भारतीय भाषांपुढील खरे आव्हान इंग्रजीचे आहे. बहुतेक भाषांमधील वृत्तपत्रांमध्ये किंवा माध्यमांत महिन्यातून एखादा तरी लेख त्या-त्या भाषेच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करणारा असतो. इंग्रजीच्या हत्तीला प्रत्येक आंधळा आपापल्या पद्धतीने पाहतोय आणि त्याचा दोष मात्र कोणावर तरी टाकायचा म्हणून हिंदीला झोडपतोय, असे हे चित्र आहे. ...........
सर्व भारतीय भाषांची स्थिती आणि कैफियत एकच आहे. फक्त केशवसुत म्हणतात तसे ‘नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे!’ नेहमीच डोळ्यांपुढे असल्यामुळे त्याकडे आपले लक्ष जात नाही आणि एकमेकांच्या दुःखाबद्दल आपण अनभिज्ञ राहतो; मात्र एखादे निमित्त घडते आणि खपली निघते. नुकताच असा एक प्रसंग घडला आणि हिंदीची कैफियत समोर आली.
निमित्त झाले एका सामान्य ट्विटचे. हिंदीतील प्रसिद्ध पत्रकार आणि प्रखर हिंदीप्रेमी राहुल देव यांनी एक ट्विट केले होते. त्याला कारण होते हिंदीतील एक पत्रकार लक्ष्मीप्रसाद पंत यांच्या आगामी पुस्तकाचे. हिंदी पत्रकारितेवरील या पुस्तकाचे शीर्षक ‘मैन @ वर्क’ असे आहे. याच्यावरच देव यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ‘एका हिंदी पत्रकाराचे पुस्तक तेही हिंदी पत्रकारितेच्या अनुभवावर आणि त्याचे शीर्षक इंग्रजी का,’ असा सवाल देव यांनी केला होता. त्याच्यावर मीही एक टिप्पणी केली आणि त्यातून सुरू झाली संवादाची एक मालिका. मराठीप्रमाणेच हिंदी भाषकांनाही इंग्रजीच्या आक्रमणाची चिंता वाटत आहे, मराठीप्रमाणेच इंग्रजीतही आपले शब्द विसरून इंग्रजीची उधार-उसनवारी करण्याची साथ फोफावली आहे आणि मराठीप्रमाणेच हिंदी भाषकही त्याच्या विरोधात पुढे येताहेत, हे त्या ट्विटवरून कळून आले.
देव यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना मी सहज म्हटले होते, ‘दिनोंदिन मेरा यह संदेह बढ़ता जा रहा है, की हिंदीवालों का हिंदी में सोचना ही बंद हो गया है। गाहे-बगाहे कोई हिंदी विचार आए तो भी उसे इस ड़र से दबा दिया जाता है, की दुनिया क्या कहेगी। आत्मभर्त्सना के एक अपूर्व दौर से गुजर रही है यह भाषा।‘ (हिंदीभाषकांचे हिंदीत विचार करणे बंदच झाले आहे की काय, ही माझी शंका दिवसेंदिवस वाढत आहे. क्वचित कधी हिंदी विचार आला तरी जग काय म्हणेल म्हणून तो दाबून टाकला जातो. आत्मभर्त्सनेच्या अभूतपूर्व काळातून ही भाषा सध्या जात आहे.) या ट्विटला मोठा प्रतिसाद मिळाला. अनेकांनी ते रिट्विट केले, त्यापेक्षा जास्त लोकांनी ते लाइक केले. अनेकांनी प्रतिक्रिया देताना हिंदीची दुरवस्था होत असल्याची भावनाही बोलून दाखवली.
हे ट्विट केले होते त्याला कारणही तसेच होते. हिंदी वृत्तपत्रे वाचणाऱ्या, हिंदी वाहिन्या पाहणाऱ्या कोणत्याही माणसाला या गोष्टी जाणवल्यावाचून राहत नाही. जेथे म्हणून विचार मांडायचा, तेथे एक तर थेट इंग्रजीत किंवा इंग्रजीमिश्रित हिंदीत मांडली जाते. मुख्यमंत्रीऐवजी आधी सीएम हा शब्द वापरायला सुरुवात झाली. आता तो थेट CM असा लिहिला जातो. भाजप म्हणण्याऐवजी BJP असे लिहिले जाते. बॉलिवूडच्या चित्रपटांची नामावली संपूर्ण इंग्रजीत असते, तर संवादात निर्भेळ हिंदी ऐकायला मिळणे ही आता पर्वणी बनली आहे. ‘थेंबे थेंब तळे साचे’ या न्यायाने एक-एक शब्द इंग्रजीची घागर भरत आहे आणि हिंदी कोपऱ्यात ढकलली जात आहे. त्यामुळे हिंदी भाषकांना स्वतःच्या भाषेत विचार करता येतो का नाही, हाच प्रश्न निर्माण झाला आहे.
