Ad will apear here
Next
‘आवो भोले.. पिस्सू टॉपतक घोडा कर लो..!’

आजूबाजूला शुभ्र बर्फ होता, पण चालायच्या वाटेवरचा बर्फ माती, चिखल आणि धुळीनी काळवंडला होता. बर्फातही मळलेली वाट असते. दोन्ही बाजूंना असलेले उभे, उंच पर्वत धीर खचवत होते. खळाळती नदी उत्साह वाढवत होती. माझी  पिस्सू टॉपची कठीण चढाई सुरू झाली होती... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा तेरावा भाग..
.............................................
‘पिस्सू टॉप बहोत मुश्कील है.. सिधी चढाई है.. जान निकल जायेगी, घोडा करलो..’ चंदनवाडीहून चालायला सुरुवात करताच घोडा करण्यासाठी घोडेवाले मागे लागले. मी घोडा करणार नाही हे शंभर टक्के ठरवलेलंच होतं. दोन लाठ्या एका हातात पकडून कंबरेत खाली  वाकून एका हाताने मी जमिनीला नमस्कार केला. पृथ्वीला स्पर्श करून यात्रा चांगली होऊ दे आणि चालण्याची शक्ती मिळू दे, अशी प्रार्थना केली. तिच्यावरूनच पुढे चालायचं होतं. हिमालय पर्वताला दोन हात जोडून नमस्कार केला. तुझ्या जागेत आलोय महाराजा..! हा तुझा अड्डा आहे. इथला डॉन तू..! तुला ग्रॅटिट्युड आणि नमस्कार अर्पण करून तुझ्या मोहल्ल्यातून, अड्ड्यातून जायची हिंमत करतोय.

आता छातीला लावली माती. आली लहर केला कहर..!  मी पुढे निघालो. खूप लोक हातातील काड्या टेकवत उत्साहात चालत होते. समूहात मधूनच ‘बम बम भोले’चा गजर ऐकू यायचा. पुन्हा तो गजर ‘स्नूज’ मोडवर असल्याप्रमाणे दर थोडया वेळाने जयघोष ऐकायला येई. सुरुवातीचा हा उत्साह होता, पण किमान त्यांच्यात तो तेव्हा तरी प्रचंड होता. मी मात्र सुरुवातीलाच गळालो होतो.

काही पावलांवरंच मला एक छोटा वैद्यकीय तंबू दिसला. तिथे हवे ते औषध मोफत मिळण्याची सुविधा होती. मी त्यांना ‘डिसेन्ट्री’वरील गोळ्या मागितल्या, पण नेमकं त्याचंच औषध त्यांच्याकडे नव्हतं. त्यांच्या बोलण्यावरून ते बंगाली लोक वाटत होते. त्यांनी मला थोडं थांबायला सांगितलं. मी काही क्षण वाट पहिली आणि पुन्हा पुढे चालू लागलो. तेवढयात मागून एक माणूस आला आणि त्याने मला मागून ‘ओ बाबू भोले बाबू..’ असा आवाज देऊन माझ्या हातात ‘ओआरएस’चं एक पाकीट देऊन तो चालता झाला. मला तिथल्या यात्रेकरूंचा तो सहकार्य करण्याचा भाव फार भावला.

आपलं सिमकार्ड जम्मू आणि काश्मीरमध्ये काम करत नाही. मी जम्मूवरून ‘दुनिया करलो मूठठींमें’ म्हणणाऱ्या एका कंपनीचं सिमकार्ड  घेतलं होतं, पण त्याची कनेक्टिव्हिटी अगदीच तकलादू. जम्मूपासून रस्त्यात काही ठिकाणी मोबाईलच्या सहा इंची पडद्यावर कनेक्टिव्हिटीच्या तीन चार रेषा काही काळ टिकल्या होत्या. पण बहुतेकवेळी त्या अदृश्यच राहत. धक्कादायक आणि उद्वेगकारक म्हणजे पहलगामसारख्या मोठ्या, महत्त्वाच्या पर्यटनस्थळीही मला ‘रेंज’ मिळत नव्हती. 

रस्त्यात काही ठिकाणी लोक घराबाहेर एसटीडी सुविधा असलेले फोन घेऊन बसले होते. मी त्यावरून एक फोन केला. दोन हातात दोन काड्या टेकवत पुढे चालू लागलो. आश्चर्य म्हणजे थंडी अजिबात नव्हती. काहीशी गर्मीच होती. त्यामुळे लेदरचं जॅकेट मी हातात घेऊन चालत होतो. पण दोन हातात दोन लाठ्या घेऊन त्याद्वारे चालताना आणि ते चामडी जाड आवरण एका हातात संभाळताना माझी तारांबळ उडत होती. एकवेळ ठरवलं की एक लाठी तिथेच टाकून द्यावी किंवा कोणाला देऊन टाकावी. शिवाय हातात काडी टेकवून चालणं  म्हणजे कमकुवतपणा अशी सर्वसामान्य समजूत. पण कोणीतरी सांगितलेलं आठवलं की हिमालयात चढताना हातात काडी घेऊन चालणे अत्यंत गरजेचे. नाहीतर पूर्ण भार पाठीवर आणि कंबरेवर येतो. म्हणून मी हातातली काडी टाकून देत नव्हतो. शेवटी लेदर जॅकेट गळ्याला गुंडाळून बाह्यांची गाठ मारली. पाठीवर बॅग घेऊन चालत राहिलो. 

