशी खात्री झालेली आहे की, परकीय शत्रूशी सशस्त्र आणि संघटित लढा दिल्याशिवाय, जेथे जेथे शक्य आहे तेथे तेथे या शत्रूवर उघड वा गुप्त आघात केल्याशिवाय, आणि जेव्हा व्यापक आणि अविरत विश्वयुद्ध सुरू होईल तेव्हा शस्त्रास्त्रे आणि रक्तपात यांचा अवलंब करून या शत्रूला आपल्या मातृभूमीच्या किनाऱ्यावरून पलीकडे ढकलून दिल्याशिवाय, संपूर्ण स्वातंत्र्याचे उद्दिष्ट साध्य होणे अशक्य आहे.

हा सिद्धान्त स्वीकारणाऱ्या ‘अभिनव भारत’चा सदस्य होत असताना, ‘मी अशी शपथ घेतो की या संस्थेच्या क्रांतिकारी ध्वजाखाली मी, जुलमी इंग्रज राज्यकर्त्यांशी विजय मिळेतो वा मृत्यू येईतो अथक झुंज देईन. या अंगीकृत कार्यात परमेश्वराने मला सामर्थ्य पुरवावे.’’

स्वत:च लिहिलेली ही शपथ वाचताना, सावरकरांच्या रक्तगौर मुखावर एक वेगळेच चैतन्य फुलून आले होते.

नंतर केशवानंदांनी आणि शिष्टाचाऱ्यांनी शपथ घेतली.

सावरकर त्या दोघांशी अधिकच मोकळेपणाने बोलू लागले, ‘‘तुम्ही परवा असं म्हणत होता, की आपल्या देशात जर एखादी गुप्त संस्था अगोदरच स्थापन झालेली असेल तर आपण तिच्यात दाखल व्हावं. त्या वेळी मी मुद्दामच तुमच्याशी अधिक बोललो नाही; पण आता तुम्ही प्रतिज्ञाबद्ध झालेले आहात, म्हणून तुम्हांला सारं काही सांगतो. इंग्रजी सत्तेला सशस्त्र विरोध करण्याच्या उद्देशानं एक गुप्त संस्था आधीच अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक गावांत तिच्या शाखा सुरू झालेल्या आहेत. साऱ्या देशभर हे कार्य रुजविण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत. लवकरच ही देशव्यापी संघटना होईल, याबद्दल मला किंचितही संदेह नाही.’’

‘‘नाव काय तिचं?’’

‘‘अभिनव भारत.’’

‘‘ती कुणी स्थापन केली आहे?’’

‘‘मीच.’’

(वि. स. वाळिंबे यांनी लिहिलेले ‘सावरकर’ हे चरित्र ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZNLCH
Similar Posts
हवा असा थाटमाट असे गूज लिहायाला... चार जानेवारी हा कवयित्री इंदिरा संत यांचा जन्मदिन. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्त्व त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे. सासूबाई म्हणून, आजी म्हणून, घरातली मोठी व्यक्ती
बाळासाहेब : एक लेणे...! शिवसेनेचे संस्थापक आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचा २३ जानेवारी हा जन्मदिन. ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी जागवलेल्या त्यांच्याबद्दलच्या या आठवणी...
असं हे वैशिष्ट्यपूर्ण कोल्हापूर... ‘रांगडेपणाबरोबर अंगात गुरगुर आणि मस्ती असणारी, रंगेलपणा अन् शौकीनपणाबरोबर जिवाला जीव देणारी, कौतुकाबरोबरच पाय आडवा घालून पाडण्याची तयारी असलेली, लाल मातीशी घट्ट नातं असणारी आणि ‘चैनीत’, ‘निवांत’ असे शब्द खऱ्या अर्थाने जगणारी अघळपघळ मनाची माणसं म्हटलं, की ती कोल्हापूरचीच असणार. दुसरी कुठली?’ समकालीन
अग्रलेखक गोविंदराव तळवलकर : पु. ल. देशपांडे यांचा लेख त्यांच्याच हस्ताक्षरात महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचे संपादकपद सर्वाधिक काळ भूषवलेले व्यासंगी पत्रकार, अभ्यासू आणि साक्षेपी राजकीय विश्लेषक आणि साहित्यिक गोविंदराव तळवलकर यांचा २२ जुलै हा जन्मदिन. त्या निमित्ताने, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेले शब्दप्रभू साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेले गोविंदरावांचे व्यक्तिचित्र येथे प्रसिद्ध करत आहोत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language