या सगळ्याची चिंता हिंदीच्या धुरिणांना नाही असे नाही; मात्र विवेकाचे हे स्वर दबून आहेत. त्यांना दाबायची संपूर्ण तजवीज करूनच इंग्रजीच्या कैवाऱ्यांच्या कारवाया चालतात. विसंगती ही, की आज हिंदीची लोकप्रियता आणि लोकाधार वाढत आहे. आज परिस्थिती अशी आहे, की देशातील बहुतांश हॉटेलांमध्ये भटारखान्यांमध्ये हिंदी बोलली जाते. भारतीय रेल्वेची भाषा (अधिकृत व अनधिकृतही) हिंदीच आहे. परंतु हिंदीची माहिती व संवादाचे कंत्राट घेतलेल्यांना हिंदीला मुक्तपणे विचरण्याचे स्वातंत्र्य द्यायचे नाही. ‘कॉन्व्हेंटगुजरी’ हिंदीला तरुणांची भाषा म्हणून लोकांच्या डोक्यावर लादले जात आहे (मराठीप्रमाणेच!)
हिंदी भाषा सर्व भारतीयांवर लादण्यात येत आहे, स्थानिक भाषांना पुरेसा वाव मिळत नाही, अन्य भाषकांची गळचेपी केली जाते, वगैरे मुद्दे आणून हिंदी विरुद्ध अन्य भारतीय भाषा असे एक चित्र उभे करण्याचा अधूनमधून प्रयत्न होतो. अनेक मराठी भाषकही हिरीरीने त्यात सहभागी होऊन हिंदीच्या विरोधातील आपला रोष प्रकट करतात; मात्र हिंदीचे आणि या अन्य भाषांचे दुखणे एकच आहे, ही गोष्ट फारशी समजून घेतली जात नाही.
खरे तर भारतीय भाषांपुढील खरे आव्हान इंग्रजीचे आहे. बहुतेक भाषांमधील वृत्तपत्रांमध्ये किंवा माध्यमांत महिन्यातून एखादा तरी लेख त्या-त्या भाषेच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करणारा असतो. इंग्रजीच्या हत्तीला प्रत्येक आंधळा आपापल्या पद्धतीने पाहतोय आणि त्याचा दोष मात्र कोणावर तरी टाकायचा म्हणून हिंदीला झोडपतोय, असे हे चित्र आहे.
या संदर्भात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार पाहण्यासारखे आहेत. ‘संस्कृतनिष्ठ हिंदी हीच भारताची राष्ट्रभाषा असावी, असे मी म्हणतो, याचे मुख्य कारण ती भाषा एकंदरीत अखिल भारतात बहुजन समाजाने इतर कोणत्याही भाषेतून अत्यधिक प्रमाणात बोलली जाते, समजली जाते, लिहिली जाते आणि ती इतर कोणत्याही रीतीने राष्ट्रीय विचारांच्या विकासाला व प्रगतीला साहाय्यभूत होण्यास कोणत्याही प्रकारे अक्षम नाही. ही दोन्ही लक्षणे हिंदीस इतर कोणत्याही प्रांतिक भाषेपेक्षा अधिक लागू आहेत... खरे पाहता ती अशीच हिंदुस्थानची राष्ट्रबोली झालेली आहे. रामेश्वरापासून काश्मीरपर्यंत आज दोन सहस्र वर्षे झाली. लाखो हिंदू प्रवासी तीर्थयात्री, व्यापारी जे जात येत, दळणवळण ठेवीत आले ते या हिंदी बोलीच्या बळावरच काय ते... हिंदीची वृत्तीही वरचढ नाही. महाराष्ट्राच्या हाताचा प्रेमाधार घेऊनच ती राष्ट्रभाषा पदावर चढत आहे,’ असे स्वा. सावरकर म्हणतात.
हिंदी ही अत्यंत झपाट्याने पसरत चाललेली भाषा आहे. तिच्या रेट्यापुढे अनेक स्थानिक भाषा भेदरलेल्या दिसतात, हे खरे आहे. परंतु ‘अर्थस्य पुरुषो दासः’ हे जेवढे खरे, तेवढेच ‘अर्थस्य भाषा दासी’ हेही खरे आहे. जास्तीत जास्त लोक जी भाषा बोलतात आणि जास्तीत जास्त लोकांची मागणी जी असेल, त्या भाषेचा वरचष्मा राहणारच आणि ती मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न होणारच. मागणी तसा पुरवठा हा बाजाराचा नियमच आहे. या बाजारावर वरचष्मा असलेल्यांच्या हिशेबाने भाषेचा प्रवाह चालतो आहे, चालणार. बाजारातील भांडवलाच्या थैल्या ज्यांच्या हातात आहेत त्यांना आपल्या भाषेचा मूळ पोत जपण्याची मातब्बरी वाटत नाही. परंतु जे बाजाराच्या प्रवाहात पतित झालेले नाहीत त्यांनी तरी स्वभाषेची पर्वा केलीच पाहिजे.