घोडेवाले सतत पिस्सू टॉपबद्दल भीती दाखवत घोडा करण्यासाठी गळ घालत होते. कोणी शेषनागपर्यंत घोडा करायला सांगत होते. शेषनाग हा शब्द कानावर पडला. त्या दिवशी रात्री शेषनागला राहायचं होतं. या प्रवासातली ती एक खूप महत्त्वाची जागा. तिथे पर्वतांमध्ये  तलाव, त्यातून लीडर नदीचा उगम. पण सगळयात जास्त मृत्यूही शेषनागला होतात. तेथे प्राणवायूची कमतरता आहे. शिवाय प्रचंड थंडी. शेषनाग म्हटल्यावर सगळं आठवलं..डोळ्यासमोर आलं. तोवर ती जागा बघितली नव्हती फक्त त्यासंबंधी ऐकलं होतं. एक गूढ पण अत्यंत सुंदर जागा.

मी प्रत्येक घोडेवाल्याला नकार देत चालत राहिलो. बाजूने लीडर नदी मस्तीत खळाळत धावत होती. तिचा आवाज प्रचंड होता. काही पावलांवरच बर्फदर्शन झाले. एक खूप मोठं ग्लेशियर समोर आलं. त्यावरून जायचं होतं. एक काश्मिरी माणूस हातातील फावड्याने बर्फात पायऱ्या करत होता. बर्फ फोडत होता. आजूबाजूला शुभ्र बर्फ होता, पण चालायच्या वाटेवरचा बर्फ माती, चिखल आणि धुळीनी काळवंडला होता. बर्फातही मळलेली वाट असते. काही अतिउत्साही पोरं  ग्लेशियरवरून वाट सोडून चालत होती. दोन्ही बाजूंना असलेले उभे, उंच पर्वत धीर खचवत होते. खळाळती नदी उत्साह वाढवत होती. माझी  पिस्सू टॉपची कठीण चढाई सुरू झाली होती...

(क्रमशः) 
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZROBK
Similar Posts
पिस्सू टॉप सगळ्यात मोठं, उभं, उंचच उंच संकट, टास्क, चॅलेंज पुढे उभं ठाकलं होतं. त्याचं नाव म्हणजे ‘पिस्सू टॉप’. अमरनाथ यात्रेत जे दरवर्षी मृत्यू होतात त्यात दोन ठिकाणी सगळ्यात जास्त मृत्यू होतात. एक पिस्सू टॉप आणि दुसरा शेषनाग. पिस्सू टॉपच्या खडतरपणाबद्दल ऐकलं होतं, वाचलं होतं. मी जन्मभर कधीही विसरणार नाही असा अनुभव पिस्सू टॉपने दिला
आत्मीयतेने मोफत जेवू घालणारे लंगरवाले... इतक्या उंचावर जिथे सर्व महाग मिळतं, तिथे हे लंगरवाले यात्रेकरूंना मोफत चविष्ट अन्न खाऊ घालतात. आश्चर्य म्हणजे अन्न वाढताना कसलाही अहंकार नाही, का कटू, कोरडा व्यवहार नाही. अत्यंत प्रेमाने, आर्जवतेने ते यात्रेकरूंना आपल्या लंगरमध्ये बोलावत असतात. जणू त्यांच्यातच एक सशक्त स्पर्धा असते, कोण जास्त यात्रेकरूंना खाऊ घालेल, कोणाचं अन्न जास्त रुचकर
..आणि सामान्य माणूसही होतो जिगरबाज सैनिक.. अमरनाथ यात्रा पुढे धार्मिक न राहता ती हळूहळू राष्ट्रीय यात्रा होऊ लागते आणि शेवटी ती फक्त सर्वसामान्य भारतीय माणसाची देशविघातक प्रवृत्तींविरोधी असलेली राष्ट्रीय यात्रा होते. सैनिक शस्त्रानिशी तिथे झुंजत असतातच, पण दरवर्षी आतंकवादी कारवायांना न जुमानता तिथे जाणारा सामान्य माणूसही एक जिगरबाज निःशस्त्र सैनिक होऊन जातो
..आणि माझी अवस्था विक्रमादित्यासारखी झाली मी जर इथेच पहलगामला माझी वजनदार मोठी बॅग ठेवली तर मला पुन्हा याच दूरच्या रस्त्याने परत पहलगामला यावं लागणार होतं. बॅगरूपी वेताळाला पाठीवरून वर गुफेपर्यंत घेऊन जाणं केवळ अशक्य होतं. तसा प्रयत्न जरी केला तरी मृत्यू शंभर टक्के. काय करावं..? माझी अवस्था पाठीवरील वेताळाने प्रश्न विचारल्याने संभ्रमात पडलेल्या विक्रमादित्यासारखी झाली होती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language