Ad will apear here
Next
चीनची संस्कृती


‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ 
या सदराचा १९वा भाग...
.....
चीनमधल्या शांघाय या लोकप्रिय शहरात फिरत असताना अचानक एका पुतळ्याशी येऊन थांबले... पुतळा चिनी वाटला नाही; पण तिन्हीसांज असल्याने नीट ओळखूही येईना... गडद अंधार झाल्यावर तिथले दिवे प्रकाशमान झाले आणि अभिमानाने व समाधानाने ऊर भरून आला. तो पुतळा रवींद्रनाथ टागोर यांचा होता.

चीनकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन लक्षात घेता आणि एकंदरच त्यांच्या संस्कृतीविषयी आपल्याला असलेली अनभिज्ञता लक्षात घेता असा पुतळा सापडणे, हा सुखद धक्का होता. असे धक्के चीनमध्ये वावरल्यावर वारंवार बसतात आणि दोन्ही देशांना जोडणारे काही तरी आहे, अशी भावना सतत मनात येत राहते.

रवींद्रनाथ टागोर आणि चीन यांचे वेगळे नाते होते. त्यांनी चीनमध्येही मोठे कार्य केले. त्यांच्या विपुल साहित्याचे चिनी भाषेत भाषांतर झालेले आहे आणि त्याचा आजही अभ्यास केला जातो. चिनी मंडळी त्यांच्या कवितांच्या आजही प्रेमात आहेत. या कविता त्यांना मनःशांती आणि आध्यात्मिक शक्ती देतात. भारत आणि चीन यांच्यादरम्यान सांस्कृतिक संवाद वाढीस लागण्यासाठी योगदान असलेला महान कवी आणि विचारवंत अशी चीनमध्ये त्यांची ख्याती आहे. १९१५मध्ये टागोर यांचे साहित्य चीनमध्ये पोहोचले. त्यांच्या लेखनाचा प्रभाव इतका जबरदस्त होता, की त्यांच्या लेखणीचा ठसा चीनमधल्या नव्या सांस्कृतिक चळवळीवर उमटला. चीनमधील आधुनिक लेखकांच्या लेखनावरही टागोर यांचा प्रभाव दिसून येतो. याबरोबरच चीन आणि भारत यांना जोडणारे आणखी एक नाव म्हणजे डॉ. कोटणीस. 

फेसबुक, गुगल यांचा अभाव, भाषेची अडचण, राजकीय मतभेद अशा अनेक कारणांनी चीन आपल्याला अत्यंत अनोळखी वाटतो. काहींना तो शत्रू वाटतो. बंद डब्याविषयी जशी उत्सुकता चाळवली जाते आणि तर्कवितर्कांना उधाण येते त्याप्रमाणे चीनच्याही बाबतीत काही अंशी होत असल्याचे वाटते. आपल्याकडच्या बऱ्याचशा वस्तू चीनमध्ये तयार होतात किंवा चीन आपल्याला भरपूर निर्यात करतो, यापलीकडे आपले चीनविषयीचे ज्ञान क्वचितच जाते. त्यामुळेच इंग्लंड, अमेरिका, रशिया, युरोप अशा देशांची आपल्याला जितकी माहिती आहे, तितकी चीनची नक्कीच नाही. तिथले प्रांत, पर्यटनस्थळे, वाहतूकव्यवस्था, शिक्षणपद्धती, संस्कृती याविषयी आपण फार गप्पा मारू शकत नाही. कारण त्या बंदिस्त असलेल्या भव्य देशामध्ये काय काय दडलेले आहे, हे आपल्याला नीटसे माहितीय कुठे?

आपल्याप्रमाणेच चिनी लोकही निरनिराळे सण साजरे करत असतात. आपल्याला गंमत वाटेल अशा वेगवेगळ्या संकल्पना आणि रीती असणारे त्यांचे सण असतात. आपल्याला फार फार तर चिनी नववर्ष माहीत आहे किंवा लाल कंदील, आकाशात सोडले जाणारे दिवे आणि ड्रॅगन इतकेच माहीत आहे; पण त्यांच्या संस्कृतीमध्ये डोकावले तर आपल्याप्रमाणेच वेगवेगळे सण, त्यामागील भूमिका आणि ते साजरे करण्याची पद्धत लक्षात येईल. तसेच, आपल्या आणि त्यांच्या संस्कृतीतली अनेक प्रकारची समानताही लक्षात येईल. पूर्वजांना आदरांजली, माता-पित्याचे ऋण, वृद्धांची काळजी, निसर्गाची साथ, ऋतूंचे भान, खाद्यपदार्थांची रेलचेल, रोषणाई, घराची साफसफाई आणि त्यानंतर सजावट, नवीन कपड्यांची खरेदी, कुटुंबकबिल्याचे एकत्र जमणे, मोठ्यांचे आशीर्वाद घेणे, लहानांना प्रेमाने भेटवस्तू आणि भरपूर आशीर्वाद देणे... अशा असंख्य गोष्टी त्यांच्याही संस्कृतीमध्ये आहेत.

उदाहरण द्यायचे तर, चीनमध्ये डबल नाइन्थ फेस्टिव्हल साजरा केला जातो. हा फेस्टिव्हल त्याच्या नावाप्रमाणे वर्षातल्या नवव्या महिन्याच्या नवव्या दिवशी साजरा होतो. या दिवशी पूर्वजांना श्रद्धांजली वाहिली जाते. पर्वतारोहण केले जाते. वाढदिवस साजरा करताना दीर्घ आयुष्याची मनोकामना करण्यासाठी भाताच्या लांबच्या लांब नूडल्स केल्या जातात. त्यांच्याकडे मूर्तिपूजा दिसून येत नाही; पण ते नास्तिकही नाहीत. त्यांच्याकडेही मंदिरे आहेत. शुभ-अशुभ या संकल्पना फार आहेत. जसे, ४ हा आकडा अशुभ मानला जातो, तर ८ हा आकडा शुभ मानतात. ४ नंबरची हॉटेलमधली खोली कमी पैशांतही मिळू शकते आणि ८ नंबरसाठी दुप्पट पैसे द्यावे लागू शकतात, इतक्या त्यांच्या भावना तीव्र आहेत.

मराठी मंडळ
परदेशामध्ये मराठी किंवा महाराष्ट्र मंडळे कार्यरत आहेत, याचा बोलबाला खूप आहे. ही मंडळे भारतातले सण तिथे दणक्यात साजरे करतात. परदेशामध्ये आपल्या भूमीतले कोणी भेटले की मोठा आधार वाटतो. चीनमध्येही असे काही घडत असेल का, हाही अनेकांना पडणारा प्रश्न आहे. चीनमध्येही मराठी मंडळ आहे आणि तेही सक्रिय आहे. परदेशात गेल्यावर भारतीय जेवणाची आठवण आली तर कुठे ना कुठे भारतीय हॉटेल सापडते. तसेच चीनमध्येही घडते. विशेषतः दक्षिण चीनमध्ये भारतीय ढंगाची हॉटेल आहेत. भारतीयांना लागणारे जेवणाचे साहित्य, खाद्यपदार्थ विकणारी दुकानेही इथे आहेत. त्यांची संख्या इंग्लंड-अमेरिकेत आहे तितकी नसली, तरी ती आहेत हे मात्र नक्की.



शिकायला आलेले विद्यार्थी 
अमेरिका, युरोप, इंग्लंड, गेली काही वर्षे रशिया, याबरोबरच चीनमध्येही जाऊन उच्च शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी आहेत. त्यांच्याबरोबरच, कंपनीच्या कामानिमित्त वास्तव्य करणारे, व्यापारानिमित्त राहायला गेलेले, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या करणारे, भारतीय कंपन्यांमध्ये किंवा बँकांमध्ये नोकरीला असलेले भारतीयही चीनमध्ये बहुसंख्य आहेत. हे प्रमाण इतर प्रसिद्ध देशांच्या तुलनेत कमी असेल; पण चीनमध्ये जाऊन आपण राहू शकतो, हे केवळ दिवास्वप्न नाही. राजकीय व सुरक्षेच्या कारणानेही भारतीयांना चीनमध्ये अडचणी येत नाहीत. चिनी लोक काहीही खातात, कसेही जगतात, असा समज सर्वसामान्यांमध्ये आहे. पण, आपल्याला जे हवंय ते खाऊन चीनमध्येही राहता येते. 

चीनमध्ये शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. चीनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या २०१९ मध्ये २३ हजार होती आणि त्यातले वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी २१ हजार होते. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) चीनमध्ये घेतलेली मेडिकल डिग्री भारतात ग्राह्य धरण्यास सुरुवात केल्यापासून, म्हणजे २००३पासून चीनमधल्या वैद्यकीय विद्यापीठांमध्ये भारतीयांची संख्या विशेष वाढू लागली. २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये भारताने चीनमधील ४५ विद्यापीठे व महाविद्यालये येथून घेतलेल्या इंग्रजी भाषेतल्या पदव्यांना मान्यता दिली आहे. उत्तम सोयीसुविधा, प्रयोगशाळा व उपकरणे, तुलनेने कमी खर्च यामुळे चीनला जायची विद्यार्थ्यांची तयारी असते. 

थोडक्यात, कोणत्याही देशाकडे किंवा दोन देशांच्या संबंधांकडे पाहण्याचे अनेक पैलू असू शकतात. खरी परिस्थिती आपल्यापर्यंत येणाऱ्या माहितीपेक्षाही वेगळी असू शकते. तसा दृष्टिकोन आपण विकसित करायला हवा. 

- गौरी देशपांडे
ई-मेल : gouri@ewan.co.in

(लेखिका चिनी भाषेच्या तज्ज्ञ असून, पुण्यातील इवान बिझनेस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मँडरिन बिझनेस डाटा अॅनालिस्ट म्हणून कार्यरत आहेत.)

(‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UWOYCR
Similar Posts
व्यावसायिकतेची बीजे चीनमध्ये पूर्वीपासूनच रुजलेली... चीनची व्यापारविषयक आकडेवारी, चलनविषयक घडामोडी, तिथल्या कंपन्यांचा विस्तार, गुंतवणूक यावर नजर टाकली, की एखाद्या ऑक्टोपसप्रमाणे चीनचे पाय किती विस्तारले आहेत, याची कल्पना येते. इतिहासावर नजर टाकली, तर गेल्या अनेक शतकांच्या इतिहासामध्ये चीन हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक अविभाज्य घटक राहिल्याचे लक्षात येते
आफ्रिकेच्या साधनसंपत्तीवर चीनचा डोळा अनेक कारणांनी चीनचा आफ्रिकेवर डोळा आहे. आफ्रिकेचे मोक्याचे स्थान, तेलाचे साठे, दुर्मीळ धातू, मासे या गोष्टी मिळवण्यासाठी चीनला आफ्रिकेला हाताशी धरायचे आहे. तसेच, आफ्रिकेला पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मदत करणे असा मुखवटा चीनने पांघरला असला, तरी चीनला जागतिकीकरणाच्या पुढच्या टप्प्यात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी आफ्रिकेची गरज लागणार आहे
युरोपमध्येही ‘मेड इन चायना’ चिनी वस्तू भारताच्या कानकोपऱ्यात पोहोचल्यात... चिनी उत्पादकांनी भारतीय संस्कृतीचा बारकाईने अभ्यास करून सणासुदीसाठी लागणाऱ्या इत्थंभूत वस्तू बनवल्यात आणि भारताला निर्यात केल्यात... चायनीजच्या गाड्या अगदी खेड्यापाड्यांतही दिसून येतात... अशी आपली निरीक्षणे आणि अनेकदा तक्रार असते; पण सगळीकडे चिनी छाप असलेला भारत हा एकमेव देश नाही
चिनी माल स्वस्त का? चिनी वस्तू स्वस्त असतात, हे जणू समीकरणच तयार झाले आहे. महागाई भस्मासुरासारखी वाढत असल्याचे चटके आपल्याला सारखे बसत असताना, उत्पादनाची सगळी गणिते चीन जुळवतो तरी कशी? इतक्या स्वस्त दरामध्ये वस्तू विकणे चीनला शक्य तरी कसे होते, असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होणे अतिशय स्वाभाविक आहे. ‘जगभर झिरपलेल्या चीनचे अंतरंग’ या सदराचा १२वा भाग

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language